Breaking News LIVE : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

Breaking News LIVE Updates, 06 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jul 2021 11:35 PM
कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता


कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  सिंधुदुर्ग, रत्नागिरीत पुढील तीन तासात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज. तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीत विजांच्या कडकटाडासह काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि नांदेडमध्ये देखील वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज, विजांच्या गडगडाटासह काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. 

लसींचा साठा प्राप्त न झाल्याने कल्याण-डोंबिवलीमधील लसीकरण उद्या बंद राहणार

कल्याण : कल्याण-डोंबिवलीमधील लसीकरण उद्या बंद राहणार, लसींचा साठा प्राप्त न झाल्याने महापालिकेची 25 लसीकरण केंद्र बंद राहणार, गेल्या 10 दिवसात अवघ्या 3 दिवस लसीकरण सुरू होतं, उद्या पुन्हा लसीकरण बंद राहणार

आषाढी यात्रा कालावधीतील संचारबंदी ही 19 ते 21 जुलै करण्याची लेखी मागणी

आषाढी यात्रा कालावधीतील संचारबंदी ही 19 ते 21 जुलै करण्याची लेखी मागणी आमदार प्रशांत परिचारक आणि आमदार समाधान अवताडे यांनी उपमख्यमंत्री अजित पवार यांचेकडे केली. शासनाने 17 ते 24 जुलै पर्यंत जाहीर झालेली संचारबंदी व्यापारी आणि नागरिकाना त्रासदायक आणि अन्यायकारक असल्याने केली मागणी.

माजी मंत्री काँग्रेसचे कृपाशंकर सिंह यांचा उद्या भाजप प्रवेश

माजी मंत्री, काँग्रेसचे कृपाशंकर सिंह यांचा उद्या भाजप प्रवेश. मुंबईत उद्या सकाळी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत अधिकृत प्रवेश होणार आहे. उद्या दुपारी 12 वा. मुंबई प्रदेश कार्यालयात प्रवेशाचा कार्यक्रम. कृपाशंकर सिंग माजी काँग्रेस नेते आणि मंत्री आहे. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात कृपाशंकर एसीबीच्या रडारवर होते. उत्तर भारतीयांमध्ये कृपाशंकर यांचं मोठं प्रस्थ होते. मुंबई पालिकेच्या तोंडावर कृपाशंकर यांच्या प्रवेशामुळे भाजपला फायदा झाला आहे, 

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि कुटुंबियांना उच्च न्यायालयाचा दिलासा, 28 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे ईडीला आदेश

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि कुटुंबियांना उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. 28 जुलैपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश ईडीला उच्च न्यायालयानं दिले आहेत. 

मराठा आरक्षणावर सरकारची दुटप्पी भूमिका  : आबासाहेब पाटील

मराठा आरक्षणावर सरकार दुटप्पी भूमिका घेत आहे. यावर मराठा क्रांती ठोक मोर्चा आक्रमक भूमिका घेणार आहे. मराठा विद्यार्थ्यांना न्याय द्या, सर्व विद्यार्थ्यांना 31 जुलै पर्यंत शासकीय सेवेत नियुक्त्या द्या, चालू शैक्षणिक वर्षात ओबीसीप्रमाणे फी माफ करावी, 16% प्रमाणे शैक्षणिक प्रवेश देण्यात यावेत आणि मराठा समाजासाठी आजच्या आज 1000 हजार कोटीची तरदूत करावी, एमपीएससी अटेम्पट्सचे घोषणा पत्र रद्द करावे या मागण्या मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आबासाहेब पाटील यांनी केली आहे. 


ओबीसी आरक्षण निकालानंतर जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुप्रीम कोर्टाचा स हस्तक्षेप नाही

ओबीसी आरक्षण निकालानंतर जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये सुप्रीम कोर्ट तूर्तास हस्तक्षेप करणार नाही, याबाबत राज्य निवडणूक आयोगाने निर्णय घेण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. कोविडची परिस्थिती, लॉकडाऊनची आवश्यकता या सगळ्या बाबींचा विचार करून आयोगाने तातडीने निर्णय घ्यावा असाही आदेश दिला आहे.  आता या निवडणुकांबाबतचा चेंडू पुन्हा राज्य निवडणूक आयोगाच्या कोर्टात आला आहे. 

प्रतिअधिवेशनातील माईक काढून घेण्यात आले, ही महाराष्ट्रातली आणीबाणी आहे; देवेंद्र फडणवीस

लोकशाहीत विरोधी पक्ष आणि माध्यमांना कुलुप लावण्याचं काम ठाकरे सरकारने केलं आहे, ही राज्यातील आणीबाणी असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. सभागृहाच्या आवारात भाजपचं प्रतिअधिवेशन सुरु असताना तालिका अध्यक्षांच्या आदेशानंतर त्यांचे माईक काढून घेण्यात आले होते. 

बुलढाणा जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठी अगदीच नगण्य

जिल्ह्यातील खडकपूर्णा, पेन टाकली या दोन मोठ्या प्रकल्पात पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे तर चार मध्यम प्रकल्पातही पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे.  जिल्ह्यातील सर्वात मोठा असणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पात आज रोजी 515.77 मी इतकी पाणी पातळी असून 57.9807 द.ल.घ.मी इतका पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा मृत साठ्यापेक्षा 25 मीटर ने कमी आहे. या पावसाळ्यात जिल्ह्यातील फक्त एकच कोराडी मध्यम प्रकल्प फुल भरला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील धरणातील पाणीसाठी अगदीच नगण्य

जिल्ह्यातील खडकपूर्णा, पेन टाकली या दोन मोठ्या प्रकल्पात पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे तर चार मध्यम प्रकल्पातही पाण्याचा मृत साठा शिल्लक आहे.  जिल्ह्यातील सर्वात मोठा असणाऱ्या खडकपूर्णा प्रकल्पात आज रोजी 515.77 मी इतकी पाणी पातळी असून 57.9807 द.ल.घ.मी इतका पाणी साठा शिल्लक आहे. हा साठा मृत साठ्यापेक्षा 25 मीटर ने कमी आहे. या पावसाळ्यात जिल्ह्यातील फक्त एकच कोराडी मध्यम प्रकल्प फुल भरला आहे.

ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील खली वाघाचा मृत्यू
नागपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिशय प्रसिध्द असलेल्या खली या वाघाचा नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये मृत्यू झालाय. ताडोबाच्या मोहर्ली-पद्मापूर मार्गावर एका अज्ञात वाहनाने खली या वाघाला धडक मारली होती ज्यामध्ये हा वाघ गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर 9 मे रोजी या वाघाला डार्ट मारून बेशुध्द करण्यात आले आणि त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नागपूरच्या गोरेवाडा रेस्क्यू सेंटर मध्ये दाखल कऱण्यात आले होते. मात्र रेस्क्यू सेंटर मध्ये त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय. खलीच्या मृत्यू मुळे ताडोबा परिसरात भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. 

 
बेळगाव महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न; कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कृत्य

बेळगाव महानगरपालिकेसमोर पुन्हा एकदा लाल पिवळा ध्वज लावण्याचा प्रयत्न, कन्नड रक्षण वेदिकेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे कृत्य, लाल पिवळा ध्वज लावण्यावरुन बेळगावमध्ये पुन्हा एकदा तणाव, ध्वज फडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दहा कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, याआधी लावलेला लाल पिवळा ध्वज खराब झाल्याचे कारण देत नवीन ध्वज फडकवण्याचा केला प्रयत्न, अनधिकृत ध्वजावरून गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र कर्नाटक सीमा भागात तणावाचं वातावरण

शिक्षण विभागाचा युटर्न; शाळा सुरु करण्याबाबतचा शिक्षण विभागाचा शासन निर्णय स्थगित

मुंबई : शाळा सुरु करण्याबाबतचा शिक्षण विभागाचा शासन निर्णय स्थगित करण्यात आला आहे. शिक्षण विभागाचा यु टर्न, 8वी ते 12वी शाळा सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय स्थगित करण्यात आला आहे. शाळा सुरु करण्याबाबतच्या निर्णयवर शिक्षक विभागाची घाई-गडबड दिसून आली.  काल 8 वी ते 12 वी शाळा सुरू करण्याबबत शासन निर्णय जाहीर करण्यात आला होता. यामध्ये कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या भागात ग्रामपंचायतीच्या परवानगीनंतर शाळा सुरु करण्यात याव्यात, असं यामध्ये नमूद करण्यात आलं होतं. मात्र हा शासन निर्णय स्थगित करण्यात आला आहे. 


 
डोंबिवलीत लसीकरणासाठीच्या टोकणची रांग थेट शिवाजी महाराज चौकापर्यंत 

गेल्या दोन आठवड्यांपासून कल्याण डोंबिवलीमध्ये लसीकरणाला चांगलाच ब्रेक लागला आहे. त्यामुळेच लसीकरणासाठी नागरिकांची संख्या जास्त आणि लसींचा साठा मात्र कमी अशी अवस्था झाली आहे. त्यामुळेच आज मोठ्या विश्रांतीनंतर कल्याण डोंबिवलीत होणाऱ्या लसीकरणासाठी लोकांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात लस घेण्यासाठी लोकांनी सकाळपासून रांग लावली आहे.

संभाजी भिडे गुरुजींसह 80 जणांवर गुन्हा दाखल, बंडातात्या कराडकर यांच्या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चा प्रकरणी कारवाई

सातारा : संभाजी भिडे गुरुजींसह 80 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल कराड शहरात मोर्चा काढून गर्दी गोळा केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. बंडातात्या कराडकर यांना स्थानबद्ध केल्याच्या कारणातून मोर्चा काढला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग आणि 144 कलमांतर्गत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

एकीकडे 12 दिवसांपासून पाऊस नाही, तर दुसरीकडे वन्य प्राण्यांकडून पिकांचं नुकसान; शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

बुलढाणा : जिल्ह्यात 65 टक्के शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या आहेत. पीक ही चांगलं उगवलेलं आहे. पण गेल्या 12 दिवसांपासून पाऊस नसल्याने पिके कोमेजून सुकू लागली आहेत. त्यात उगवलेली पीक वन्य प्राणी नष्ट करीत आहे. शेकडो रोही शेतातील पिके नष्ट करतात. शेतकऱ्यांना दुहेरी त्रासाचा सामना करावा लागत आहे. मलकापूर तालुक्यातील वादोदा- हरसोडा शिवारात अशाच शेकडो रोहीचा कळप पिकांचं नुकसान करताना केमरात कैद झालंय.

मुंबईच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये मोठी दुर्घटना टळली

मुंबई च्या सेंट जॉर्ज रुग्णालयात काल रात्री 10 वाजताच्या दरम्यान आग लागली होती. या रुग्णालयात सध्या कोव्हिडंचे रुग्ण असल्याने या आगीमुळे काही काळ खळबळ उडाली होती. रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये ही आग लागली होती. प्रथम या ठिकाणी एक स्पार्क झाला आणि नंतर आग आणि धूर या विभागात पसरला. आग विझविण्यास गेलेल्या महाराष्ट्र सुरक्षा बलाचे दोन जवान योगेश पेंढारकर आणि मनोज कदम यांचा श्वास घेण्यास त्रास झाल्याने त्यांना जेजे रुग्णालयात उपचार दाखल केले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठी दुर्घटना टळली आहे.

साईबाबा विश्वस्त मंडळ आज जाहीर होण्याची शक्यता
दोन आठवड्यांपूर्वी औरंगाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर विश्वस्त मंडळ नेमण्याच्या हालचाली सुरू झाल्या. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होऊन शिर्डी देवस्थानाचं अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे तर पंढरपूरचं अध्यक्षपद काँग्रेसकडे देण्याचा निर्णय झाला. यानंतर शिर्डी विश्वस्त मंडळाची एक यादी सोशल मीडियावर व्हायरल सुद्धा झाली. मात्र राज्य सरकारने औरंगाबाद उच्च न्यायालयात दोन आठवड्यांची मुदतवाढ घेतली. आज ही मुदतवाढ संपली असून राज्य सरकार आज विश्वस्त मंडळ जाहीर करणार का याकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले आहे. सोशल मीडियातून व्हायरल झालेल्या या यादीतील अनेक नावांवर आक्षेप घेण्यात आला होता. याच बरोबर स्थानिक ग्रामस्थांना जास्त संधी मिळावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र या यादीत स्थानिकांना डावलल्यानं स्थानिक ग्रामस्थसुद्धा नाराज होते तर स्थानिक सेनानेत्यांनासुद्धा डावलल्याने स्थानिक नेत्यांनी यामध्ये आम्हाला संधी मिळावी अशी मागणी पक्षाचे नेतृत्वाकडे केली होती. आता दोन आठवड्यांची मुदत संपल्याने राज्य सरकार आज विश्वस्त मंडळ जाहीर करणार का? हे पाहावे लागेल. या प्रकरणी उद्या 7 जुलैला औरंगाबाद उच्च न्यायालयात पुन्हा एकदा सुनावणी ठेवण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांपासून शिर्डीच्या साईबाबा विश्वस्त मंडळ अस्तित्वात नसल्यानं शिर्डी विश्वस्त मंडळाचे काम चार सदस्यीय समितीमार्फत करण्यात येत आहे. औरंगाबाद उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीकडून कारभार सुरू असून महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर विश्वस्त मंडळ जाहीर होईल अशी अपेक्षा होती मात्र दोन वर्षे उलटूनही विश्वस्त मंडळ नियुक्त न केल्याने शिर्डीतील याचिकाकर्त्यांना थेट औरंगाबाद उच्च न्यायालयात धाव घेतली आणि विश्वस्त मंडळ नेमण्याची मागणी केली होती.
केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना हावित यांची वर्णी लागण्याची शक्यता

केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून नारायण राणे, हिना हावित यांची वर्णी लागण्याची शक्यता असून या दोन नेत्यांच्या नावाची चर्चा आहे. व्यतिरिक्त भूपेंद्र यादव , पूनम महाजन आणि प्रीतम मुंडे यांचीही नावं चर्चेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नव्या मंत्रीमंडळातील 17 ते 22 मंत्री 7 जुलैला  शपथ घेतील. याच पार्श्वभूमीवर भाजपचे राज्यसभा खासदार व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची चिन्हे दिसून येत आहेत. कारण दिल्लीच्या भाजप राष्ट्रीय कार्यालयातून नारायण राणे यांना फोन आला असून त्यांना तातडीनं दिल्लीला बोलावून घेतलं आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणेंचं स्थान जवळपास निश्चित झालं असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. 

उद्या मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार

 केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असून देशभरातील अनेक नेत्यांना मोदी कॅबिनेटमध्ये स्थान मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत. मोदी सरकार 2.0 मध्ये अद्याप तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्यामुळे मोदी सरकारच्या कॅबिनेटमध्ये कोणाची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सध्या मोदी कॅबिनेटमध्ये अनेक ज्येष्ठ मंत्री अधिकच्या खात्यांचा प्रभार आहे. त्यांच्यावरील जबाबदारी कमी करुन नव्या मंत्र्यांकडे हा कार्यभार दिला जाणार आहे. 7 जुलै रोजी मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. 

पार्श्वभूमी

भाजपचे निलंबित 12 आमदार राज्यपालांना भेटले, म्हणाले, महाविकास आघाडी सरकारनं लोकशाहीचा गळा घोटला!


मुंबई :  विधिमंडळाच्या दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनाच्या (Maharashtra Assembly Session)पहिल्याच दिवशी सभागृहात जोरदार राडा पाहायला मिळाला. अधिवेशनात तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की प्रकरणी भाजपच्या 12 आमदारांना (BJP MLA suspended) निलंबित करण्यात आलं आहे. गैरवर्तन करणाऱ्या आमदारांचं एक वर्षासाठी निलंबन करण्यात आलं आहे. अभिमन्यू पवार, आशिष शेलार, अतुल भातखळकर, जयकुमार रावल, राम सातपुते, गिरीश महाजन, संजय कुटे, नारायण कुचे, पराग आळवणी, हरिश पिंपळे, नारायण कुचे, कीर्तिकुमार भांगडिया यांचं निलंबन करण्यात आलं आहे. 


या निलंबित 12 आमदारांनी यानंतर राज्यपालांची भेट घेतली. त्यांनी यासंदर्भात राज्यपालांना एक निवेदनही दिलं आहे.  ठाकरे सरकारच्या या दडपशाही निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी  राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली असल्याचं आमदारांनी सांगितलं. आम्हाला बोलू द्या अशी मागणी केली असताना भाजप आमदारांवर शिविगाळ केल्याचा खोटा ठपका ठेवत निलंबित केलं असल्याचं निवेदनात म्हटलं आहे. भाजपच्या आमदारांनी अशा प्रकारची शिविगाळ केलेली नाही. तरीही लोकशाहीच्या प्रथा, परंपरा गुंडाळून लोकशाहीचा गळा घोटून महाविकास आघाडीकडून सभागृहाचे कामकाज चालवले जात आहे, असं निवेदनात म्हटलं आहे. आमच्यावर केलेले आरोप आम्हाला अमान्य असून उलट महाविकास आघाडीच्या सदस्यांनीच आमच्यावर हातापाई केली असल्याचंही यात म्हटलं आहे. 




राज्यात सोमवारी 13027 रुग्णांना डिस्चार्ज, 6740 रुग्णांची भर; पाच जिल्ह्यात रुग्णसंख्या शुन्यावर



मुंबई : कोरोनाच्या कालच्या आकडेवाडीमुळे काहीशी चिंता वाढली होती. कारण राज्यात काल 3378 रुग्ण बरे झाले होते, तर 9336 रुग्णांची भर पडली होती. मात्र आज राज्यातील कोरोनाची आकडेवारी काहीशी दिलासादायक आहे. आज राज्यात 6740 नव्या कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 13 हजार 27 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 58 लाख 61 हजार 720 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.02 टक्के आहे. 


राज्यात आज 51 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 48 महापालिक क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 827 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यवतमाळ (57), हिंगोली (84), गोंदिया (88) या तीन जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 16,960 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


दिल्लीला भूकंपाचे धक्के, 3.7 रिश्टर स्केलची तीव्रता


Earthquake in Delhi: दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के (Delhi NCR Earthquake Latest update) बसल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. 3.7 रिश्टर स्केलची तीव्रतेचे हे धक्के असल्याचं सांगण्यात आलं आहे. भूकंपाचं केंद्र  हरियाणा मधील झज्जर मध्ये असल्याचं सांगण्यात आलं आहे. रात्री 10:36 वाजताच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवल्याचं काही नागरिकांनी सांगितलं. भूकंपाची खोली 5 किलोमीटरपर्यंत असल्याचं सांगण्यात येत आहे. 


दरम्यान दिल्लीत भूकंपाचे धक्के बसल्यानंतर सोशल मीडियावर लोकं एकमेकांना भूकंपाबद्दल विचारणा करु लागली होती. यात अनेकांनी भूकंपाचे धक्के जाणवल्याचं सांगितलं.  

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.