Breaking News LIVE : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कल्पिता पिंपळे यांच्या प्रकृतीची विचारपूस
Breaking News LIVE Updates, 3 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.
ताई, तुमच्या बहादुरीचे वर्णन कोणत्या शब्दात करू...तुम्ही चिंता करू नका लवकर बरे व्हा, हल्लेखोरांवर निश्चित कडक कारवाई केली जाईल असे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ठाणे महापालिकेच्या सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्याशी बोलताना सांगून त्यांना धीर दिला.
फेरीवाल्यांविरुद्ध कारवाई करताना श्रीमती पिंपळे यांच्यावर हल्ला झाला होता. त्यासध्या रुग्णालयात उपचार घेत असून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीत एकूण 50.41 टक्के मतदान झाले. 113396 पुरुष तर 103764 महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण 217160 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
सोलापूर : जिल्ह्यात सलायनमध्ये झुरळ निघाल्याचा दावा रुग्णाच्या नातेवाईकाने केलाय. बार्शीतील डॉ.जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकाने केलाय. निहिरा नीरज पुराणिक या तीन वर्षीय बालिकेला 27 ऑगस्टला ब्रॉकायटीस आणि निमोनियाचा त्रास होत असल्याने डॉ. जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावरती हॉस्पिटलमध्ये व्यवस्थित उपचार देखील सुरु होते. मात्र त्यातील एक सलायन ठराविक कालावधीनंतर नंतर बंद पडत होता. तेव्हा या सलाईन बॉटलची तपासणी केल्यानंतर त्यात चक्क झुरळ आढळल्याचा आरोप रुग्णाच्या नातेवाईकानी केलाय. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी. तसेच या बॅचमधील आणखी किती बॉटल रुग्णांना दिले गेलेत याची ही चौकशी व्हावी अशी मागणी नातेवाईकांनी केलीय. दरम्यान निहिरा पुराणिक हिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला असून तिची तब्येत सध्या व्यवस्थित असल्याची ही माहिती आहे.
भाजपचे नेते किरीट सोमय्या, भाजप आमदार नितेश राणे ओरोस मध्ये सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांची भेट, संचयनी घोटाळ्यासंदर्भात चर्चा
जवळपास 20 मिनिटं झाली चर्चा, संचयनी घोटाळा संदर्भात पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याशी केली चर्चा झाल्याची माहिती,
संचयनी घोटाळा संदर्भात ठेवीदारांच्या किती तक्रारी आल्या आणि पोलीसांच्या तपासा संदर्भातील जाणून घेतली माहिती
Provident Fund News : केंद्र सरकारच्या वतीनं नवे आयकर नियम जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार, कर्मचाऱ्यांची भविष्य निधी खाती दोन स्वतंत्र खात्यांमध्ये विभागली जाणार आहेत. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स अर्थात सीबीडीटीनेही यासंदर्भात अधिसूचना जारी केली आहे. यासोबतच सरकार आता वार्षिक 2.5 लाख रुपयांवरील ठेवींवर कर आकारणार आहे. अधिसूचनेनुसार, भविष्य निधि खात्यांवर मिळणारं व्याज मोजण्यासाठी केंद्र सरकार वेगळा विभागही उघडणार आहे. सर्व विद्यमान कर्मचारी भविष्य निधी (ईपीएफ) खाती करपात्र आणि करपात्र योगदान खात्यांमध्ये विभागली जातील.
कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 29 लाख 03 हजार 289
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 20 लाख 63 हजार 616
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 99 हजार 778
एकूण मृत्यू : चार लाख 39 हजार 895
एकूण लसीकरण : 67 कोटी 9 लाख 59 हजार लसीचे डोस
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 29 लाख 3 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 20 लाख 63 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाख आहे. एकूण 3 लाख 99 हजार 778 रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत.
Indian Stock Market Records : भारतीय शेअर मार्केटमध्ये सातत्यानं तेजी पाहायला मिळत आहे. शेअर मार्केटनं पुन्हा एकदा इतिहास रचला आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्स 58 हजारांच्या पार पोहचला आहे. शुक्रवारी सुरुवातीच्या सत्रात, सेन्सेक्स 217 अंकांनी उसळी घेत 58,069 वर पोहोचला. तर निफ्टी 66.20 गुणांनी वाढून 17,300 वर पोहोचला आहे. एका दिवसापूर्वी बीएसई सेन्सेक्स गुरुवारी 514 गुणांनी वाढून नव्या उंचीवर पोहोचला होता. तर NSE निफ्टी देखील 157.90 अंकांनी वाढून 17,234.15 च्या सर्वोच्च पातळीवर बंद झाला होता.
संघ परिवारातील विविध 36 संघटनांची अखिल भारतीय समन्वय बैठक आजपासून नागपूर सुरू झाली आहे. दोन दिवस चालणाऱ्या या बैठकीत विविध संघटनांचे संघटनात्मक सचिव हे उपस्थित राहणार आहे. विशेष म्हणजे भाजपचे राष्ट्रीय महासचिव बी एल संतोष हे ही या बैठकीत उपस्थित राहणार आहे. संघाच्या विविध संघटनांमधील आपापसातील समन्वय, सोपवलेल्या कामाची पूर्तता आणि पुढील वर्षी करावयाच्या कामाचे नियोजन असं या बैठकीचा अजेंडा असणार असून वार्षिक पातळीवर होणारी ही बैठक यावर्षी नागपुरात होत असल्याने त्यास एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. कोरोना काळात केलेले सेवाकार्य आणि सोबतच उत्तरप्रदेश सह विविध राज्यातील आगामी विधानसभा निवडणुका हे पाहता ते मुद्देही या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत स्वतः या बैठकीत विविध संघटनांच्या कामांचा आढावा घेणार आहे.
बेळगाव महापालिकेसाठी तब्बल आठ वर्षांनंतर मतदान,
58 प्रभागात 385 उमेदवार रिंगणात, सत्तेची चावी मतदारांच्या हाती,
आज सकाळी 7 पासून मतदानास झाला प्रारंभ,
बेळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला सकाळी सात वाजता प्रारंभ झाला. सात वाजल्यापासून मतदान केंद्रावर मतदार दाखल झाले आहेत. सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. प्रथमच महापालिका निवडणुकीत मतदान यंत्रांचा वापर करण्यात आला आहे. भाजप, काँग्रेस, आप, एमआयएम,जेडीएस आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत.
पुणे-बंगलोर महामार्गावरील सातारा जिल्ह्यातील खंबाटकी बोगद्याजवळ तेलाचे डबे आणि तेलाच्या पिशव्या घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने संपूर्ण रस्त्यावर तेलाचा मोठा साठा आला होता. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असला तरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात तेल पसरले होते. इतर वाहने घसरू नयेत म्हणून म्हणून ब्रॅकेट लावून पोलिस वाहतूक धिम्यागतीने करून घेतली. या ट्रक मधील जास्त प्रमाणात तेल हे घाटातुन दरीत गेले. पोलिसांनी रस्त्यावर माती आणि पाणी टाकून रस्त्यावरचे तेल काढण्याचा प्रयत्न केला आहे.
परभणीत शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासह 7 जणांवर नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी काल केले होते धरणे आंदोलन.
पार्श्वभूमी
राज्यात काल 4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, रिकव्हरी रेट 97. 04 टक्क्यांवर
राज्यात काल 4,342 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 755 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 81 हजार 985 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97. 04 टक्के आहे.
राज्यात काल 55 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 50 हजार 607 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 660 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (59), नंदूरबार (2), धुळे (23), जालना (19), परभणी (49), हिंगोली (60), नांदेड (28), अकोला (23), वाशिम (5), बुलढाणा (60), यवतमाळ (13), नागपूर (82), वर्धा (4), भंडारा (6), गोंदिया (2), गडचिरोली (32) या 17 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 43,27,469 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,73,674 (11.92 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2,87,385 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1,971 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
दिवसअखेर इंग्लंडची 3 बाद 53 धावांपर्यंत मजल, तर भारताचा पहिला डाव 191 धावांवर गुंडाळला
इंग्लंड विरोधातील चौथ्या कसोटी सामन्याला आजपासून सुरूवात झाली आहे. पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने पहिल्या डावात 3 बाद 53 धावा केल्या आहेत. तर भारतीय संघाला फक्त 191 धावांपर्यंत मजल मारता आली आहे. भारताकडून फक्त शार्दुल ठाकूरने चांगली कामगिरी केली आहे. शार्दुलने 36 बॉलमध्ये तीन षटकार आणि सात चौकार मारत 57 धावा केल्या. या शिवाय कर्णधार विराट कोहलीने 50 धावा केल्या. तर दुरीकडे इंग्लंडच्या क्रिस व्रोक्सने सर्वाधिक चार विकेट घेतले तर ओली रॉबिन्सननी तीन विकेट घेतले.
मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतलंय, मला थोडासा वेळ द्या, राष्ट्रपतींचं संभाजीराजेंना आश्वासन
मराठा आरक्षणाचा प्रश्न राष्ट्रपतींपुढे मांडून मराठा समाजाला असलेली आरक्षणाची गरज व समाजाच्या भावना राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपतींनी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह महाराष्ट्रातील चारही प्रमुख पक्षांचे प्रतिनिधी देखील होते.
राष्ट्रपतींच्या भेटीनंतर खासदार संभाजीराजे छत्रपती पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेत संभाजीराजे म्हणाले, आम्ही सविस्तर पद्धतीने आमची बाजू मांडली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तरपणे ऐकून घेतली आहे. राजर्षी शाहू हे आरक्षणाचे जनक असे उद्गार राष्ट्रपतींनीही काढले. दुर्गम आणि दूरवर भागात राहणाऱ्या लोकांसाठी आरक्षण असा जो कायद्यात शब्द आहे. तो बदलण्याची विनंती या भेटी दरम्यान केली. "मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे. मला या विषयी अभ्यासासाठी थोडासा वेळ द्या", असं राष्ट्रपती म्हणाले आहेत.
शाळा दिवाळीपूर्वी सुरू करणार की दिवाळीनंतर याचा निर्णय दोन दिवसात, बच्चू कडू यांची माहिती
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दीड वर्षांपासून शालेय शिक्षणाचं वेळापत्रक विस्कळीत झालं आहे. पण काही राज्यं मात्र या स्थितीतून हळूहळू सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. देशातील अनेक राज्यात योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू करण्यात आल्या. राजधानी दिल्लीत देखील कालपासून शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. परंतु अद्याप महाराष्ट्रातील शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. परंतु माहिती शिक्षण राज्य मंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी शाळा सुरू होण्यासंदर्भातील निर्णय येत्या दोन दिवसात घेतला जाईल, अशी माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -