Breaking News LIVE : वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांची माहिती

दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Feb 2021 06:11 PM
गेवराई तालुक्यातील कोल्हेर गावांमध्ये असलेल्या महानुभाव पंथाच्या आश्रमातील तब्बल 29 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. महानुभव पंथाच्या आश्रमामध्ये काल एका धार्मिक सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सोहळ्याला अनेकांनी गर्दी केली. त्यानंतर या सगळ्यांची आज अँटीजन टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये तब्बल 29 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाला आहे, त्यामुळे आता आरोग्य विभागाची चिंता वाढलीय.
कोरोना विषाणू संक्रमण रोखण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक करण्यात आलेले आहे, तरीदेखील अनेक नागरिक विनामास्क फिरताना आढळून येतात, गेल्या वर्षीच्या सप्टेंबर महिन्यापासून पुणे शहरात विना मास्क कारवाई अंतर्गत तब्बल साडे बारा कोटी पेक्षाही जास्त इतक्या दंडाची रक्कम वसूल करण्यात आलीय. यामध्ये तब्बल 2 लाख 60 हजारहुन अधिक नागरिकांवर विनामास्कची कारवाई करण्यात आलीय. सुरुवातीच्या टप्प्यात दंड वसूल केला जात असल्याने पुणेकर नियमितपणे मास्क घालत होते. मात्र, रुग्णांच्या संख्येत घट होत असल्याने पुन्हा मास्क घालण्यात टाळाटाळ होत होती. मात्र, गेल्या दोन ते तीन आठवड्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होऊ लागल्याने पोलीस आता कडक कारवाई करत आहेत.
महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरला अचानक आग. कोल्हापूर शहरातील साने गुरुजी वसाहत याठिकाणीची घटना. शॉर्ट सर्किटने आग लागल्याची प्राथमिक माहिती. साधारण 250 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित. उद्या सकाळी ट्रान्सफॉर्मर दुरुस्तीचे काम सुरू होणार.
भिवंडीत महापौर चषक 2021 क्रिकेट स्पर्धेत कोरोनाच्या सर्व नियमांचे उल्लंघन होत असून एबीपी माझाने त्यासंदर्भात बातमी दाखवल्यानंतर आता प्रशासन खडबडून जागे झाले आहे. मनपा प्रशानाच्या वतीने स्पर्धा आयोजकासह आठ जणांवर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा देण्याचे आदेश, राठोड प्रकरणाने सरकारची नामुष्की झाल्याने निर्णय, शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांची माहिती
इयत्ता दहावी बारावी बोर्डाचे अंतिम वेळापत्रक जाहीर. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा एप्रिल-मे 2021 अंतिम वेळापत्रक जाहीर. दहावी बोर्ड लेखी परीक्षा 29 एप्रिल 2021 ते 20 मे 2021 तर बारावी बोर्डाची लेखी परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे 2021.
यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांनी सदर ठिकाणी प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्याबाबत निर्देशित केले आहे. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या शहरी व ग्रामीण क्षेत्रातील प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी नियम लागू करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी शनिवार सायंकाळी पाच वाजल्यापासून सोमवारी सकाळी 9 वाजेपर्यंत जिल्ह्यात संपूर्ण संचारबंदी घोषित केली आहे. या अंतर्गत दुध व दुग्धजन्य पदार्थ हे जीवनाश्यक/अत्यावश्यक असल्यामुळे तसेच ते नाशवंत पदार्थ असल्याने (दूध विक्रेते/डेअरी) आठवड्याचे सातही दिवस सकाळी 6 ते रात्री 9 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात येत आहे. संचारबंदीच्या या कालावधीमध्ये जिल्ह्यातील सर्व दवाखाने, औषधी दुकाने (जनावरांचे दवाखाने आणि त्यांच्या औषधी दुकानासह), पेट्रोलपंप, गॅस वितरण इत्यादी अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. या आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम 1897, भारतीय दंड संहिता 1860 चे कलम 188 आणि इतर संबंधित कायदे आणि नियम यांचे अंतर्गत कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी सांगितलं आहे.
दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा या पहिल्या सत्रात सकाळी साडेदहा ते दुपारी दीड वाजेच्या दरम्यान तर दुसऱ्या सत्रात दुपारी तीन ते सायंकाळी सहाच्या दरम्यान होणार होणार
पूजाची बदनामी थांबवा नाही तर कुटुंबासह आम्हाला आत्महत्या करावी, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पूजा चव्हाणचे वडील लहू चव्हाण यांनी दिली आहे. ते म्हणाले की, "रोज वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप, फोटोग्राफ बदनामी करण्याच्या उद्देशाने येत आहेत. पूजाला न्याय मिळाला पाहिजे पण कृपया तिची बदनामी मीडियाने, सोशल मीडियाने थांबवावी. पूजा ही सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय कार्यकर्ते होती पण एकाच व्यक्तीसोबत तिचे फोटो हेतुपुरस्सर व्हायरल केले जात आहेत. आमच्या घरामध्ये बहिणी आहेत. या सगळ्या रोजच्या बातम्या आणि वायरल होणाऱ्या फोटोमुळे आमच्या कुटुंबाला आता होणारा त्रास सहन होत नाही. पूजाला न्याय मिळाला पाहिजे मात्र राजकारण थांबवा."
वनमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या नेत्या चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर सोशल मीडियावर चित्रा वाघ यांची बदनामी करणारे फोटो सध्या व्हायरल केले जात आहेत. चित्रा वाघ यांचा त्यांच्या पतीसोबत असणाऱ्या फोटोमध्ये बदल करून त्यांच्या पतीच्या चेहऱ्या जागी संजय राठोड यांचा चेहरा लावून हे फोटो व्हायरल केले जात आहेत. व्हायरल झालेले फोटो हे चित्रा वाघ यांनी स्वतः माध्यमांत पर्यंत पोचवले आहेत.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात पुणे लष्कर कोर्टात खटला दाखल. लीगल जस्टीस सोसायटी तर्फे अॅड विजयसिंह ठोंबरे यांनी दाखल केला. खटल्यावर युक्तीवाद ही झाला. मात्र, 5 मार्चला पुणे कोर्ट पुढील निकाल देणार आहे.
युसुफ पठाणने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.
सोलापूर विजापूर मार्गावर 18 तासात 25.54 किमी रस्ता (एक पदरी) बांधला. लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये याची नोंद होणार असल्याचा दावा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला.

कोरोनामुळे एसटी महामंडळातील 107 कर्मचाऱ्यांचा आजपर्यंत मृत्यू झाला आहे. तर तब्बल साडेचार हजार कर्मचारी पॉझिटिव्ह होऊन निगेटिव्ह झाले आहेत. त्यामुळे एसटी महामंडळाने आता तरी आमच्याकडे लक्ष द्यावं अशा पद्धतीची मागणी एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांनी केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार दररोज हे कर्मचारी तब्बल 45 लाखांपेक्षा जास्त प्रवाशांच्या संपर्कात येतात. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात आहे. आणि त्यासाठी परिवहन मंत्री अनिल परब यांनी तत्काळ सर्व कर्मचाऱ्यांना कोविडची लस देण्याची घोषणा करावी अशी मागणी सर्व कर्मचाऱ्यांना केली आहे. याबाबत बोलताना महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेसचे सरचिटणीस मुकेश तिगोटे म्हणाले की, "मुंबईत दररोज 100 ते 200 चालक बाहेरगावावरुन बेस्ट सेवेसाठी येत आहेत. मुंबईतल्या प्रचंड गर्दीत हे चालक वाहक प्रवाशांच्या संपर्कात येत आहेत आणि पुन्हा यातील अनेक कर्मचारी करोना पॉझिटिव्ह होऊन गावी जात आहेत. परिणामी गावाकडे देखील कोरोनाचा प्रसार होत आहे. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा देण्यासाठी आघाडीवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची शासनाने दखल घ्यावी आणि कोविड-19ची लस सर्वांना देण्यात यावी.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीवर चार अतिरिक्त नवीन उपाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. यामध्ये नाना गावंडे, सचिन नाईक, संजय राठोड आणि चारुलता टोकस यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त तीन नवीन सदस्यांची पार्लमेन्टरी बोर्डवर नियुक्ती करण्यात आली असून त्यामध्ये एकनाथ गायकवाड, संजय निरुपम, जनार्दन चांदूरकर यांचा समावेश आहे.
खेड-शिवापूर टोल नाक्यावर बनावट टोल पावतीच्या रॅकेटचा पर्दाफाश

पुणे-सातारा मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर बनावट टोल पावत्या देत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.. या प्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने टोलनाक्यावर स्टिंग ऑपरेशन करुन वाहन चालकांना बनावट टोलपावत्या दिल्या जात असल्याची खात्री झाल्यानंतर ही कारवाई केली आहे. पोलिसांनी या टोलनाक्यावरील सहा जणांना अटकही केलीय. त्यातील काही जणांकडे टोलच्या बनावट पावत्या ही सापडल्या आहेत. टोल नाक्यावर बनावट पावत्या देत असल्याची तक्रार पोलिसांकडे आली होती, त्यानुसार टोलनाक्यावर स्टिंग ऑपरेशन करुन ही कारवाई करण्यात आलीय.. आणखीन किती टोलवर असं रॅकेट चालवलं जात आहे याचीही चौकशी पोलिसांनी सुरु केलीय.
पूजा चव्हाणचा ज्या दिवशी मृत्यू झाला त्या दिवशी संजय राठोड यांच्या मोबाईल वरून पूजाच्या मोबाईलवर 45 कॉल्स आले होते, भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांचा सनसनाटी आरोप, पूजा प्रकरणात या मोबाईलवर फोन का आले होते? याची पोलिसांनी चौकशी करावी आणि त्याची माहिती लोकांसमोर द्यावी, चित्रा वाघ यांची माहिती
नांदेड शहरातील इतवारा पोलिसांकडून गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासहित आरोपी जेरबंद. नांदेड शहरातील विष्णुपुरी येथील काळेश्वर मंदिर परिसरात एक तरुण गावठी पिस्तुल घेऊन वावरत असल्याची माहिती गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सिद्धेश्वर भोरे हे पथका सहित काळेश्वर परिसरात पोहचले. त्यावेळी सदर तरुण हातात पिस्तुल घेऊन वावरत आहे व परिसरात दहशत पसरविण्याचा प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार सदर युवक नितीन डोंगरे याची तपासणी केली असता गावठी पिस्तूलासह दोन जिवंत काडतुसे हस्तगत करून भारतीय हत्यार कायद्याच्या कलम 3/25 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नांदेड पोलिसांनीअनेक वेळा कार्यवाही करून जिवंत काडतुसे व गावठी पिस्तुल हस्तगत केली आहेत परंतु तरीही अवैद्य हत्यार सापडण्याच्या घटना काही कमी होत नाहीत. त्यामुळे आशा घटनांवर आळा घालायचा असेल तर अवैध हत्यारांचा पुरवठा करणारा मुख्य स्रोत शोधणे हे आव्हान सध्या नांदेड पोलिसां समोर आहे.
अमरावतीच्या दसरा मैदान येथील कोविड 19 तपासणी केंद्रावर उसळली गर्दी...

यावेळी मात्र नागरिकांनी कोणतंच सोशल डिस्टसिंगच भान ठेवलं नाही...

जवळपास 150 ते 200 नागरिक जवळ जवळ उभे राहून तपासणीसाठी केली गर्दी...
- मार्चमध्ये सादर होणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सवलत मिळण्याची शक्यता
- राज्यातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरू असल्याची अर्थखात्यातील सूत्रांची माहिती

परभणीत दोन मंगल कार्यालयांविरोधात कारवाई करण्यात आल्यानंतर आता हिंगोलीतही पोलिसांनी मंगल कार्यालयांना भेटी देणे सुरु केलं आहे. एका मंगल कार्यालय मालकाविरोधात गुन्हा दाखल करून 50 हजारांचा दंड ठोठावला आहे. हिंगोली शहरातील खटकाळी बायपास भागातील ओम साई मंगल कार्यालयात पोलिसांनी भेट दिली असता तिथे काल हजारोंच्या संख्येने लोकांना लग्नास उपस्थिती लावल्याचे निदर्शनास आले. कोरोना वाढीच्या अनुषंगाने दिलेल्या नियमांचे पालन न करणे व आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे उल्लंघन केल्याप्रकरणी ओम साई मंगल कार्यालयाचे मालक राजेश्वर तुंगेनवार व व्यवस्थापक राम मुंढे यांच्या विरोधात पोलिसांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आला असून 50 हजारांचा दंडही ठोठावला आहे.
औरंगाबाद महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक अस्तेय कुमार पांडे यांनी शहरात सुरू असलेल्या सिमेंटच्या रस्त्यांची पाहणी केली. शहरातील एमजीएम रोड ते चिस्तिया चौक दरम्यान दुभाजक बसवले जात होते. ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आयुक्तांच्या लक्षात आलं. आयुक्तांनी ते दुभाजक पाहिले त्याची तपासणी केली आणि ते दुभाजक पुन्हा बसवण्यास संदर्भात सूचना दिल्या. हे सिमेंटचे दुभाजक अत्यंत निकृष्ट दर्जाचे होते.
सांगलीच्या आयर्विन पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी नियुक्त ठेकेदाराकडून वीज चोरी केल्याचा प्रकार आज उघडकिस आला आहे. स्थानिक नागरिकांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या पुलाच्या ठेकेदाराकडून थेट वीज मंडळाच्या लाईनमधुन हे कनेक्शन जोडून घेतले आहे. त्यामुळे हा वीज चोरीचा प्रकार असल्याचे समोर आले आहे. सांगलीवाडीतील संतप्त नागरिकांनी आयर्विन पुलावर धाव घेत ठेकेदाराला धारेवर धरले. महापालिकेचे नगरसेवक अजिंक्य पाटील यांनी थेट काम बंद पाडून पूल वाहतुकीस सुरू करावा अशी मागणी केली आहे.
शेतकरी आंदोलनाला तीन महिने झाल्याच्या निमित्ताने दिल्लीत किसान काँग्रेसचे आंदोलन
,
केंद्रीय कृषिमंत्र्यांना घेराव घालण्यासाठी निघालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखलं
,
काँग्रेस कार्यालयाच्या बाहेरच कार्यकर्त्यांचा थाळीनाद, बॅरिकेड वर उभे राहून घोषणाबाजी
,
किसान काँग्रेस उपाध्यक्ष सुरेंद्र सोळुंके यांच्या नेतृत्वात आंदोलन
उपमुख्यमंत्री अजित पवारांची नियोजित कोरोना आढावा बैठक आज रद्द...

दर शुक्रवारी पुणे जिल्ह्यातील आढावा बैठक घेत असतात अजित पवार...

मात्र अजित पवार आज पुण्यातील बारामती होस्टेलवर..

अजित पवार घेतायत कार्यकर्त्यांच्या भेटी...
राज्यात 1 फेब्रुवारीला कोरोनाचे सर्वांत कमी एक हजार 948 रुग्ण सापडले होते. काल (25 फेब्रुवारीला ) राज्यभरात तब्बल आठ हजार 702 रुग्ण आढळून आले. म्हणजे 1 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत राज्यात दररोज चार हजार 100 च्या सरासरीने तब्बल एक लाख एक हजार 474 रुग्ण वाढले आहेत . या काळात दररोज 36 च्या सरासरीने 884 जण दगावले आहेत .
राज्यातील 11 जिल्ह्यांमधील 410 विद्यार्थी तर 234 शिक्षक कोरोना बाधित आढळले. त्यात सामाजिक न्याय व समाज कल्याण विभागाअंतर्गतच्या शाळांची संख्या सर्वाधिक.

राज्यातच कोरोना बाधित पुन्हा वाढू लागल्याने दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे.
इंदापूर तालुक्यातील लक्ष्मण डोईफोडे शहीद झाले आहेत. इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी गावचे लक्ष्मण डोईफोडे वय 45 वर्षे हे आसाम राज्यात कर्तव्यावर असताना 23 फेब्रुवारी रोजी शहीद झाले आहेत. त्यांचं पार्थिव त्यांच्या बोराटवाडी या गावात दाखल. गावात प्रदक्षिणा घालून त्यांच्यावर घराजवळील शेतात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गावातील रस्त्यावर फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्यात तसेच रांगोळी च्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली आहे.
राज्याच्या ग्रामीण परवानगी मागण्यासाठी ग्रामपंचायतीकडे भागातील सुमारे 3,200 चौरस फुटांपर्यंतच्या परवानाधारक अभियंत्याद्वारे प्रमाणित आणि भूखंडांवरील बांधकामांना नगर साक्षांकित कागदपत्रांसह अर्ज केल्यानंतर रचनाकारांच्या परवानगीची गरज लागणार नाही . ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी ही घोषणा केली
सोलापुरात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी रात्र संचारबंदी लागू करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीला सुरुवात करण्यात आली आहे. रात्री 11 ते 5 वाजेपर्यंत ही संचारबंदी लागू असणार आहे. यावेळी अत्यावश्यक सेवेशिवाय इतर कोणत्याही नागरिकांना शहर आणि जिल्ह्यात घराबाहेर फिरण्यास मनाई असणार आहे. सोलापूर शहरातील प्रमुख चौकात रात्री पोलिसांनी कडक बंदोबस्त लावला. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची चौकशी करूनच त्यांना सोडले जात होते. सोलापुरात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढू नये यासाठी प्रशासनाने काही निर्बंध लावले आहेत. 7 मार्च पर्यंत ही रात्र संचारबंदी लागू असणार आहे.
कल्याण स्टेशनवरील स्कायवॉकवर रात्रीच्या सुमारास नागरिकांची लुबाडणूक करणाऱ्या तृतीयपंथीयांना मनसेने चांगलीच अद्दल घडवली.
रात्रीच्या सुमारास कल्याण स्टेशन परिसरातील स्कायवॉकवर तृतीयपंथीय प्रवाशांना लुबाडत असून त्याच्याकडून जबरदस्ती पैसे लुबाडणे, पैसे दिले नाहीतर घाणेरड्या शिव्या देऊन मारहाण करणे आदी प्रकारच्या तक्रारी कल्याण शहर मनसेला आल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मनसे कार्यकर्त्यांनी काल रात्री थेट कल्याणच्या स्कायवॉकवर धडक देत तृतीयपंथीयांना चांगलीच अद्दल घडवली. मनसे कार्यकर्त्यांनी संपूर्ण स्कायवॉक पिंजून काढत याठिकाणी असणाऱ्या तृतीयपंथीयांना पोलिसांच्या ताब्यात दिले.

पार्श्वभूमी

मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ सापडली!


 


भारतातील श्रीमंत उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांनी भरलेली जीप आढळल्याने खळबळ उडाली आहे. मुंबईतील अँटिलिया या निवासस्थानाजवळ जिलेटिनचा साठा सापडला. मुंबई पोलीस, फॉरेन्सिक टीम, आणि श्वानपथकं घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे. या स्फोटकांसह एक चिठ्ठीही सापडली असून त्यामधून घातपाताची धमकी दिल्याचं समजतं. पोलीस आणि तपास यंत्रणांकडून सीसीटीव्ही फूटेज तपासण्याचं काम सुरु आहे. मुकेश अंबानी यांचं अँटिलिया हे निवासस्थान हे पेडर रोडवर आहे. हा उच्चभ्रू परिसर आहे. दरम्यान काल मध्यरात्री एक वाजता अँटिलियाजवळ ही स्कॉर्पिओ कार पार्क केल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फूटेजमधून समोर आलं आहे. तर आज दुपारी तीन वाजता या कारसंदर्भातील फोन आल्याचं कळतं.


 


गॅस सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपयांची वाढ, सर्वसामान्यांना महागाईचा झटका


 


 पेट्रोल- डिझेलनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा 25 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. . त्यामुळे ग्राहकांना 14.2 किलो वजनाच्या विना अनुदानित सिलेंडरसाठी 794 रुपये मोजावे लागणार आहे.  24 फेब्रुवारी दुपारी 12 पासून हे दर लागू होणार आहे.फेब्रुवारी महिन्यात तिसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. त्या नंतर 15 फेब्रुवारी रोजी 50 रुपयांची वाढ झाली होती. आता पुन्हा एकदा सिलेंडरच्या किंमतीत 25 रुपायांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईत घरघुती सिलेंडर आता 769 रूपयांवरून 794 रुपयांवर पोहचली आहे.


 


नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा दमदार विजय; इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव


 


अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या तिसर्‍या कसोटी सामन्यात भारताने दुसर्‍या दिवशी इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह भारताने चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. दुसर्‍या डावात इंग्लंडने भारताला 49 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारताने कोणताही गडी न गमावता अवघ्या 7.4 षटकांत पूर्ण केलं. रोहित शर्माने 25 चेंडूत तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद 25 धावा काढल्या तर शुभमन गिलने 21 चेंडूत 1 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 15 धावांवर नाबाद राहिला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.