आंतरजातीय विवाह केल्याने, मुलगी आणि जावयाच्या अंगावर रॉकेल टाकून त्यांना पेटवून दिले होते. यात मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता तर जावयावर पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पारनेर तालुक्यातील निघोज इथे ही घटना घडली होती. या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी या आधीच मुलीचे काका आणि मामा यांना अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी असलेला मुलीचा बाप रामा भरतीया हा फरार होता.
रुक्मिणी रणसिंग असं मृत मुलीचं नावं असून जावयाचं नाव मंगेश रणसिंग आहे. मंगेश आणि रुक्मिणी यांनी सहा महिन्यांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. पण हा विवाह रुक्मिणीच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. त्यामुळे तिच्या माहेरच्यांनी रागातून रुक्मिणीला तिच्या पतीसह अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं.
लग्नानंतर सहा महिन्यांनी मुलगी माहेरी राहायला आली होती. तिचा नवरा भेटण्यासाठी तिथे आला होता. यावेळी मुलीचे वडील, काका आणि मामा यांनी मंगेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर रुक्मिणी त्याच्यासोबत जाण्यासाठी निघाली असता, तिघांनी त्यांना एका खोलीत डांबलं आणि अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिलं. दोघांना उपचारांसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु गंभीर भाजल्याने मुलीचा मृत्यू झाला होता तर जावयावर उपचार सुरु आहेत.