Breaking News LIVE : राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकीचा बेबनाव
Breaking News LIVE Updates, 2 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा आणि इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.
परभणी - शिवसेनेचे खासदार संजय जाधव, आमदार डॉ. राहुल पाटील, काँग्रेस आमदार सुरेश वरपूडकर यांच्यासह 7 जणांवर गुन्हा दाखल , जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रतिबंधात्मक आदेशाचे केले उल्लंघन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी काल केले होते धरणे आंदोलन, धरणे आंदोलनाचे संयोजक म्हणुन गुन्हा दाखल, शहरातील नवा मोंढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जुन्या पुणे मुंबई महामार्गावरील बोरघाटात चारचाकी गाडी दरीत गेली. तर एक टेम्पो वरतीच पलटी झालाय. दरीत गेलेल्या गाडीचे चालक सुखरूप असून त्याला वरती घेण्यासाठी बचावकार्य सुरू आहे. काहीवेळापूर्वी बोरघाटातील खिंडीत ही घटना घडली. टेम्पोची धडक लागल्याने कार दरीत गेली असण्याचा महामार्ग वाहतूक पोलिसांचा अंदाज आहे. दोन्ही वाहन पुण्याहून मुंबईला जात होती. चालकाला वरती घेतल्यानंतरच नेमकं काय घडलं हे समोर येईल.
राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात एकीचा बेबनाव केला आहे. भाजपचे खासदार राष्ट्रपतींना भेटायला तर गेले, निवेदनावर सही करायला मात्र टाळाटाळ केली. राष्ट्रपतींना निवेदन सादर होईपर्यंत भाजप खासदारांची सही नाही. निवेदन सादर झाल्यावर राष्ट्रपतींनीही विचारलं यावर तुमची सही का नाही? त्यानंतर भाजप खासदारांनी निवेदनावर सही केली.
ईडीच्या अनेक ठिकाणी धाडी टाकल्या आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेशी संबंधित ठिकाणी सात ठिकाणी धाडी टाकण्यात आल्या. मुंबई आणि इतर ठिकाणी देखील धाडी टाकल्या.
आरक्षणाची आजवरची सर्व स्थिती राष्ट्रपतींना नमूद केली. सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी सविस्तर पणे ऐकून घेतली. राजर्षी शाहू आरक्षणाचे जनक असेही उद्गार राष्ट्रपतींनी काढले. मी तुमचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतले आहे, मला थोडासा वेळ द्या असं राष्ट्रपती म्हणाले, ही माहिती खासदार संभाजीराजे छत्रपतींनी दिली.
भाजपचे सिंधुदुर्गातील नगरसेवक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत थोड्याच वेळात शिवसेनेत प्रवेश करणार
गडचिरोली जिल्ह्यात अवैध जंगलतोडीची घटना समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्याने केले 50 एकर जंगल साफ, पोर्ला वनपरिक्षेत्रातील चुरचुरा गावातील घटनेने वनविभागात खळबळ, 7 एकर खाजगी जमीन विकत घेत आजूबाजूचे 50 एकर जंगल जेसीबीने टाकले तोडून
खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र शिष्टमंडळ राष्ट्रपतींना भेटणार आहे. राष्ट्रपतींच्या भेटीआधी नेत्यांची एकत्रित चर्चा झाली. शिवसेनेकडून विनायक राऊत भाजपकडून रणजितसिंह निंबाळकर राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण तर काँग्रेसकडून संग्राम थोपटे भेटणार आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून मिळालेल्या विहिरीचे काम पूर्ण केल्यावरही त्याच बिल काढण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्याकडून सहायक कार्यक्रम अधिकाऱ्यांने 3 हजारांची लाच मागितल्याचा प्रकार मोताळा पंचायत समितीमध्ये उघडकीस आला आहे. लाभार्थी शेतकाऱ्यानेच लाच मागतानाचा व्हिडीओ बनवून त्याची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्याकडे केली आहे. अध्यापही संबंधित अधिकाऱ्यावर कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. जिल्ह्यात हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अंबरनाथ : शहरातील सोसायटीमधील कचरा उचलणे पालिकेने अचानक केले बंद, सहा दिवसांपासून सोसायट्यांमध्ये साचले कचऱ्याचे ढीग, सोसायटीमध्ये पसरली दुर्गंधी, महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्याला घेराव
महाराष्ट्राच्या राजकारणात पाठीत खंजीर खुपसणारा एकच चेहरा होता आता दोन चेहरे झालेत अशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर चंद्रकांत पाटलांनी टीका केली होती. चंद्रकांत पाटलांनी केलेली ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शरद पवार यांचा वरील भाष्य हे वास्तववादी असल्याचे मत राज्याच्या पंचायतराज समिती दौऱ्यावर असणारे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष व शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलेय.यात ते म्हणाले की शरद पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहलय की शेतकऱ्यांना त्यांचा शेतीमाल कुठेही विकता आला पाहिजे,परंतु ज्यावेळी कृषी विषयक सभागृहात अली त्यावेळी मात्र त्यास मूक संमती दिली.त्यांनी सत्तेसाठी काँग्रेस पक्षासोबत हातमिळवणी केली अनेकांना सत्तेसाठी चकवा दिला,त्यांची जी कुटणीती आहे ही महाराष्ट्राला परिचित आहे. म्हणून देशपातळीवरील राजकारणात शरद पवारांना अथवा त्यांच्या एखाद्या घोषणेला फारसे महत्व दिल्या जात नाही.कारण शरद पवार हे चकवा देणारे राजकारणी आहेत हे देशपातळीवरील राजकारण्यांना माहीत झालेय.त्यामुळे उद्धव ठाकरे व शरद पवारांची चाल महाराष्ट्राला माहीत झाली आहे.
पत्नी, सासू-सासरे आणि मेहुण्याच्या त्रासाला कंटाळून शरद नरेंद्र भोसले (वय 30) या व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पुण्याच्या धनकवडी परिसरात हा प्रकार घडला. आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सुसाईड नोट लिहिली असून त्यात पत्नी, सासू सासरा आणि मेहुण्याच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. या प्रकरणी पत्नी, प्रियंका, सासू नंदा, सासरा शंकर शिंदे आणि मेहुणा मनीष उर्फ गणेश शंकर शिंदे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 48 हजार फेसबुक अकाऊंट गेल्या सात महिन्यात हॅकर टोळ्यांनी हॅक केले आहेत. यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा देखील समावेश आहे. अँड्रॉइड वरील अॅप्स डाउनलोड केल्याने गोपनीय डेटा चोरीला जात आहे अशी माहिती राज्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक यशस्वी यादव यांनी दिली आहे आता राज्यभरात सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर दिला जातोय. व्हीआयपी फोटो, प्रोसेसिंग फोटो, रवीश क्लीनर, होरोस्कोप डेली, ॲप लॉक मॅनेजर, ॲप लॉक, ॲप लॉक मास्टर, होरोस्कोप ,पाय फिटनेस डाऊनलोड केले असतील तर तातडीने फेसबुकचा पासवर्ड बदला असा आवाहन यशस्वी यादव यांनी केला आहे
Chandan Mitra Passes Away : राज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार चंदन मित्रा यांचं काल रात्री दिल्लीत निधन झालं. त्यांचा मुलगा कुशान मित्रानं यासंदर्भात माहिती दिली. मित्रा यांनी पायोनियरचे संपादक म्हणूनही काम पाहिलं आहे. चंदन मित्रा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत पोहोचले होते. परंतु, 2018 मध्ये त्यांनी भाजपची साथ सोडत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. चंदन मित्रा यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
'द पायोनियर'चे संपादक आणि दोन वेळा भाजपकडून राज्यसभेवर निवडून गेलेले खासदार डॉ. चंदन मित्रा यांचं निधन झालं.
मुंबई आणि आसपासच्या परिसरात पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. पार्किंगची जागा असेल तरच नवं वाहन खरेदीची परवानगी द्यायला हवी असं मत व्यक्त करत लोकांना परवडंतय म्हणून एका कुटुंबाला 4 ते 5 गाड्या ठेवण्याची परवानगी का देता?, असा थेट सवाल गुरूवारी मुंबई उच्च न्यायालयानं उपस्थित केला. मुंबईसारख्या दाटावटीनं वललेल्या शहरात हल्ली दोन इमारतींच्या मधल्या रस्त्यांवर कार पार्किंगमुळे चालायलाही जागा नसते. गाड्यांची संख्याच इतकी प्रचंड वाढलीय की, बहुमजली पार्किग लॉट्सही आता तोकडे पडू लागलेत. त्यामुळे आता प्रशासनानं अंडरग्राऊंड बहुमजली पार्किंगचा गांभीर्यानं विचार करायला हवा. असं मत या सुनावणी दरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केलं.
मात्र लोकांच्या वाहन खरेदीवर कायद्यानं कुठलंही बंधन घातलेलं नाही, असं यावेळी सरकारी वकिलांनी हायकोर्टात सांगितलं. यावर पुढच्या सुनावणीत तुमचं उत्तर प्रतिज्ञापत्रावर सादर करा असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं दिले आहेत. पार्किंगसाठी जागा नसल्याने लोकं रस्ते आणि फुटपाथासारख्या सार्वजनिक ठिकाणी गाड्या पार्क करतात ज्याचा फटका ट्राफिकला बसतो. वारंवार तक्रार आणि निर्देश देऊनही नवी मुंबई महापालिकेनं यावर काहीच उपाययोजना केली नाही. त्यामुळे अखेरीस सामाजिक कार्यकर्ता संदीप ठाकूर यांनी याविषयावर हायकोर्टात याचिका दाखल केलेल्या याचिकेवर गुरूवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी पार पडणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पात 144.06 द.ल.घ.मी. पाणीसाठा असून धरणाची पातळी 519.90 मी पर्यंत वाढली असल्याने रात्री प्रकल्पाचे तीन दरवाजे 10 सेंटीमीटरने उघडले आहेत. सध्या प्रकल्पातून 1092.01 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग खडकपूर्णा नदीत सुरू असून नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील मेघोली लघुपाटबंधारा फुटला असून त्यात एका महिलेचा मृत्यू झाला तर अनेक जनावरं दगावली अशी माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापनने दिली आहे. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास आऊटलेट शेजारून बंधारा फुटल्याची ग्रामस्थांची माहिती आहे. बंधारा फुटल्याने शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून अनेक घरांत पाणी शिरलं. मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर पडल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
पार्श्वभूमी
गणेशोत्सवासाठी मुंबई पोलीस सज्ज; मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई तर गणपती मंडळांसाठीसुद्धा नियम
गणपतीच्या आगमनाला फक्त काही दिवस शिल्लक आहेत. या दरम्यान मुंबईतील सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जेणेकरून लोकांमध्ये कोरोनाच्या नियमांचा काटेकोरपणे पालन करण्यात येईल. गुरुवारपासून मुंबई पोलीस मास्क न घालता रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर कारवाई करणार आहेत. बुधवारी सह आयुक्त कायदा आणि सुव्यवस्था विश्वास नांगरे पाटील यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सूचना दिल्या आहेत, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या हद्दीत मास्क न घालणाऱ्या नागरिकांवर कारवाई करण्यास सांगितलं आहे.
यासह, मुंबई पोलिसांनी गणेशोत्सवाचं आयोजन करणाऱ्यांना भक्तांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचं आवाहन गणेशोत्सव मंडळांना केलं आहे. याशिवाय जर भक्तांना मंडळाला भेट द्यायची असेल आणि गणपतीचं दर्शन घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी टोकन यंत्रणेची व्यवस्था करा जेणेकरून जास्त गर्दी होणार नाही, असंही मुंबई पोलिसांच्या वतीनं आवाहन करण्यात आलं आहे.
अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी सीबीआयच्या ताब्यात, 20 मिनिटांच्या चौकशीनंतर सुटका
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे जावई गौरव चतुर्वेदी यांना सीबीआयने ताब्यात घेतलं होतं. सीबीआयने 20 मिनिटे त्यांची चौकशी केली आणि त्यांची सुटका केली. मात्र त्यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. सीबीआयचा प्राथमिक चौकशी अहवाल देशमुख यांनीच लीक केल्याचा सीबीआयला संशय आहे. या प्रकरणात गौरव चतुर्वेदी आणि आनंद डागा यांचं नाव समोर आल्याचं बोललं जात आहे. काही अधिकाऱ्यांचाही यात हात असल्याचीही शक्यता आहे.
गौरव चतुर्वेदी यांचे वकील आनंद डागा यांना सीबीआयने अटक केली आहे. आनंद डागा यांच्यावर संशय आहे की सरकारी अधिकाऱ्यांचा वापर करुन त्यांनी हा चौकशी अहवाल लीक केला आहे. म्हणूनच त्यांची सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. तसेच राज्य सरकारच्या काही अधिकाऱ्यांचीही नावंही समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यांची चौकशी सीबीआयकडून होण्याची शक्यता आहे.
काश्मीरमधील फुटिरतावादी हुर्रियत नेते सय्यद अली गिलानी यांचे 92व्या वर्षी निधन
हुर्रियत कॉन्फरन्स (जी) चे माजी अध्यक्ष आणि फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचं वयाच्या 92 व्या वर्षी निधन झालं. बुधवारी श्रीनगरमध्ये आपल्या राहत्या घरी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांच्या छातीत दुखत असून त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता. जम्मू -काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून दुःख व्यक्त केले असून कुटुंबियांप्रति संवेदना व्यक्त केल्या.
मेहबूबा मुफ्ती यांनी म्हटलं की, "गिलानी साहेबांच्या निधनाच्या वृत्तानं दुःखी झालेय. आम्ही बर्याच गोष्टींवर सहमत होऊ शकलो नाही, पण मी ठामपणे आणि दृढ विश्वासानं आपल्या भूमिकांवर ठाम राहिल्याबद्दल त्यांच्या आदर करते. अल्लाह त्यानां जन्नत देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि हितचिंतकांना संवेदना."
सप्टेंबर अखेरपर्यंत कोविड रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक होणार : अस्लम शेख
कोरोना व्हायरसच्या तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून उपाययोजना सुरु केल्या आहेत. आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोविडच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यात आला. सप्टेंबर अखेरपर्यंत कोविड रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक होणार असल्याची माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असताना नाईट कर्फ्यू, संचारबंदी जमाव बंदी लागू केली जाऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र तूर्तास नाईट कर्फ्यु, संचारबंदी,जमावबंदीची गरज नाही, असं अस्लम शेख यांनी सांगितलं. टास्क फोर्सने सांगितल्यानुसार सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोना रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. रुग्णसंख्या वाढली तर निर्बंध कडक करण्याची गरज आहे, असंही त्यांनी म्हटलं.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -