Breaking News LIVE :कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यासंदर्भात केंद्र सरकारची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

Breaking News LIVE Updates, 20 July 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Jul 2021 07:50 PM
कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, 21 ते 24 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज

कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा, 21 ते 24 जुलै दरम्यान अतिवृष्टीचा हवामान खात्याचा अंदाज, 70 ते 120 मिमी पावसाची शक्यता, पाऊस वाढल्याने नद्यांची पातळीही वाढणार, डोंगराळ भागात भू:स्खलन होण्याची भिती

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यासंदर्भात केंद्र सरकारची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव

कोविडमुळे मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर करण्यासंदर्भात केंद्र सरकारची पुन्हा सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे. धोरण ठरवण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ वाढवून देण्याची मागणी केली आहे. 3 जुलैला यासंदर्भात आदेश देत सुप्रीम कोर्टाने मदत ही दिलीच पाहिजे असं म्हटलं होतं. त्या वेळी केंद्र सरकारला सहा आठवड्यांचा वेळ कोर्टाने दिला होता. आता ही मुदत आणखी वाढवण्याची केंद्राने याचिका केली आहे.

राज ठाकरे यांनी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सदिच्छा भेट घेतली

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर असून आज दुसऱ्या दिवशी राज यांनी महाराष्ट्र भूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत राज यांनी विविध विषयांवर चर्चा करतानाच बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्बेतीची चौकशी केली. राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना बाबासाहेब पुरंदरे यांच्या तब्बेतीच्या चौकशीसाठी आवर्जून पोहोचत असतात...

'महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल', राहुल गांधीच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच वक्तव्य

'महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल', राहुल गांधी यांच्या भेटीनंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी एचके पाटील दोघांचंही वक्तव्य. सरकार मधल्या समतोलाबाबत राहुल गांधी यांनी प्रदेशाध्यक्षध्यक्ष पटोले यांना समज दिल्याचं दोघांच्याही वक्तव्यातून उघड झाले आहे. पक्ष आणि सरकार या दोन्ही गोष्टी वेगवेगळे आहेत,हा वाद आता मिटला आहे
काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्था स्वबळावर लढेल. 

पुणे कॅन्टोमेंट परिसरात एम जी रोडवरील इमारतीच्या बेसमेंटमध्ये आग, अग्निशमनदलाच्या गाड्या घटनास्थळी

पुणे कॅन्टोमेंट परिसरात एम जी रोडवरील वंडरलँड बिल्डिंग येथे बेसमेंटमध्ये आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.

नाना पटोले राहुल गांधी यांच्या भेटीसाठी निवासस्थानी दाखल

नाना पटोले राहुल गांधी यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहे. 12 तुघलक लेन या राहुल गांधींच्या निवासस्थानी  बैठक होणार आहे. नाना पटोले यांच्या सततच्या वक्तव्यांनी नाराजीच्या पार्श्वभूमीवर बैठक होत आहे. 
बैठकीला एच के पाटील आणि केसी वेणुगोपाल हे देखील उपस्थित असणार आहेत. 

सातारा जिल्ह्यात 862 कोरोनाबाधित रुग्ण तर 11 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल 862 कोरोनाबाधित रुग्ण सापडले तर 11 जणांचा मृत्यू झाला. काल उपचार देऊन 1299 रुग्णाना सोडले. आज अखेर 2,09,892 बाधित सापडले तर 196,928 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आला. 

मंत्रिमंडळ फेरबदलाच्या बाबत निर्णय हायकमांड घेईल; बाळासाहेब थोरातांची माहिती

आज काँग्रेसच्या संघटनात्मक बाबींवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली आहे त्यासाठी आपण दिल्लीत आल्याची माहिती काँग्रेस नेते आणि राज्याचे मंत्री बाळासाहेब थोरातांनी दिली. विधानसभा अध्यक्षपदासाठी हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा करावी लागणार नाही. त्या आधी कृषी कायदे संमत करण्यासाठी विशेष अधिवेशनाची मागणी आम्ही केली आहे, त्यात ही निवड व्हावी अशी आमची मागणी आहे असंही ते म्हणाले.


 

संततधार कोसळण्याऱ्या पावसामुळे बारावी निकाल तयार करण्याचे काम रखडले
मुसळधार कोसळण्याऱ्या पावसामुळे बारावी निकाल तयार करण्याचे काम रखडले आहे. बारावीच्या शिक्षकांना निकालाचे काम करण्यासाठी चार ते पाच दिवस वाढवून द्यावेत, अशी मागणी शिक्षकांच्या वतीनं केली जात आहे. रात्र दिवस एक करून शिक्षकांचा बारावी निकाल तयार करण्याच्या कामासाठी कॉलेजमध्येच मुक्काम ठोकला आहे. यावर्षी बारावी परीक्षा रद्द करून अंतर्गत दहावी, अकरवी आणि बारावीचे गुण एकत्र करून अंतर्गत मूल्यपामनद्वारे निकाल जाहीर करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार निकाल तयार करण्याचे काम सुरु असताना मागील 3 ते 4 दिवसापासून मुंबई, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असताना शिक्षकांना कॉलेजमध्ये येऊन निकाल पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. शिवाय, बारावीच्या शिक्षकांना 23 जुलैपर्यंत मंडळाच्या संगणकीय प्रणालीमध्ये विषय निहाय गुण भरण्याची मुदत दिलेली आहे. परंतु, हा कालावधी अपुरा असल्यामुळे त्यांना चार ते पाच दिवसाचा कालावधी वाढवून देण्यात यावा, अशी मागणी मुंबई कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेकडून करण्यात आली आहे.
पेगॅसस प्रकरणात जेपीसी स्थापन करुनच चौकशी व्हावी; शिवसेनेची मागणी

पेगॅसस प्रकरणात संयुक्त संसदीय समिती स्थापन करुन त्याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना करणार असून त्या संबंधीचे पत्र लोकसभा अध्यक्षांना देण्यात येणार आहे. या प्रकरणी पंतप्रधानांच्या उपस्थितीत संसदेच्या समिती कक्षात आज गटनेत्यांना प्रेझेंटेशन दिले जाणार आहे. कोरोना संदर्भात केवळ प्रेझेंटेशनवर आम्ही समाधानी नाही असं शिवसेनेचे लोकसभेतील गटनेते विनायक राऊत यांनी सांगितलं.  

महाराष्ट्रातही पेगाससचा वापर झाला असण्याची शक्यता: संजय राऊत

महाराष्ट्रातही पेगाससचा वापर झाला असण्याची शक्यता असून कदाचित आमच्यावरही पाळत ठेवल्याचं लवकरच उघड होऊ शकतं असं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.  भाजपने या मुद्द्यावर आंतरराष्ट्रीय कारस्थान वगैरे बाता सांगणं बंद करावं, काँग्रेसच्या काळात हे झालं असतं तर त्यांनी आज देशात तांडव केलं असतं असंही ते म्हणाले. 

विमानतळ मुंबईत तर मुख्यालय अहमदाबादेत

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाता ताबा आता अदीनींकडे आला असून त्यांनी ताबा मिळताच कंपनीचं मुख्यालय गुजरातमधील अहमदाबादला हलवलं आहे. विमानतळ मुंबईत तर मुख्यालय अहमदाबादेत असं काहीसं चित्र निर्माण झालंय. 

माजी खासदार राजू शेट्टी पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह

माजी खासदार राजू शेट्टींना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांना कोणताही त्रास नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने घरामध्येच शेट्टी यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

मुंबईसह लगतच्या उपनगरांत पावसाची विश्रांती; वाहतूक, रेल्वे सेवाही सुरळीत

दोन दिवसांच्या कोसळधारेनंतर मुंबईत पावसानं विश्रांती घेतली आहे. मुंबईसह लगतच्या उपनगरांतही पावस थांबला आहे. वसई-विरारमध्ये सकाळपासून पाऊस नाही, मात्र ढगाळ वातावरण कायम आहे. आज मुंबईत वाहतूक सुरळीत आहे. तसेच आज वाहतूकही सुरळीत आहे. रेल्वे सेवाही सुरळीत आहे. 

पार्श्वभूमी

Ashadhi Ekadashi 2021 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न


आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल-रुक्मिणी यांची शासकीय महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी विठुमाऊलीच्या जयघोषात मंदिराचा गाभारा दुमदुमून गेला. पहाटे 3 वाजून 40 मिनिटांनी विठ्ठल-रखुमाई यांची शासकीय महापूजा सपंन्न  झाली. यंदा मानाचे वारकरी म्हणून कोलते दाप्त्यांना मान मिळाला. त्यांनी आज पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत विठ्ठलाची महापूजा केली.


दरवर्षी लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत होणारा आषाढी एकादशीचा सोहळा गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. आषाढीच्या निमित्ताने विठ्ठल-रखुमाईची महापूजा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सपत्नीक केली. यावेळी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. यंदा मानाचा वारकरी म्हणून  विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांना मान मिळाला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोलते दाम्पत्याचा सत्कार केला गेला.


यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या वॉटरप्रूफ प्रतिमांचा अनावरण सोहळा पार पडला. सध्या कोरोना संकटामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने विठ्ठल मंदिरही कुलूपबंद आहे. या वेळेचा सदुपयोग करीत मंदिर प्रशासनाने विठुरायाच्या अतिशय आकर्षक 31 प्रकारच्या प्रतिमा तयार करून घेतल्या आहे. लॉकडाऊन लांबला तर जगभरातील विठ्ठल भक्तांना या प्रतिमा ऑनलाईन विक्री करण्याची तयारीही मंदिर समितीने ठेवली आहे.


Pandharpur : पंढरपूरला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतला सोलापूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा


कोरोना प्रादुर्भावात आपल्या जीवाची पर्वा न करता सर्व यंत्रणा काम करत आहेत. या साऱ्यांच्या कामाचा परिपाक म्हणून आपण या महामारीवर मात करीत आहोत. या कामाचे सर्व श्रेय तुमचे आहे, यापुढेही संभाव्य तिसऱ्या लाटेत जबाबदारीने काम करून कोरोनाचा मुकाबला करूया, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. 


आषाढी वारीनिमित्त शासकीय महापूजेनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पंढरपुरात आगमन झालं. त्यानंतर त्यांनी शासकीय विश्रामगृह येथे अधिकाऱ्यांच्या बैठकीत या सूचना केल्या. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, माहिती आणि जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शितलकुमार जाधव आदी उपस्थित होते.


अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्रा यांना अटक


अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती आणि व्यावसायिक राज कुंद्राला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. राज कु्ंद्राला क्राईम ब्रान्चने चौकशीसाठी बोलवले होते. चौकशीनंतर त्याला अटक करण्यात आले आहे. पॉर्न रॅकेटप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. 


क्राईम ब्रान्चने फेब्रुवारी 2021 मध्ये अश्लील चित्रपट बनवणे आणि काही अॅप्सवर ते दाखवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्राईम ब्रान्चने या प्रकरणात सोमवारी राज कुंद्रा यांना अटक केली कारण या षडयंत्रात राज कुंद्रा सहभागी आहे. तसेच त्यांच्या विरोधात पुरावे असून अधिक तपास सुरू आहे. क्राईम ब्रान्चने राज कुंद्रा यांना चौकशीसाठी बोलवले होते त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे. राज कुंद्रा अनेक वेळा चर्चेत आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.