Breaking News LIVE : Coronavirus : अमरावतीत चीनमधून येणार ऑक्सिजन प्लांट

Breaking News LIVE Updates, 07 May 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 May 2021 10:21 PM
 लग्नाचा कार्यक्रम आटोपून घरी परतताना बोरसे कुटुंबियांवर काळाचा घाला

धुळे: साक्री तालुक्यातील बळसाने गावाहून लग्न समारंभाचा कार्यक्रम आटोपून दिघावे गावाकडे परतताना कासारे या गावाजवळ वाहनावरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीमध्ये कार जाऊन पडली.  दुर्घटनेमध्ये अद्याप दोघा जणांचे मृतदेह बचाव कार्य करणाऱ्या पोलिसांच्या व ग्रामस्थांच्या हाती लागले आहेत. यामध्ये एका महिलेचा समावेश असून एक 14 वर्षाचा मुलाचा देखील मृतदेह मिळून आला आहे.  अद्यापही विहिरीला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे आणखी दोन जण बुडाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्घटनेमध्ये वाहनातील एक इसम पाण्याबाहेर सुखरूप बाहेर निघाला असून वाहनामध्ये तब्बल पाच जण असल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे

अमरावतीत चीनमधून येणार ऑक्सिजन प्लांट

अमरावती जिल्ह्यातल्या कोरोना रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून चिनमधून अत्याधुनीक ऑक्सिजन प्लांट आणण्यात येणार आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने खा. नवनीत आणि आ. रवी राणा यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. हा प्लांट हरमन फिनोकेम कंपनी आपल्या सीएसआर फंडातून उपलब्ध करून देणार आहे.
अत्याधुनीक ऑक्सिजन प्लांट 9 टनाचा राहणार असून 24 तासात 40 लिटरचे 209 सिलेंडर भरण्याची त्याची क्षमता आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात हा प्लांट लावण्यात येणार आहे. चिनमधल्या शांघाय शहरातून हरमन कंपनीने हा प्लांट घेतला आहे. जिल्ह्यातली ऑक्सिजनची टंचाई कायमस्वरूपी दुर व्हावी, कोरोना रुग्णांना तातडीने शुद्ध ऑक्सिजन मिळावा आणि त्या माध्यमातून रुग्णांचे प्राण वाचावे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन हा ऑक्सिजन प्लांट अमरावतीत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

आज राज्यात 54,022 नवीन कोरोना रुग्ण, 37,386 रुग्ण बरे होऊन घरी, रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर

Breaking News LIVE : आज राज्यात 54,022 नवीन कोरोना रुग्ण, 37,386 रुग्ण बरे होऊन घरी, रिकव्हरी रेट 85.36 टक्क्यांवर #Maharashtra #corona https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-may-07-2021-maharashtra-political-news-lockdown-corona-vaccination-985430

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळं मृत्यू, दिल्लीतील एम्स रुग्णालयात झालं निधन

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा कोरोनामुळं मृत्यू, दिल्लीतील एम्स रुग्णालयात झालं निधन

रायगडमध्ये कर्जतजवळील नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आग

रायगडमध्ये कर्जतजवळील नितीन देसाई यांच्या एनडी स्टुडिओमध्ये आग, शूटिंगसाठी तयार केलेल्या 'जोधा अकबर' चित्रपटामधल्या किल्ल्याचा सेट जळला, अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल

रायगड : कर्जतजवळील नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एनडी स्टुडिओच्या सेटला आग

LIVE : रायगड : कर्जतजवळील नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एनडी स्टुडिओच्या सेटला आग; शूटिंगसाठी तयार करण्यात आलेल्या सेटला आग, कर्जत नगरपालिक फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल

कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कमी, माजी खासदार संजय काकडेंचा आरोप

राज्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी महाविकास आघाडी सरकार कमी पडतंय, मुंबई आणि पुण्यात रुग्णसंख्या वाढतीये, मुख्यमंत्री मुंबईचे आहेत, अजित पवार पुण्याचे आहेत. ते फक्त बंद खोलीत बैठका घेतायेत, फक्त केंद्र सरकारवर राज्य सरकार जबाबदारी ढकलून रिकामं होतंय. मात्र तिसऱ्या लाटेचं नियोजन काय हे राज्य सरकारने जनतेला सांगाव. आता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री यांनी बाहेर पडायला हवं, असा सल्ला माजी खासदार संजय काकडे यांनी दिलाय.


 


 

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव; पेंटिंग ब्रश बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग

भिवंडीत पुन्हा अग्नितांडव, भिवंडी तालुक्यातील दापोडा गावच्या हद्दीत हरिहर कॉम्प्लेक्स मध्ये भीषण आग, हॅरीस ब्रशेस इंडिया प्रा.लि.कंपनीला भीषण आग लागली आहे. या कंपनीत मोठ्या प्रमाणात पेंटिंग ब्रश बनवले जात असून संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी गेली आहे. आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहे.

लॉकडाऊनमुळे 400पेक्षा अधिक बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात

पालघर : राज्यात टाळेबंदीने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच कंबरड मोडलं आहे. पालघर जिल्ह्यात डिसेंबर नंतर मोठ्या प्रमाणावर शेतकरी झेंडू फुलाची लागवड करत असून सध्या 400पेक्षा अधिक बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. लग्नसराई , यात्रा , उत्सव रद्द झाल्याने झेंडू फुलाची मागणी कमालीने घटली आहे

Coronavirus : जगभरात 10 दिवसांमध्ये कोरोनानं सर्वाधिक मृत्यू भारतात, गेल्या 10 दिवसांत 36 हजार 110 रुग्ण दगावले

Coronavirus : जगभरात 10 दिवसांमध्ये कोरोनानं सर्वाधिक मृत्यू हे भारतात झालेत. मागील 10 दिवसात भारतानं 36 हजार 110 लोकांना कोरोनामुळे गमावलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, मागील 10 दिवसात सर्वाधिक मृत्यूची नोंद भारतात झाली आहे. याआधी अमेरिकेचा क्रमांक पहिला होता. तिथे 10 दिवसात 34 हजार 798 जणांचा बळी गेला होता. त्यानंतर ब्राझीलमध्ये 32 हजार 692 जणांचा 10 दिवसात कोरोनानं मृत्यू झालेला. पण, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतानं अमेरिका आणि ब्राझीललाही मागे टाकलंय. मागच्या 10 दिवसात भारतात तासाला 150 लोकांचा कोरोनानं जीव घेतलाय.

लोणावळ्यात आजपासून कडक लॉकडाऊन

पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेल्या पुण्यातील लोणावळ्यात आजपासून कडक लॉकडाऊनला सुरूवात झाली आहे. मावळ तालुक्यात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्या अनुषंगाने तालुका प्रशासनाने हा 12 मेच्या रात्रीपर्यंत कडक लॉकडाऊनचा निर्णय घेतलाय. या दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद राहणार आहे. तर जीवनावश्यक वस्तू केवळ घरपोच करण्याची मुभा देण्यात आलीये.

संगमनेरमध्ये गस्त घालणाऱ्या पोलिसांवर जमावाचा हल्ला

संगमनेर शहरात जमावाने पोलिसांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. संचार बंदी काळात गस्त घालत असताना दिल्ली नाका परिसरात गुरुवारी (6 मे) संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी सहा जणांसह अज्ञात जमावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याचे आणि गर्दीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

India Corona Case : देशातील कोरोना प्रादुर्भाव वाढताच, जाणून घ्या आजची कोरोना स्थिती

देशातील आजची कोरोना स्थिती : 


एकूण कोरोनाबाधित रुग्ण : दोन कोटी 14 लाख 91 हजार 598
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : एक कोटी 72 लाख 12 हजार 351
एकूण सक्रिय रुग्ण : 36 लाख 45 हजार 164
कोरोनामुळे आतापर्यंत झालेले एकूण मृत्यू : 2 लाख 34 हजार 083
देशात आतापर्यंत लसीकरणाची आकडेवारी : 16 कोटी 49 लाख 73 हजार 58 डोस

India Corona Case Updates : देशात गेल्या 24 तासांत 4,14,188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 3,915 रुग्णांचा मृत्यू

India Corona Case Updates : भारतात कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहायला मिळत आहे. दिवसागणिक कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. एवढंच नाहीतर देशातील मृत्यूदरातही वाढ होत आहे. आरोग्य मंत्रालयाचनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत भारतात 4,14,188 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर  3,915 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 3 लाख 31 हजार 507 रुग्ण उपचारावर मात करुन घरी परतले आहेत. 

सातारा जिल्ह्यात 2028 कोरोनाबाधित तर 72 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात 2028 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून 72 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची सख्या 118,445 झाली आहे तर आजअखेर 92,079 रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. 

मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील निवासी डॉक्टर थकबाकी आणि पगारवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सायन, नायर, केईएम आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टर थकबाकी आणि पगारवाढीच्या मुद्द्यावरून  आक्रमक झाले आहेत. पालिकेकडून त्यांना देण्यात येणारा 10 हजार रुपये कोविड भत्ता हीच पगारवाढ असून 11 महिन्यांची थकबाकी नामंजूर करण्यात आली आहे. याबाबत निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. सात दिवसात थकबाकी न देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास पालिका रुग्णालयातील तब्बल तीन हजार डॉक्टर सामूहिक रजेवर जातील असा इशारा पालिका मार्ड संघटनेने दिला आहे. डॉक्टरांच्या सेवेची दखल घेत पालिकेने प्रोत्साहन म्हणून पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह कोविडसाठी काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना दहा हजार रुपये भत्ता लागू केला. त्याच दरम्यान मे 2020 मध्ये सरकारी निवासी डॉक्टरांचा पगार अर्थात विद्यावेतन 1 हजार रुपयांनी वाढवले तरी पालिका रुग्णालयातील 3000 डॉक्टरांना दहा हजार रुपयांची पगारवाढ मिळालेली नाही. ही थकबाकी लवकरात लवकर मिळावी अशी या डॉक्टरांची मागणी आहे. पालिकेने मात्र थकबाकी देण्यास नकार दिला आहे हीच पगारवाढ आहे. त्यामुळे थकबाकी नामंजूर करण्यात येत असल्याचे अधिकृत पत्र पालिकेच्या वतीने जारी करण्यात आले. त्यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये नाराजी आहे.

नांदेड जिल्ह्यात कोविड कालावधीत कृषी दुकाने राहणार दिवसभर सुरु
नांदेड : जिल्ह्यात कोविड-19 ब्रेक द चेन निर्बंध कालावधीत शेतीविषयक सेवांशी निगडित असलेले कृषी सेवा केंद्र अथवा दुकाने, जसे बियाणे, खते, कीटकनाशके, कृषी साहित्य विक्री दुकाने यांच्याशी निगडित विक्री तसेच निर्बंध कालावधीमध्ये शेती संबंधी कार्ये उपक्रम, बियाणे ,खते, उपकरणे, यांची दुरुस्ती आणि साठवणूक, वाहतूक यासाठी सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यत सुरु ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी परवानगी दिलीय.

 

राज्याच्या कृषी आयुक्तालया मार्फत शेती संबंधीत येणाऱ्या काळातील पेरणी व शेती व्यवस्थापणा अंतर्गत करावयाच्या अत्यावश्यक कामामध्ये शेतकऱ्यांना अडचणी होऊ नये,या दृष्टीने विचार करून या दुकानांना कोविड कालावधीत मुभा देण्यात आलीय.या सेवा सुरू ठेवताना कोविड नियमांचे व सर्व मार्गदर्शक तत्वांचे तंतोतंत पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक राहील. या आदेशांचे  पालन न करणाऱ्या व्यक्ती व संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा, साथरोग कायद्यानुसार कायदेशीर कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहील.
सोलापूर : 8 दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यानंतरही सोलापुरात खरेदीसाठी तुफान गर्दी

सोलापूर : 8 दिवसांचा लॉकडाऊन घोषित झाल्यानंतरही सोलापुरात खरेदीसाठी तुफान गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. अत्यावश्यक साहित्य, भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरले होते. सोलापूरच्या स्टेशन रोड भाजीमार्केटमध्ये भाजीसाठी तुडुंब गर्दी झाली होती. 

पाच दिवसांच्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भाजी बाजार, पेट्रोलपंपवर नागरिकांची गर्दी

वर्धा : पाच दिवसांच्या कडक निर्बंधांच्या पार्श्वभूमीवर भाजी बाजार, पेट्रोलपंप यांसारख्या ठिकाणी नागरिकांनी गर्दी केली आहे. वर्ध्यांत सकाळपासूनच रस्त्यावर नागरिकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. उड्डाणपूलावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चौकात वाहतूक कोंडी झाली असून वाहनांच्या लांबचं लांब रांगा लागल्या आहेत. 

आमदार अतुल सावे, खासदार भागवत कराड यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात औरंगाबादमध्ये गुन्हा

औरंगाबादमध्ये आमदार अतुल सावे, हरिभाऊ बागडे, खासदार भागवत कराड, विजया रहाटकर यांच्यासह भाजपा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या हिंसेविरुद्ध कोविड काळात नियम मोडून आंदोलन केल्याने वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.

अँड्राईड मोबाईल अभावी कष्टकऱ्यांना लसीकरण नोंदणीसाठी अडचण ; आरपीआयने पुढाकार घेत सुरू केली नोंदणी

कल्याण-डोंबिवली : सरकारने लसीकरणाच्या नोंदणीसाठी ऑनलाईनची सोय केली असली तरी त्यासाठी अँड्राईड मोबाईल असणे आवश्यक आहे. मात्र ज्यांच्याकडे मोबाईल नाहींत असे नागरिक तासंतास ताटकळत रांगेत उभे असतात परिणामी सेंटरवर गर्दी होते. कल्याण डोंबिवलीमधील झोपडपट्टी भागात कष्टकरी वर्ग मोठ्या प्रमाणात राहतो .पोटाची खळगी भरण्याची चिंता असणाऱ्या या वर्गाकडे अँड्राईड मोबाईल नाही, त्यामुळे त्यांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येत नाही आणि नागरिक लसीकरणा पासून वंचित राहू शकतात. याबाबत आरपीआयने पुढाकार घेतलाय. डोंबिवलीतील इंदिरा नगर झोपडपट्टी मध्ये आरपीआय तर्फे नागरिकांची लसीकरणासाठी नाव नोंदणी करण्यात येत आहे.

बदलापुरात शनिवारपासून आठवडाभर कडक लॉकडाऊन, कोरोनाबाधितांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी निर्णय

बदलापूर शहरात कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता मुरबाड विधानसभेचे आमदार किसन कथोरे यांनी बदलापूर मध्ये सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, तसंच सगळ्या विभागांचे अधिकारी, पोलीस यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये लॉकडाऊन प्रभावीपणे लावला नाही, तर बदलापूरची कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येऊ शकत नाही, असा निष्कर्ष सर्वांनीच काढला. त्यामुळे शनिवारपासून बदलापुरात आठ दिवसांचा कडक लॉकडाऊन लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या कालावधीमध्ये बदलापूरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकानं आठ दिवसांसाठी काटेकोरपणे बंद राहतील. दूध, फळे, भाजीपाला, किराणा या दुकानदारांना फक्त होम डिलिव्हरी देता येईल. अन्यथा त्यांच्यावर सुद्धा कडक स्वरुपाची कारवाई केली जाईल. तर मेडिकल आणि दवाखाने मात्र सुरु राहतील. यापूर्वी मुरबाड शहरामध्ये आमदार किसन कथोरे यांनी अशाच प्रकारचा कडक लॉकडाऊन लावला होता. हा लॉकडाऊन लावण्यापूर्वी मुरबाड शहरातली रुग्णसंख्या दिवसाला जवळपास 150 च्या घरात होती. तर लॉकडाऊननंतर आठच दिवसात ती रुग्णसंख्या 20 वर आली होती. त्यामुळे बदलापूर शहरात सुद्धा अशा प्रकारचा लॉकडाऊन लावला, तर रुग्ण संख्या कमी व्हायला नक्कीच मदत होईल, असा विश्वास आमदार किसन कथोरे यांनी व्यक्त केला. सोबतच बदलापूरकरांनी सुद्धा 8 दिवस प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करावं, असं आवाहन आमदार किसन कथोरे यांनी केलं.

रेमडेसिवीरच्या नावाखाली इतर द्रवाची विक्री; चांदवडमध्ये एक तरुण अटकेत, दुसरा पसार

नाशिकमधील चांदवड शहरात रेमडेसिवीरच्या नावाखाली कुठलेतरी द्रव विकत असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून दुसरा आरोपी पसार झाला आहे. चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयासमोर ही घटना घडली असून औषध विक्री करणारे किरण साळवे आणि रोहित घरते अशी आरोपींची नावं आहे. त्यापैकी रोहित घरते पसार झाला तर किरण साळवेला पकडण्यात पोलिसांना यश आलं. त्याच्याकडून तीन बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन बाटल्यांमध्ये कोणते द्रव्य आहे याचा तपास करण्यासाठी त्या प्रयोगशाळेत पाठवल्या आहेत. चांदवड पोलीस अधिक तपास करत आहे.

अमरावती ग्रामीणमध्ये कोरोनाची हॉटस्पॉट असलेली 130 गावे सील

अमरावती महापालिका क्षेत्रात वर्षभर धुमाकूळ घातल्यानंतर कोरोना संसर्गाची वक्रदृष्टी आता ग्रामीण भागाकडे वळली आहे. जिल्हा ग्रामीणमध्ये आतापर्यंत तब्बल 32 हजार 602 रुग्ण आणि 536 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. गुरुवारी जिल्ह्यात 1189 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, यात महापालिका क्षेत्रातील 307 आणि ग्रामीणमधील 882 जणांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांचे प्रमाण सध्या जास्त आहे.. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील 'हॉट स्पॉट' असणारी 130 गावे सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवल यांनी दिली. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी हॉटस्पॉट असणारी आणखी काही गावे सील करणार असल्याचे सांगितले. यासंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेतली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात कोरोना केअर सेंटर उघडण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

पार्श्वभूमी

राज्यात गुरुवारी 62,194 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 63,842 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात गुरुवारी (6 मे) तब्बल 62 हजार 194 कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर 63 हजार 842 कोरोना रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. राज्यात आतापर्यंत एकूण 42,27,940 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचेप्रमाण (Recovery Rate) 85.54% एवढा झाला आहे. दरम्यान काल 853 कोरोना बाधित रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. सध्या राज्यातील मत्यूदर 1.49% एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 2,86,61,668 प्रयोगशाळा नमुन्याांपैकी 49,42,736 (17.25 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38,26,089 व्यक्ती होम क्वॉरन्टीनमध्ये आहेत तर 29,406 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरन्टीनमध्ये आहेत. 


जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही  : हायकोर्ट
राज्यातील इतर शहराच्या तुलनेत मुंबईनं कोरोना आटोक्यात आणण्यात यश मिळविलं आहे. आतातर सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई पॅर्टनचे कौतुक केलं आहे. मात्र जे मुंबईत शक्य आहे ते पुण्यात का नाही?, राज्यातील इतर महापालिका बीएमसीचा आदर्श डोळ्यापुढे का ठेवत नाहीत? असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला. पुणे, पिंपरी चिंचवड, ठाणे यांनी यशस्वी मॉडेलपासून प्रेरणा घेत समान कार्यक्रम आखला पाहिजे. अन्यथा जास्त रुग्णसंख्या असलेल्या जिल्ह्यांत कडकडीत लॉकडाऊन करण्याशिवाय पर्याय नाही, यावर मुख्यमंत्र्यांनी विचार करावा असं मत हायकोर्टानं व्यक्त केलं आहे. 


सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 15 मेपर्यंत कडक लॉकडाऊन
सोलापूर शहर आणि जिल्ह्यात 8 ते 15 मे पर्यंत संपूर्ण लॉकडाऊन करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता निर्बंध कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता सुरू असलेल्या आदेशानुसार सकाळी 7 ते 11 पर्यंत सुरु असलेल्या अत्यावश्यक सेवा देखील 8 ते 15 पर्यंत बंद असतील. या कालावधीत केवळ वैद्यकीय सेवा सुरु राहतील अशी घोषणा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केली. 8 मे रात्री 8 ते 15 मे सकाळी 7 पर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. 


कोरोनावर रशियाच्या नवीन 'स्पुटनिक लाईट'चा एक डोस पुरेसा
देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार उडाला असून यापुढेही अशा लाट येत राहणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. भविष्यातील हानी टाळायची असेल तर जलद लसीकरण हा एकच पर्याय सध्या आपल्यासमोर आहे. या संदर्भात आता एक सकारात्मक बातमी आली आहे. रशियामध्ये स्पुटनिक लसीचा आणखी एक प्रकार विकसित केला आहे. स्पुटनिक लाईट असं या लसीचं नाव असून याचा एकच डोस पुरा असल्याचा दावा कंपनीने केला आहे. यावूर्वी रशियन कंपनीची स्पुटनिक व्ही (Sputnik V) बाजारात उपलब्ध आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.