सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील बांदा सटमटवाडी या ठिकाणी तब्बल 89 जिवंत गावठी बॉम्ब, बंदुकीच्या दोन नळ्या आणि रिकामी चार काडतुसं पोलिसांना आढळली आहे. प्राथमिक तपासांत हे सर्व साहित्य शिकारीच्या उद्देशाने ठेवले असल्याचं समोर आलं आहे. तसंच हे सर्व बाळगल्याप्रकरणी अक्षर सादिक खान याला पोलिसांनी ताब्यात देखील घेतलं आहे. ही कारवाई बांदा पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाकडून संयुक्तपणे करण्यात आली आहे.


या प्रकरणी संशयितावर बांदा पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात या सर्व साहित्याचा विशेषत: बॉम्बचा साठा नेमका कसा आणि कशासाठी ठेवण्यात आला होता, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दहशतवादविरोधी पथक, बॉम्बशोधक आणि नाशक पथक तसंच श्वान पथकाला त्याठिकाणी आणलं होतं. ज्यानंतर 'शेरा' या श्वानाने बॉम्बच्या वासाच्या सहाय्याने घराशेजारी रचण्यात आलेल्या लाकडाच्या माचाखाली ठेवण्यात आलेला गावठी बॉम्बचा साठा शोधून काढला. पोलिसांनी तेथून हे सर्व गावठी बॉम्ब जप्त केले. तर वाळत ठेवलेले काही बॉम्ब त्यांना आढळून आले आहेत. यात तब्बल 89 गावठी बॉम्बसह राहत्या घरातून दोन बंदुकीच्या नळ्या, चार रिकामी काडतुसे आणि बंदुकीसाठी वापरण्यात येणारं इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या शेजारील गोवा राज्यात विधानसभा निवडणूकीची रणधुमाळी सुरू असतानाच सीमाभागात सिंधुदुर्ग पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.


हे ही वाचा - 




LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha