Breaking News LIVE : पुढील तीन तासात विदर्भातील अमरावतीसोबतच नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

Breaking News LIVE Updates, 11 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Jun 2021 10:16 PM
पुढील तीन तासात विदर्भातील अमरावतीसोबतच नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

पुढील तीन तासात विदर्भातील अमरावतीसोबतच नागपूर जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. अमरावती, नागपुरातील अनेक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज असून विजांच्या कडकडाटासह वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. भंडारा, गोंदिया, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यातील काही भागात देखील हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता असल्याची माहिती नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिली आहे. 

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या

पारनेर तालुक्यातील नारायणगव्हाण येथे माजी सरपंच राजाराम शेळके यांची निर्घृण हत्या, जुन्या भांडणातून हत्या झाल्याची चर्चा,  अकरा वर्षापूर्वी घडलेल्या प्रकाश कांडेकर हत्या प्रकरणातील ते आरोपी होते, सध्या ते कांडेकर खून प्रकरणात शिक्षा भोगत होते, मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे सध्या ते रजेवर होते, दुपारच्या सुमारास राजाराम शेळके हे नारायण गव्हाण येथील आपल्या मालकीच्या शेतात काम करीत असताना अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार केले, सुपा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

मुंबई आणि मुंबई उपनगर तिसर्‍या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यात 

- मुंबई आणि मुंबई उपनगर तिसर्‍या टप्प्यातून दुसर्‍या टप्प्यात ,,
- लॉकडाऊनच्या निकषानुसार एका आठवड्यातच मुंबई दुसर्‍या टप्प्यात ,


मुंबईतील ऑक्सिजन बेडची उपलब्धता जास्त असल्याने आणि रुग्णवाढीची टक्केवारी घसरल्याने मुंबईचा समावेश दुसर्‍या टप्प्यात,


- त्यामुळे मुंबई आणि मुंबई उपनगरातील शासकीय कार्यालयांमधील उपस्थित १०० टक्के ठेवण्याचा निर्णय,

आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिंमत बिसवा शर्मा हे नागपूरच्या संघ मुख्यालयात

आसामचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री हिंमत बिसवा शर्मा हे नागपूरच्या संघ मुख्यालयात सर संघचालक मोहन भागवत यांना भेटायला आले आहेत. साधारण चार वाजता ते संघ मुख्यालयात पोहोचले. मोहन भागवत यांच्या सोबत त्यांची बैठक सुरू आहे...

भाजप नेते मुकुल रॅाय यांची घरवापसी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश

भाजप नेते मुकुल रॅाय यांची घरवापसी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूलमध्ये प्रवेश

राजकीय नेत्यांना लस कोणी दिली? याचं उत्तर दिवसभराचं कामकाज संपेपर्यंत आरोग्य विभागाच्या सचिवांना विचारुन उत्तर द्या : हायकोर्ट

मुंबईत ज्येष्ठ राजकीय नेत्यांना घरी जाऊन कोरोनावरील लस आम्ही दिलेली नाही, अशी माहिती मुंबई महापालिकेने हायकोर्टात दिली. यावर 'त्यांना' लस कोणी दिली? असा सवाल हायकोर्टाचा राज्य सरकारला विचारला. राज्य सरकारनं उत्तर देण्यासाठी आठवड्याभराचा अवधी मागितला. पण आठवडाभर कशाला लागतो? एका आठवड्याचा वेळ लस कोणी दिली याचं उत्तर देण्यासाठी का लागतो? असा प्रश्न विचारात दिवसभराचं कामकाज संपेपर्यंत आरोग्य विभागाच्या सचिवांना विचारुन उत्तर द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला दिले आहे.

प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्यातील बैठक संपली, दोघांमध्ये तीन तास चर्चा

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठक संपली आहे. तब्बल तीन तास दोघांमध्ये चर्चा झाली आहे. बैठकीतील तपशीलाबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

पिंपरी चिंचवड शहरात तेरा अॅपे रिक्षाची तोडफोड

पिंपरी चिंचवड शहरात तेरा अॅपे रिक्षाची तोडफोड झाली. वाकडमध्ये ही घटना मध्यरात्री घडली आहे. एका इमारतीच्या सुरक्षा राक्षकाने ही तोडफोड केल्याच पोलिसांचं म्हणणं आहे. नव्या इमारतीसमोर या रिक्षा पार्क केला जातात, त्यामुळे इमारतीचे प्रवेशद्वार झाकले जाते. म्हणून सुरक्षारक्षक अनेकदा इथं वाहनं पार्क करू नका असं सांगत होता. पण न ऐकल्याने त्याने वाहनांच्या काचा फोडल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.

नाना पटोले यांचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या बुलढाण्यातील आयोजकांविरोधात गुन्हा दाखल

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या खामगाव आणि शेगाव येथील आयोजकांविरुद्ध साथ रोग प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.  सायंकाळी 4 वाजल्यानंतर संचारबंदी सुरू असताना आयोजकांनी शेकडो लोक जमा केले होते. या आयोजकांना पोलिसांनी सकाळीच नोटीस बजावली होती. 

पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्यास परवानगी:  उपमुख्यमंत्री अजित पवार

पुण्यात सोमवारपासून मॉल उघडण्याची परवानगी देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलीय. पुण्यातील दुकाने रात्री 7 पर्यंत उघडण्यास परवानगी तसेच अभ्यासिका, वाचनालय सुरू करण्यास सोमवारपासून परवानगी देण्यात आली आहे. 

मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे रुळाला तडा, काही काळासाठी सेवा विस्कळीत; हळूहळू लोकल सेवा पूर्ववत, रेल्वे प्रशासनाची माहिती

मुंबई : मुलुंड ते ठाणे दरम्यान रेल्वे रुळाला तडा गेलाय आणि त्यामुळे लोकल वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला आहे. मुलुंड ठाणे दरम्यान प्रवाशांवर रेल्वे रुळांवरुन चालत जाण्याची वेळ आली आहे. रेल्वे रुळांची दुरुस्ती लोकल सेवा पूर्ववत झाल्याची मध्य रेल्वेच्या वतीनं माहिती देण्यात आली आहे. तसेच हळूहळू लोकल सेवा पूर्ववत होतेय, अशी माहितीही रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 

यंदाच्या पायी आषाढी वारीला बायो बबल नियमांनुसार, परवानगी मिळावी; देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

पंढरपूर : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यंदाच्या पायी आषाढी वारीला बायो बबल नियमांनुसार, परवानगी मिळावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीसांनी केली आहे. 

प्रशांत किशोर आज घेणार शरद पवारांची भेट

यापुढं राजकीय पक्षांच्या रणनीतीचं काम करणार नाही असं पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर सांगणारे रणनीतीकार प्रशांत किशोर आज राजकीय धुरंधर शरद पवार यांना भेटत आहेत. सध्या राजकीय भेटीगाठींचं केंद्र ठरत असलेल्या सिल्वर ओक इथं किशोर आणि पवार दीड तास चर्चा करतील.

आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर लढणार: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

आगामी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आम्ही स्वबळावर लढण्याची तयारी सुरू केलीये. आमच्या मित्र पक्षांच काय प्लॅनिंग आहे हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांची भूमिका अजून माहीत नाही असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले. नरेंद्र मोदींचा चेहरा निवडणुकीत वापरण्यासाठी भाजपकडून विरोध होतोय म्हणजे भाजपचा खरा चेहरा समोर आलाय. मी मूळचा काँग्रेसी असल्याने मी आता माझ्या घरी आहे आणि सुखरूप आहे असंही ते म्हणाले. 

मुंबईपासून नागपूरपर्यंत मोटारसायकल चोरणारी टोळी जेरबंद, 46 चोरीच्या दुचाकी जप्त

मुंबईपासून नागपूरपर्यंत विविध शहरात दुचाकीची चोरी करणारी टोळी पंढरपूर शहर पोलिसांनी जेरबंद केली असून यात चोरीच्या 46 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत . पंढरपूर शहरात एक दुचाकी चोरीची तक्रार 21 मे रोजी दाखल झाल्यावर शहर पोलिसांनी तपास सुरु केला असता यामध्ये चार अट्टल आरोपी जेरबंद करण्यात आले . यातून अनेक धक्कादायक चोऱ्या समोर येत गेल्या . यातील सापडलेले चारही आरोपींवर विविध प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल असून यांचा म्होरक्यावर तर तब्बल 53 गुन्हे दाखल असल्याचे पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी सांगितले . हा म्होरक्या अजूनही पोलिसांना गुंगारा देत असून यालाही लवकरच जेरबंद केले जाईल असा विश्वास सातपुते यांनी व्यक्त केला . हा म्होरक्या सापडल्यानंतर अजूनही मोठ्या प्रमाणात दुचाकी चोरीसह इतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून या अट्टल टोळीने मुंबई , पुणे  , नागपूर , औरंगाबाद , लातूर , उस्मानाबाद , सोलापूर , सातारा , सांगली , कोल्हापूर अशा जिल्ह्यातून या दुचाकींची चोरी केली होती . यातील काही आरोपींवर दरोडे , जबरी चोरी , बलात्कार , अपहरण , शस्त्रे बाळगणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत . जेरबंद केलेल्या चार आरोपींच्या कडून आत्तापर्यंत 14 लाख पन्नास हजार रुपये किमतीच्या 46 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत . 

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Cases : राज्यात गुरुवारी बरे होणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनाबाधित रुग्णांची संख्या जास्त


राज्यात हळूहळू कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. राज्यात आज 12 हजार 207 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 11 हजार 449 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. दरम्यान, आज 393 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. 


सध्या राज्यात 1,60,693 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत एकूण 56,08,753 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 95.45% टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 10,76,165 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,384 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात अनलॉक उघडल्यानंतर पुन्हा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. राज्यात आज नवीन कोरोना रुग्णसंख्येपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी आहे. राज्यात आज सर्वाधिक 1 हजार 50 नवीन कोरोना बाधित रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात आढळले आहेत. 


आज मुंबईत कोरोनाचे 660 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 768 रुग्णांनी आज कोरोनावर मात केली. दरम्यान आज कोरोनामधून 22 जणांचा मृत्यू झाला आहे.


India vs Sri Lanka Team: श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, शिखर धवन कर्णधार तर भुवी उपकर्णधार, 'या' खेळाडूंना संधी


भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने (BCCI) श्रीलंका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यात टीम इंडियाचं नेतृत्व शिखर धवन करणार आहे तर संघाचा उपकर्णधार भुवनेश्वर कुमार हा असणार आहे. संघामध्ये आयपीएलमध्ये चमकलेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडसह वेगवान गोलंदाज चेतन सकारिया, नितीश राणा, देवदत्त पडिकल आणि कृष्णप्पा गौतम यांचा पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश केला गेला आहे. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका तर तीन सामन्यांची  टी20 मालिका खेळणार आहे. 


13 ते 25 जुलैदरम्यान खेळली जाणार मालिका 


भारतीय टीम श्रीलंकेमध्ये 13 ते 25 जुलै दरम्यान तीन वनडे आणि तीन टी20  सामन्यांची मालिका खेळणार आहे. 13, 16 आणि 18 जुलै रोजी एकदिवसीय तर  21, 23 आणि 25 जुलै रोजी टी 20 सामने खेळले जाणार आहेत. हे सामने कुठे खेळले जाणार याबाबत अद्याप घोषणा केलेली नाही.  
 
श्रीलंका दौऱ्यात या खेळाडूंना संधी


श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियामध्ये फलंदाजाच्या यादीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. तर ऑलराउंडर म्हणून हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि के गौतम यांचा समावेश केला आहे. तर गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, राहुल चहर आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे. 


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.