बुलडाणा : शेतकऱ्यांसाठी हे वर्ष सर्वसाधारणच राहिल तर देशाची सत्ता स्थिर राहिल, असं भाकित भेंडवळच्या भविष्यवाणीतून करण्यात आलं. पाऊस, पीक परिस्थिती, हवामान, राजकीय, आर्थिक आणि सामाजिक परिस्थिती याचा वेध घेणारी विदर्भासह संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेली बुलडाण्यातील भेंडवळची घटमांडणी दरवर्षीप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झाली.

भेंडवळ भविष्यवाणी - (पाऊसमान/हवामान)
- पहिला महिना साधारण पाऊस, कुठे कमी, कुठे जास्त...सार्वत्रिक पाऊस होणार नाही.
- दुसरा महिना चांगला पाऊस होईल.
- तिसरा महिना कमी जास्त पाऊस होईल, मात्र पहिल्या महिन्याच्या तुलनेत नक्कीच जास्त पाऊस पडेल.
- चौथा महिना मात्र लहरी स्वरुपाच्या पावसाचा राहील.
- यावर्षी अवकाळी पाऊस पडणे शक्य आहे.
- नैसर्गिक आपत्ती येण्याची शक्यता आहे. सागरी किनारपट्टीवर संकटं येऊ शकतात, भूकंपासारखी आपत्तीही शक्य.
- चारा-पाण्याची टंचाई येईल



भेंडवळ भविष्यवाणी - (पीकपाण्याबद्दलचं भाकित)
- अंबाळी - मोघम, रोगराई नाही.
- कापूस - मोघम उत्पादन असून भाव मध्यम राहिल.
- ज्वारी - पीक सर्व साधारण येईल, भावात तेजी मात्र राहणार नाही.
- गहू - पीक मोघम स्वरुपाचे राहिल.
- तांदूळ - मोघम उत्पादन होईल.
- तूर - पीक चांगलं राहिल.
- मूग - मोघम उत्पादन राहिल.
- उडीद - सर्वसाधारण उत्पादन राहिल.
- तीळ - मोघम स्वरुपाचे उत्पादन राहिल.
- भादली - रोगराई शक्य.
- बाजरी - उत्पादन सर्व साधारण असले तरी भावात तेजी राहिल.
- हरभरा - सर्व साधारण स्वरुपाचे उत्पादन राहिल.

मागील वर्षाचा कौल : राजा गादीवर कायम, पाऊस सर्वसाधारण, भेंडवळची भविष्यवाणी

भेंडवळ भविष्यवाणी - (संरक्षणाबद्दलच भाकित)
परकीय घुसखोरी होत राहणार. मात्र, भारतीय संरक्षण भक्कम राहून चोख प्रतिउत्तर देईल.

भेंडवळ भविष्यवाणी (राजकीय भाकित)
घटमांडणी केली गेली तिथे सत्तेचे प्रतीक असलेले पान आणि विडा (सुपारी) कायम आहे. पान स्थिर असून त्यावरील नाणंही कायम आहे. सुपारी मात्र किंचित हललेली आहे. त्यामुळे सत्ता स्थिर राहू शकेल असे संकेत आहेत.

भेंडवळ भविष्यवाणी - (आर्थिक भाकित)
घटमांडणीमध्ये ठेवलेली करंजी पार हललेली आहे, त्यामुळे देशाला आर्थिक संकटांना सामोरे जावं लागू शकतं, असा भेंडवळमधील अंदाज आहे.



भेंडवळमध्ये भविष्यवाणी कशी केली जाते?
भेंडवळची घट मांडणी अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर सायंकाळी करण्यात येते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सूर्यास्तापूर्वी गावाबाहेरील शेतात घटाची आखणी करुन, त्यात घागर, मातीचे ढेकळे, पापड, पुरी, सांडोळी, कुरडी, पान आणि त्यावर सुपारी, गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ बाजरी, तांदूळ, अंबाडी, वाटाणा, सरकी, मसूर, करडी असे एकूण 18 प्रकारच्या धान्याची प्रतिकात्मक मांडणी केली जाते.

पृथ्वीचे प्रतिकात्मक स्वरुपातील पुरी, समुद्राचं प्रतिक म्हणून घागर आणि त्यावर पापड, वडा, पावसाळ्याचे प्रतिक म्हणून मातीचे ढेकळे, वडा, पानसुपारी यांचीही मांडणी केली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी घटमांडणीमधील बदलांचे निरीक्षण करुन भाकित वर्तवलं जातं.