Breaking News LIVE : मुंबईत पुढील एक-दोन तास विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
Breaking News LIVE Updates, 17 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
मुंबईत पुढील एक-दोन तास विजांच्या कडकडाटासह मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज, सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता दादर, परळ परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात, सोबतच दक्षिण मुंबईतही पावसाच्या जोरदार सरी. ठाणे, कल्याण, रायगडमध्येही पुढील 1 तास मुसळधार पाऊस अपेक्षित आहे. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.
रात्री 10.30 पर्यंत पाऊस (मिमीमध्ये)
सांताक्रुज - 12 मिमी
राम मंदिर - 19 मिमी
जुहू विमानतळ - 11.5 मिमी
कुलाबा - 4.5 मिमी
सुप्रीम कोर्टाने दट्ट्या दिल्यानंतर यूपी सरकारने अखेर कावड यात्रा रद्द केली आहे. योगी सरकार ही यात्रा रद्द न करण्यावर अडून होतं. उत्तराखंड सरकारने यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतरही यूपीकडून निर्णय होत नव्हता. अखेर सुप्रीम कोर्टाने दखल घेतल्यानंतर उत्तर प्रदेश सरकारकडून कावड यात्रा रद्द.
शरद पवार गुगली टाकण्यात एक्सपर्ट असल्याने आजच्या मोदी - पवार भेटीचा वेगळा अर्थ लावण्याची काही गरज नाही, महाविकासआघाडी सरकार भक्कम आहे.नाना पटोलेंची स्वबळाची भाषा योग्यच आहे, आम्हालाही आमचा काँग्रेस पक्ष पुन्हा खंबीर करायचाय त्यामुळे जवळ आहे तोवर जवळ नाही तेव्हा बघू पुढं काय करायचं ते. केंद्राकडून ईडी, सीबीआयचा गैरवापर होतोय हे दुर्दैवं आहे. केंद्रात नव सहकार खातं निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील सहकार चळवळीला कोणताही धोका पोहोचणार नाही, ही चळवळ भक्कम पायावर उभी आहे,असे सुशील कुमार शिंदे म्हणाले.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी. येत्या सोमवार ते शुक्रवारपर्यंत नवीन आदेश लागू असणार. त्यानंतर शनिवार-रविवार हे विकेंड लॉकडाऊनचे दिवस असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील. कोल्हापुरात निर्बंध स्तर 3 मधील नियम सोमवारपासून लागू राहतील. नवीन नियम पुढील आदेश मिळेपर्यंत लागू राहणार.
पंढरपुरात संचारबंदी लागू झाली असून उद्यापासून २५ जुलैपर्यंत विविध टप्प्यात संचारबंदी असणार आहे. पंढरपूर डे येणारे सारे मार्ग बंद केले असून कडक नाकेबंदी सुरू झाली आहे. जड वाहतूक बाहेरून वळवली आहे. उद्यापासून एसटी बससेवा आणि खाजगी वाहतूक 25 जुलै पर्यंत पूर्ण बंद राहणार आहे. केवळ दूध , औषधे अत्यावश्यक सेवेतील वस्तू मिळणार आहे. चंद्रभागा वाळवंट परिसरात शासनाने परवानगी दिलेल्या लोकांशिवय कोणालाही प्रवेश नाही. आषाढीसाठी शहरात आधीच येऊन मठात राहिलेल्या भाविकांना बाहेर काढले जाणार आहे. मुख्यमंत्री यांच्यासमवेत पूजेत सहभागी असणारे पुजारी , सेवक , मंदिर समिती सदस्य , सल्लागार सदस्य यांची आरटीपीसीआर टेस्ट करण्यात येणार आहे.
सध्या केवळ 6 टक्के मुंबईकरांचं लसीकरण पूर्ण झाले असून या वेगानं पूर्ण मुंबईचं लसीकरण व्हायला 3-4 वर्ष लागतील. मुंबईतील अपु-या लस पुरवठ्यासंदर्भात एका शिक्षकाने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. बाहेरून लसी आयात करण्यासाठी मागवलेलं 'ग्लोबल टेंडर' अपयशी, बीएमसीची हायकोर्टात कबूली. केंद्र आणि राज्य सरकारला मुंबईच्या लसीकरणाबाबत वेळापत्रक स्पष्ट करणारं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहे. पुढील सुनावणीत सीरम आणि भारत बायोटेकलाही याचिकेत प्रतिवादी करण्याबाबत विचार करू असे हायकोर्ट म्हणाले.
कोरोना काळात सुरु असलेल्या राजकारणाबाबत शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीत चर्चा, मंत्री नवाब मलिकांची माहिती, पवार-मोदी भेटीबाबत संभ्रम पसरवण्याचं काम, लसीकरणाबाबत व्यापक मोहिम राबवण्यावर शरद पवार आणि पंतप्रधान मोदींच्या भेटीत चर्चा- मंत्री नवाब मलिक
सांगोल्याचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्यावर सोलापूर येथील अश्विनी हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू, 95 वर्षाच्या देशमुख यांना पित्ताशयात खड्यांचा त्रास, सर्जरी करून खडे काढले , आता प्रकृतीत चांगली सुधारणा होत असल्याची मुलगा चंद्रकांत देशमुख यांची माहिती
आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांविरोधात सोलापुरात गुन्हा,
कोरोना विषयक नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी सदर बाजार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल,
इंधन दरवाढ विरोधात सोलापुरातील सुपर पेट्रोल पंप येथे काँग्रेसने केले होते आंदोलन ,
याच आंदोलनाविरोधात भांदवि कलम 143, 186, 188, 269, 336 सह आपत्ती व्यवस्थापन कायदनव्ये गुन्हा,
नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये अमित ठाकरे लक्ष घालणार असून त्यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक प्रक्रिया राबविली जाणार आहे. अमित ठाकरे तीन दिवस नाशिक मध्ये राहणार असून या दरम्यान ते पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पक्षाची गटबाजी रोखण्यावर त्यांचा भर राहणार असून मनविसे पदाधिकाऱ्यांची फेरनिवड होणार असल्याचे संकेत आहेत.
शरद पवार आणि पंतप्रधान मोदी यांची दिल्लीत भेट, दोघांमध्ये जवळपास एक तासापेक्षा अधिक काळ चर्चा, पंतप्रधान कार्यालयामध्ये शरद पवार आणि मोदींची भेट
भेटीचा तपशील अद्याप गुलदस्त्यात, मात्र सहकार आणि बँकिंग यासंदर्भात चर्चा झाली असण्याची शक्यता
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पाठोपाठ त्यांचे पुत्र अमित ठाकरे, मनसे नेते संदीप देशपांडेही नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी 'मनविसे'कडून अमित ठाकरे यांचे नाशिकमध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं असून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करण्यात आली आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानं अमित यांच्या नाशिक दौऱ्याला महत्व प्राप्त झालं आहे.
सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते मेळाव्यास प्रचंड गर्दी झाली आहे. शहरात शनिवार आणि रविवारी कडक संचारबंदी असताना ही गर्दी झाली असून या कार्यक्रमाला राज्याचे मंत्री जयंत पाटील आणि दत्ता भरणे उपस्थित राहणार आहेत. सोलापुरातील हेरिटेज लाँन येथे हा कार्यक्रम होत असून अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही तर सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे.
मुख्यमंत्र्यांनी पंढरपुरात महापूजेला जाणं हा मान असतो, वारकऱ्यांनी त्याला विरोध करु नये असं भाजप नेते चंद्रकांत पाटील म्हणाले. वारकऱ्यांनी आंदोलन करावे, त्यांच्या मागण्यांना आमचा पाठिंबा असेल असंही ते म्हणाले.
मुंबईत भाजप नेते अतुळ भातखळकरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कुरार मेट्रो स्थानकाच्या कामासाठी अडचणीच्या ठरणाऱ्या घरांवर कारवाई सुरु होती. यावेळी स्थानिकांनी ही बेकायदेशीर कारवाई असल्याचं सांगत विरोध केला. त्यावेळी स्थानिकांना पाठिंबा देण्यासाठी अतुल भातखळकरही तिेथे पोहचले आणि त्यांनीही कारवाईला विरोध केला. त्यानंतर पोलिसांनी अतुल भातखळकर यांना ताब्यात घेतलं असून आता त्यांना वनराई पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलंय.. दरम्यान, कारवाईला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी गाडीत घालून नग्न करुन मारहाण केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय.
चाकणमध्ये दुहेरी हत्याकांडाची धक्कादायक घटना घडली आहे. प्रेम प्रकरणातून मुलीच्या प्रियकर आणि त्याच्या मित्राला बेदम मारहाण करण्यात आली. यातच त्या दोघांचा जीव गेला आहे. तर, या मारहाणीत प्रेयसी मुलगी देखील जखमी आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलासह एकूण सहा जणांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मयत, बाळू सीताराम गावडे हा वीटभट्टीवर कामाला होता. त्याने त्याच्या मालकाची मुलगी 14 तारखेला पळवून नेली होती. यात त्याचा मित्र मयत राहूल दत्तात्रय गावडे याने मदत केली होती. त्याचा राग ठेऊन या दोघांना मारहाण झाली
चीन आणि गुजरातच्या बाजारपेठेत कोट्यवधी रुपयांचे मूल्य असलेले दगड ,सेमी प्रेसियस स्टोन्सचा साठ्यावर औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयाने कारवाई केली आहे. शहरातील मध्यवर्ती भागात एका गर्भश्रीमंत व्यक्तीच्या जागेत हा साठा आढळला आहे. माजी नगरसेवक अशरफ मोतीवला यांच्या एमजीएम हॉस्पिटल समोरील जागेत हा दगडांचा साठा असून प्रशासनाने मोतीवाला यांना या प्रकरणी नोटिस पाठवली आहे.
Breaking News LIVE : अँटिलिया प्रकरण आणि मनसुख हिरन हत्या प्रकरणी अटकेत असलेल्या सचिन वाझेकडून जामिनासाठी अर्ज, वाझेच्या वकिलांनी कोर्टाला सांगितलं की, एनआयएनं वाझेच्या अटकेनंतर आतापर्यंत 90 दिवस झाले तरी चार्जशीट फाईल केलेलं नाही. जामीन अर्जावर 22 जुलैला सुनावणी
डोंबिवली पूर्वच्या देसले पाडा परिसरातील साई इन्क्लेव्ह या सोसायटीमध्ये बुधवारी रात्री दोन शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. आणि काही क्षणातच त्यांच्यातल्या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. या फ्रीस्टाईल हाणामारीची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपली आहेत. या व्हिडीओमध्ये काही महिला एकमेकींना बेदम मारहाण करतायत, तर पुरुषांमध्येही हाणामारी होताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात दोन्ही बाजूकडील 14 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डोंबिवली पूर्वच्या देसले पाडा परिसरातील साई इन्क्लेव्ह या सोसायटीमध्ये बुधवारी रात्री दोन शेजाऱ्यांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. आणि काही क्षणातच त्यांच्यातल्या वादाचं पर्यवसान हाणामारीत झालं. या फ्रीस्टाईल हाणामारीची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात टिपली आहेत. या व्हिडीओमध्ये काही महिला एकमेकींना बेदम मारहाण करतायत, तर पुरुषांमध्येही हाणामारी होताना दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. या प्रकरणात दोन्ही बाजूकडील 14 ते 15 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 जुलैला आषाढी एकादशी आहे. या दिवशीच्या शासकीय महापूजेत सहभागी होण्याचा मान केशव कोलते आणि इंदुमती कोलते यांना मिळालाय. चिठ्ठीद्वारे मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आलीय. केशव कोलते हे वर्धा इथले रहिवासी असून गेल्या २० वर्षांपासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देतायत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षांपासून दर्शन रांगेतील वारकऱ्यांऐवजी मंदिरात सेवा देणाऱ्या भाविकांमधून मानाचे वारकऱ्यांची निवड केली जाते. विठूरायाची सेवा फळाला आल्याची भावना कोलते यांनी व्यक्त केलीय.
गोगलगाय आणि सोयाबीनवर पाय अशी अवस्था उस्मानाबादेतल्या अनेक गावांमध्ये दिसून येतेय. तेर, वाणेवाडी, किणी, हिंगळजवाडी, डकवाडी या गावातील शेकडो एकर क्षेत्रावरचे सोयाबीन गोगलगायी रात्रीतून उद्ध्वस्त करत आहेत. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. शंखाच्या आकाराच्या या आफ्रिकन गोगलगायी अचानक एवढ्या मोठ्या प्रमाणात कशा आणि कुठून आल्या याचा शोध कृषी विभाग घेत आहे. या गोगलगायींचा प्रादुर्भाव वाढला असून रात्रीतून पेरलेलं सोयाबीन, शेतातली पानवेली आणि झाडाझुडपांची पानं फस्त करताहेत. या गोगलगायींना मारण्यासाठी सर्व प्रकारची कीटकनाशकं वापरण्यात आलीत. तरी, त्याचा उपयोग होत नसल्याचं दिसतंय. त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय.
बहुचर्चित राष्ट्रीय महामार्गाचे अवघ्या काही महिन्यांच पितळ उघडे पडले आहे. पहिल्याच अल्पशा पावसाने वेरुळजवळील पूल खचला असून कन्नड जवळील रेल येथील पूल तसेच बायपास जवळील रस्ता खचला आहे.
पार्श्वभूमी
राज्यात काल 13, 452 रुग्णांना डिस्चार्ज, 7,761 रुग्णांची भर; 26 शहरं-जिल्ह्यांमध्ये एकही मृत्यू नाही
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. राज्यात काल 13, 452 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर 7,761 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर राज्यातील अॅक्टिव्ह केसेस 1 लाख 1 हजार 337 वर आहेत. आज मालेगाव, भंडारा, गोंदियामध्ये एकही कोरोना रुग्णांची नोंद सरकारी आकडेवारीनुसार झालेली नाही. तर कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक 1085 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आज सरकारी आकडेवारीनुसार राज्यातील 26 शहरं आणि जिल्ह्यांमध्ये एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात आज 167 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.04 टक्के झाला आहे. नंदूरबार (47),जालना (37), हिंगोली (59), यवतमाळ (21), गोंदिया (66), चंद्रपूर (16) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16, 925 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेत सहभागी होणार
यंदाच्या आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेत सामील होण्याचा मान विठ्ठल मंदिरातील विणेकरी केशव शिवदास कोलते व त्यांच्या पत्नी इंदुमती कोलते यांनी मिळाला. आज मंदिर समिती सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते चिठ्ठी द्वारे मानाच्या वारकऱ्यांची निवड करण्यात आली. कोलते दाम्पत्य मुख्यमंत्र्यांसोबत या महापूजेत सामिल होणार आहे. केशव कोलते हे वर्धा येथील रहिवासी असून 1972 पासून महिन्याची वारी करीत असत . गेल्या 20 वर्षापासून ते विठ्ठल मंदिरात विणेकरी म्हणून सेवा देत आहेत. गेल्या दोन वर्षापासून कोरोना संकटामुळे मंदिर बंद असल्याने दर्शन रांगेतील भविकातून मानाचा वारकरी निवडता ये नसल्याने मंदिरात सेवा देणाऱ्या भविकातून ही निवड केली जाते. आपण केलेली सेवा फळाला आली आणि विठुरायाचे पूजा करण्याचे भाग्य मिळाले अशी भावना कोलते यांनी व्यक्त केली.
दहावीचा निकाल मिळवण्यात येत असलेल्या अडचणीवरुन शिक्षणमंत्र्यांची दिलगिरी; दोषींवर कठोर कारवाईचा इशारा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार करण्यात आलेला दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मात्र, एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यात अडचणी येत आहेत. यावर आता शालेय शिक्षणमंत्री यांनी दिलगिरी व्यक्त करत दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली करणार असल्याचा इशारा दिला आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडवरुन ट्विट करत याची माहिती दिली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -