Maharashtra Breaking News LIVE : साताऱ्यातील कास रोडवरील गणेश खिंड येथे सेल्फी काढताना पढलेला युवकाला सुरक्षित बाहेर काढलं

Maharashtra News LIVE Update, 09 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Jul 2021 08:55 PM
मुंबई शहरात सलग तिसऱ्या दिवशी पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरण बंद

मुंबई शहरात सलग तिसऱ्या दिवशी पुरेशा लस साठ्याअभावी उद्या शनिवारी 10 जुलै रोजी शासकीय आणि महानगरपालिका केंद्रांवर लसीकरण बंद राहणार आहे. तिसरी लाट तोंडावर असताना लसीकरण बंद असणं भविष्यात घातक ठरू शकते.

साताऱ्यातील कास रोडवरील गणेश खिंड येथे सेल्फी काढताना पढलेला युवकाला सुरक्षित बाहेर काढलं

साताऱ्यातील कास रोडवरील गणेश खिंड येथे सेल्फी काढताना गुरुवारी दुपारी युवक दरीत पडला होता. शिवेंद्रराजे ट्रेकर्स कार्यकर्त्यांनी क्रेन लावून युवकाला सुरक्षित बाहेर काढले. जखमी युवकावर रुग्णालयात उपचार सुरू. तनिष्क जांगळे असे संबंधित युवकाचे नाव.

Mumbai Rain : दक्षिण मुंबईसह दादर परिसरातही मुसळधार पावसाला सुरुवात

हवामान विभागाचा अंदाज अखेर खरा ठरला आहे. मुंबईत आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. अशातच मागील अर्धा तासापासून दक्षिण मुंबईसह दादर परिसरातही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. उद्या देखील काही ठिकाणी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता आहे तर रविवारपासून मुंबईत पावसाची संततधार बघायला मिळू शकते. पश्चिमी वारे सक्रीय झाल्याने पावसाला सुरुवात झाली आहे, अशातच संपूर्ण महाराष्ट्रात पुढील पाच दिवस चांगला पाऊस बरसण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईतील धरणांमध्ये 18  टक्के पाणीसाठा सध्या उपलब्ध आहे, अशातच धरण क्षेत्रातही असाच पाऊस बरसल्यास मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील एक महिन्यापासून कोरोनामुक्त असलेल्या गावात सुरू होणार शाळा

सोलापूर जिल्ह्यातील एक महिन्यापासून कोरोनामुक्त असलेल्या गावात सुरू होणार शाळा. जिल्ह्यातील 335 गावांमध्ये सोमवारपासून 8 वी ते 12 वीचे वर्ग सुरू होणार आहेत. या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे तातडीने लसीकरण पूर्ण करण्यात येणार. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची पत्रकार परिषदेत माहिती.

गोकुळ'कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, म्हशीच्या दुधाला 2 रुपये दरवाढ

गोकुळ'कडून दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, म्हशीच्या दुधाला 2 रुपये दरवाढ,गायीच्या दुधाला 1 रुपये प्रतिलीटर दर वाढ दिली जाईल,नवीन दर 11 जुलैपासून लागू होणार,गोकुळकडून कोल्हापूर जिल्हा वगळून विक्री दरात 2 रुपयांची दर वाढ,दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलेलं आश्वासन काही दिवसांतच आम्ही पूर्ण केलंय,गोकुळ दूध संघात सत्ता आल्यानंतर प्रत्येक पातळीवर आम्ही बचत करण्याचा प्रयत्न केलाय,मुंबईत गोकुळची व्याप्ती वाढली पाहिजे यासाठी राज्य सरकारच्या मदतीने जागा घेतोय- मंत्री सतेज पाटील यांची माहिती

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास  सर्जरी

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी  तातडीने बायपास  सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटल मध्ये ठेवण्यात येईल. त्यांच्या प्रकृतीची माहिती वंचित बहुजन आघाडीच्या फेसबुक पेज वरून  रोज देण्यात येईल, असं वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी सांगितलं आहे.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन

उत्तर प्रेदश : उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचं निधन झालं आहे. बाबरी विध्वंस प्रकरणाच्या वादग्रस्त काळात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. 

Maharashtra News : कोरेगाव भीमा प्रकरणी शरद पवार साक्ष नोंदवणार

1 जानेवारी 2018 रोजी कोरेगाव भीमा येथे हिंसाचार घडला होता. त्याच्या चौकशीसाठी नेमण्यात आलेल्या आयोगाचे कामकाज 2 ऑगस्टपासून सुरु होणार असून त्या प्रकरणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आपली साक्ष नोंदवणार आहेत. 

रिफायनरी प्रकल्पासाठी समर्थकांचं आणखी एक पाऊल; दुसऱ्या समर्थक समितीची स्थापना

रत्नागिरी : राजापूर तालुक्यातच आरआरपीसीएलचा तेल शुद्धीकरणाचा कारखाना व्हावा यासाठी समर्थकांनी आणखी एक पाऊल उचलंलं आहे. त्यानुसारी दुसऱ्या प्रकल्प समर्थक समितीची स्थापना केली गेली आहे. यामध्ये 34 जणांना समावेश असून राजापूरचे माजी नगराध्यक्ष हनिफ काझी समितीच्या अध्यक्षपदी आहेत. देवाचे गोठणे-सोलगाव-नाटे दशक्रोशी रिफायनरी समर्थक समिती असं या समितीचं नाव आहे. गावांमध्ये समन्वय राखला जावा या दृष्टीनं ही दुसरी समिती स्थापन केली गेली आहे. त्यामुळे रिफायनरीसाठी समर्थक सर्वकाही करत असून राजकीय इच्छाशक्तीवर या प्रकल्पाचं भवितव्य अवलंबून असणार आहे. राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगावच्या सड्यावर प्रकल्प व्हावा यासाठी सध्या सर्वच स्तरातील प्रकल्प समर्थक आपली ताकद लावताना दिसून येत आहे.  

नांदेड जिल्ह्यात काही भागात जोरदार तर काही भागात रिमझिम पाऊस

नांदेड : जिल्ह्यात गुरूवार पासून पावसाचं  आगमन झाल असून काही भागात जोरदार तर काही भागात हलक्या सरी कोसळल्या आहेत. गेला महिनाभर पावसाने दडी मारल्याने सोयाबीन आणि कापसाची पिके अक्षरशः पाण्याअभावी सुकून जात होती. तसेच अनेक शेतकऱ्यांनी दुबार पेरणी करूनही पावसाच्या उघडीपमुळे ही पेरणी संकटात सापडली होती.परंतु काल पासून सुरु झालेल्या या पावसामुळे जिल्ह्यातल्या कांही भागातील पिकांना जीवदान मिळेल अशी आशा निर्माण झालीय.

Maharashtra Nagpur News : नागपुरातील दिव्यांग मारहाण मृत्यूप्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग

नागपूर पोलिसांच्या मारहाणी मनोज ठवकर या दिव्यांग व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मारहाणीचा आरोप असलेले पोलीस उपनिरीक्षक मुकेश ढोबळे, पोलीस कर्मचारी नामदेव चरडे व आकाश शहाणे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. ठवकर यांचा मृत्यू पोलिसांच्या ताब्यात असताना झाल्याने नियमानुसार प्रकरणाचा तपास CID कडे दिला गेला आहे.


 

अपेक्स रुग्णालय प्रकरणी सांगलीतील आणखी एका डॉक्टरवर अटकेची टांगती तलवार

मिरजमधील अपेक्स रुग्णालय प्रकरणी सांगलीतील आणखी एका डॉक्टरवर अटकेची टांगती तलवार आहे. डॉ. महेश जाधवच्या अपेक्स कोविड सेंटरमध्ये सांगलीतील डॉ. शैलेश बरफे यांनी मदत केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. डॉ. बरफे याने पोलीस चौकशीला हजर न राहता अटकपूर्व जामीनासाठी सांगली सत्र न्यायालयात केलेला अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यानंतर डॉ.बरफे फरार आहे. 

जोतिबा डोंगरावरील ग्रामपंचायतीचा वीज पुरवठा पूर्ववत

कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा डोंगरावर 15 दिवसांपूर्वी वीज पुरवठा खंडित केल्याने ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. एबीपी माझाच्या बातमीनंतर पालकमंत्री सतेज पाटील यांनी महावितरणला वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे आजपासून पाणी पुरवठा सुरळीत होणार असून रस्त्यावरचे दिवे देखील लागणार आहे. 56 लाखांचे वीजबिल भरले नसल्याने महावितरणने वीजपुरवठा खंडित  केला होता.

लसीचा प्रभाव वाढवण्यासाठी फायझर करणार बूस्टर डोसची निर्मिती

फाझरने आपल्या कोरोनाव्हायरस लसीच्या प्रतिकारशक्तीत घट असल्यामुळे बूस्टर डोस विकसित करण्याच्या प्रयत्नांना वेग दिला आहे. बुस्टर डोसमुळे लोकांचा कोरोनाच्या नव्या प्रकारापासून बचाव होईल. कंपनीने येत्या ऑगस्टमध्ये बूस्टर डोससाठी यूएस फूड अ‍ॅन्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनकडे आणीबाणीच्या वापराची अधिकृतता मागविण्यात येईल, असे कंपीनीने सांगितले आहे. कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस प्रकारावर फायझरची लस कमी उपयोगी आहे असे कांही देशात लक्षात आले आहे

पार्श्वभूमी

शिक्षण सेवक भरतीला राज्य शासनाचा हिरवा कंदिल; 6,100 रिक्त पदांसाठी पवित्र प्रणाली राबवणार, शिक्षणमंत्र्यांची माहिती
राज्यातील सुमारे सहा हजार 100 शिक्षण सेवकांची पदं आता भरली जाणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या पुढाकारामुळे भरती प्रक्रीयेला गती मिळाली आहे. गुणवत्ताधारक उमेदवारांसाठी पवित्र प्रणालीच्या माध्यमातून पारदर्शकपणे ही प्रक्रीया राबविण्यात येणार आहे. राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या, खाजगी व्यवस्थापनाच्या अनुदानित, अंशतः अनुदानित आणि विना अनुदानित तसेच अनुदानास पात्र घोषित केलेल्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांमधील तसेच शासकीय आणि अनुदानित अध्यापक पदविका विद्यालयातील (डी. एल. एड. कॉलेज) शिक्षकांच्या रिक्त पदांवर भरती करताना, सर्व उमेदवारांना निवडीची समान संधी मिळावी असा प्रयत्न करण्यात येणार आहे. तसेच शिक्षण सेवक पदासाठी उच्च गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड होण्याच्या दृष्टीने शिक्षण सेवकांची भरती "अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी" (TAIT) परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे तसेच खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये "अभियोग्यता आणि बुद्धीमत्ता चाचणी" (TAIT) परीक्षेत अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची मुलाखत घेऊन त्या आधारे अंतिम निवड करण्यात येणार आहे.


आरोग्यमंत्री मंडावियांची मोठी घोषणा; कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी 23 हजार कोटींचं पॅकेज मंजूर
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या कॅबिनेटच्या पहिल्या बैठकीत कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी खास पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे.  23 हजार कोटी रुपयांच्या इमर्जन्सी हेल्थ रिस्पॉन्स फंडला मंजुरी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या पॅकेजची घोषणा केली होती. त्याला गुरुवारी नव्या कॅबिनेटमध्ये मंजुरी देण्यात आली.  मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसर्‍याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या नव्या मंत्रिमंडळासोबत बैठक घेतली. या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत.


Tokyo Olympics 2020 : टोकियो ऑलिम्पिक प्रेक्षकांविनाच होणार, ऑलिम्पिक मंत्र्यांची घोषणा
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जपानची राजधानी टोकियोमध्ये होत असलेली ऑलिम्पिक स्पर्धा प्रेक्षकांविनाच होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. ऑलिम्पिक मंत्र्यांनी याबाबत घोषणा केली आहे. आजच टोकियोमध्ये आणीबाणी लागू (japanese Prime Minister announces state emergency Tokyo )करण्यात आली आहे. टोकियोमध्ये होऊ घातलेल्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर जपानच्या पंतप्रधानांनी हा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान योशिहिदे सुगा यांनी 12 जुलै ते 22 ऑगस्टदरम्यान टोकियोमध्ये कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळं आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळं ऑलिम्पिक खेळांचा आनंद प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लुटण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार नसल्याचं स्पष्ट झालं आहे.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.