Amol Kolhe on Budget 2024: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitaraman) यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. देशातील अनेक राज्यांसह बिहार आणि आंध्र प्रदेशसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून महाराष्ट्रासाठी विशेष कुठलीही घोषणा केलेली नसल्याने राज्यातील विविध नेत्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून यंदाचा अर्थसंकल्प हा सरकार टिकवण्यासाठी केलेला केविलवाणा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया खासदार अमोल कोल्हे( Amol Kolhe) यांनी दिली आहे.
'घालीन लोटांगण वंदीन बिहार, डोळ्याने पाहिलं आंध्र माझे, दुर्लक्षून राष्ट्र उपेक्षून महाराष्ट्र सरकार वाचवेन म्हणे नमो' असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी बजेटवर विडंबनात्मक कविता करत बजेटमध्ये बिहार आणि आंध्रप्रदेश ला खैरात वाटल्याचा ठपका ठेवत महाराष्ट्राला उपेक्षित ठेवल्याचा आरोप करत त्यांनी आपला संताप व्यक्त केला.
सरकार वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न
यंदाचा अर्थसंकल्प हा सरकार वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे. जेडीयू आणि टीडीपी या दोन कुबड्यांचा आधारावर म्हणजेच या दोन पक्षांच्या ज्या काही मागण्या होत्या त्या पूर्ण करून आंध्र प्रदेश आणि बिहारला खैरात देण्याचा हा प्रयत्न आहे. त्यांना अधिक निधी मिळाला यात दुःख वाटण्याचे कारण नाही.पण त्याचवेळी देशात सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पान पुसली आहेत.
ट्रिपल इंजिन सरकार काय करतंय?
आंध्र प्रदेश आणि बिहारला निधी दिला याचे दुःख नाही पण सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला पान पुसली आहेत. जे ट्रिपल इंजिनचे सरकार महाराष्ट्रात आहे, जे वारंवार वेगवेगळ्या कामांसाठी दिल्ली दौरे करतात, ते ट्रिपल इंजिन सरकार नेमकं काय करताय असा सवाल खासदार अमोल कोल्हे यांनी केला. या ट्रिपल इंजिन सरकारची या सरकारमध्ये काही भूमिका आहे की नाही? आणि जर ती असेल तर महाराष्ट्राच्या वाट्याला घसघशीत निधीचं दान का पडलं नाही असा सवालही त्यांनी केला. याचे उत्तर खरंतर महायुतीच्या नेत्यांनीही देणं गरजेचं असल्याचं म्हणत महाराष्ट्राची निराशा करणारा हा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.
बिहारमध्ये बनवणार रस्त्यांचे जाळे, बजेटमध्ये 26 हजार कोटींची तरतूद
केंद्र सरकारने 2024 च्या अर्थसंकल्पात बिहारला मोठी भेट दिली आहे. अर्थमंत्री सीतारामन यांनी बिहारला आर्थिक मदत जाहीर केली आहे. बिहारच्या बोधगयामध्ये आम्ही औद्योगिक विकासाला चालना देऊ, असे अर्थमंत्र्यांनी यावेळी सांगितलं आहे. त्यामुळे पूर्व विभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे. रस्ते जोडणी प्रकल्पांच्या विकासातही आम्ही सहकार्य करू. पाटणा-पूर्णिया द्रुतगती मार्ग, बक्सर-भागलपूर महामार्ग, बोधगया-राजगीर-वैशाली-दरभंगा आणि बक्सरमध्ये गंगा नदीवर अतिरिक्त द्विपदरी पूल 26,000 कोटी रुपये खर्चून बांधण्यात येणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बिहारमध्ये नवीन विमानतळ, वैद्यकीय सुविधा आणि क्रीडा पायाभूत सुविधांची घोषणा केली. याशिवाय राज्यातील महामार्गांसाठी आणखी 26 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आंध्र प्रदेशला अर्थसंकल्पात 'मोठी भेट', केंद्र नवीन राजधानीसाठी 15000 कोटी देणार
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंध्र प्रदेशच्या नवीन राजधानीसाठी 15,000 कोटी रुपयांची घोषणा केली आहे. टीडीपीकडून अमरावतीला आंध्र प्रदेशची राजधानी बनवायची आणि विकसित करायची आहे, त्यासाठी त्यांना १५ हजार कोटी रुपये देण्यात यावेत, अशी मागणी सातत्याने होत होती. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील टीडीपी सरकारला केंद्र सरकारने सहमती दर्शवली असून आता अर्थसंकल्पात नवीन भांडवलाच्या बांधकामासाठी निधीची घोषणा केली आहे. अमरावती विजयवाड्याजवळ वसलेले आहे. अमरावतीला सुरवातीपासून तयार केले जात आहे.
हेही वाचा: