Breaking News LIVE : अकोला शहरात अल्पवयीन मुलाकडून आपल्या रूममेटची गळा आवळून हत्या
Breaking News LIVE Updates, 20 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं की, अशी अनेकांची इच्छा असू शकते, पण हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न आहे. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करतोय. जनतेचे प्रश्न आम्ही मांडतोय. सिंगल लार्जेस्ट पार्टी होतो, पण बहुमत नव्हतं. येत्या काळात आम्ही बहुमताने निवडून येऊ.
आषाढी वारीला पायी जाऊ द्या या मागणीसाठी भाजप अध्यात्मिक आघाडी उद्या राज्यपालांची भेट घेणार
अकोला शहरातील सिव्हिल लाइन्स पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरात एका अल्पवयीन मुलाने आपल्या रूममेटची गळा आवळून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे खासगी कोचिंग क्लासेस क्षेत्रात खळबळ उडाली आहे. प्रतीक लवंगे असे मृतकाचे नाव असून आरोपी व मृत मुलगा दोघेही बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सिव्हील लाईन पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या शास्त्रीनगर परिसरातील एका भाड्याच्या खोलीत बुलढाणा जिल्ह्यातील दोन अल्पवयीन मुले नीट परीक्षेच्या तयारीकरिता राहायला आले होते. हे दोघेही नवयुवक जीवलग मित्र असल्याने एकाच खोलीत भाड्याने राहत होते. 17 जून रोजी कुठल्या तरी कारणावरून आपसात वाद झाला आणि या वादातच प्रतीक लवंगे या युवकाची त्याच्या मित्राने गळा आवळून हत्या केल्याचे समोर आले. या प्रकरणी सिव्हिल लाईन पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
पावसाची रिपरिप सुरु होताच नाशिकमध्ये पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी होण्यास सुरुवात, पोलिस आणि वनविभागाकडून कारवाईला सुरुवात, कालपासून 32 पर्यटकांवर त्रयंबकेश्वर पोलिसांकडून कलम 188 अंतर्गत कारवाई, त्र्यंबकेश्वर-घोटी महामार्गावर पोलिसांची नाकाबंदी
सातारा : महाबळेश्वर, पाचगणी वासियांसाठी आनंदाची बातमी, महाबळेश्वर, पाचगणीला पाणी पुरवठा करणारे वेण्णालेक भरलं, सलग पडलेल्या पावसामुळे लवकर भरले वेण्णालेक
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र, पालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल; केंद्रीय तपासयंत्रणेचा ससेमिरा टाळण्यासाठी काही मंत्र्यांची केंद्राची हातमिळवणी, काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते फोडत आहे, सरनाईकांचा लेटरबॉम्ब
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये भाजपशी जुळवून घ्या अशी मागणी केली आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी-काँग्रेस आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत, आपला पक्ष कमकुवत होत असेल तर मोदींशी जुळवून घेतलेले बरे असे ते म्हणाले. युती तुटली तरी युतीच्या नेत्यांचे वैयक्तिक संबंध, जिव्हाळा अनेक नेत्यांमध्ये तसाच आहे. तो जिव्हाळा अजून तूटण्याआधी परत जुळवून घेतलेलं बरं होईल असं सरनाईकांनी या पत्रात म्हटलं आहे.
पंढरपूर : आषाढी एकादशीला पालखीसोबत अश्व आणायला परवानगी द्या, अशी मागणी सध्या वारकऱ्यांकडून करण्यात येत आहे. संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा प्रमुखांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे. ही मागणी करत असताना आम्ही तबलीगी नाही किंवा कुंभ मेळाव्याती साधू नाही, आम्ही वारकरी आहोत, असंही वारकऱ्यांनी म्हटलं आहे. आळंदी देवस्थान पालखी सोहळा प्रमुख आणि वारकऱ्यांची सध्या एक महत्त्वाची बैठक सुरु आहे. वारकरी, आषाढी सोहळ्यातील दिंड्यांचे प्रमुख आणि विश्वस्त यांच्यात महत्त्वाची बैठक सुरु आहे. आषाढी वारीवरुन या सर्वांमध्ये एकमत नसल्याचं दिसून येत आहे.
देशात सलग 38व्या दिवशी कोरोना व्हायरसच्या नव्या रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. 19 जूनपर्यंत देशभरात 27 कोटी 66 लाख 93 हजार कोरोना लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल दिवसभरात 38 लाख 10 हजार लसीचे डोस देण्यात आले आहेत. तसेच आतापर्यंत 39 कोटींहून अधिक कोरोना टेस्ट करण्यात आल्या आहेत. काल दिवसभरात जवळपास 19 लाख कोरोना सॅम्पल टेस्ट करण्यात आले आहेत. ज्याच्या पॉझिटिव्हिटी रेट 3 टक्क्यांहून अधिक आहे.
- एकूण कोरोनाबाधित : दोन कोटी 98 लाख 81 हजार 965
- कोरोनामुक्त रुग्णांचा एकूण आकडा : दोन कोटी 87 लाख 66 हजार
- एकूण सक्रिय रूग्ण : 7 लाख 29 हजार
- एकूण मृत्यू : 3 लाख 86 हजार 713
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होताना दिसत आहे. परंतु, अद्यापही धोका टळलेला नाही. त्यामुळे सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या दैनंदिन आकड्यात घट होत असली तरी, मृतांचा आकडा फारसा कमी झालेला नाही. देशात तब्बल 80 दिवसांनी 60 हजाराहून कमी दैनंदिन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 58,419 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली असून 1576 बाधितांनी जीव गमावला आहे. यापूर्वी 30 मार्च रोजी 60 हजारांहून कमी कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. काल दिवसभरात 87,619 लोक कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
संपूर्ण राज्यात वन्यप्राण्यांकडून जे शेती पिकांचे नुकसान झालेले आहे, त्या नुकसानभरपाई साठी वित्त विभागाने 20 कोटी रुपयांच्या निधीला मागच्या आठवड्यातच मान्यता दिलेली आहे व लवकरच ही रक्कम त्या-त्या जिल्ह्यात वितरीत केली जाईल अशी माहिती वन विभागाच्या प्रधान सचिवांनी दिली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देण्यात येणारी 17 कोटी रुपयांची नुकसानभरपाई अद्याप मिळाली नसून ती गेली दीड वर्षांपासून प्रलंबित.
जेजुरी : विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी घोंगडी बैठका घेऊन ओबीसी समाजाच्या जनजागृतीला सुरुवात केली असून त्यांच्या पहिल्या टप्प्याच्या घोंगडी बैठकांचा समारोप झाला. आज अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत मल्हारी मार्तंडाच्या जेजुरी गड पायथ्याशी समारोप करण्यात आला. यावेळी जागरण गोंधळ करत तळी उचलून भंडारा उधळण्यात आला. महाराष्ट्रातील मंदिरांवर अवलंबून उपजिविका असणाऱ्या अनेक समाजातील घटकांना शासनाने मदत करावी यासाठी वारंवार आवाज उठवला आणि त्यांच्या मागण्या सरकारपर्यंत पाठवण्यासाठी त्यांनी हा जागर केल्याचे सांगितलंय. यावेळी गोपीचंद पडळकर यांच्या समवेत आलेल्या समर्थकांनी जोरजोरात येळकोट येळकोट जय मल्हार आणि ओबीसी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देऊन मल्हारगडाचा पायथा परिसर दुमदुमून सोडला.
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत असतानाही एक पॉझिटिव्ह बातमी समोर येत आहे. मालवण तालुक्यातील वायरीभूतनाथ ग्रामपंचायतने ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी विलागीकरण कक्ष तयार केले आहेत. त्यात पांडुरंग पराडकर यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांना विलागीकर कक्षात दाखल केलं. मात्र विलागीकर कक्षात दाखल झाल्यानंतर बसून करायचं काय? असा प्रश्न पांडुरंग पराडकर यांना पडला. मुळात पांडुरंग हे मच्छीमार आहेत. त्यांच्या दोन बोटी आहेत. सध्या मासेमारी बंदी कालावधी असल्याने ते या काळात घरी समुद्रातील मासे पकडण्यासाठी जाळ विणण्याचं काम करतात. मात्र ते सध्या कोरोना पॉझिटिव्ह असल्याने विलागीकर कक्षात आहेत. अस असलं तरी देखील वेळ वाया न घालवता ते स्वतःसाठी समुद्रात मासेमारी करण्यात जाळ विणत आहेत. जाळ विणणं म्हणजे तसं कलाकसुरीचं काम मात्र मच्छीमार या काळात घरोघरी जाळ विणत असतात.
पार्श्वभूमी
राज्यात शनिवारी 8,912 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 257 रुग्णांचा मृत्यू
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.76 टक्के एवढे झाले आहे. राज्यात काल 257 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.97 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,93,12,920 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,63,420 (15.17 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 8,06,506 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 4,695 व्यक्ती संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
तृतीयपंथीसाठी ठाणे महापालिकेचं राज्यातील पहिलं विशेष लसीकरण सत्र
देशात सध्या कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. दैनंदिन रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर घट होताना दिसत आहे. अशातच कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण हेच शस्त्र असल्याचं वैज्ञानिकांकडून वारंवार सांगण्यात येत आहे. तसेच तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम जलद करण्याचा प्रयत्न वारंवार प्रशासनाकडून केला जात आहे.
लसीकरण मोहिमेंतर्गत समाजातील सर्व घटकांना सामावून घेण्याचा प्रयत्न ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर ठाण्यात तृतीयपंथीसाठीचं राज्यातील पाहिलं कोरोना प्रतिबंधक लसीकरण सत्र काल (शनिवारी) ठाणे महानगरपालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रात पार पडलं. यावेळी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, महापौर नरेश गणपत म्हस्के, आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची उपस्थिती होती. शहरातील तृतीयपंथी लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने या विशेष लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या लसीकरण मोहिमेंतर्गत स्वतःचे आधारकार्ड आणि इतर कोणतेही ओळखपत्र असणाऱ्या तसेच ओळखपत्र नसलेल्या तृतीयपंथीना देखील महापालिकेच्या या लसीकरण केंद्रावर लस देण्यात आली. आज एकूण शहरातील 16 तृतीयपंथीना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली. यावेळी सर्व तृतीयपंथीनी महापालिका प्रशासनाचे आभार मानले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -