Breaking News LIVE : शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात सर्व बंद राहणार: उपमुख्यमंत्री अजित पवार

Breaking News LIVE Updates, 19 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Jun 2021 01:10 PM
नाशिक-औरंगाबाद महामार्गावर येवला येथे बस-अल्टो कारचा अपघात, 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी

नाशिक-औरंगाबाद महामार्गावर येवला येथे बस-अल्टो कारचा अपघात, येवल्याच्या रायते गावाजवळ संध्याकाळच्या सुमारास झाला अपघात, कारचे टायर फुटल्याने कार बसवर जाऊन आदळली, जोरदार झालेल्या धडकेने कारमधील 1 जण ठार तर 2 जण गंभीर जखमी

फिरायला गेलेल्या लोकांना 15 दिवस क्वॉरंटाईन करण्याचा विचार:  उपमुख्यमंत्री अजित पवार

सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उस्मानाबाद, कोल्हापूर या सारख्या जिल्ह्यांमध्ये अजुनही कोरोनाचे बऱ्यापैकी रुग्ण आहेत.  पिंपरी चिंचवडमधे दुसऱ्या लाटेत मृत्युमुखी पडलेले 53 टक्के कोरोना रुग्ण हे 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. पुण्यातील जे लोक फिरायला बाहेर जातायत अशा व्यक्तींना जिल्ह्यात परत आल्यानंतर पंधरा दिवस कॉरन्टाईन करण्याचा विचार आहे असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 


 

शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात सर्व बंद राहणार: उपमुख्यमंत्री अजित पवार

पर्यटनस्थळी गर्दी केल्यास निर्बंध वाढवणार असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. शनिवारी आणि रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता पुण्यात सर्व बंद राहणार असंही ते म्हणाले. 

वाढत्या महागाईच्या विरोधात मुंबईत काँग्रेसचं आंदोलन

वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेसने मुंबईत आज टिळक भवनच्या समोर आंदोलन केलं. या आंदोलनाला प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे आणि इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. वाढत्या महागाईला मोदी सरकार जबाबदार असल्याची टीका करत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. देश को बचाना है, राहुल गांधी को लाना है अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

बहिणीच्या लग्नाचा बस्ता घेऊन जाणाऱ्या भावाचा अपघातात मृत्यू, नांदेडमधील दुर्दैवी घटना
बहिणीच्या लग्न सोहळ्यास आहेरासाठी शिवण्यासाठी टाकलेले कपडे आणि लग्न बस्ता घेऊन जाणाऱ्या भावासह दोन मित्रांचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना नांदेडमध्ये घडली आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून अज्ञात वाहनांच्या धडकेत तीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. धनेगाव शिवारात एका बाईकवरुन तीन जण जात होते, अज्ञात वाहनांच्या धडकेने मोटारसायकलवरच्या तिघांचा मृत्यू झाला. 21 वर्षीय लंकेश गवळे, 20 वर्षीय सतीश देवकांबळे आणि 19 वर्षीय विनोद दर्शने अशी मयतांची नावे आहेत. यातील दोन मयत हे मारतळा गावचे आहेत तर एक जण गौळ गावातील रहिवाशी आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 
वर्धा जिल्ह्याचा पहिल्या फेजमध्ये समावेश 

पॉझिटिव्हिटी रेट 5 टक्क्यांवर घसरल्याने आता वर्धा जिल्ह्याचा पहिल्या फेजमध्ये समावेश करण्यात आला असून त्यामुळे नियमांमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. सोमवारी 21 जूनपासून जिल्ह्यात पहिल्या फेजच्या सवलती लागून होणार असून सर्व अस्थापने पूर्ववत सुरु होणार आहेत असा आदेश ल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिला आहे. 

जलसंपदामंत्री जयंत पाटील कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पांना भेटणार; सांगली, कोल्हापुरातील संभाव्य पूर टाळण्यासाठी संवाद

कोल्हापूरसह सांगली जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. कर्नाटकातील हिप्परगी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणातून 1 लाख 31 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हिप्परगी धरणातील विसर्ग वाढवल्याने पंचगंगासह कृष्णा नदीच्या पाणीपातळीत घट होण्याची शक्यता आहे. काल धरणातून करण्यात आला होता 59 हजार क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला होता. तर अलमट्टी धरणाबाबतही आज जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांच्यात बैठक होणार आहे.

नागपूर-मुंबई महामार्गावर डिझेल वाहून नेणाऱ्या टँकरला अपघात, डिझेल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड

नागपूर-मुंबई महामार्गावर करंजगाव गावच्या हॉटेल ब्ल्यू मून जवळ डिझेलचा टँकर पलटी झाला आहे. टँकरमधून डिझेलचा लीक होऊन वहायला लागलं. हे कळताच डिझेल भरण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळाली. डिझेलचा भाव जवळपास शंभरपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे लोकांनी डिझेल घेऊन जाण्यासाठी एकचं गर्दी केली. या सगळ्यामुळे महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे.

कोयना परिसरातील पाऊस ओसरला

कोयना परिसरातील पाऊस ओसरला असून गेल्या 24 तासात कोयनेत 143 मिलीमीटर, नवजा 172 मिलीमीटर आणि महाबळेश्वरमध्ये 200 मिलीमीटर पाऊस पडला आहे. कोयना धरणात प्रतिसेकंद 29124 क्युसेक्स पाण्याची आवक असून सध्या सध्या कोयनेत 37.92 टीएमसी पाणी साठा उपलब्ध आहे. 

खेड -दापोली- मंडणगड मार्गावरील वाहतूक ठप्प

रात्रभर मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे खेड जगबुडी नदी आणि नारंगी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केट जवळ तर नारंगी नदीचे पाणी सुर्वे इंजिनियरिंग जवळ भरल्याने काही ठिकाणी वाहतूक ठप्प

लोणावळ्यात गेल्या 24 तासात तुफान पावसाची हजेरी

लोणावळ्यात गेल्या 24 तासात तुफान पावसाची हजेरी. तब्बल 165 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. याच पावसाने पर्यटकांचं आकर्षण केंद्र असलेलं भुशी धरण ओसंडून वाहू लागलं. तर गेल्या 48 तासांत 313 मिमी पाऊस कोसळला. आत्तापर्यंत या मोसमात 704 मिलिमीटर पाऊल पडलाय. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 445 मिलिमीटर इतक्याच पावसाची नोंद होती.

रस्ता नसल्याने कोल्हापुरात बांबूच्या डालाचा पाळणा करुन गर्भवतीला रुग्णालयात नेण्याची वेळ

कोल्हापुरात बांबूच्या डालाचा पाळणा करुन गर्भवतीला रुग्णालयात नेण्याची वेळ आली. वासनोलीपैकी जोगेवाडी धनगरवाड्यात हे धक्कादायक दृश्य पाहायला मिळालं. धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांची अवस्था बिकट आहे. त्यातच कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे या पायवाटेवरुन चालणं देखील अवघड होतं. रस्त्यासाठी वन विभागातून परवानगी मिळाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने त्यामधील जलपर्णी शिरढोण पुलाला तटली, शिरढोण-कुरुंदवाड रस्ता वाहतुकीसाठी बंद

कोल्हापुराच्या पंचगंगा नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढत असल्याने त्यामधील जलपर्णी शिरढोण पुलाला तुंबली आहे. त्यामुळे पोलिसांनी शिरढोण-कुरुंदवाड रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे. पाण्याच्या पातळीबरोबर जलपर्णीवर येत असून पुलापेक्षा उंच ढिगारा साचला आहे. जलपर्णीच्या दाबामुळे पुलाजवळील लोखंडी पोल देखील पूर्णपणे वाकला आहे. त्यामुळे या जलपर्णीचा पुलालाही धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही. पंचगंगा नदीच्या प्रदूषित पाण्यामुळे उन्हाळ्यात नदी पात्रात जलपर्णी वाढली होती. त्यानंतर पहिल्याच पावसात कोल्हापूरपासून वाहत आलेली जलपर्णी पंचगंगा नदीवरील शिरढोण पुलाला तटली आहे.

कपडे विक्रेत्याकडून महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या मालासह ट्रॅक्टर जाळण्याचा प्रयत्न

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार पेठेतील गर्दी कमी करण्यासाठी मनपा आणि पोलीस प्रशासनाच्या पथकाने काल (18 जून) जळगाव शहरातील फुले मार्केट परिसरात रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली. यावेळी फेरीवाल्यांचा माल जप्त केला होता. यासाठी मनपाचे ट्रॅक्टर वापरले जात होते. जप्त केलेला माल या ट्रॅक्टरमधून नेला जात असतानाच एका कपडे विक्रेत्याने संतापाचा भरात बाटलीत पेट्रोल भरुन आणत या ट्रॅक्टरवर शिपडले आणि ट्रॅक्टरसह जप्त केलेल्या मालाला आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रकार मनपा कर्मचारी आणि पोलिसांच्या लक्षात येताच त्यांनी तरुणाकडे असलेलं माचिस घेऊन आग लावण्यापासून परावृत्त केलं. यानंतर पोलीस आणि मनपा कर्मचाऱ्यांनी या तरुणाला चोप देत पोलीस ठाण्यात नेलं. मनपा कर्मचाऱ्यांच्या वतीने संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे

आजपासून महाबळेश्वरमध्ये पर्यटनास सशर्त सुरुवात

पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी लागू करुन महाबळेश्वर, पाचगणी सुरु करण्याचा निर्णय वाई प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे. महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावरच होणार रॅपिड अॅन्टीजेन तपासणी होणार आहे. तर हॉटेल व्यावसायिक कर्मचारी यांना करावी लागणार प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. 

पार्श्वभूमी

Milkha Singh Death : फ्लाईंग सिख मिल्खा सिंह यांचे निधन
भारताचे महान धावपटू मिल्खा सिंह (Milkha Singh Death) यांचे  निधन झाले. वयाच्या 91 व्या वर्षी अखेरचा श्वास  घेतला आहे. गेल्याच आठवड्यात त्यांच्या पत्नी निर्मल कौर यांचे कोरोनामुळे  (Athlete Milkha Singh's wife Nirmal Kaur dies of COVID-19)  निधन झाले. मिल्खा सिंह फ्लाईंग सिख (Flying Sikh) नावाने प्रसिद्ध होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 


राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्याही लसीकरणास सुरुवात - राजेश टोपे
राज्यात आज, 19 जूनपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येणार आहे. 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे. 
18  ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने लसीकरणाच्या सुनियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला असून त्याप्रमाणे शनिवार 19 जूनपासून 30 ते 44 या वयोगटातील नागरिकांना लस दिली जाणार आहे.


पर्यटकांसाठी आनंदाची बातमी! महाबळेश्वर, पाचगणी आजपासून सुरु
र्यटकांसाठी आनंदाची बातमी साताऱ्यातून आली आहे. राज्यातील थंड हवेचे ठिकाण असलेले महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांसाठी सुरु होणार आहे. शनिवारपासून संपूर्ण महाबळेश्वर पाचगणीचे पर्यटन सर्वांसाठी खुले होणार आहे. पर्यटकांसाठी काही नियम आणि अटी लागू करुन महाबळेश्वर, पाचगणी सुरु करण्याचा निर्णय वाई प्रांताधिकाऱ्यांनी घेतला आहे. महाबळेश्वर, पाचगणीमध्ये पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांची दांडेघर नाक्यावरच होणार रॅपिड अॅन्टीजेन तपासणी होणार आहे. तर हॉटेल व्यावसायिक कर्मचारी यांना करावी लागणार प्रत्येकी दहा दिवसानंतर तपासणी होणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.