Breaking News LIVE : कोरोनाशी संबंधित अनेक औषधं वस्तूंवर जीएसटी दरात कपात

Breaking News LIVE Updates, 12 June 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Jun 2021 05:16 PM
मुंबई-पुणे महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ वाहनांची गर्दी, अमृतांजन ब्रीज जवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर  2 ते 3 किलोमीटर वाहनांची रांग 

 मुंबई-पुणे महामार्गावर अमृतांजन पुलाजवळ वाहनांची गर्दी, अमृतांजन ब्रीज जवळ पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर वाहनांची रांग, पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावर  2 ते 3 किलोमीटर वाहनांची रांग 

कोरोनाशी संबंधित अनेक औषधं वस्तूंवर जीएसटी दरात कपात

जीएसटी कौन्सिलच्या आजच्या बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय, कोरोनाशी संबंधित अनेक औषधं वस्तूंवर जीएसटी दरात कपात. Tociluzumab, amphotericin औषधांवर शून्य टक्के जीएसटी, इतर काही उपकरणांवर औषधांवर करकपात, मात्र लसींवरचा पाच टक्के जीएसटी कायम राहणार, हे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं. या पाच टक्के जीएसटी उत्पन्नातला 70 ते 75 टक्के वाटा राज्यांना दिला जाईल , 30 सप्टेंबर पर्यंत ही दरकपात लागू राहणार आहे

सोलापुरात नरेंद्र पाटील यांच्या नेतृ्त्त्वात मराठा समाजाची बैठक, भाजपचे आमदार सुभाष देशमुख उपस्थित

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली सोलापुरात बैठक सुरु झाली आहे. या बैठकीला माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख देखील उपस्थित आहे. कोल्हापूरनंतर सोलापुरात मोर्चा घेण्यासाठी बैठक सुरु असल्याचं कळतं. मराठा समाजाच्या मागणीसाठी राज्यपाल, मुख्यमंत्री, पंतप्रधान, राष्ट्रपती यांना पत्र लिहा, असं आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी मराठा समाजातील तरुणांना केलं. मोर्चासाठी कोणतेही राजकारण करू नये, सर्वांनी मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहावे. 58 मोर्चे निघाले त्यावेळी जी भूमिका सर्वांची होती तीच भूमिका आता देखील असावी, असंही भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी म्हटलं.

ज्ञानोबाच्या आणि तुकोबाच्या किमान दोन पालख्याला तरी सरकारने परवानगी द्यावी, अमरावतीच्या विश्व वारकरी सेनेची मागणी

सरकारने जर वारी संदर्भात जर फेर विचार केला नाही तर सरकारने जे सांगितले होते की, "माझं कुटुंब,माझी जबाबदारी" तसंच आम्ही नारा लावू "माझी वारी, माझी जबाबदारी". सरकारच्या निर्णयाची 24 तारखेपर्यंत वाट पाहू नाहीतर आम्ही वारीला निघू असा इशारा अमरावतीच्या विश्व वारकरी सेनेचे गणेश महाराज शेटे यांनी इशारा दिला. ज्ञानोबाच्या आणि तुकोबाच्या किमान दोन पालख्याला तरी सरकारने परवानगी द्यावी अशी मागणी विश्व वारकरी सेनेने केली आहे. 

राज्य सरकारने सर्व चर्चा करुन पालखी सोहळ्याचा निर्णय : उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्य सरकारने सर्व चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतला आहे. वर्षानुवर्षे चाललेली परंपरा टिकली पाहिजे परंतु सध्याच्या कोरोना सावटाचाही विचार केला पाहिजे असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलं.  सर्व अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी सर्वांशी समन्वय साधत पालखी सोहळ्याबाबत निर्णय घेतलाय असंही ते म्हणाले. 

उमराणे बाजार समितीने अमावस्येला तसेच शनिवारी बाजार समितीत लिलाव सुरु ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय

आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समिती पाठोपाठ आता जिल्हयातील उमराणे बाजार समितीने अमावस्येला तसेच शनिवारी बाजार समितीत लिलाव सुरु ठेवण्याचा महत्वपुर्ण निर्णय व्यापारी-बाजार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

मराठा क्रांती मोर्चाकडून पुणे ते कोपर्डी रॅलीचे आयोजन

खासदार संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मोर्चाकडून पुणे ते कोपर्डी रॅलीचे आयोजन करण्यात आलेय.  पुण्यातून संभाजीराजेंसोबत दोनशे वाहनांचा ताफा कोपर्डीला जायला निघणार आहे. कोपर्डीतील पिडीत मुलीच्या घरी संभाजीराजे जाणार आहेत. पिडीतेच्या कुटुंबियांची भेट घेऊन संभाजीराजे पुढे औरंगाबादला काकासाहेब शिंदेच्या स्मारकावर दर्शनासाठी जाणार आहेत.

संभाजीराजे आज नगरमधील कोपर्डीच्या दौऱ्यावर

संभाजीराजे आज नगरमधील कोपर्डीच्या दौऱ्यावर, मराठा पदाधिकारी, नेत्यांशी संवाद साधणार 

अजित पवार बारामती दौऱ्यावर, दोन महिन्यांनी जनता दरबार भरला

उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा जनता दरबार सुरु आहे. हा जनता दरबार विद्या प्रतिष्ठानमध्ये सुरु आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन महिन्यापासून हा जनता दरबार बंद ठेवण्यात आला होता. परंतु आज तो पुन्हा भरवण्यात आला आहे. अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांची गर्दी झालेली पाहायला मिळाली. मतदारसंघातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुण्या-मुंबईत भेटायला येऊ लागू नये म्हणून अजित पवार स्वतः लोकांना भेटत असतात. यावेळी सर्व शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो. नागरिकांचे ज्या विभागाकडे काम आहे त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे नागरिकांचे निवेदन देत असतात आणि तात्काळ मार्ग काढण्याचे आदेश अजित पवार देत असतात. अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या.


 
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ग्रामस्थाचा मृत्यू

चंद्रपुरातील भद्रावती तालुक्यातील मुधोली गावाजवळील जंगलात वाघाच्या हल्ल्यात एका ग्रामस्थाचा मृत्यू झाला आहे. भारत बावणे (65) असं मृतक इसमाचे नाव असून तो काल सरपण गोळा करण्यासाठी जंगलात गेला होता. संध्याकाळी घरी परत न आल्याने आज सकाळी वनविभागाने जंगलात शोधाशोध केल्यावर त्याचा मृतदेह मिळाला. 

वसई विरारकरांसाठी सुखद बातमी आहे. वसई विरार महानगरपालिका लेवल ३ वरुन लेवल २ मध्ये

वसई विरारकरांसाठी सुखद बातमी आहे. वसई विरार महानगरपालिका लेवल ३ वरुन लेवल २ मध्ये आली आहे. पालिकेने परिपत्रक काढ़ून ही माहीती दिली आहे. सोमवारपासून हे आदेश लागू होतील. त्यामुळे वसई विरारमध्ये अत्यावश्यक दुकानासोबत, अत्यावश्य नसलेली दुकाने ही नियमित खुलतील. तर सलून, जीम, मॉल, चिञपटगृह रेस्टॉरन्ट, लग्न संमारंभ येथील नागरीकांची उपस्थिती ५० टक्क्यापर्यंत असतील.   लोकल ट्रेनमध्ये निर्बंध असतील. तसेच सार्वजनिक ठिकाण, वॉकिंग सायकलिंग, हे नियमित असतील. खाजगी कार्यालये ही उघडू शकतात. स्पोर्ट इनडोर साठी वेळेच बंधन असेल, तर ऑउट डोर साली वेळेची मुभा नसेल. सहकारी संस्थांच्या बैठका, निवडणुका मध्ये ५० टक्के उपस्थिती असणार आहे.

वसई विरारमध्ये निर्बंध शिथिल

वसई विरारकरांसाठी सुखद बातमी आहे. वसई विरार महानगरपालिका लेवल 3 वरुन लेवल 2 मध्ये आली आहे. महापालिकेने परिपत्रक काढ़ून ही माहीती दिली आहे. सदरचे आदेश हे सोमवारपासून लागू होतील. त्यामुळे वसई विरारमध्ये अत्यावश्यक दुकानासोबत, अत्यावश्यक नसलेली दुकाने ही नियमित सुरु होतील. तर सलून, जीम, मॉल, चिञपटगृह रेस्टॉरन्ट, लग्न संमारंभ येथील नागरीकांची उपस्थिती 50 टक्क्यापर्यंत असतील. लोकल ट्रेनमध्ये निर्बंध असतील.

पालघर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा 119 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद

पालघर जिल्ह्यात शुक्रवारी रात्री उशिरा 119 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही नोंद icmr च्या पोर्टलवर करण्यात आली आहे. यामध्ये पालघर ग्रामीणमध्ये 110 तर वसई विरार महानगर पालिका क्षेत्रात 9 मृतांची नोंद करण्यात आली आहे. पालघर आरोग्य विभागाच्या माध्यमातुन हे सर्व रुग्ण परस्पर जिल्ह्याच्या बाहेर उपचारासाठी गेले असल्याने आधार कार्ड तपासणीवरून ही नोंद उशिरा झाली असल्याची माहिती देण्यात आली आहे

माळशेज घाटात चारचाकीवर दरड कोसळली

गेल्या दोन दिवसापासून माळशेज परिसरात पावसाने हजेरी लावलीय .नगर येथे राहणारा मुकुंद बसवे हा तरुण आज आपल्या मित्रासह आपल्या वडिलांना आणण्यासाठी गाडीने कल्याणच्या दिशेने निघाला होता  .सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास माळशेज घाटात गाडीने पोहचला .घाटात त्याने चहा पिण्यासाठी आपली गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. मुकुंद व त्याचा मित्र गाडीतून उतरले .चहाच्या दुकानजवळ पोहचले असताना अचानक त्यांच्या गादीवर दरड कोसळली. या दुर्घटनेत गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय .सुदैवाने मुकुंद व त्याचा मित्र गाडी खाली उतरल्याने दोघे ही बचावले .दरम्यान रस्त्याच्या कडेला गाडी असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला नाही 

मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच, राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी

मुंबईत पावसाची रिपरिप सुरुच असून मध्येच मुसळधार सरी बरसत आहेत. शिवाय, राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी आहे. याच पार्श्वभूमीवर हवामान खात्याकडून अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. 

पार्श्वभूमी

सलग दुसऱ्या दिवशी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा नवीन कोरोनाबाधित जास्त
राज्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. मात्र कालपासून डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णसंख्येपेक्षा नवीन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त असल्याचं दिसून येत आहे. शुक्रवारी मृत्यूच्या आकड्यातही कालच्या तुलनेत वाढ झाल्याचं दिसत आहे.  राज्यात शुक्रवारी 11,766 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,104 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 406 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 


मुंबई तिसर्‍या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यात, अनलॉकच्या नियमांमध्ये कोणताही बदल नाही
मुंबई आणि मुंबई उपनगर (Mumbai Corona Update) तिसर्‍या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या निकषानुसार एका आठवड्यातच मुंबई दुसर्‍या टप्प्यात आली आहे.  मुंबईतील ऑक्सिजन बेडची उपलब्धता जास्त असल्याने आणि रुग्णवाढीची टक्केवारी घसरल्याने मुंबईचा समावेश दुसर्‍या टप्प्यात (Mumbai Unlock) करण्यात आला आहे.  मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय कार्यालयांमधील उपस्थिती 100 टक्के ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपस्थिती 100 टक्के ठेवण्याबाबत कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागानं आदेश काढले आहेत.  


मुंबईत 13 आणि 14 जूनला मुसळधार पावसाचा इशारा, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
13 आणि 14 जूनला  मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर व उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पुढील 4-5 दिवस कोकणात अती तीव्र पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम किनारपट्टी भागात जोरदार वारे वाहतील. त्यामुळे मुंबईसह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये अतीमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.