Breaking News LIVE : रिक्षातून घरी जात असताना चोरट्याने मोबाईल खेचल्याने एका महिलेचा मृत्यू

Breaking News LIVE Updates, 10 June 2021 : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Jun 2021 08:18 PM
राज्यातील सरकारी वकील बदलण्याचा राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

राज्यातील सरकारी वकील बदलण्याचा राज्य सरकारच्या मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय. अखेरीस फडणवीस सरकारच्या काळातील वकील बदलले जाणार. दुय्यम न्यायालय, मुंबई नगर दिवाणी न्यायालय, सत्र न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमले जाणार. अनेक सरकारी वकीलांची मुदत संपूनही ते कार्यरत आहेत. फडणवीस सरकारच्या काळात नेमणूक झालेल्या वकिलांबाबत वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्षेप घेतला होता. निरपेक्ष विचारांच्या वकिलांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात येत होती. अखेरीस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला.

रिक्षातून घरी जात असताना चोरट्याने मोबाईल खेचल्याने एका महिलेचा मृत्यू

रिक्षातून घरी जात असताना चोरट्याने मोबाईल खेचल्याने एका महिलेचा मृत्यू. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल. 


हे चोरटे दुचाकीवरून आले होते, त्यांनी रिक्षात बसलेल्या कनमिला रायसिंग हिचा मोबाईल हिस्कवला. मात्र, यावेळी झालेल्या झटापटीत कनमिला रिक्षातून खाली पडली, त्यात तिच्या डोक्याला दुखापत झाली, शेवटी रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. ही महिला मुंबईतील कालिना परिसरात राहते. घटना घडली तेव्हा तिच्यासोबत रिक्षात अजून एक मैत्रीण देखील होती. सध्या पोलिसांनी तपास पथके तयार करून चोरट्याचा शोध घेत आहेत.

बारामती : गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार, तर एक जण गंभीर

बारामती : गाडीचा टायर फुटल्याने झालेल्या अपघातात 2 जण जागीच ठार, तर एक जण गंभीर, पुणे सोलापूर महामार्गावरील भिगवणजवळील डाळज नंबर 3 मधील घटना, पुण्याहून लातूरला जाताना अपघात, संध्याकाळी 7 च्या सुमारासची घटना, मृतांची ओळख अद्याप पटली नाही

पुढील काही तासात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस 

पुढील काही तासात मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात पाऊस ,


पश्चिम विदर्भातील जिल्ह्यातही पावसाची हजेरी ,


लातूर, बीड, औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोलीत काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता,


पश्चिम विदर्भातील अकोला, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाण्यात विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस

जालना : पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू

जालना : पाण्यात बुडून तीन बालकांचा मृत्यू, बदनापूर तालुक्यातील कुसळी गावची घटना, घराजवळील खदानीमध्ये पावसाने साचलेल्या पाण्यात बुडून तीन सख्या भावंडांचा मृत्यू, मयतांची नावे मनोज अंकुश वैद्य (11वर्ष ), दीपाली अंकुश वैद्य ( 10वर्ष) आकाश संजय वैद्य वय (7वर्ष )

राज्यातील सरकारी वकील बदलण्याचा राज्य सरकारचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय

- राज्यातील सरकारी वकील बदलण्याचा राज्य सरकारचा मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय, 


अखेरीस फडणवीस सरकारच्या काळातील वकील बदलले जाणार,  दुय्यम न्यायालय, मुंबई नगर दिवाणी न्यायालय, सत्र न्यायालय आणि जिल्हा न्यायालयातील सरकारी वकील आणि सहाय्यक सरकारी वकील नेमले जाणार 


- अनेक सरकारी वकीलांची मुदत संपूनही ते कार्यरत आहेत.  फडणवीस सरकारच्या काळात नेमणूक झालेल्या वकिलांबाबत वेळोवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आक्षेप घेतला होता.


- निरपेक्ष विचारांच्या वकिलांची नेमणूक करावी अशी मागणी करण्यात येत होती 


- अखेरीस आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत निर्णय झाला

: 1 ते 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या आणि ते नियमित फेडणाऱ्या शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज मिळणार

LIVE UPDATE : 1 ते 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या आणि ते नियमित फेडणाऱ्या शेतकर्‍यांना बिनव्याजी कर्ज मिळणार, मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय #Maharashtra #CabinetDecisions



 



https://marathi.abplive.com/news/maharashtra/breaking-news-live-updates-maharashtra-news-latest-marathi-headlines-june-10-2021-maharashtra-political-news-coronavirus-maharashtra-rain-990124

बुलडाणा : पीककर्ज नाकारल्याने शेतकऱ्यांचं किडनी विकण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र

बुलडाण्यातील मलकापूर तालुक्यातील वाकोडी गावातील पाच शेतकऱ्यांना बॅंकेने पीक कर्ज नाकारल्याने त्यांना आता शेतीसाठी बियाणे , मशागतीसाठी खर्च करण्यासाठी जवळ पैसा नसल्याने आता या पाच शेतकऱ्यांनी आपली किडनी नाममात्र फक्त 50 हजार रुपयात गरजू लोकांना  विकायची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितली आहे. तसं पत्र या शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्याकडे पाठवलं आहे. दरवर्षी या शेतकऱ्यांना पीक देण्यात येतं. पण यावर्षी बॅंकेने पीककर्ज नाकारल्याने त्यांना आता शेतीसाठी पैशाची अडचण असल्याने त्यांना आता किडनी विकल्याशिवाय पर्याय नसल्याचं या शेतकऱ्यांचं म्हणणे आहे.

वर्धा - कोरोना लसीकरण लवकर पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीना निधीतून 5 लाख रुपये देणार, आमदार रणजित कांबळे यांचा पुढाकार

वर्धा - कोरोना लसीकरण लवकर पूर्ण करणाऱ्या ग्रामपंचायतीना आमदार निधीतून 5 लाख रुपयांचा विशेष निधी देणार, देवळी, पुलगाव विधानसभा क्षेत्राकरिता आमदार रणजित कांबळे यांचा लसीकरणासाठी पुढाकार, अधिकारी, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सरपंचांच्या ऑनलाइन बैठकीत लसीकरण नियोजन करण्याचे निर्देश, 90 टक्के लसीकरण करणाऱ्या ग्रामपंचायतीनांही दिल्या जाणार विशेष निधी, कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती करण्याचेही निर्देश

आजच्या कॅबिनेटमधे अनाथांना 1% आरक्षण देण्याबाबत  निर्णय होण्याची शक्यता

आजच्या कॅबिनेटमधे अनाथांना 1% आरक्षण देण्याबाबत  निर्णय होण्याची शक्यता , अनाथ मुलांच्या व्याख्येत सरकार बदल करण्याची शक्यता, अनाथांना शैक्षणिक शुल्कात सवलत मिळणार, अनाथ आरक्षणातून प्रवेश घेणा-या मुलांचं शैक्षणिक शुल्क सरकार भरणार, 2018 मधे फडणवीस सरकारने आरक्षण देण्यात आले मात्र ते खुल्या प्रवर्गातून होते अनेक मुल आरक्षणापासून वंचित होते, लाभ घेऊ शकत नव्हते  त्यामुळे आधीच्या निर्णय रद्द होत महत्वपूर्ण निर्णय आज होण्याची शक्यता

जळगाव : रेतीचे डंपर सोडण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आणि पोलिस कॉन्स्टेबल लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

जळगाव : रेतीचे डंपर सोडण्यासाठी दहा हजारांची लाच घेतल्याप्रकरणी वरणगाव पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक सुनील वाणी आणि पोलिस कॉन्स्टेबल गणेश शेळके लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात, जळगाव लाचलुचपत विभागाचे उपअधीक्षक सुनील भामरे यांच्या पथकाची कारवाई

महाविकास आघाडी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणी वाढणार

महाविकास आघाडी सरकारमधल्या आणखी एका मंत्र्याच्या अडचणी वाढणार, अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्टच्या पाहणीसाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची टीम लवकरच धडकणार, रत्नागिरीतल्या मुरुडमध्ये सीआरझेड नियमांचे उल्लंघन करत रिसॉर्ट उभारल्याचा आरोप, आज दिवसभरात किरीट सोमय्या यांनी केंद्रीय तपास यंत्रणांची देखील भेट घेऊन याबाबत कागदपत्र पुरवले आहेत.

राष्ट्रवादीने महाराष्ट्रात नेतृत्वाची फळी उभी केली: शरद पवार

आजच्या दिवशी 22 वर्षांपूर्वी संघटना उभी करण्याची भूमिका स्वीकारली, ती कितपत योग्य होती याचा आढावा घ्यायचा आजचा दिवस आहे असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. 

संकटं कितीही येवोत, महाराष्ट्र कधीही झुकणार नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार

राज्यावर कोरोनाचे संकट आलं आहे. संकट कितीही येवोत, कधीही येवोत, हा महाराष्ट्र कधीही झुकणार नाही, थकणार नाही आणि या कामी राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात पुढे उभा असणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

लोकशाहीविरोधी पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहणार : उपमुख्यमंत्री अजित पवार 

केंद्रात भाजपचं सरकार आल्यानंतर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण झाला आहे असं सांगत लोकशाहीविरोधी पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहणार असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली

सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळली आहे. सुशांतच्या वडिलांनी सुशांतच्या जीवनावर बननणाऱ्या चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी या याचिकेतून केली होती. परंतु, न्यायालयानं ही मागणी फेटाळली आहे. 

मुंबई महापालिकेची जबाबदारी आता वाढली आहे: महापौर किशोरी पेडणेकर

दुर्घटनांकडे आता डोळसपणे पहायला हवं तसंच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी अधिक जबाबदारीनं वागलं पाहिजे असं मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या. कोरोना काळात अनेक बेकायदेशीर कामं झाली असून मुंबई महापालिकेची जबाबदारी आता वाढली आहे असंही त्या म्हणाल्या. 

सात वर्षांत भाजपला मिळालेलं यश हे मोदींच्या चेहऱ्यामुळे: खासदार संजय राऊत

देशाच्या पंतप्रधानांनी राजकीय प्रचारात भाग घेऊ नये असं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. सात वर्षांत भाजपला मिळालेलं यश हे केवळ मोदींच्या चेहऱ्यामुळे हे नाकारू शकत नाही असंही ते म्हणाले.

यंदा पायी वारी सोहळा नको, देवाच्या आळंदीतील ग्रामस्थांची भूमिका

पुण्यातील देवाच्या आळंदीमधील ग्रामस्थांनी यंदा पायी वारी सोहळा नको, अशी भूमिका घेतलाय. दुसऱ्या लाटेत बरंच भोगल्यानंतर आता तिसऱ्या लाटेत तीच वेळ यायला नको. शिवाय तिसऱ्या लाटेचं खापर ही वारकरी सांप्रदाय आणि ग्रामस्थांवर फुटी नये. म्हणून यंदा ही एसटीतूनच पंढरपूरला वारी नेहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केलीये.

अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवरुन झुगारत लासलगावात 75 वर्षांत पहिल्यांदाच अमावस्येला कांद्याचा लिलाव सुरु

आशिया खंडातील सर्वात मोठ्या लासलगाव बाजार समिती अखेर 75 वर्षांपासून अमावस्येला बंद ठेवले जाणारे बाजार समितीमधील कांद्याचे लिलाव अखेर आजच्या अमावस्येला सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला होता. आज पहिल्याच अमावस्येला लिलाव होत असून अंधश्रद्धेचे भूत मानगुटीवरुन झुगारत बाजार समितीनेने एक पाऊल पुढे टाकले आहे. अमावस्येला कांदा लिलाव सुरू ठेवण्याचा निर्णय झाल्यानंतर आजच्या पहिल्याच अमावस्येला शेतकऱ्यांचा कसा प्रतिसाद मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र अंधश्रद्धेला झुगारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याचे पहावयास मिळाले. 

येस बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची 17 ठिकाणी छापेमारी

मुंबई : येस बँकेच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सीबीआयची 17 ठिकाणी छापेमारी. 466 कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गौतम थापर यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दिल्ली एनसीआरसह तीन राज्यातं सीबीआयनं छापेमारी केली. 

महाराष्ट्रात कोरोनामुळं झालेल्या मृत्यूचा आकडा लपवण्याचा प्रयत्न? राज्यात कोरोनामुळे झालेल्या 11 हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद नाही

महाराष्ट्रात कोरोनामुळं झालेल्या मृत्यूचा आकडा लपवण्याचा प्रयत्न? राज्यात कोरोनामुळे झालेल्या 11 हजारांहून अधिक मृत्यूंची नोंद नसल्याची बाब समोर आली आहे. राज्याच्या पोर्टलवर 11 हजार 617 मृत्यूची नोंद करण्याचे आदेश आरोग्य विभागानं दिलेले आहेत. त्याचप्रमाणे नोंदी न झाल्यास संबंधित जिल्हा शल्य चिकित्सकांवर कारवाई करणार असल्याचा इशाराही आरोग्य विभागाच्या वतीनं देण्यात आला आहे. 

धुळ्यातील शिरपूर येथे बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त, मुंबईच्या पथकाची कारवाई

मुंबईच्या पथकाने कारवाई करत धुळ्यातील शिरपूर येथे बनावट मद्याचा कारखाना उद्ध्वस्त केला. या कारवाई दरम्यान तीन संशयितांना अटक करण्यात आली ड तयार दारू, यंत्रसामग्री आणि तीन वाहने असा एक कोटीहून अधिक रकमेचा मुद्देमाल त्यांनी जप्त केला. महामार्गाला अगदी खेटून असलेल्या या जागेत इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट मद्यनिर्मिती चालते आणि त्याची खबरबात कोणालाही असू नये याबद्दल त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. रात्री उशिरापर्यंत मुद्देमाल जप्त करून वाहून नेण्याची कार्यवाही सुरू होती

खासदार संभाजीराजेंच्या उपस्थितीत समन्वयकांची बैठक, मराठा आरक्षणाबाबत 16 जूनच्या आंदोलनाची दिशा ठरणार

खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत आज कोल्हापुरात समन्वयकांची बैठक होणार आहे. मराठा आरक्षणाबाबत 16 जूनच्या आंदोलनाची दिशा या बैठकीत ठरवली जाणार आहे. आंदोलन कशा पद्धतीने केलं जाणार याचा आज निर्णय होणार आहे.

मागील चार महिन्यात नाशिकमध्ये तब्बल 9 हजार 112 मृत्यू, कोरोनामुळे मृतांच्या संख्येत वाढ

मागील चार महिन्यात नाशिकमध्ये तब्बल 9 हजार 112 मृत्यू झाले आहेत. जानेवारी ते एप्रिल महिन्यातील मृतांची संख्या धक्कादायक आहे. कोरोनामुळे मृतांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. चार महिन्यात 5 हजार 558 पुरुष तर 3 हजार 554 महिलांनी जीव गमावला. एकट्या एप्रिल महिन्यात सर्वाधिक 4 हजार 915 मृत्यूची नोंद झाली आहे. मार्च महिन्यात 1 हजार 701 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये नाशिक ग्रामीणसह उत्तर महाराष्ट्रच्या इतर जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. दर महिन्याला विविध कारणांनी सरासरी 1200 ते 1500 मृत्यू होत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे.

मुंबईतील मालाडमध्ये दुमजली चाळीचा काही भाग कोसळला, 16 जणांना वाचवण्यात यश

मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमधील एका दुमजली चाळीचा काही भाग कोसळला. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य अद्यापही सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून जवळपास 16 लोकांना वाचवण्यात आलं आहे. ज्यामध्ये तीन लहान मुलं, तीन महिला आणि 10 पुरुषांचा समावेश आहे. दरम्यान, या इमारतीत एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बचावकार्य अद्याप सुरु आहे. 

ज्येष्ठ अंध कवी चंद्रकांत देशमुखे यांचे निधन

बालपणापासून अंध आणि शिक्षणाचा कसलाही गंध नसलेले सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील संवेदनशील व्यक्तिमत्त्व, ज्येष्ठ अंध कवी चंद्रकांत देशमुखे उर्फ बाबूजी यांचे वयाच्या 73 व्या वर्षी बुधवारी (9 जून) हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने राहत्या घरी निधन झाले. आपल्या कवितेतून देशभक्ती रुजवण्याचे त्यांचे काम गेली 57 वर्षे अविरतपणे सुरु होते. त्यांच्या निधनाने सांगली जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. दीड वर्षाचे असताना देवीच्या साथीत त्यांचे डोळे गेले. वयाच्या तेराव्या वर्षापासून त्याना कवितेचा छंद जडला आणि अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची प्रेरणा मिळाली. अंधत्व आल्यामुळे अंधकवी म्हणून त्याची ओळख होती.

पार्श्वभूमी

Maharashtra Corona Cases : राज्यात बुधवारी 10,989 नवीन रुग्णांचे निदान; तर 16,379 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात बुधवारी (9 जून) कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच काल कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात काल 10 हजार 989 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 16 हजार 379 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मंगळवारी (8 जून) राज्यात 10219 रुग्णांची नोंद झाली होती.  कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,97,304 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.45 टक्के झाला आहे. काल 261 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात एकूण 1,61,864 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 11,35,347 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील पाच महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यात 10 पेक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 


मुंबईतील मालाडमध्ये एका दुमजली चाळीचा भाग कोसळला, काही जण अडकल्याची भीती
मुंबईत मुसळधार पावसामुळे एका दुमजली चाळीचा काही भाग कोसळला आहे. मालाडच्या मालवणीमध्ये ही घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून बचावकार्य सुरु आहे. काही जणांना ढिगाऱ्याखालून काढण्यात यश आलं असून काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. एकूण दोन ते तीन कुटुंब याठिकाणी राहत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. परिसर दाटीवाटीचा असल्याने घटनास्थळी पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अरुंद असल्याने बचावकार्यात अडचणी येत आहे. अॅम्ब्युलन्स, अग्निशमन दलाच्या गाड्या, जेसीबी घटनास्थळापर्यंत पोहोचू शकत नाहीयेत. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्य सुरु केले आहे. आजूबाजूच्या घरांनाही धोका असल्याने तेथील रहिवाशांना हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. 


पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांचा विरोध
पायी वारी सोहळ्याला आळंदी ग्रामस्थांनी विरोध दर्शविला आहे. यंदाही पालखी सोहळा हा एसटीतूनच पंढरपूर जावा, अशी मागणी राज्य सरकार, आळंदी देवस्थान आणि जिल्हा प्रशासनाकडे निवेदनातून केली आहे. दुसरी लाट परदेशातून आली, पण तिसऱ्या लाटेला आपण जबाबदार ठरायला नको. कुंभमेळा, पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुक, ग्रामपंचायत निवडणुकांचा अनुभव आपल्या गाठीशी आहे. तेव्हा पायी वारीचा अट्टाहास वारकरी संप्रदायाची अवहेलना आणि बदनामीला कारणीभूत ठरेल. असं ग्रामस्थांनी निवेदनात म्हटलंय.


QS जागतिक विद्यापीठ मानांकनात देशातील तीन विद्यापीठांना पहिल्या दोनशेमध्ये स्थान, पंतप्रधानांकडून अभिनंदन
विद्यापीठांसाठीच्या QS या जागतिक मानांकनांमध्ये 2022 मध्ये, भारतातील 3 विद्यापीठांनी पहिल्या दोनशेमध्ये स्थान मिळवले आहे. तर संशोधनाबाबत बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्था जगात सर्वोत्कृष्ट ठरली आहे. QS म्हणजे क्वाकारेली सायमंड्स ही संस्था जागतिक पातळीवर उच्चशिक्षण संस्थांचे विश्लेषण करते. या संस्थेने आज जगभरातील शैक्षणिक संस्थांसाठी अठरावी आंतरराष्ट्रीय विद्यापीठ मानांकने जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयआयटी ( भारतीय तंत्रज्ञान संस्था )-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बेंगळुरूचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर म्हटलं की, आयआयटी (भारतीय तंत्रज्ञान संस्था)-मुंबई, आयआयटी दिल्ली आणि आयएससी (भारतीय विज्ञान संस्था) बंगळुरूचे  हार्दिक अभिनंदन ! भारतातील अधिकाधिक विद्यापीठे व शिक्षणसंस्थांनी जागतिक गुणवत्तेच्या मापदंडां वर उत्कृष्ट ठरावे आणि तरुणाईतील बौद्धिक श्रीमंतीला पाठबळ द्यावे, या दिशेने प्रयत्न सुरू आहेत.


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.