Breaking News LIVE : पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांचा विरोध
Breaking News LIVE Updates, 09 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. यंदाही पालखी सोहळा हा एसटीतूनच पंढरपूर जावा, अशी मागणी राज्य सरकार, आळंदी देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. दुसरी लाट परदेशातून आली, पण तिसऱ्या लाटेला आपण जबाबदार ठरायला नको. कुंभमेळा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक, ग्रामपंचायत निवडणुकांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. तेव्हा पायी वारीचा अट्टाहास वारकरी संप्रदायाची अवहेलना आणि बदनामीला कारणीभूत ठरेल. असं ग्रामस्थांनी निवेदनात म्हटलंय.
मुंबईत आज 788 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 511 रुग्ण कोरोनामुक्त, सध्या मुंबईत 15947 अॅक्टिव्ह रुग्ण
निगडीच्या अमरधाम स्मशानभूमीमध्ये अनेक त्रुटी आणि हलगर्जीपणा निदर्शनास आला असा आरोप करत महापौर माई ढोरे यांनी प्रत्यक्षात जाऊन पाहणी केली आणि प्रशासनास कारवाईचे आदेश ही दिलेत. अमरधाम स्मशानभूमीबाबत काही तक्रारी येत होत्या. अर्धवट अवस्थेत जळालेले मृतदेह राहत असल्याने, मृतदेहाची विटंबना होते. म्हणून इथं दिले जाणारे सरपण साहित्य कसे आहे, याची पाहणी महापौरांनी केली
निलंगा नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आठ महीने झाले वेतन मिळाले नाही त्यामुळे या कर्मचाऱ्याने नगरपरिषद आवारात आज पहाटे आत्महत्या केल्याचं सांगण्यात येतंय. आत्महत्या करणारा कर्मचारी हा 32 वर्षापासून कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून काम करत होता.
मुंबई आयआयटीने यंदा जगातील विद्यापीठ संस्थांमध्ये 177 वं स्थान मिळवलं आहे. मागील वर्षी आयआयटी मुंबईने 172 वं स्थान मिळवलं होतं. परंतु यंदा घसरण झाली आहे. असं असलं तरी देशात पहिल्या स्थानावर आयआयटी मुंबईने आपलं स्थान कायम ठेवलं आहे. क्यूएस (क्वाकरेली सायमंड) ही ब्रिटिश कंपनी दरवर्षी जगातील टॉप विद्यापीठ शैक्षणिक संस्था यांच्या रँक जाहीर करते. यावर्षी सुद्धा या रँक जाहीर करण्यात आल्या असून आयआयटी मुंबईला 100 पैकी 46.4 गुण मिळाले आहेत. अॅकेडमिक, रेप्युटशन, एम्प्लॉयर रेप्युटशन या सगळ्याचा विचार करुन जगभरातील विद्यापीठांना गुण दिले जातात.
केंद्राच्या कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलनाला महाविकास आघाडी सरकारने पाठिंबा दिलं होता. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी काँग्रेस पक्ष ज्या राज्यात सत्तेत आहे तिथे शेतकऱ्यांना पूरक असा कायदा करावा अशा सूचना दिल्या होत्या. राज्यात याबाबत उपसमिती देखील स्थापन झाली होती. राज्यातील कृषी कायदा कसा असावा याबाबत आज माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्याबरोबर बैठक होणार आहे. बैठकीला बाळासाहेब थोरात,राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे असणार आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार आहे
आषाढी यात्रेच्या वेळी श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांच्यासह विविध संतांच्या पालख्यांचे शेवटच्या मुक्कामाचे ठिकाण असलेल्या वाखरी ( ता.पंढरपुर ) ग्रामपंचायतीने यंदाचा पालखी सोहळा गतवर्षी प्रमाणे प्रातिनिधीक स्वरुपात साजरा करण्याची मागणी केली आहे. याबाबतचे लेखी पत्र आळंदी संस्थानला पाठवण्यात आले आहे , अशी माहिती वाखरीच्या सरपंचानी दिली आहे
प्रेम प्रकरणातून रेखा जरे यांची बाळ बोठे यांनी हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. बाळ बोठे आणि रेखा यांचे प्रेमसंबंध होते, त्यांच्यामध्ये वाद झाले आणि बदनामी होऊ नये म्हणून हत्या केल्याची माहिती अहमदनगर पोलिसांनी दिली आहे. बाळ बोठे यांच्यासह सात आरोपींच्या विरोधात पारनेर न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रात पोलिसांनी हे नमूद केलं आहे.
अकोल्यात काल सायंकाळपासून झालेल्या मुसळधार पावसाने न्यू तापडिया नगर येथील क्रांती चौक परिसरातील नाल्याचा काही भाग वाहून गेल्याने दुसऱ्या बाजूस असलेले नागरिकांचे घर व नागरिक त्यामध्ये फसले होते. त्यांना सकाळी नगरसेवक व माजी महापौर विजय अग्रवाल यांच्या मदतीने अग्निशामक दलाच्या जवानांनी दोर बांधून सुरक्षित स्थळी आणण्यात आलं आहे.
आशिया खंडातील कांद्याची सर्वात मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच मोठा बदल करण्यात आला आहे. बाजार समितीच्या स्थापनेपासून दर अमावस्येला बंद राहणारे कांदा आणि धान्य लिलाव यापुढे सुरु राहणार आहेत. अनेक वर्षाची ही परंपरा आता बंद होणार आहे. अमावस्येला कांदा लिलाव सुरु करावेत अशी मागणी होत होती. अखेर बाजार समिती प्रशासन, संचालक आणि व्यापारी यांच्यात चर्चा होऊन अमावस्येला बाजार समितीमधील लिलाव सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या 75 वर्षांपासून प्रचलित असलेला या परंपारिक अंधश्रद्धेच्या जोखडातून बाजार समिती आता मुक्त झाली आहे. त्यामुळे अमावस्येच्या दिवशी एका सत्रात आता बाजार समितीत लिलावाचे काम सुरु राहणार असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
पेण : रायगड जिल्ह्यातील पेणमध्ये तयार होणाऱ्या गणेशमूर्ती महाराष्ट्रासह परदेशातही मोठ्या प्रमाणात पाठवल्या जातात. गणेश उत्सवानिमित्ताने पेणमधून थायलंडला गणेशमूर्ती रवाना झाल्या आहेत.
परभणी : यंदा परभणी जिल्ह्यात मृग नक्षत्राला पावसाने हुलकावणी दिली. मात्र मृग नक्षत्राच्या दुसऱ्या दिवशी जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसलाय. मध्यरात्री 2 वाजल्यापासून परभणीसह जिल्हाभरात जोरदार पाऊस झालाय. पहाटेपासून पावसाचा जोर कमी होत सर्वत्र रिपरिप सुरु आहे. यामुळे पाहिल्याचं पावसात अनेक छोटी मोठी नाले वाहत आहेत. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचायला ही सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज अधिकृत पावसाळा सुरु झाल्याचा भास परभणीकरांना येतोय.
मुंबईसह उपनगरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. सायन, मानखुर्द, चेंबूरमध्ये मुसळधार पाऊस असून ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईतही पावसाच्या सरी कोसळत आहेत. तर
साताऱ्यातील फलटणमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनातून बरा होऊन घरी आलेल्या युवकाला त्याच्याच मृत्युची माहिती फोनवर देण्यात आली. या सर्व धक्कादायक प्रकारामुळे आरोग्य यंत्रणेतील एक भोंगळ कारभार समोर आला आहे. फलटण येथील मंगळवार पेठेत राहणारा 20 वर्षाचा युवक सिध्दांत भोसले याच्या मोबाईलवर आरोग्य सेविकेचा फोन आला. सिध्दांतचा मृत्यू झाला आहे. त्याला इतर काही आजार होता का? आणि त्याच्या बद्दलची माहिती घ्यायची आहे. असे सांगण्यात आले. आता मलाच माझ्या मृत्यूची माहिती कशी काय देत आहेत, असे म्हणत सिध्दांतने त्याच्या आईला फोन दिला. तेव्हाही सिध्दांत गेल्याची माहिती त्याच्या आईला देत इतर प्रश्नावली सुरु केली. सिध्दांतची आई भडकली आणि त्यांनी फलटण ग्रामीण रुग्णालयात जाऊन संबंधित परिचारिकेशी संवाद साधला असता सिध्दांतचे नाव मृत यादित 46 व्या नंबरला असल्याचे दिसून आले. ज्याच्या मृत्युचे ऑडिट करायचे होते तोच स्वत: रुग्णालयात आल्यामुळे रुग्णालयातील सर्वांचीच तंतरली. सिध्दांत 7 मे रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्याला फलटण मधीलच भोकरे दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तर पाच दिवसानंतर त्याला घरी सोडण्यात आले होते. आता या सिध्दांतची ही चुकिची नोंद नेमकी कशी झाली हे मात्र अद्याप समजलेले नाही.
पार्श्वभूमी
खासगी रुग्णालयांमधील कोरोना लसीच्या दराबाबत मंगळवारी आरोग्य मंत्रालयाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केली आहेत. यानुसार, ऑक्सफोर्ड-अॅस्ट्रजेनिकाच्या कोविशिल्ड, भारत बायोटेकची कोवॅक्सिन आणि रशियाची स्पुटनिक-व्ही या लसींसाठी खासगी रुग्णालयांना जीएसटी आणि सेवा करासहित निश्चित रकमेपेक्षा जास्त शुल्क आकारता येणार नाही. कोविशिल्ड लसीला जास्तीत जास्त 780 रुपये, कोवॅक्सिनसाठी 1410 रुपये आणि स्पुतनिक लसीसाठी 1145 रुपये शुल्क आकारले जाऊ शकते, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
सेवा शुल्क 150 रुपयांपेक्षा जास्त असू शकत नाही
आरोग्य मंत्रालयाने सांगितले की, कोविड लसीकरण कार्यक्रमासाठी सुधारित मार्गदर्शक सूचना 8 जून रोजी देण्यात आल्या आहेत. त्यात म्हटले आहे की सर्व लसी उत्पादकांना खासगी रुग्णालयांच्या लसीची किंमत जाहीर करावी लागेल. त्यात काही बदल झाल्यास त्याची माहिती अगोदरच द्यावी लागेल. खासगी रुग्णालये एकाच डोससाठी सेवा शुल्क म्हणून जास्तीत जास्त 150 रुपये आकारू शकतात. राज्य सरकार या किंमतींवर नियंत्रण ठेवू शकतात.
आरोग्य मंत्रालयाने पुढे सांगितले की, कोविशिल्ड लस उत्पादक कंपनीने तिची किंमत 600 रुपये जाहीर केली आहे. यात 30 रुपये जीएसटी आणि सेवा शुल्क 150 रुपये जोडल्याने एकूण किंमत 780 रुपये होते. त्याचप्रमाणे कोवॅक्सिन लस उत्पादक कंपनीने त्याची किंमत 1200 रुपये जाहीर केली आहे. पाच टक्के दराने 60 जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्क मिळून त्याची किंमत 1410 रुपये झाली आहे. तर स्पुतनिक-व्ही लसीची किंमत 948 निश्चित केली आहे. यात जीएसटी 47.40 रुपये जीएसटी आणि 150 रुपये सेवा शुल्क मिळून त्याची एकूण किंमत 1145 रुपये होते.
Maharashtra Corona Cases : कोरोनाची लाट ओसरतेय; राज्यात काल 10 हजार 891 रुग्णांची नोंद, 16 हजार रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात काल गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोना रुग्णसंख्येची नोंद झाली आहे. काल राज्यात 10 हजार 891 नवीन कोरोना बाधित रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात 16,577 रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण 55,80,925 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.35% एवढे झाले आहे. दरम्यान काल 295 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के इतका आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,69,07,181 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 58,52,891 (15.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 11,53,147 व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत तर 6,225 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरांटाईनमध्ये आहेत. राज्यात काल रोजी एकूण 1,67,927 सक्रीय रुग्ण आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -