Breaking News LIVE : एकनाथ खडसे ईडी चौकशीसाठी हजर राहणार, भोसरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडीचं समन्स

Breaking News LIVE Updates, 08 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 08 Jul 2021 10:50 AM
नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले

नागपूर जिल्ह्याच्या कळमेश्वर तालुक्यात नाल्याला आलेल्या पुरात दोन जण वाहून गेले. कळमेश्वर-गोवरी रस्त्यावर असलेल्या नाल्यावरील घटना, नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असताना काढली दुचाकी, पाण्याचा प्रवाह अधिक असल्यानं दुचाकी वाहत गेली, अण्णाजी निंबाळकर आणि गुड्डू शिंदे असं मृत्यू झालेल्या व्यक्तीची नावे

नक्षलवाद्यांना हत्यार पुरवणाऱ्या आठ जणांना गोंदियात अटक

नक्षलवाद्यांना विस्फोटक साहित्य आणि हत्यार पुरवठा करणाऱ्या आठ आरोपींना बालाघाट पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीमध्ये गोंदिया,ठाणे, कोटा जिल्ह्यातील आरोपींचा समावेश आहे. महाराष्ट्रासह मध्यप्रदेश आणि छत्तीसगढमधील नक्षलवाद्यांना या आरोपींनी हत्यारांचा पुरवठा केला आहे. आरोपींकडून पोलिसांनी एके-47 रायफल्स, जिलेटीन रॉड, पिस्तुल, रायफल, कोडेक्स,दोन स्कोडा वाहन, एलईडी जप्त केले आहे. 

राणेंची मंत्रीपदी वर्णी, कार्यकर्त्यांचा पंढरपुरात जल्लोष करत विठ्ठलाला दुग्धभिषेक

नारायण राणे यांची मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ वर्णी लागल्याने पंढरपुरात राणे समर्थकांनी व भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठलाला दुग्धभिषेक घालत वारकरी भाविकांना पेढे भरवून आनंद व्यक्त केला. मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लवकर मार्गी लागण्याचा समर्थकांनी विश्वास व्यक्त केला.

नागपूरमध्ये पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचं आंदोलन

नागपूर : पेट्रोल डिझेलच्या वाढलेल्या दरासंदर्भात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी काँग्रेसचे आज नागपूरच्या संविधान चौक आवरून आंदोलन पुकारला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आणि सर्व काँग्रेस आमदार यांचे नेतृत्वात संविधान चौक ते विभागीय आयुक्त कार्यालय अशी सायकल रॅली काढली जाणार होती. मात्र आंदोलन सुरु होण्याच्या पूर्वी पासूनच जोरदार पाऊस सुरु होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पेंडॉलमध्ये उभे राहून काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत असताना पावसाचा जोर वाढला आणि जो पेंडॉल काँग्रेस नेत्यांसाठी उभारण्यात आलेला होता. तो एका बाजूने खायला सुरुवात झाली काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्या पेंडॉल ला पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यात यशस्वी झाले नाही पेंडॉलच्या वरती मुसळधार पाऊस होत असल्यामुळे पाणी जमा होऊ लागला आणि अचानकच एका बाजूचे पेंडॉल खाली कोसळला. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले मंत्री सुनील केदार आणि इतर सर्व आमदार व काँग्रेस नेत्यांना एकच पेंडॉलमधून बाहेर पडावे लागला. त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. 

पुण्यात काँग्रेसचे अभिनव आंदोलन; इंधन दरवाढीच्या विरोधात सायकल यात्रा

पुणे : पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसचे अभिनव आंदोलन, पुणे कॅम्पातील आंबेडकर पुतळ्यापासून विभागीय आयुक्त कार्यालयावर काढणार सायकल यात्रा; काँग्रेसचे राज्यमंत्री विश्वजित कदम, शहराध्यक्ष रमेश बागवे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते होणार रॅलीत सहभागी.

एकनाथ खडसे ईडी चौकशीसाठी हजर राहणार

तुम्ही ईडीची चौकशी मागे लावाल तर मी सीडी लावेल, असा इशारा देत भाजपला सोडचिठ्ठी दिलेल्या राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसेंना आज सकाळी ईडीचं समन्स आलं आहे. आज सकाळी 11 वाजता चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश एकनाथ खडसेंना देण्यात आले आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरुन, एकनाथ खडसेंची प्रकृती खालावल्यामुळे त्यांची आजची पत्रकार परिषद रद्द केल्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे एकनाथ खडसे आज चौकशीसाठी ईडी कार्यालयात उपस्थित राहणार का? असा प्रश्न सध्या उपस्थित केले जात होते. अशातच एकनाथ खडसे यांनी स्वतः माध्यमांशी बोलताना ईडी चौकशीसाठी हजर राहणार असल्याची माहिती दिली आहे.  

नाशिक महापालिका आयुक्तांकडून पाणी कपातीचे संकेत

नाशिककरांनो पाणी जपून वापरा, नाशिक महापालिका आयुक्तांकडून पाणी कपातीचे संकेत, शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात सध्या फक्त 35 टक्के साठा शिल्लक,  पुढच्या आठवड्यापर्यंत समाधानकारक पाऊस  पडला नाही तर पाणीकपातीचा निर्णय घेण्यात येईल, महापालिका आयुक्त कैलास जाधव यांची माहिती

पाऊस पडावा म्हणून पांजरा ग्रामवासियांनी लावला  बाहुला बाहुलीचे लग्न

पाऊस पडावा यासाठी भंडारा जिल्ह्यातील पांजरा गावातील नागरिकांनी बाहुला-बाहुलीचे लग्न लावलं आहे. भंडारा जिल्ह्यात  रुसलेल्या निसर्गाला प्रसन्न करण्यासाठी वेगवगळे उपक्रम राबविण्याची जुनी परंपरा आजही कायम आहे. जुन्या पिढीतील लोकांबरोबर तरुण वर्गही मोठ्या उत्साहात सहभाग दर्शवतात. पाऊसाची कृपादृष्टी व्हावी तसेच गावाची एकता आणि एकात्मता कायम राखण्याचा आजही ग्रामीण भागात जुन्या रूढी परंपरा जोपासल्या जात आहेत. 

पालघरमध्ये पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात

गेल्या काही दिवसां पासून दडी मारलेल्या पावसाने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची शक्यता होती. पालघर जिल्ह्यातील मनोर ,कासा,चारोटी भागात पावसाच्या हलक्या सरी पडायला सुरुवात झाली आहे. काही शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या त्या पावसाअभावी संकटांत सापडल्या होत्या. तर अजूनही गरव्या भात पिकाच्या पेरण्या झालेल्या नाहीत. पाऊस नसल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर ओढवले आहे. मात्र आज जिल्ह्यात काही ठिकणी पावसाची रिपरिप सुरु झाली आहे तर काही ठिकाणी वातावरण ढगाळ आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत

नांदेडमध्ये 72 लाखांच्या मुद्देमालासह मुलीचे प्रियकरासोबत पलायन

नांदेड जिल्ह्यातील हणेगाव येथे 72 लाखाचे दागिने व मुद्देमाल घेऊन प्रियकरासोबत मुलगी पळाली. देगलूर तालुक्यातील हणेगाव येथील कापड व्यावसायिक व्यापाऱ्याच्या मुलीने प्रियकरासोबत मिळून बापालाच 72 लाखाचा चुना लावल्याचं स्पष्ट झालंय. बटाई शेत करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने कापड व्यापाऱ्याच्या मुलीला पैसे व दागिन्यासहित पळविल्याची तक्रार मरखेल पोलीस स्टेशनमध्ये दाखल करणयात आली आहे. 

परभणीच्या कुपटा शिवारात धुडगूस घालणारी वानर टोळी पकडली 

परभणीच्या सेलु तालुक्यातील कुपटा शिवारात धुडघुस घालणाऱ्या तब्बल 69 उपद्रवी वानरांच्या टोळीला पकडण्यात गावकरी आणि वन्यजीव मित्रांना यश आले आहे. मागच्या अनेक महिन्यांपासून अनेक वानरांनी कुपटा गावात मुक्त संचार सुरु होता.अनेकांच्या घरावरील सोलर पॅनल,लोखंडी पत्रे यांचे नुकसान हे वानर करत होती शिवाय अनेक गावकऱ्यांच्या घरात शिरुन कुठंल्याही गोष्टी उचलून नेत होते त्यामुळे गावकरी या उपद्रव्यांना कंटाळले होते.

Petrol-Diesel 8 July : देशात पुन्हा एकदा इंधन दरांत वाढ, देशातील सर्वच मोठ्या शहरांत पेट्रोल शंभरीपार

Petrol-Diesel 8 July : देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरु असून पुन्हा एकदा सामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. पेट्रोल-डिझेलचे दर आज पुन्हा एकदा कडाडले आहेत. पेट्रोल आज 35 पैशांनी तर डिझेल 9 पैशांनी महागलं आहे. दिल्लीमध्ये इंडियन ऑइलच्या पंपावर पेट्रोल 100.56 रुपये प्रति लिटरनं तर डिझेल 89.62 रुपये प्रति लिटरनं विकण्यात येत आहे. देशातील सर्वच मोठ्या शहरांमध्ये पेट्रोलची किंमत शंभरी पार पोहोचली आहे. 


वाशिम जिल्ह्यात 17 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाची हजेरी

वाशिम : वाशिम जिल्ह्यात गेल्या 17 दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने रात्री उशिरा जिल्ह्यातील रिसोड आणि मंगरूळपीर भागांत हजेरी लावली. मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला असून इतर तालुक्यात तुरळक हलक्या प्रमाणात पाऊस बरसल्याने वातावरणात वाढलेला उकाडा थोड्या प्रमाणात का होईना कमी झाला आहे. तर धोक्यात असलेल्या खरीप पिकाला जीवनदान मिळालं. मात्र अनेक भागांत दुबार पेरणीचे संकट मात्र कायम असल्याचं चित्र आहे. 

सांगलीत मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवत दोन दिवस उपचार सुरुच; डॉक्टरला अटक

सांगली : मृत रुग्ण जिवंत असल्याचे भासवत दोन दिवस उपचार सुरु ठेवले आणि बनावट कागदपत्रे बनवून जादा बिल आकारले. इस्लामपूरातील आधार हॉस्पिटलमध्ये मार्च महिन्यात हा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी आधार हॉस्पिटलचा डॉ. योगेश वाठारकर यांच्यावर विश्वासघात, फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. डॉ. वाठारकरला इस्लामपूर पोलिसांनी मध्यरात्री अटक केली आहे. 24 फेब्रुवारी ते 8 मार्च या काळात ही घटना घडली आहे. इस्लामपूर पोलिसांनी सांगली सिव्हिल हॉस्पिटल मार्फत मागवलेल्या अहवालात वाठारकर दोषी आढळून आल्याने मृत महिलेचा मुलगा सलीम शेख याच्या फिर्यादीनंतर कारवाई करण्यात आली. 

पार्श्वभूमी

मोदी सरकारचे खातेवाटप जाहीर, जाणून घ्या कोणाला कोणतं खातं?


मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात 15 कॅबिनेट आणि 28 राज्यमंत्र्यांसह एकूण 43 मंत्र्यांनी बुधवारी सायंकाळी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. आता विविध खात्यांची जबाबदारी मंत्र्यांना देण्यात आली.  महत्त्वाची खाती कोणाकडे जाणार याबद्दल उत्सुकता होती.  या साऱ्या पार्श्वभूमीवर अपेक्षेप्रमाणे मोदी यांनी काही खात्यांमध्ये बदल केले आहेत .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर केले. 


मोदी सरकारमधील मंत्र्यांची खातेनिहाय यादी खालीलप्रमाणे


पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे विज्ञान, तंत्रज्ञान विभाग देण्यात आले आहे. अमित शाह यांच्याकडे सहकार मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर मनसुख मांडवीय हे नवे केंद्रीय आरोग्य मंत्री आहेत.



  • राजनाथ सिंह - संरक्षण मंत्रालय

  • अमित शाह-  सहकार, गृह मंत्रालय

  • नितीन गडकरी- रस्ते वाहतूक व महामार्ग

  • निर्मला सीतारमण - केंद्रीय वित्त, कॉर्पोरेट व्यवहार

  • नरेंद्र सिंह तोमर - कृषी व शेतकरी कल्याण

  • मनसुख मांडवीया -  केंद्रीय आरोग्य मंत्रिपद, रसायन आणि खते विभाग

  • स्मृती इराणी - महिला, बालविकास मंत्रिपद

  • धर्मेंद्र प्रधान -केंद्रीय शिक्षणमंत्री

  • पीयूष गोयल - केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रिपद 

  • अश्विनी वैष्णव - केंद्रीय रेल्वेमंत्री

  • हरदीपसिंह पुरी - पेट्रोलियम मंत्रिपद

  • ज्योतिरादित्य शिंदे - नागरी उड्डाण मंत्रालय

  • पुरुषोत्तम रुपाला -  दुग्धविकास, मत्स्योत्पादन खातं

  • अनुराग ठाकूर - केंद्रीय क्रीडामंत्री

  • पशुपती पारस  -अन्न प्रक्रिया मंत्रालय

  • गिरीराज सिंह - केंद्रीय ग्रामविकास मंत्रालय

  • भुपेंद्र यादव  - केंद्रीय कामगार मंत्रालय

  • आर के सिंह - केंद्रीय ऊर्जामंत्री

  • किरण रिजिजू - केंद्रीय कायदेमंत्री


मोदी सरकारच्या या नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर हे भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण मंत्रिमंडळ आहे. कारण या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक तरुण चेहऱ्यांना प्राधान्य दिले आहे, यामुळे मंत्रिमंडळाचे सरासरी वय खूपच कमी होईल. तसेच मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाल्यापासूनच अनेक मंत्र्यांची जबाबदारी काढून घेतली जाऊ शकते अशा शक्यताही वर्तवण्यात येत होत्या. अशातच मोदी मंत्रिमंडळातील अनेक मोठ्या नेत्यांच्या राजीनामे घेण्यात आले. 


राज्यातील कोविड मुक्त भागात इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा 15 जुलै पासून सुरु होणार!


राज्यातील कोरोनामुक्त झालेल्या विभागात पहिल्या टप्प्यात इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग सुरळीतपणे सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय शिक्षण विभागाने जाहीर केला आहे.  विद्यार्थांना शाळेतील नियमित शिक्षणाचा लाभ मिळावा यासाठी कोविडमुक्त क्षेत्रात शाळा सुरु करण्याची बाब विचाराधीन होती. राज्यातील कोविड- मुक्त क्षेत्रातील ग्रामपंचायती /स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी कोविड निकषांच्या आधारे पहिल्या टप्प्यात शाळेतली इय्यता  आठवी ते बारावीचे वर्ग सुरु करुण्यास शासन मान्यता शिक्षण विभागाकडून दिली आहे. पालकांशी चर्चा करुन ठराव करावा आणि स्थानिक प्रशासनाच्या  सल्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. 


ज्या गावात आठवी ते बारावी  वर्ग सुरु करायचे आहेत त्या गावात किमान महिनाभर आधीपासून एकही कोविड रुग्ण नसावा. शिवाय,ग्रामपंचायत स्तरावर सरपंचाच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून निर्णय घेण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच, शाळा सुरु करण्यापूर्वी शिक्षकांच्या लसीकरणाला प्राधान्य देऊन जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे, असे सुद्धा शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. मात्र काही तांत्रिक बाबींमुळे हा शासन निर्णय स्थगित करून आज पुन्हा नव्याने आठवी ते बारावी वर्गाच्या शाळा सुरु करण्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.