Breaking News LIVE : शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

Breaking News LIVE Updates, 15 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Jun 2021 11:08 PM
त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचं उघड

पुण्याजवळील सासवडमध्ये आज सकाळी एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. आता त्या महिलेच्या आठ वर्षाच्या मुलाचाही खून झाल्याचं उघड झालंय. महिलेचे नाव आलीया शेख असून तिच्या मुलाचं नाव अयान शेख आहे. मात्र, आलीया यांचे पती आबीद शेख मात्र गायब आहेत. हे कुटुंब पुण्यातील धानोरी भागात राहणारे असुन तीन दिवसापूर्वी आबीद शेख यांनी ब्रीझा कार पिकनीकला जाण्यासाठी भाड्यानं घेतली होती. हे कुटंब पिकनिकसाठी बाहेर पडलं खरं पण आज सकाळी सासवड गावात आलीया यांचा तीक्ष्ण हत्याराने वार केलेला मृतदेह आढळून आला. सासवड पोलिस त्या खुनाचा तपास करत असतानाच  संध्याकाळी नवीन कात्रज बोगद्यालगत एका आठ ते दहा वर्षांच मुलाचाही मृतदेह आढळून आला. कात्रज पोलिस त्या खुनाचा तपास करत असतानाच सकाळी सासवडला ज्यांचा मृतदेह आढळून आला त्या आलीया यांचा तो अयान नावाचा  मुलगा असल्याच उघड झालं. तर आबीद शेख यांनी भाड्याने घेतलेली ब्रीझा कार पुणे सातारा रस्त्यावर एका चित्रपट गृहासमोर सोडून दिल्याच आढळून आलय. आबीद शेख हे एका एका कंपनीत ब्रॅच मॅनेजर म्हणून काम करतात. 

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक. कर्नाळा बँकेत 512 कोटी रूपयांच्या घोटाळ्या प्रकरणी विवेक पाटील मुख्य आरोपी. फेब्रुवारी 2020 मध्ये कर्नाळा बँक घोटाळ्या प्रकरणी 17 संचालकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र गृह खातं कर्नाळा बँक प्रकरणात चौकशी करण्यात चालढकल करीत असल्याने अखेर पनवेल  भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण भाजप आमदार महेश बालदी यांच्याकडून ईडीकडे मार्च 2020 रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. चौकशी अंती अखेर विवेक पाटील यांना ईडीकडून अटक.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारकडून ओबीसी आयोगावर सदस्यांची नियुक्ती

सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीतील ओबीसी आरक्षण रद्द केल्यानंतर राज्य सरकारकडून ओबीसी आयोगावर सदस्यांची नियुक्ती, राज्य मागासवर्ग आयोगावर सगळ्यांची नियुक्ती जाहीर,  2017 साली आयोगाची स्थापना झाली आहे. त्या आयोगावर सदस्य नियुक्त करण्यात आले. आयोगावर विविध प्रवर्ग आणि सर्व महसुली विभागाला प्रतिनिधित्व देण्यात आलंय. आयोगावर सदस्य म्हणून नियुक्त केलेल्यांमध्ये प्रा. बबनराव तायवडे, निवृत्त न्यायमूर्ती चंद्रलाल मेश्राम, अड. बालाजी किल्लारीकर,प्रा. संजीव सोनावणे, डॉ. गजानन खराटे, डॉ. निलीमा सराप, डॉ. गोविंद काळे, प्रा. लक्ष्मण हाके, ज्योतिराम चव्हाण यांचा समावेश

सांगोला नगरपरिषदेच्या तीन नगरसेवकांचा पुणे येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.

सांगोला नगरपरिषदेच्या तीन नगरसेवकांचा पुणे येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश.

मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्विकास विधेयक राष्ट्रपती कार्यालयात सहा महिने मंजुरीच्या प्रतिक्षेत,  तातडीने मंजुरी द्या! शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी 

महाराष्ट्र सरकारने एकमताने संमत केलेले मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचे पुनर्विकास विधेयक राष्ट्रपती कार्यालयात सहा महिने मंजुरीच्या प्रतिक्षेत,  तातडीने मंजुरी द्या! शिवसेनेची राष्ट्रपतींकडे मागणी 

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वबळाची भाषा तर बाळासाहेब थोरात यांची मात्र सामोपचाराची भूमिका

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची स्वबळाची भाषा तर बाळासाहेब थोरात यांची मात्र सामोपचाराची भूमिका, भाजपाला सत्तेपासून दूर ठेवणं हे राष्ट्रहिताचं काम असे तीन पक्ष मानतात, असं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं. 

पुण्यात शरद पवार, जयंत पाटील, अजित पवार आणि दत्तात्रय भरणे यांच्यात बैठक सुरु

पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापुरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यात बैठक सुरु आहे. काल देखील दत्तात्रय भरणे यांनी बारामतीतील गोविंद बागेमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतली होती. उजनीच्या पाणी प्रश्नावरुन सोलापूरचे पालकमंत्री असलेल्या दत्तात्रय भरणे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेतेही सहभागी आहेत. त्यामुळे दत्तात्रय भरणे सोलापूरचे पालकमंत्रीपद सोडणार किंवा त्यांच्याकडून ते पद काढून घेतले जाणार अशी चर्चा सुरु आहे. उजनी धरणातील सोलापुरच्या वाट्याचे पाणी इंदापूरला नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप सोलापूर जिल्ह्यातील नेत्यांनी केला होता. त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी तो निर्णय रद्द केला होता. मात्र त्यानंतर दत्तात्रय भरणे यांचा मतदारसंघ असलेल्या इंदापूर तालुक्यात उजनीच्या पाण्यासाठी आंदोलन करण्यात आले.

राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच

राज्यपालनियुक्त विधानपरिषदेच्या 12 सदस्यांच्या नावाची यादी राज्यपालांकडेच असल्याचं समोर आलं आहे. राज्यपालांच्या उपसचिव प्राची जांभेकर यांच्या उपस्थितीत आज झालेल्या सुनावणीत ही माहिती समोर आली. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी याबाबत अपील केलं होतं.

बेळगावात भाच्याच्या वाढदिवसानिमित्त आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी वाघ दत्तक घेतला!
सध्या कोरोनामुळे प्राणी संग्रहालयांनादेखील आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. प्राणी संग्रहालयाना प्राण्यांचा दैनंदिन खर्चाची जोडणी करणे अवघड झाले आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी भूतरामनहट्टी येथील प्राणी संग्रहालयातील एक वाघ कायमचा दत्तक घेतला आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी यांचा मुलगा हर्षित याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने लक्ष्मी हेब्बाळकर यांनी प्राणी संग्रहालयातील शौर्य नावाचा वाघ दत्तक घेतला. यासाठी त्यांनी एक लाखाचा चेक वन अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला. नंतर वन अधिकाऱ्यांनी वाघाला दत्तक घेतल्याचे प्रमाणपत्र लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याकडे सुपूर्द केले. "प्राणी संग्रहालयातील शौर्य वाघ मी दत्तक घेतला आहे. त्याची कायमची जबाबदारी मी स्वीकारली आहे. सध्या कोरोनामुळे प्राणी संग्रहालय पाहण्यासाठी लोक येत नाहीत. त्यामुळे प्राणी संग्रहालयाना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. जनतेने प्राणी संग्रहालयाला मदत करण्यासाठी पुढे यावे," असे आवाहन आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
सांगलीत कृष्णा नदीकाठी नवीन पुलाजवळ 13 फुटांच्या अजस्त्र मगरीचे दर्शन

सांगलीत कृष्णा नदीच्या काठी अजस्त्र मगरीचे आज दर्शन झाले. सकाळी सातच्या सुमारास सांगलीतल्या नवीन पुलाजवळ 13 फूट अजस्त्र मगरीचे दर्शन झाले. नदी शेजारी ही मगर दिसली. काही वेळाने ती पुन्हा कृष्णा नदी पात्रात गेली. भल्या मोठ्या मगरीचे दर्शन झाल्याने या परिसरात भीतीचं वातावरण पसरले आहे.

भंडारा तुमसर मार्गांवर बस आणि ट्रकचा अपघात, 71 प्रवासी बचावले

भंडारा : भंडारा तुमसर मार्गांवर बस आणि ट्रक मध्ये धडक झाली असुन 71 प्रवासी सुदैवाने बचावले आहेत. भंडाऱ्यावरुन तिरोडा येथे जात असताना वरठी गावाजवळ एका ट्रकने बसला धडक दिली. पण बस चालकाच्या समय सुचकतेने बसला नियंत्रित करण्यात यश आले. त्यामुळे बसमधील 71 प्रवासी सुदैवाने बचावले. यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत .

लॅण्डिंगदरम्यान इंडिगो विमानाचं टायर फुटलं, कर्नाटकच्या हुबळी विमानतळावरील घटना; सुदैवाने सर्व प्रवासी, क्रू मेंबर सुरक्षित

कर्नाटकच्या हुबळी विमानतळावर मोठी दुर्घटना टळली. इंडिगो ATR 6E-7979 हे विमान कन्नूरहून हुबळी विमानतळावर पोहोचल्यानंतर लॅण्डिंगदरम्यान विमानाचा टायर फुटला. सोमवारी (14 जून)  रात्री उशिरा ही घटना घडली. सुदैवाने सर्व प्रवासी आणि क्रू मेंबर सुरक्षित आहेत. दुरुस्तीसाठी विमान हुबळी विमानतळावर आहे.

पासपोर्ट नुतनीकरणासाठी कंगानला तातडीने दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार

पासपोर्ट नुतनीकरणासाठी कंगान रनौतला तातडीने कोणताही दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. कंगनाने चुकीची याचिका दाखल केली आहे, पासपोर्टचा अवधी संपत असताना ऐनवेळी याचिका का दाखल केली? असा सवाल करत 'सिनेमाच्या चित्रकरणाच्या तारखा बदलता येतात' असं हायकोर्टाने स्पष्ट केलं. कंगनाच्या याचिकेवर आता 25 जून रोजी सुनावणी होणार आहे. पासपोर्ट नुतनीकरणारबाबत कंगनाच्या याचिकेवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. 'देशद्रोह' प्रकरणी गुन्हा दाखल असल्याचा मुद्दा उपस्थित करत पासपोर्ट प्राधिकरणाने कंगनाच्या पासपोर्ट नूतनीकरणावर आक्षेप नोंदवला आहे.'धाकड' या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी कंगनाला 15 जून ते 30 ऑगस्ट या काळात हंगेरीला रवाना व्हायचं आहे. मात्र पासपोर्ट सप्टेंबर 2021 पर्यंतच वैध असल्याने प्रवासात अडचणी येत असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. 


यावर सुनावणी करताना न्यायालयाने पासपोर्ट प्राधिकरणाने काही लेखी आक्षेप नोंदवलाय का? असा सवाल विचारला. त्यावर पासपोर्ट नूतनीकरणासाठीचा फॉर्म भरताना तिथल्या अधिकाऱ्यांनी तोंडी आक्षेप नोंदवल्याचा दावा कंगनाच्या वतीने करण्यात आला. याशिवाय याचिकेत पासपोर्ट प्राधिकरणाला प्रतिवादी करण्यात आलेलं नाही, मग आम्ही थेट आदेश कसे देऊ शकतो? असं म्हणत पासपोर्ट नुतनीकरणाबाबत पोलीस स्टेशन नाही तर पासपोर्ट प्राधिकरण निर्णय घेतं असं हायकोर्टाने सांगितलं. तसंच कंगनाला नव्याने सुधारित याचिका दाखल करण्याची मुभा  हायकोर्टाने दिली.

पुरंदर तालुक्यात महिलेचा मृतदेह आढळून आला, पोलिसांकडून तपास सुरु

पुरंदर तालुक्यातील खळद या ठिकाणी एका महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. पुणे पंढरपूर मार्गावरील खळद येथील सुर्या हॉटेलच्या बाजूला रस्त्यालागत हा मृतदेह आढळला.  ही महिला साधपणे 35 वर्षाची आहे. मयत महिलेच्या अंगावर धारदार शास्त्राने वार केल्याचे निशाण आहेत. या महिलेचा खून करून रस्त्याच्या कडेला टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त आहे. या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पुढील तपास सासवड पोलीस करत आहेत.


 
तळकोकणात पहाटेपासून संततधार, नद्यांनी गाढली इशारा पातळी

तळकोकणात पहाटेपासून संततधार, नद्यांनी गाढली इशारा पातळी, कर्ली, तिलारी, सुख नद्यांचं पाणी वाढू लागल्याने नदी काठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट

गेल्या आठवड्यात झोडपणाऱ्या पावसाची येत्या आठवड्यात दडी?

गेल्या आठवड्यात झोडपणाऱ्या पावसाची येत्या आठवड्यात दडी? राज्यातील अनेक विभागातील पाऊस रविवारपासून गायब, मुंबईत पुढचे दोन दिवस पाऊस अपेक्षित नाही तर दक्षिण कोकणात पावसाचा जोर कायम राहणार, पेरणीची घाई करु नका, हवामान विभागाचं शेतकऱ्यांना आवाहन

मुबंई गोवा महामार्गावर नांदगाव येथे उड्डाण पुलाच्या मध्यभागी पडलेल्या रस्त्याला तडे, दुरुस्तीचं काम सुरु

सिंधुदुर्ग : मुबंई गोवा महामार्गावर नांदगाव येथे उड्डाण पुलाच्या मध्यभागी पडलेल्या रस्त्याला तडे पडलेल्या भागी दुरुस्तीचं काम सुरु. दुरुस्ती न करता कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची वाहनचालकांकडून मागणी केली जात आहे. सध्या उड्डाण पुलावरील वाहतूक बंद असून सर्व्हिस रोडने वाहतूक सुरु आहे. 

महाराष्ट्राच्या 'चेरापुंजी'त पर्यटकांची वर्दळ ; आंबोली पोलिसांकडून पर्यटकांवर कारवाई

महाराष्ट्राच्या चेरापुंजीत पर्यटकांची वर्दळ  पाहायला मिळते आहे. कोकणातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोलीत पर्यटकांची गर्दी झाली आहे. आंबोली पोलिसांकडून पर्यटकांवर कारवाई करण्यात आली आहे. जिल्यासह गोव्यातून कोल्हापूरच्या दिशेने जाताना आंबोलीच्या मुख्य धबधब्याजवळ पर्यटक थांबून आंबोलीच्या आल्हादायक वातावरणाचा आनंद लुटत आहेत. दुसरीकडे बेळगाववरून खास आंबोलीचा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक आंबोलीत येत असताना त्यांना आंबोली तपासणी नाक्यावर थांबवून परत माघारी पाठवलं जातं आहे. पर्यटकांनी पर्यटनस्थळी जाऊ नये असे सिंधुदुर्ग प्रशासनाने आवाहन करण्यात आलं आहे.

धूळपेरणी नंतर मृगनक्षत्रात चांगला पाऊस, शेतकऱ्यांना फायदा

वाशिम जिल्ह्यात अनेक भागात धूळ पेरणी शेतकऱ्याने उरकली होती. त्याचाच फायदा शेतकऱ्यांना होताना दिसतोय. मालेगाव तालुक्यातील मुंगळा परिसरात धूळपेरणी नंतर मृगनक्षत्रात चांगला पाऊस बरसल्याने धूळ पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना याचा फायदा झाला आहे. पेरणी केलेलं पीक आता डोलायला लागल्याने शेतकऱ्यांनमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

बुलढाण्यात हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, वाहनांच्या दोन किमीपर्यंत रांगा; नियोजन नसल्याने शेतकरी आक्रमक

बुलढाणा जिल्ह्यात आज हरभरा खरेदी केंद्र सुरु झाल्याने शेतकऱ्यांनी हरभरा विक्रीसाठी मोठी गर्दी केली आहे. जवळपास दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून खरेदी केंद्रावर नियोजन नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. आता खरीप हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशांची आवश्यकता आहे. त्यामुळे शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी गर्दी करत आहेत. गेल्या आठवड्यात हरभऱ्याचे भाव प्रति क्विंटल 5400 रु होते. पण केंद्र सरकारने डाळबिया आयात धोरणात शिथिलता दिल्याने आता हरभऱ्याचे भाव पडले आहे. खाजगी व्यापारी हरभऱ्याला प्रति क्विंटल 4400 ते 4500 रुपये देत असल्याने शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे एकच गर्दी झाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली. तसंच डाळबिया आयात धोरणाचा निषेध देखील केला.

बुलढाणा : हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची गर्दी, शेतकरी आक्रमक, मोदी सरकार विरुद्ध शेतकऱ्यांची घोषणाबाजी

बुलढाणा : जिल्ह्यात आज हरभरा खरेदी केंद्र सुरु करण्यात आल्याने शेतकऱ्यांची हरभरा विक्रीसाठी मोठी गर्दी झाली आहे. जवळपास दीड ते दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या असून खरेदी केंद्रावर नियोजन नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. आता खरीप हंगाम सुरु झाला असून शेतकऱ्यांना पेरणीसाठी पैशांची आवश्यकता असल्याने बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी शेतकरी गर्दी करत आहेत. गेल्या आठवड्यात हरभऱ्याचे भाव प्रति क्विंटल 5400 रु होते पण केंद्र सरकारने डालबिया आयात धोरणात शिथिलता दिल्याने आता हरभऱ्याचे भाव पडले असून खाजगी व्यापारी हरभाऱ्याला प्रति क्विंटल 4400 ते 4500 रुपये देत असल्याने शेतकरी बाजार समितीत हरभरा विक्रीसाठी आणत आहेत. त्यामुळे एकच गर्दी झाल्याने शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी मोदी सरकार विरुद्ध घोषणाबाजी केली तसच डालबिया आयात धोरणाचा निषेध देखील केला आहे. 

म्हाडाच्या कार्यालयात मनसैनिकांचा राडा; अधिकाऱ्यावर शाई फेकली

मराठी कंत्राटदाराला काम करण्यास धमकावले जात असल्याने काल (सोमवारी) मनसेच्या कार्यकर्त्यांनी म्हाडा कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांला काळे फासले आहे. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आणि वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघात काव्या इंटरप्रायजेस या कंपनीला 1 कोटी 19 लाख रुपयांचे कंत्राट मिळाले होते. त्याचे वर्क ऑर्डर देखील काढले गेले होते. मात्र या कंत्राटदाराला माजी आमदार सुनील शिंदे यांच्या नावाने धमकावत सदर टेंडर मागे घेण्याच्या धमक्या येत होत्या. वारंवार कंत्राटदार म्हाडाकडे याबाबत पाठपुरावा करून देखील अधिकारी चालढकल करीत होते. यामुळे मनसैनिकांनी आक्रमक होत म्हाडाच्या कार्यालयात घुसून म्हाडाचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर राकेश गावित यांच्या अंगावर शाई फेकून याचा निषेध केला. सदर कंत्राट घेणाऱ्या कंपनीचे मालक देखील मनसेचे पदाधिकारी असल्याचे कळते आहे.

पार्श्वभूमी

Maratha Reservation : मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार


मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरणार आहे. एसईबीसी प्रवर्गातील जागा खुल्या प्रवर्गातून भरण्याचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस प्रवर्गातून ऐच्छिक स्वरूपाचा लाभ घेता येणार आहे. मात्र उमेदवारांना इडब्ल्यूएस प्रमाणपत्र आधीच देणं बंधनकारक राहणार आहे. 


जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील भरतीसाठी सामान्य प्रशासन विभागाची मंजुरी देण्यात आली असून  तब्बल 13 हजार जागांसाठी भरती होणार आहे. मराठा आरक्षणाच्या न्यायालयातील निर्णयामुळे भरती  रखडली होती. 


मोठा दिलासा...! राज्यातील अॅक्टिव्ह रुग्ण दीड लाखांच्या खाली, सोमवारी 8,129 नवे कोरोनाबाधित तर 14,732 रुग्णांना डिस्चार्ज


राज्यात काल (सोमवारी) 8,129 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर काल 14,732 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल 200 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. काल आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या जवळपास सहा हजारांनी जास्त नोंदवण्यात आली आहे. राज्यात काल एकूण 1,47,354 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 15 जिल्हे आणि मनपा क्षेत्रात एकाही मृत्यूची नोंद करण्यात आलेली नाही तर 13 ठिकाणी केवळ एका मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


आजपर्यंत एकूण 56,54,003 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.55 टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज 200 कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.  सध्या राज्यातील मृत्यूदर 1.90 टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 3,82,15,492 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 59,17,121 (15.48 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.  सध्या राज्यात 9,49,251 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 5,997 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 529 कोरोनाबाधितांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 700 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 725 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईत आजवर 6,84,107 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मुंबईचा ओव्हरऑल रिकव्हरी रेट 95 टक्क्यांवर गेला आहे. सध्या मुंबईत 15,550 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 672 दिवसांवर गेला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.