Buldana: तूर काढण्याच्या मशीममध्ये पाय अडकल्यानं 20 वर्षीय तरुणाचा मृत्यू झालाय. ही घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील भालेगाव परिसरात आज (30 जानेवारी) दुपारी घडलीय. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजलीय. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आलीय. दरम्यान, 20 वर्षाचा मुलगा गमवल्यानंतर कुटुंबावर दुख:चं डोंगर कोसळलंय. 


पवन श्रीराम बावस्कर असं मृत्यू झालेल्या तरूणाचं नाव आहे. पवन हा बुलढाणाच्या मलकापूर येथील भालेगाव परिसरातील रहिवाशी आहे. दरम्यान, पवन आज दुपारी तूर काढण्याच्या मशीनवर काम करीत होता. संपूर्ण तूर काढून झाल्यावर अगदी शेवटच्या क्षणी त्याचा मशीनमध्ये पाय अडकला. ज्यामुळं तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर स्थानिकांनी त्याला ताबडतोब मलकापूर येथील रुग्णालयात दाखल केले. परंतु, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ही बातमी समजताच भालेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


अहमदनगर: रस्ता अपघातात आरपीएफ जवानाचा मृत्यू
अहमदनगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे नगर-दौंड रोडवर ऊसाच्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा आणि चारचाकी गाडीची जोरदार धडक झाली. या अपघातात दौंड येथे कार्यरत असलेल्या आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झालाय. करांडे हे दौंड वरून आपल्या गावाकडे निघाले होते. पहाटेच्या सुमारास ऊसाने भरलेला ट्रॅक्टर रोडने जात असताना ट्रॅक्टरचा अंदाज न आल्याने ट्रॅक्टर आणि चार चाकीची धडक झालीय. या धडकेत आरपीएफ जवान बाबा कारंडे यांचा मृत्यू झाला आहे. यामुळे दौंड रेल्वे पोलीस दलात शोककळा पसरली आहे.



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha