Breaking News LIVE : साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर!

Breaking News LIVE Updates, 16 September 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 16 Sep 2021 11:14 PM
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर!

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर! राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड. जगदीश सावंत यांची उपाध्यक्षपदी निवड. 12 जणांचे विश्वस्त मंडळ गेझेट काढून जाहीर.

केंद्राने त्यांचे कर कमी करावेत, राज्यांच्या कर वसुलीच्या अधिकारांवर गदा आणू नये: अजित पवार

पेट्रोल-डिझेलला जीएसटीच्या अंतर्गत आणण्याची चर्चा सुरु आहे, केंद्राने केंद्राचे काही कर कमी करण्याचा विचार करावा, राज्यांच्या कर वसुलीच्या अधिकारांवर गदा का आणता असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केंद्र सरकारला केला आहे. लखनऊमध्ये जीएसटी कौन्सिलची बैठक का घेता? असा सवाल विचारल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उद्या होणारी बैठक ही व्हिडिओ कॅान्फरन्सवर घ्या अशी मागणी केली आहे. 


 

युतीसाठी भाजप हाच उत्तम पर्याय; संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांचं वक्तव्य

संभाजी ब्रिगेडला निवडणुकीसाठी युती करण्यासाठी भाजप हाच पर्याय असल्याच संभाजी ब्रिगेडचे प्रमुख पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलय.  मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या राजकीय आघाडीकडून प्रकाशीत होणाऱ्या मराठा मार्ग या मासिकात लेख लिहून पुरुषोत्तम खेडेकर यांनी त्यांची ही भुमिका मांडलीय.  संभाजी ब्रिगेड स्थापन होऊन 32 वर्ष झाल्यानंतर संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या राजकारणात उतरायच ठरवल असून आगामी महापालिका निवडणुकांच्या तयारीला लागा अशी सुचना या लेखातून संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना करताना भाजप हाच युती करण्यासाठी पर्याय असल्याच पुरुषोत्तम खेडेकर यांनी म्हटलय.  संभाजी ब्रिगेडची सामाजिक आणि राजकीय भुमिका ही नेहमीच भारतीय  जनता पक्षाच्या विरोधात राहिलीय.  


मात्र दुसरीकडे पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या 15 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्य़ातील चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार राहिल्यात.  त्यामुळे अनेक मुद्यांवर पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात दिसत असली तरी त्यांचा भाजपसोबत नेहमीच घरोबा राहिलाय.  मधल्या काळात संभाजी ब्रिगेडमधे फुट पडून पुरुषोत्तम खेडेकर यांच्या नेतृत्वाखालील संभाजी ब्रिगेडच्या गटाने राजकीय पक्ष म्हणून निवडणुक लढवायच ठरवल तर प्रविण गायकवाड यांच्यासोबत असलेल्या संभाजी ब्रिगेडच्या दुसऱ्या गटाने सामाजिक संघटना म्हणून काम करायच ठरवलय.  पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाला युती करण्यासाठी दिलेल्या या निमंत्रणाला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणं महत्त्वाच असेल.

शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी वर्धा नदीत बुडालेल्यांपैकी आणखी 5 जणांचे मृतदेह सापडले

अमरावतीच्या वर्धा नदीत बुडालेल्यांपैकी आणखी पाच जणांचे मृतदेह सापडले. शोध मोहिमेच्या तिसऱ्या दिवशी एक महिला, एक पुरुष आणि एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. अकरा जणांपैकी आठ जणांचे मृतदेह सापडले असून तिघांचा शोध अजूनही सुरूच आहे.



दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून चौकशीत दिशाभूल, सूत्रांची माहिती

दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून चौकशीत दिशाभूल केली जात आहे. दहशतवाद्यांनी आतापर्यंत दिलेल्या माहितीत बरीच तफवत आहे. आता पोलीस समोरासमोर बसवून चौकशी करणार आहेत. 


 


शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राविरोधात साक्ष देणार

शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राविरोधात साक्ष देणार आहे. पॉर्न फिल्म रॅकेटप्रकरणी गुन्हे शाखेकडून राज कुंद्रा, रेयान थॉपविरोधात 1 हजार 467 पानांचं आरोपपत्र, आरोपपत्रात शिल्पा शेट्टीसह एकूण 43 साक्षीदारांची नावं आहेत. 


 


सलग आठव्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर

भारतीय बाजारात आज म्हणजेच, गुरुवार (16 सप्टेंबर) पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही. नव्या किमतींनुसार, सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेल दोघांच्याही किमती स्थिर आहेत. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. 


महत्त्वाची बाब म्हणजे, कच्च्या तेलाच्या किमतीत सातत्यानं वाढ होत आहे. अशातच देशात मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. तेल कंपन्यांनी मुंबईसह सर्व मोठ्या शहरांसाठी बुधवारी नवे दर जारी केले आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती ग्राहकांना नुकसान पोहोचवत आहेत. परंतु, हे गेल्या बऱ्याच दिवसांमध्ये पहिल्यांदाच असं झालंय की, सलग 15 दिवस पेट्रोलच्या किमतीत कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दरम्यान, देशभरात आजही पेट्रोल-डिझेलच्या दरांनी ऐतिहासिक उंची गाठली आहे. 

परमबीर सिंह यांनी राज्य सरकारनं त्यांच्याविरोधात सुरू केलेल्या कायदेशीर चौकशीला आव्हान देत दाखल केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली

 परमबीर सिंह यांना चौकशीच्या प्रकरणात दिलासा देण्यास हायकोर्टानं नकार दिला आहे. परमबीर सिंह यांनी त्यांच्याविरोधातील चौकशीला आव्हान देत दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. या याचिकेत केलेल्या मागण्यांबाबत हायकोर्ट निर्णय देऊ इच्छित नाही. त्यामुळे परमबीर यांनी योग्य त्या लवादापुढे जाऊन दाद मागावी. तसेच लवादानं हायकोर्टाच्या कुठल्याही निर्देशांच्या प्रभावाखाली न राहता स्वतंत्र सुनावणी घेत यावर निर्णय द्यावा असे निर्देश न्यायमूर्ती एस.एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन.ज. जमादार यांच्या खंडपीठानं आपल्या निकालात दिले आहेत. खंडपीठानं 26 जुलै रोजी यासंदर्भात आपला निकाल राखून ठेवला होता.

देशातील कोरोनाबाधितांचा गेल्या सहा दिवसांतील आकडा

10 सप्टेंबर : 33,376
11 सप्टेंबर : 28,591
12 सप्टेंबर : 27,254
13 सप्टेंबर : 25,404
14 सप्टेंबर : 27,176
15 सप्टेंबर : 30,570

देशात 4 दिवसांनी कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत वाढ

कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत चढ-उतार सुरुच आहे. देशात चार दिवसांनी पुन्हा एकदा दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत काहीशी वाढ झाल्याचं दिसून आल. गुरुवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 30,570 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 431 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 38,303 रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. 

मिस्टर इंडिया बॅाडीबिल्डर मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न

मिस्टर इंडिया बॅाडीबिल्डर मनोज पाटीलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यापूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये अभिनेता साहिल खान हा आपल्या आत्महत्येला कारणीभूत असल्याचं म्हटलं आहे. 

नांदेड जिल्ह्यात मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त जिल्ह्यात 75 हजार व्यक्तींना कोविड लसीकरणाचा जिल्हा प्रशासनाचा संकल्प

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व मराठवाडा मुक्ती संग्राम दिन याचे औचित्य साधून जिल्ह्यात 17 सप्टेंबर रोजी 75 हजार लसीकरणाचा संकल्प जिल्हा प्रशासनाच्यावतीने घेतला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव व यामूळे गत दिड वर्षात बाधितांना सोसावे लागणारे कष्ट लक्षात घेता अधिकाधिक लसीकरण करण्याशिवाय तरणोपाय नसल्याचे अवघ्या जगाच्या लक्षात आले आहे. जिल्हा प्रशासनाने विविध संस्थाच्या माध्यमातून लसीकरणासाठी व्यापक मोहिम हाती घेतली असून सार्वजनिक गणेश मंडळानाही यात पुढाकाराचे आवाहन केले आहे.

पार्श्वभूमी

दहशतवाद्यांचा घातपाताचा कट उधळल्यानंतर मुंबई 'हायअलर्ट'वर; मुंबई लोकलच्या सुरक्षेसाठी नवं मॉडल उभारणार
मुंबईत एका संदिग्ध दहशतवाद्याला अटक केल्यानंतर सर्वच तपास यंत्रणा कामाला लागली आहे. हा दहशतवादी मुंबई लोकलमधून प्रवास करून दिल्लीला जात असल्यानं मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत देखील हायअलर्ट दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर काल (बुधवारी) आरपीएफचे आयुक्त जितेंदर श्रीवास्तव, रेल्वे पोलीस आयुक्त कैसर खालिद आणि मध्य रेल्वेचे विभागीय संचालक शलभ गोयल यांच्यात एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मुंबई लोकलच्या सुरक्षेबरोबरच महिलांच्या सुरक्षेबाबत देखील ॲक्शन प्लान तयार करण्यात आलेला आहे. तसेच लोकलच्या सुरक्षेसाठी एक नवीन मॉडेल तयार करण्यात येत असल्याची माहिती एबीपी माझाला सुत्रांनी दिली आहे.


राज्य सरकार ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढणार
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यातील पाज जिल्हा परिषदेत निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानंतर ओबीसी राजकीय आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला. राज्य सरकारने ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला आहे. या अध्यादेशानंतर आता ओबीसी समाजाला काही ठिकाणी 27 टक्के, काही ठिकाणी 20 टक्के आणि काही ठिकाणी 4 टक्के आरक्षण मिळेल, अशी माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर छगन भुजबळ यांनी बैठकीतील निर्णयाची माहिती दिली.


स्पुटनिकच्या सिंगल डोस लसीला भारतात तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी DCGI ची मंजुरी
स्पुटनिक लाईट सिंगल डोस लस लवकरच देशात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने बुधवारी भारतात स्पुटनिक लाइट लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचणीसाठी परवानगी दिली आहे. स्पुटनिक लाइट ही सिंगल डोस कोविड -19  लस रशियामध्ये बनली आहे. मेडिकल जर्नल द लॅन्सेटमध्ये असे म्हटले होते की कोविड - 19 विरूद्ध स्पुटनिक लाईटची ही लस 78..6 ते 83.7 टक्के प्रभावी आहे. जे की दोन डोस लसींपेक्षा जास्त आहे. 


जुलैमध्ये, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) च्या  सबजेक्ट एक्पर्ट कमिटीने स्पुटनिकचा इमर्जन्सी वापर करण्यास परवानगी नाकारली आणि देशात रशियन लसीच्या तिसऱ्या टप्प्याच्या चाचण्या घेण्याची गरज असल्याचे सांगितले. कमिटीने नमूद केले की स्पुटनिक- V मध्ये स्पुटनिक लाइटमध्ये समान घटक वापरले जातात आणि चाचणी दरम्यान भारतीय लोकसंख्येवरील सुरक्षा आणि प्रतिकारशक्ती बाबतचा डेटा समोर आला आहे.


पुणे वाहतूक पोलिसांच्या कारवाईचा राग; पुणेकरानं चक्क उभारलं दुचाकीचं स्मारक!
इरेला पेटलेले पुणेकर काय करतील याचा नेम नाही. रस्त्याच्या कडेला उभी केलेली दुचाकी वाहतूक पोलिसांनी नो पार्किंगची कारवाई करत उचलल्याच्या रागातून एका पुणेकराने चक्क त्या दुचाकीच स्मारक उभारलंय, तेही रस्त्याच्या कडेला. सचिन धनकुडे असं या पुणेकरचं नाव असून त्यांनी कोथरूडमध्ये उभारलेल हे दुचाकीचं स्मारक सध्या चर्चेचा विषय बनलंय.


काही दिवसांपूर्वी सचिन धनकुडेंनी त्यांची दुचाकी रस्त्याच्या कडेला लावून काम करण्यासाठी निघून गेले. काही वेळाने ते जेव्हा परत आले तेव्हा गाडी जागेवर नव्हती. वाहतूक पोलीस गाडी चौकीला घेऊन गेल्याचं समजल्यावर ते चौकीत गेले आणि वादाला सुरुवात झाली. आपली गाडी नो पार्किंगमध्ये नव्हतीच असा त्यांचा दावा होता. पोलीस मात्र मानायला तयार नव्हते. मग मात्र धनकुडेनमधला पुणेकर जागा झाला आणि त्यांनी कोथरूडमधील पौड रस्त्यावर भर चौकात आपल्या गाडीचं स्मारक करायचं ठरवलं.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.