Breaking News LIVE : 31 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन

Breaking News LIVE Updates, 29 March 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Mar 2021 06:44 AM
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 4961 कोरोना रुग्णांची नोंद तर 31 बाधितांचा मृत्यू.

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 4961 कोरोना रुग्णांची नोंद तर 31 बाधितांचा मृत्यू.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे 31 मार्चला ऑनलाईन भूमिपूजन होणार

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे 31 मार्चला होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आँनलाईन भूमिपूजन. कोरोना निर्बंध नियमावलीमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत होणार भूमिपूजन. छत्रपती शिवाजी महाराज उद्यान जवळील जुने महापौर निवासाच्या जागेत होणार आहे, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची उभारणी. यंदाच्या अर्थसंकल्पात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटी  रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.

31 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचे 31 मार्च रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन होणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज उद्याना जवळील जुन्या महापौर निवासाच्या जागेत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाची उभारणी करण्यात येणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी 400 कोटी रुपये इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. 

शिवसेना आमदार माजी मंत्री रामदास कदम यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

शिवसेना आमदार माजी मंत्री रामदास कदम यांना कोरोनाची लागण, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

सोलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद

सोलापुरात यंदाच्या मोसमातील सर्वाधिक तापमानाची नोंद. आज दिवसभरात 41.5 अंश से तापमानाची नोंद.

औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या 41 मैदानावर भरणार फळ-भाजीपाला मार्केट

औरंगाबाद कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मंडईत भरणारा फळ-भाजीपाला मार्केट आता शहरातील वेगवेगळ्या 41 मैदानावर भरणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नेमाने यांनी दिली. बाजार समितीच्या सभागृहात ही बैठक घेण्यात आली.

बीडमध्ये लॉकडाऊन मध्ये सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत सूट

बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यातील लॉकडाऊन मध्ये वाढीव सूट देण्याबाबत घोषणा केली असून, जिल्हावासीयांच्या मागणीनुसार सकाळी ७ ते दुपारी १ पर्यंत लॉकडाऊन शिथिल करण्यासह सर्व प्रकारच्या व्यापारास परवानगी देण्याबाबत जिल्हाधिकारी यांना निर्देश दिले आहेत. 

जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार  

 जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुलं राहणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने 28 मार्च 2021 च्‍या कोवीड- 19 संदर्भातील नवीन मार्गदर्शक सूचना केल्या असून त्यानुसार आता जेजुरीत खंडोबाच्या दर्शन वेळेत बदल करण्यात येणार आहे. भाविकांना दर्शनासाठी मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 8 या वेळेत खुले राहणार आहे. या आधी दर्शनाची वेळ ही पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत होती. मात्र आता त्यात बदल करण्यात आला आहे अशी माहिती मार्तंड देवस्थानकडून देण्यात आली आहे .

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपातर्फे समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक भाजपातर्फे समाधान आवताडे यांना उमेदवारी जाहीर

पुण्यातील डेक्कनमधील सेंट्रल मॉलमध्ये गॅस गळती

पुण्यातील डेक्कनमधील सेंट्रल मॉलमध्ये गॅस गळती,  मॉलमधील कर्मचारी आणि नागरिकांना काढलं बाहेर, एरंडवणा अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल, पार्किंगमध्येच गॅस गळती झाल्याने चिंता वाढली

डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचे निधन

डहाणू नगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पिंपळे यांचं निधन झालं.  चार दिवसापूर्वी ते घरात असताना त्यांचा अचानक रक्तदाब वाढल्याने आपल्या घरामध्ये पडले होते. शेजाऱ्यांनी पाहिल्यावर त्यांना डहाणूमधील वेस्ट कोस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. नंतर त्यांना मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, आज उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोधी समाजाचा रंगोत्सव रद्द

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोधी समाजाचा रंगोत्सव रद्द करण्यात आला. दरवर्षी लोधी समाजातर्फे सोलापुरात रंग गाड्यांची भव्य अशी मिरवणूक निघत असते. यंदा 2 एप्रिल रोजी  ही मिरवणूक निघणार होती. दरवर्षी जवळपास 80 रंगगाड्या या मिरवणुकीत सहभागी होत असतात. शेकडो वर्षांची परंपरा कोरोनामुळे खंडित होणार आहे.  मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय घेतल्याची लोधी समाज अध्यक्ष भगतसिंग कल्लावाले यांनी माहिती दिली आहे. 

धुळे शहरातील अंजना हार्ट हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 3 कोरोना बधितांचा मृत्यू

धुळे शहरातील अंजना हार्ट हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन अभावी 3 कोरोना बधितांचा मृत्यू. ऑक्सिजन वेळेवर न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप..

पवारसाहेबांच्या पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल : नवाब मलिक

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना पोटात दुखत असल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान ब्रीच कँडीमध्ये तपासणी झाल्यानंतर पित्ताशयावर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. दोन दिवस औषधे बंद करण्यात आली आहे. शिवाय 31 मार्चला अँडोस्कोपी झाल्यानंतर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. 

गडचिरोली: कुरखेडा तालुक्यात नक्षलविरोधी अभियानाला मोठे यश, 5 नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी

गडचिरोली: कुरखेडा तालुक्यातील खोब्रामेंढा-हेटाळकसा जंगल परिसरात पोलिसांच्या नक्षलविरोधी C-60 पथकाने 3 दिवसापासून राबविलेल्या अभियानाला मोठे यश, 5 नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी, 3 पुरुष 2 महिला नक्षल्यांचे मृतदेह, अतिरिक्त पोलीस अधीक्षक- अभियान कलवानिया यांच्या नेतृत्वात राबविले गेले अभियान, चकमक संपल्यावर मोठ्या प्रमाणात नक्षल साहित्य-बंदुका- स्फोटके आणि दैनंदीन साहित्य ताब्यात आल्याची माहिती, आज सकाळपासून अतिरिक्त पोलीस कुमक पाठवून नक्षल शोध अभियान केले जात आहे तीव्र, रंगपंचमीच्या दिवशी गडचिरोली पोलीस दलाला मोठे यश.


 

नंदुरबार कोरोना स्थिती


नंदुरबार जिल्ह्यात 344 नवीन रुग्णांची भर पडली तर तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल दिवसभरात  669  रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एकूण 4461 रुग्णांवर उपचार सुरू असून एकूण 282 जणांचा मृत्यू झाला आहे. 

पालघर : घराला लागलेल्या भीषण आगीत चार जणांचा मृत्यू

पालघर : मोखाडा तालुक्यातील ब्राम्हणपाडा या गावात  अनंता मोळे  यांच्या घराला रात्री 2 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. घरात  एकूण सात जण होते.  या घटनेत अनंता मोळे यांची दोन मुले आई व त्याच्या पत्नीचा जागीच जळुन मृत्यू झाला आहे. या घटनेत घरमालक व  दोन मुले वाचली असून नाशिक येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

 नाशिक पोलिस अॅक्शन मोडवर, शहरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांचे छापे

 नाशिक पोलिस अॅक्शन मोडवर, शहरात रात्री उशिरापर्यंत सुरु असलेल्या हॉटेल्स आणि बारवर पोलिसांचे छापे,  कोरोना नियमांचेही होत नव्हते पालन,  शहरातील 3 बार अँड रेस्टोरंट अनिश्चित काळासाठी केले सील, अनेक हॉटेल्सला ठोठावला दंड, बारमधील मद्यपींवरही कारवाई

धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची शहरात गस्त सुरू

 


नागरिकांनी सार्वजनिकरित्या धुलीवंदन साजरे करू नये असं आवाहन कोल्हापूर पोलिसांनी केलंय. कोरोना संकट वाढत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याची सूचना देत नियमांचे पालन न केल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलंय.

पुणे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद

पुणे जिल्ह्यात  काल दिवसभरात तब्बल 8292  कोरोना रुग्णांची नोंद झाली तर 42 बाधितांचा मृत्यू झाली. आतापर्यंत एका दिवसात आढळून आलेली ही सर्वाधिक वाढ आहे.  पुणे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची विक्रमी नोंद झालीय.

रविवारी उशिरा रात्री 11 च्या सुमारास 6-7 जण एनआयए कार्यालयात दाखल

रविवारी उशिरा रात्री 11 च्या दरम्यान MH02EU3945 या गाडीतून 6-7 जण एनआयए कार्यालयात दाखल झाले होते. यावेळी ते दीड तास एनआयएच्या कार्यालयातच होते. त्यानंतर ही सर्व मंडळी 2-2 च्या संख्येने बाहेर पडली. यावेळी माध्यमकर्मींनी त्यांना रात्री उशिरा दाखल होण्याचं कारण विचारल्यानंतर त्यांनी बोलण्याचं टाळलं. त्यानंतर त्यांनी थेट पळ काढला. दरम्यान, एनआयएचे अधिकारी देखील उशिरा रात्रीपर्यंत एनआयए कार्यालयात होते. एनआयए अधिकाऱ्यांना विचारणा करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.

मुंबई पोलिसांची जमावबंदी असताना रात्री बाहेर फिरणाऱ्यांवर कारवाई

राज्यात जमावबंदी लागू झाल्यानंतर ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. मुंबईत देखील नाईट कर्फ्यू लागू झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून अनेक ठिकाणी रात्री नाकाबंदी करण्यात आली आहे. रात्री विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच रॅश ड्राईव्हिंग करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत होती. रात्री ८ ते सकाळी ७पर्यंत जमावबंदी लागू असणार आहे.

पार्श्वभूमी

राज्यात कोरोनाचा उद्रेक! आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद


 राज्यात आज नवीन कोरोना बाधित रुग्णसंख्येचा उद्रेक झालेला पहायला मिळाला आहे. राज्यात आज तब्बल 40 हजार 414 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात काल मध्यरात्रीपासून रात्रीची जमावबंदी लागू करण्यात आली आहे. तर निर्बंधांचे काटेकोर पालन होत नसल्याने लॉकडाऊनबाबत नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे.


Maharashtra Lockdown : स्थिती गंभीर! राज्यात लॉकडाऊनच्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश


 राज्यातील कोविड रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस झपाट्याने होणाऱ्या वाढीमुळे बेड्स, व इतर आरोग्य सुविधा अपुऱ्या पडू लागल्याचे चित्र असून आज झालेल्या टास्क फोर्सच्या बैठकीत लॉकडाऊनसारखे अतिशय कडक निर्बंध त्वरित लावण्यात यावेत अशा सूचना देण्यात आल्या. यासंदर्भात आज आयोजित या महत्वाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री डॉ राजेश टोपे तसेच मुख्य सचिव सीताराम कुंटे, टास्क फोर्स डॉक्टर्स व प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी निर्बंध आणि नियमांचे कडक पालन होणार नसेल तर येत्या काही दिवसांत संपूर्ण लॉकडाऊन लावून संसर्ग थोपवावा यावर चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयातील तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयांतील अभ्यागतांना पूर्ण प्रवेशबंदी घालावी तसेच खासगी कार्यालये व आस्थापना 50 टक्के कर्मचारी संख्येचे निर्बंध पाळत नसतील तर लॉकडाऊनची तयारी करावी अशा स्पष्ट सूचना बैठकीत दिल्या. 


एनआयएची टीम सचिन वाझे यांना घेऊन मिठी नदीजवळ; नंबर प्लेट, हार्ड डिस्क, डीव्हीआरसह महत्त्वाचे पुरावे हाती


अँटिलीया प्रकरणात चौकशीसाठी एनआयए रविवारी सचिन वाझे यांच्यासमवेत मिठी नदीवर पोहोचली. एनआयएला नदीतून नंबर प्लेट आणि डीव्हीआय यासह अनेक पुरावे सापडले आहेत. डीव्हीआर नष्ट करुन तो नदीत फेकला गेल्याचा संशय आहे. नदीतून दोन सीपीयू आणि एक हार्ड डिस्क डायव्हर्स सापडले आहेत. दोन नंबर प्लेट्स सापडल्या असून दोन्हींवर एकच नंबर लिहिलेला आहे.


Ind vs Eng 2021 | सॅम करनची झुंज अपयशी; 7 धावांनी सामना जिंकत मालिका भारताच्या खिशात


अतिशय अटीतटीच्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने अखेर विजयी पताका उंचावली आहे. अखेरच्या क्षणापर्यंत सामना कोण जिंकणार याबद्दलचं चित्र अस्पष्ट होतं. सुरुवातीच्या डावात भारतीय संघाच्या फलंदाजाची घसरगुंडी आणि त्यानंतर मधल्या फळीनं केलेली कमाल पाहता संघानं विरोधी बाजूला असणाऱ्या इंग्लंडच्या संघापुढे 330 धावांचं आव्हान ठेवलं. भारतानं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करत असताना इंग्लंडचे खेळाडू खेळपट्टीवर आले. पण, कमालीच्या जिद्दीनं मैदनाता उतरलेल्या भारतीय गोलंदाजांपुढे इंग्लंडच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. सलामीवीरांच्या वाट्याला अपयश येतानाचं चित्र असतानाच इंग्लंडच्या संघालाही सामन्यावर पकड मिळवण्यासाठी अखेरच्या विकेटपर्यंत प्रत्येक खेळाडूच्या योगदानाची साथ मिळाली. सॅम करननं संघाला विजयाच्या दारापर्यंत आणून सोडलं, अखेरच्या चेंडूपर्यंत त्यानं सामना जिंकण्यासाठीचे शक्य ते सर्व प्रयत्न केले. पण, अखेर त्याची झुंज अपयशी ठरली. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.