Breaking News LIVE : सीबीआयच्या एफआयआरविरोधात राज्य सरकारची याचिका फेटाळली
Breaking News LIVE Updates, 22 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Corona Update : राज्यात आज 7302 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 7756 रुग्णांची कोरोनावर मात, तर आज 120 रुग्णांच्या मृत्यूची नोंद
सीबीआयच्या एफआयआरविरोधात राज्य सरकारची याचिका फेटाळली, अनिल देशमुख प्रकरणात राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका,सीबीआय पोलीस अधिका-यांच्या बदल्या आणि सचिन वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्याच्या निर्णयाचा तपास करू शकते - हायकोर्ट,पोलीस आयुक्तांनी या संपूर्ण प्रकरणाची रितसर तक्रार करायला हवी होती - हायकोर्ट
परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबईच्या मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये परमबीर सिंह आणि मुंबई पोलीस दलातील इतर पाच पोलीस कर्मचाऱ्यांवर खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. तर संजय पुनमिया आणि सुनील जैन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्यातील एका बांधकाम व्यासायिकाने हा गुन्हा दाखल केला आहे.
आज पहाटे काकड आरतीनंतर साई प्रतिमा आणि पोथीची मिरवणूक काढून शिर्डीतील तिन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सवाला सुरुवात झालीय. कोरोना संकटामुळे सलग दुसऱ्या वर्षी गुरुपोर्णिमा उत्सव भक्तांविना साध्या पध्दतीने साजरा होतोय. मुख्य कार्यकारी अधिकारी के.एच. बगाटे यासह अधिकारी पोथी मिरवणुकीत सहभागी झाले होते. साईबाबांना गुरुस्वरुप मानून दरवर्षी लाखो भक्त साईचरणी नतमस्तक होतात. मात्र यावेळी मोजके भाविक साईदर्शनासाठी आल्याच चित्र पहायला मिळतय.
शिवसेना आमदार संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात सामावून घ्यावे या मागणीसाठी शिवसैनिक गिरीश व्यास हे यवतमाळ ते मुंबई सायकल वारी करणार आहेत. हा प्रवास 700 किमीचा आहे. उद्धव ठाकरे यांना भेटून संजय राठोड यांना मंत्रिमंडळात घेण्याचं साकडं घालणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. यवतमाळ येथून ते मुंबई दादर येथील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळापर्यंत जाण्यासाठी निघाले आहे. पुढील 8 दिवसात ते मुंबईला पोहचतील.
महाड येथे टेरेसवरुन पूर पहात असताना तोल जाऊन खाली कोसळल्याने 50 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. संजय नारखेडे असं या मृत व्यक्तीचं नावं असून महाडच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. महाडच्या रोहिदासनगर भागात ही घटना घडली आहे.
चेंबूरच्या भारत नगरमध्ये झालेल्या दुर्घटनेत 19 जणांना आपला जीव गमावावा लागला. अनेक जण जखमी आणि बेघर झाले आहेत. सरकारने त्यांना मदती ची घोषणा ही केली आहे.मात्र त्या आधी या अपघातग्रस्त कुटुंबांना तात्काळ मदत म्हणून काँग्रेसने मदतीचा हात देऊ केला आहे.या अपघातात मृत्यू पावलेल्याच्या कुटुंबाला 25 हजार रुपये आणि जखमींना 15 हजार रुपये प्रत्येकी देण्यात आले.त्याच बरोबर बेघर झालेल्या कुटुंबांना रेशन किटचे वाटप करण्यात आले.काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या हस्ते या मदतीचे वाटप करण्यात आले.या ठिकाणी या दुर्घटनेत मृत पावलेल्याना मुंबई काँग्रेसतर्फे श्रद्धांजली ही वाहण्यात आली.या वेळी चंद्रकांत हंडोरे यांनी सरकारने जाहीर केलेली मदत ही या कुटुंबांना लवकरात लवकर मिळावी आणि इथल्या बेघरांना कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था करावी अशी मागणी काँग्रेसतर्फे केली आहे.
रायगड जिल्ह्यातील महाड शहरातील अनेक रस्त्यावर पाणी साचले आहे. शहरातील शिवाजी चौक आणि बाजारपेठ परिसरात पाणी साचल्याने या ठिकाणच्या सर्वांना सुरक्षित स्थळी पोहोचवण्यात आलं आहे.
गेल्या तीन दिवसांपासूनच्या कोसळणाऱ्या पावसामुळे कल्याण नजिकच्या टिटवाळ्यात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. प्रामुख्याने टिटवाळा परिसरात अग्निशमन केंद्रात गुडघाभर पाणी शिरले आहे. तर रिजन्सी संकुल मध्ये 8-10 बिल्डिंगला फटका बसला असून मंदिर परिसरात अनेक ठिकाणी गायत्री धाम, घर अंगण संकुल मध्ये पाणी साचले असून नागरिक आता पाणी ओसरण्याची वाट पाहत आहेत.रिजन्सी संकुल परिसरात चार चाकी गाड्या पाण्याखाली गेल्या आहेत.
गेली दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील खेड जगबुडी नदी धोक्याची पातळीवर पोहोचली आहे. जगबुडी नदीच्या पुराचे पाणी खेडच्या बाजारपेठेत शिरले आहे. बाजारपेठेत पाणी शिरल्याने व्यवसायिकांची आपल्या दुकानातील माल हलविण्यास धावपळ उडाली आहे. नगरपरिषदेकडून नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात येतोय. चिपळूमधील वशिष्टी नदीच्या पाणी पात्रात वाढ होऊन सध्या धोकापातळीवर वाहते. पुराचे पाणी बाजारपेठेत शिरल्याने व्यवसायिकांची धावपळ उडालेली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Rains Updates : पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावासाचा इशारा
राज्यातल्या बहुतांश भागात पावसानं दमदार हजेरी लावलेली असली तरी पुढील पाच दिवस मुंबईसह राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज आणि उद्या मुंबईसह राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, पुण्यातील घाट माथ्यावर अतिवृष्टीचा तर कोल्हापुरातल्या घाटमाथ्यावर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. मराठवाड्यात देखील पुढील तीन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भातल्या नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस अपेक्षित आहे. दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टी भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी अतिमुसळधार पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने महाराष्ट्रात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
राज्यात काल 8159 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 7839 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात आज 8 हजार 159 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 7 हजार 839 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 60 लाख 8 हजार 750 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.33 टक्के आहे. राज्यात आज 165 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.09 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 94 हजार 745 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. जालना (31), हिंगोली (45), यवतमाळ (17), गोंदिया (55) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 566 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
11 वी CET परीक्षेचे ऑनलाइन अर्ज सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी काही कालावधीसाठी बंद
इयत्ता 11 वी प्रवेशासंदर्भात घेण्यात येणाऱ्या सामाईक प्रवेश परीक्षेसंदर्भात (CET) ऑनलाइन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात आली असल्याचे बोर्डकडून सांगण्यात आले आहे. 21 ऑगस्ट रोजी अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. त्यासाठी http://cet.mh-ssc.ac.in/ हे संकेतस्थळ ज्यावर विद्यार्थी ऑनलाइन अर्ज भरत होते ते तांत्रिक कारणास्तव बंद ठेवण्यात आले असून अर्ज भरण्याची ऑनलाइन सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल, असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप अकरावी सीईटी परिक्षेचा ऑनलाइन अर्ज भरला नाही किंवा भरत असताना तांत्रिक अडचणी आल्या असतील त्यांना तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर परीक्षेचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पुरेसा कालावधी सुद्धा देण्यात येईल असे देखील बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीचा अहवाल राज्य सरकारला सादर, जवळपास एक हजार कामांची चौकशी होणार
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वकांशी असलेल्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल झाल्या होत्या. तसेच कॅगनेही यावर ठपका ठेवला होता. याच अनुषंगाने ठाकरे सरकारने माजी सनदी अधिकारी विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत केली होती. या समितीने राज्य सरकारला अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार जवळपास एक हजार कामांची खुली चौकशी केली जाणार आहे. जलयुक्त शिवार योजनेच्या एक हजार कामांची चौकशी करण्याची शिफारस समितीने केली आहे. त्यापैकी तब्बल 900 कामांची अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी होणार आहे, तर उर्वरित 100 कामांची विभागीय चौकशी होणार आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सर्वात महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार योजना ओळखली जाते. मात्र या योजनेच्या मागे आता चौकशीचा ससेमिरा सुरू झालाय. फडणवीस सरकारच्या योजनेच्या चौकशी करण्यासाठी ठाकरे सरकारने चार सदस्यीय समिती गठीत केली होती आणि या समितीचा अहवाल राज्य सरकारला आता सादर झालाय.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -