Breaking News LIVE : नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्यास विरोध
Breaking News LIVE Updates, 08th May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे असा प्रस्ताव सिडको मार्फत मंजूर करण्यात आला असून राज्यसरकारकडे सदर प्रस्ताव आता मंजुरीसाठी पाठविण्यात आलाय. प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव वगळून बाळासाहेब ठाकरे यांच नाव देण्याचा घाट सिडकोने आणि नगरविकास मंत्र्यांनी घातल्याने प्रकल्पग्रस्तांनी नाराजी व्यक्त केलीय. बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला विरोध नसून ते नाव विमानतळ प्रकल्पाला देण्यास विरोध असल्याचे सांगत दि बा पाटील यांचेच नाव विमानतळाला देण्यासाठी सरकार विरोधात तीव्र लढा देण्याचा इशारा प्रकल्पग्रस्तांनी दिलाय. यामुळे येणाऱ्या काळात नामांतरणावरून प्रकल्पग्रस्त विरुद्ध सरकार असा सामना रंगण्याची शक्यता आहे.
Breaking News LIVE : आज राज्यात 82,266 रुग्णांना डिस्चार्ज तर 53, 605 नवीन रुग्णांचे निदान तर 864 रुग्णांचा मृत्यू
पुणे : इंदापूर तालुक्यात सोमवारी मध्यरात्रीपासून 7 दिवसांचा कडक लॉकडाऊन, वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इंदापूर प्रशासनाचा निर्णय, मेडिकल आणि हॉस्पिटल संबंधित गोष्टी सुरू राहणार, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार, भाजी मंडई आणि किराणा दुकानदेखील 7 दिवस बंद राहणार, 11 मे ते 17 मे पर्यंत इंदापुर तालुक्यात कडक लॉक डाऊन
रत्नागिरी : उत्तर रत्नागिरी पुर्वभागात वादळी वाऱ्यासह पाऊस... चिपळूण;शिरगाव तर गुहागरमध्येही पावसाच्या सरी.. आंबा बगायतदाराना पावसाचा फटका..
पाटण तालुक्याला भूकंपाचे 2 धक्के, कोयना धरणापासून भूकंप केंद्रबिंदू 13 किमी अंतरावर, पहिला धक्का 2.9 रिश्टर स्केल तर दुसरा 3 रिश्टर स्केलचा, जमिनीपासून ७ कि.मी. खोल अंतरावर भूकंपाचा हादरा, कोयना व पाटण परिसरात जाणवला भूकंप, धरण सुरक्षित असल्याची प्रशासनाची माहिती
Breaking News LIVE : देशातील ऑक्सिजन पुरवठ्यासंदर्भात सुप्रीम कोर्टाकडून राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन
राज्याचा लाॅकडाऊन वाढवण्याचा निर्णय येत्या पंधरा तारखेला घेणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांत रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत आहे. त्यामुळं त्या राज्यात कडक लाॅकडाऊन लावणार असून राज्याचा पाॅझिटिव्हिटी रेट अजून कमी होत नाहीये. दररोज 50 ते 60 हजारांच्या घरात रुग्ण संख्या येतीये.. त्यामुळं एक तृतीअंश राज्य हे उतरत्या वळणार असून उर्वरित भागावर आम्ही लक्ष ठेवून आहोत अशी माहिती टोपे यांनी दिली
केंद्र सरकारकडून कोविड 19 उपचारासंदर्भात महत्वाचे बदल, आता दवाखान्यात दाखल करण्यासाठी कोरोना पॉझिटीव्ह रिपोर्टची गरज नाही
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून दूरध्वनीद्वारे माहिती घेतली तसेच दुसऱ्या लाटेशी मुकाबला करताना महाराष्ट्र चांगली लढाई लढतो आहे असे सांगितले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी देखील विशेषत: महाराष्ट्राला ऑक्सिजनच्या बाबतीत अधिक बळ मिळावे अशी विनंती केली आणि विविध उपाययोजनांची माहिती दिली. तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी कसे नियोजन करत आहोत त्याविषयीही मुख्यमंत्री बोलले. पंतप्रधान आणि केंद्र सरकार हे कोरोना लढ्यात महाराष्ट्राला प्रथमपासून मार्गदर्शन करत असून त्याचा चांगला उपयोग राज्य सरकारला होत आहे. महाराष्ट्राच्या काही सूचना केंद्राने मान्यही केल्या याविषयीही मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचे आभार मानले.
कोरोना संसर्ग होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसांना सरकारकडून 50 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अॅड. अनिल परब यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली आहे.
सोलापूर शहरात आज रात्री 8 पासून लागू होणाऱ्या कडक लॉकडाऊनमध्ये अंशतः बदल करण्यात आला असून 11 आणि 12 तारखेला दोन दिवस कडक लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रमजान निमित्त ईदसाठी अन्नधान्य, सुखा मेवा आणि इतर साहित्य खरेदीसाठी मुस्लिम समुदायाने मागितली होती परवानगी. मुस्लिम समुदायाची हीच मागणी मान्य झाल्याचं दिसतंय प्रशासनाने 8 मे रात्री 8 पासून 15 मे सकाळी 7 पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत मेडिकल, वैद्यकीय सेवा वगळता सर्व सुविधा आणि आस्थापना बंद राहणार आहेत. मात्र 11 आणि 12 तारखेला अत्यावश्यक सेवासाठी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत महापालिका क्षेत्रात परवानगी आहे.
उद्यापासून सहा दिवस कडक लाकडॉऊनच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गांधी रोडवर नागरिकांची खरेदीसाठी तोबा गर्दी. कोरोना नियम धाब्यावर बसवत अकोलेकर रस्त्यावर.
यवतमाळ : संपूर्ण जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत असल्याने कडक निर्बंध जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घोषित केले आहे. रविवार 9 मे सकाळी 7 वाजेपासून 15 मेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत हे कडक निर्बंध राहणार आहेत. त्यामुळे आज जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी किराणा आणि भाजी बाजारात नागरिकांनी मोठी गर्दी केली असल्याचे दिसून आले आहे.
देशातला 16 मे पर्यंतचा रेमडेसिवीरचा कोटा जाहीर झाला असून महाराष्ट्राला 11 लाख 50 हजार रेमडेसिवीर मिळणार आहेत. देशात 16 मे पर्यंत 53 लाख वायल्सचे वाटप करण्यात येणार आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर आता सरकारी हालचालींना वेग आला असून राज्य सरकार आता मागासवर्ग आयोग स्थापन करण्याची शक्यता आहे. या आयोगाचा अहवाल राज्य सरकार राष्ट्रपतींकडे पाठवेल आणि मराठा समाजाला त्या माध्यमातून आरक्षण देण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगण्यात येतंय.
येवला : कोरोनाची साखळी तुटावी यासाठी येवला शहरात एकीकडे चार दिवसाचा जनता कर्फ्यु सुरू असताना दुसरीकडे लस घेण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. यावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे पहायला मिळाले. येवला येथे 18 ते 44 या गटासाठी 100 लस तर 44 ते 60 मधील नागरिकांसाठी दुसरा डोस चे 100 लस उपलब्ध होत्या, परंतू नियोजनाचा अभाव आणि गोंधळामूळे पहाटेपासून आलेल्या जेष्ठ नागरीकांना लसीचा दुसरा डोस आज मिळणार नसल्याचे सांगण्यात आल्याने पुन्हा माघारी फिरावे लागले आहे.
वर्धा जिल्ह्यात कडक निर्बंधांच्या अंमलबजावणीला सुरुवात, चौकाचौकात पोलिसांचा बंदोबस्त, घराबाहेर येणाऱ्यांची केली जात आहे चौकशी; ओळखपत्र, आरोग्य विषयक कागदपत्रांची तपासणी केली जात असून विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे.
मुंबईतील सेंट जॉर्ज आणि गोकुळदास तेजपाल (जीटी) या दोन रुग्णालयांसाठी स्वतंत्र शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नव्याने सुरू करण्याचा प्रस्ताव सादर करावा असे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज दिले.
सरकारचे निर्माते असलेले पवार साहेबच बार धार्जिणे असल्याने या सरकारला मंदिरांपेक्षा मदिरा आणि बारचालकांवर प्रेम आहे अशी टीका भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी केली. पवार साहेबांना हातावर पोट असलेले मजूर, लोककलावंतांची उपासमार, हाल-फुल विक्रेते, शेतकरी , मराठा आरक्षण हे काहीच दिसले नाही असाही आरोप त्यांनी केला. एकीकडे मठ-मंदिरांची विजतोडणी करायची आणि बारचालकांना वीजबील सवलत द्यायची हे चित्र आम्ही सहन करणार नाहीत असा इशारा त्यांनी दिला.
देशातील इंधन कंपन्यांनी सलग चौथ्या दिवशी इंधनाचे दर वाढवले आहेत. पेट्रोलचे दर 29 डिझेल 31 पैसे प्रति लिटरने वाढवले आहेत. त्यामुळे परभणीत देशातील सर्वात महाग इंधन विक्री केली जात आहे. आज परभणीत पेट्रोलने शंभरी पार केली आहे. परभणीत पेट्रोलची 100 रुपये 1 पैसे तर डिझेलची 89.78 रुपये या दराने विक्री केली जात आहे. नेहमीच परभणीकरांना महाग इंधन घ्यावे लागत आहे. आधीच लॉकडाऊनने सर्व ठप्प असताना इंधनाची दरवाढ झाल्याने सामान्य परभणीकरांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे या इंधन दरवाढी विरोधात संताप व्यक्त केला जात आहे.
मुंबई विमानतळावर चाक निखळून पडलेल्या एअर अम्ब्युलन्सचे वैमानिकाने केलेले लँडिंग हे कौतुक आणि चर्चेचा विषय ठरले. पण चाक पडले हे रविकांत आवला या जवानाने हेरले. त्यांनी आपली ड्युटी अत्यंत सतर्कतेने बजावली आणि म्हणूनच सीआयएसएफच्या महासंचालकांनी त्याचा गौरव केला आहे.
350 वर्षांची परंपरा असलेली बुलढाण्यातील भेंडवळ इथली घट मांडणी यंदाही कोरोनाच्या प्रकोपामुळे आणि शासनाच्या निर्बंधामुळे पारिवारिक पूजा करुन घरातूनच करण्यात येणार असल्याची माहिती सारंगधर महाराज वाघ यांनी दिली आहे. शेती आणि पावसाविषयक निसर्गाचा सूक्ष्म अभ्यास गुढीपाडवा ते अक्षय्य तृतीया या काळात करुन वर्षभराची भाकिते या घट मांडणीत करण्यात येतात. 350 वर्षांपूर्वी महान तपस्वी चंद्रभान महाराज वाघ यांनी ही घट मांडणी सुरु केली होती. आता त्यांचे वंशजही परंपरा कायम ठेवून आहेत. या घट मांडणीचे भाकिते ऐकून घेण्यासाठी मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, मराठवाडा, खान्देशातून मोठ्या प्रमाणात शेतकरी अक्षय्य तृतीयेला भेंडवळ इथे येतात. यावर्षीही गेल्या वर्षाप्रमाणे घट मांडणीची पूजा पारिवारिक पद्धतीने करुन त्याचे भाकित विविध माध्यमातून शेतकऱ्यांना देण्यात येणार असून शेतकऱ्यांनी भेंडवळ इथे येऊ नये, असं आवाहन सारंगधर महाराज वाघ यांनी केलं आहे. पारिवारिक पूजाअर्चा करुन या घट मांडणी चे भाकिते विविध एबीपी माझासह विविध माध्यमातून शेतकऱ्यांना माहित केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रक्रियेत असलेले घेरडी येथील प्राथमिक शाळेतील शिक्षक प्रमोद वसंतराव माने आणि त्यांच्यापासून बाधा झालेल्या कुटुंबातल्या तीन सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे
अंबरनाथ पश्चिमेकडील मोरीवली एमआयडीसी क्षेत्रात एका रासायनिक कंपनीतून रात्री बाराच्या सुमारास वायू गळती होऊन केमिकलने पेट घेतल्याने भीषण आग लागली. जैन अँड जैन अस या कंपनीचं नाव असून या कंपनीत केमिकल बनवलं जात होतं. या कंपनीत इथाईल, मिथाईल, पॅराक्साईड, किटोन रसायनाचा मोठा साठा होता. आगीमुळे परिसरातील इतर कंपन्यांना देखील धोका निर्माण झाला होता. केमिकलचा दर्प पसरताच याबाबत तत्काळ अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचले आणि ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु केले. अंबरनाथ नगरपालिकेचे अग्निशमन दल, एमआयडीसीचे अग्निशमन दल आणि उल्हासनगरचे अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले होते. तब्बल दोन तास अग्निशमन दलाने प्रयत्न केल्यावर ही आग आटोक्यात आली. शुक्रवारी कंपनी बंद असल्याने कंपनीत कामगार नव्हते, त्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र या आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाल्याचं बोललं जातं आहे. कंपनीच्या रियाकटरमध्ये केमिकल होते त्यामुळे तापमान वाढल्याने वायुगळती झाली आणि त्यातून आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आहे.
ऑक्सिजन क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकाचा ऑक्सिजनअभावी मृत्यू झाला. डॉ. भालचंद्र काकडे यांचं चेन्नईत निधन झालं. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात डॉ. भालचंद्र काकडे यांनी रसायनशास्त्रात पदवी घेतली होती. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे संशोधक म्हणून काकडे यांचे जगभर नाव होतं. कोरोना संसर्गामुळे त्यांच्यावर चेन्नईतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. परंतु रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा संपल्याने डॉ. भालचंद्र काकडे यांचा मृत्यू झाला.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द ठरवल्यानंतर ठिकठिकाणी मराठा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांच्या सातत्याने बैठक होऊ लागल्या असून पंढरपुरातील जिजाऊ सभागृहात एक महत्वाची बैठक पार पडली. यामध्ये पुन्हा मराठा समाजाला आंदोलन करण्यास भाग पाडू नका अन्यथा होणाऱ्या सर्व प्रकारच्या आंदोलनास राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा देण्यात आला. भाजपचे आमदार समाधान अवताडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत संदीप मांडवे, प्राचार्य बब्रुवान रोंगे, किरणराज घाडगे, रामभाऊ गायकवाड, संदीप मुटकुळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. हा निकाल मोठा असून याचा अभ्यास सध्या समाजातील कायदेतज्ज्ञ करत आहेत. न्यायालयाच्या निर्णयामुळे पुन्हा समाज पहिल्या ठिकाणीच येऊन थांबला असून जर सर्वच पक्षांना मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर केंद्र आणि राज्य सरकार राजकारण का करत आहे असा सवाल किरण घाडगे यांनी विचारला. राज्याची जबाबदारी राज्याने पूर्ण करावी आणि केंद्राची जबाबदारी केंद्राने पूर्ण करत समाजाला आरक्षण द्यावे अन्यथा होणाऱ्या सर्व प्रकारच्या आंदोलनास राज्य आणि केंद्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा यावेळी संदीप मांडवे यांनी दिला. सध्या कोरोनाचा भयानक काळ सुरु असल्याने पहिल्यांदा रुग्णांना मदत करायची समाजाची भूमिका असून हा काळ संपल्यानंतर आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार असल्याचे आमदार समाधान अवताडे यांनी सांगितलं.
चंद्रपूर शहरात रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार प्रकरणी एक डॉक्टर आणि दोन नर्ससह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये चंद्रपूर शहरातील क्राईस्ट रुग्णालयातील ICU चे डॉक्टर जावेद सिद्दीकी आणि या डॉक्टरला मदत करणाऱ्या दोन नर्सेसचा समावेश आहे. विशेष म्हणजे क्राईस्ट रुग्णालयाला चंद्रपूर शहरातील मुख्य शासकीय कोविड रुग्णालया एवढेच महत्व आहे. चंद्रपुरातील अन्न व औषध प्रशासनाला रेमडेसिव्हरचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती मिळावी होती. त्याआधारे शुक्रवारी दुपारी चंद्रपूर शहरातील गांधी चौक परिसरातून अन्न व औषध प्रशासनाने घातलेल्या धाडीत एका युवकाला अटक करण्यात आली. या युवकाकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले होते. यासोबतच इंजेक्शन खरेदी करणाऱ्या प्रदीप गणवीर यालाही अटक करुन चंद्रपूरच्या शहर पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर या आरोपींकडून हे इंजेक्शन नक्की कुठून आणले गेले याबाबत चौकशी केली असता क्राईस्ट रुग्णालयाच्या डॉ.सिद्दीकी आणि या दोन नर्सची नावं निष्पन्न झाली. काळ्याबाजारात या इंजेक्शनची किंमत 50,000 रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आणि अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे रेमडेसिविर इंजेक्शनचा सुरु असलेला काळाबाजार समोर येण्याची शक्यता आहे.
औरंगाबादमध्ये शिवसेनेचे मंत्री संदीपान भुमरे यांनी संचारबंदीच्या काळात गर्दी जमवून विकास कामांचं उद्घाटन केलं. पैठण या आपल्या मतदारसंघात त्यांनी देवगावत पांदणरस्ते, शेत रस्ते वैयक्तिक सिंचन विहिरीचे उद्घाटन केलं. लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही उद्घाटनाच्या कार्यक्रमाला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. शिवाय त्यांनी जमलेल्या गर्दीसमोर भाषण देखील केलं. मंत्री संदीपान भुमरे यांनी जमवली गर्दी एकीकडे कोरोनामुळे लोकांचा मृत्यू होत असताना शिवसेनेचे मंत्री मात्र उद्घाटनात व्यस्त आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे नेते दत्ता गोर्डे यांनी केली आहे.
पार्श्वभूमी
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कडकडीत लॉकडाऊन
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळं काही जिल्ह्यातील स्थानिक प्रशासनाने जिल्ह्यामध्ये संपूर्ण कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. जास्त रूग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं मत हायकोर्टानं देखील व्यक्त केलं होतं. आता राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. मेडिकल आणि आरोग्य सुविधांशी संबंधित कामं वगळता सर्व गोष्टींवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.
राज्यात शुक्रवारी 54,022 नवीन कोरोना रुग्ण, 37,386 रुग्णांना डिस्चार्ज
महाराष्ट्रात कोरोनाचा प्रकोप सुरुच आहे. शुक्रवारीही कोरोना रुग्णांचा आकडा 50 हजारांच्या वरच होता. राज्यात काल 54,022 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 37,386 रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्याचा रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. राज्यात गुरुवारी 62,194 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली होती तर 63,842 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले होते. राज्यात आतापर्यंत एकूण 42,65,326 कोरोनाबाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.36% एवढे झाले आहे. राज्यात काल 898 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.49 टक्के एवढा आहे.
कोरोनाचा लहान मुलांना वाढता धोका लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ज्ञांचा टास्कफोर्स!
कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक असणार असल्याचा वैद्यकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे. त्या अनुषंगाने राज्यात बालरोग तज्ज्ञांची टास्कफोर्स तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. कोरोनाची लागण लहान मुलांमध्ये होत असल्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचे निदर्शनास येत असून तिसऱ्या लाटेबाबत दिलेली पूर्वसूचना लक्षात घेता राज्यात बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स करण्यात येणार असल्याचं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनीही सांगितलं. राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना केला जात आहे. अशातच तिसऱ्या लाटेची देखील पूर्वसूचना मिळाली आहे. हो धोका लक्षात घेऊन त्याच्या प्रतिबंधासाठी शासनाने पावले उचलली आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -