Breaking News LIVE : बुलडाणा : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन

Breaking News LIVE Updates, 4 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Aug 2021 06:11 PM
आम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत राज्यपाल यांच्याशी बोललो : दत्तात्रय भरणे

आम्ही विद्यार्थ्यांच्या अडचणींबाबत राज्यपाल यांच्याशी बोललो आहोत. त्यांना किती जागांचा प्रश्न आहे. याबाबत देखील माहिती दिली. जवळपास 20 हजार जागा भरणं बाकी आहे. त्यामुळे तत्काळ राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फाईलवर सही केली आहे, अशी माहिती पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पुढील 2 तासांत फाईल राज्य सरकारकडे पोहचेल. विद्यार्थ्यांच्या मुलाखतीसाठीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. 6 सदस्य आहेत. त्याची संख्या कमी पडेल अशी परिस्थिती आहे. ती संख्या वाढवण्याबाबत देखील आम्हाला राज्यपाल यांनी मान्यता दिली आहे : दत्तात्रय भरणे.

बुलडाणा : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांच निधन.

बुलडाणा : शेगाव येथील संत गजानन महाराज संस्थानचे व्यवस्थापकीय विश्वस्त शिवशंकर पाटील यांचं निधन. वयाच्या 82 व्या वर्षी वृद्धापकाळाने शेगाव येथे निधन. कोरोनाच्या निर्बंधांमुळे शेगावात भक्तांनी येऊ नये असं संस्थानच आवाहन.

आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्ससाठी उद्यापासून बारावीच्या निकालानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु होईल : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत

आर्ट्स, कॉमर्स आणि सायन्ससाठी उद्यापासून बारावीच्या निकालानुसारच प्रवेश प्रक्रिया सुरु होईल. कोणत्याही प्रकारची सीईटी नसेल : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत.

राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांना आपत्तीच्या परिस्थितीत लोकांच्या भेटी घेण्याचा अधिकार : चंद्रकांत पाटील

राज्यपाल हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात. त्यामुळे त्यांना आपत्तीच्या परिस्थितीत लोकांच्या भेटी घेण्याचा अधिकार आहे. मंत्रिमंडळाची भूमिका घटनेची पायमल्ली आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांची कर्जमाफ झाली पाहिजे. कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. आम्ही मदत करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात आम्ही मदत केली ती खरी मदत. 


राज ठाकरे यांनी उत्तर भारतीय संमेलनात केलेल्या भाषणाची सीडी मी पूर्ण ऐकली. तरी देखील काही मुद्दे माझ्या मनात आहेत. त्यावर त्यांच्याशी चर्चा करणार आहे. मनसेसोबत युतीबाबत आम्हाला केवळ पुणे किंवा विशिष्ट क्षेत्राचा विचार करून चालत नाही. आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत. पुण्यात युती केली आणि त्याचा फटका मुंबईत बसला असे होऊन चालणार नाही.


पुण्यातील दुकाने पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास अजूनही परवानगी नाही. सरकारने व्यापाऱ्यांचा आक्रोश समजून घ्यावा.


राज्यांना एखाद्या जातीला मागास ठवण्याचा अधिकार असावा याबाबतचे दुरुस्ती विधेयक केंद्राने आणावे. आणि त्याला सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा. यातून मराठा आरक्षणाचा विषय सुटू शकतो.

वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून बाजारपेठेचा भाग स्थलांतरितच करता येतील का? : खासदार संजय काका पाटील

सांगलीच्या महापुराबाबत खासदार संजय काका पाटील यांनी महत्त्वाची मागणी केली आहे. वारंवार येणाऱ्या पुराचा धोका लक्षात घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून बाजारपेठेचा भाग स्थलांतरितच करता येतील का? याबाबत केंद्रीय नगर विकास मंत्रालयाने पाहणी अभ्यास सुरू करावा. केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीप सिंग पुरी यांना भेटून ही मागणी केली आहे.

कोकण म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची उद्या घोषणा होणार

कोकण म्हाडाच्या घरांच्या लॉटरीची उद्या घोषणा होणार. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उद्या 3 वाजता करणार घोषणा. घोषणेनंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर निघणार लॉटरी. कोविडमुळे अनेक दिवसांपासून लॉटरी रखडली होती.

कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे बंद करणार, पाऊस ओसरत असल्याने कोयना प्रशासनाचा निर्णय

सातारा : कोयना धरणाचे 6 वक्र दरवाजे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पायथा विद्युत गृहातील विसर्ग मात्र सुरुच राहणार आहे. पाऊस ओसरत असल्याने कोयना प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे. कोयना धरणात आता 85. 88 टीएमसी पाण्याचा साठा उपलब्ध आहे. कोयना धरणात सध्या 20 हजार क्युसेस पाण्याची आवक होत आहे. 

राज्यपालांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठक रद्द करावी, अन्यथा काळे झेंडे दाखवून बैठकीच्या ठिकाणी निषेध करणार, परभणी शहर राष्ट्रवादीचा इशारा

परभणी : राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नांदेड हिंगोली परभणी दौऱ्यावर अगोदरच टीका केली जात असताना आता परभणी शहर राष्ट्रवादीकडून त्यांना इशारा देण्यात आला आहे. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी विद्यापीठात येऊन त्यांचे कार्यक्रम घ्यावेत मात्र जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेली बैठक रद्द करावी अन्यथा बैठकीच्या ठिकाणी येऊन काळे झेंडे दाखवत निषेध नोंदवणार असल्याचा इशारा परभणी शहर राष्ट्रवादी कडून देण्यात आला आहे. आज राष्ट्रवादीच्या शहर कार्यकारिणीने जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देऊन हा इशारा दिला आहे. 

मुंबई येथील एका भाविकाने विठ्ठल मंदिराला दिली 1 कोटी रुपयांची देणगी

मुंबई येथील एका भाविकाने विठ्ठल मंदिराला दिली 1 कोटी रुपयाची देणगी दिली आहे. या भाविकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्स कंपनीकडून आलेली रक्कम कुटुंबाने विठुरायाला अर्पण केली. विशेष म्हणजे या भाविकांच्या कुटुंबाने आपले नाव गुप्त ठेवण्याची विनंती समितीला केल्याने या दनाशुराचे नावं समजू शकले नाही. अलीकडच्या काळात विठुरायाला मिळालेली ही सर्वात मोठी देणगी आहे.

हॉटेलची वेळ वाढवून देण्याच्या मागणीसाठी वसई विरार हॉटेल व्यावसायिकांचा मूक मोर्चा

वसई विरार परिसरातील हॉटेल व्यावसायिकांनी आज पालघरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चा काढला होता. कोरोना काळात हॉटेल व्यवसायावर मोठया प्रमाणात निर्बंध लावण्यात आल्याने, हॉटेल व्यावसायिकांच मोठं नुकसान झालं आहे. अजून ही या व्यवसायात शथिलता आणली जात नाही. त्यामुळे सरकारकडे आपलं निवेदन देण्यासाठी त्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मुक मोर्चाच आंदोलन केलं होतं.


या आंदोलनात 200 च्या वर हॉटेल व्यावसायिक सहभागी झाले होते. वसईतील तुंगारेश्र्वर फाटा येथून या मुक मोर्चाला सुरवात होवून, दुपारी 12.30 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहचून, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं गेलं. हॉटेलची वेळोमर्यादा वाढवून द्यावी ही मागणी हॉटेल व्यावसायिकांनी केली आहे. या आधीही विरारमध्ये एका हॉटेल व्यावसायिकांनी आर्थिक टंचाईला कंटाळून आत्महत्या केली होती.

कौटुंबिक भांडणात हस्तक्षेप करत जातपंचायतीने टाकलं वाळीत, सोलापुरात गुन्हा पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, चौघांना अटक

सोलापूर : पती पत्नीच्या भांडणात हस्तक्षेप करत एका व्यक्तीस 2018 पासून जातपंचायतीने बहिष्कृत केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडलीय. शरणीदास भोसले नामक व्यक्तीचा जवळपास 19 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र 2018 साली पती-पत्नीत भांडण सुरू होते. पत्नी माहेरी जाऊन या विषयी जात पंचायतीकडे तक्रार करण्यात आली. पती-पत्नीच्या या वादात हस्तक्षेप करत भांडण मिटवण्यासाठी पंचांनी 2 लाख रुपयांची मागणी केल्याचा आरोप देखील शरणीदास भोसले यांनी केला आहे. मात्र पैसे देणे शक्य नसल्याचे सांगत जात पंचयितांचा हा निर्णय मान्य नसल्याचे सांगितले. तेव्हापासून जात पंचायतीने आपल्याला वाळीत टाकल्याचा आरोप शरणीदास भोसले यांनी केला. काही दिवसांपूर्वी शरणीदास यांच्या आईला हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले होते. मात्र जात पंचायतीच्या भीतीपोटी भावाने आजारी आईला भेटुसुद्धा दिले नाही. त्यामुळे या प्रकरणात शरणीदास यांनी अखेर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक अधिनियम अन्वये जात पंचकमेटी प्रमुख राम धोडीबा शिंदे पाटील, पंच आशोक शिंदे पाटील, पंच नाना शिंदे पाटील, पंच संतोष राम शिंदे, पंच उत्तम शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. यापैकी चार आरोपीना पोलिसांनी अटक देखील केलीय. दरम्यान जात पंचायतीमुळे गरिबांवर अन्याय होतो. त्यामुळे अशा जात पंचायती बरखास्त करण्यात याव्यात अशी मागणी फिर्यादी शरणीदास भोसले यांनी केली आहे. 

मराठा आरक्षणाच्या निकालानंतर 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात केंद्र सरकार बदल करणार

मराठा आरक्षणाच्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची बातमी. मराठा आरक्षणाच्या निकालानंतर 102व्या घटनादुरुस्ती विधेयकात केंद्र सरकार बदल करणार आहे. नव्या बदलांना आजच्या केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीत मंजुरी मिळणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालात 102 व्या घटना दुरुस्तीनंतर एसीईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार केवळ केंद्र सरकारलाच आहे असे म्हटले आहे. विधेयकात बदल करून केंद्र हा अधिकार आता राज्य सरकारांना ही देणार आहे. 


 

गणेशोत्सवापूर्वी सिंधुदुर्गातील चिपी विमातळावरून विमान वाहतूक सुरु होण्याची शक्यता, नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली

केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरु करण्याबाबत नारायण राणे आणि ज्योतिरादित्य शिंदे या दोघांमध्ये चर्चा झाली असून येत्या महिन्याभरात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळ सुरू होणार आहे अशी माहिती मिळत आहे. सिंधुदुर्ग वासीयांसाठी नारायण राणे आणि ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट महत्वपूर्ण आहे. गेली अनेक वर्षे रखडलेला चिपी विमानतळ उडाणाच्या प्रतीक्षेत आहे. सताधाऱ्याकडून अनेक तारखा जाहीर केल्या गेल्या मात्र आता केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांची वर्णी लागल्यानंतर हवाई वाहतूक मंत्रांची भेट घेतल्यानंतर चीपी विमानतळावरून महिन्याभरात विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. गणेशोत्सवाच्या आधी ही विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती मिळत आहे. 



कृष्णा-वारणा नदी काठच्या महापुरामुळे झालेल्या नुकसानीचे आत्तापर्यंत सोळा हजारांहून अधिक पंचनामे

सांगली : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे सांगली जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात येत असून  जिल्हयात महापूरामुळे बाधित झालेल्या 113 गावांमधील आतापर्यंत 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे झाले आहेत. बाधित गावातील कुंटुंबं, कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे  युध्दपातळीवर पूर्ण  करण्यासाठी यंत्रणा गतीने कार्यरत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलीय.


 जिल्ह्यात महापुरामुळे तसेच अतिवृष्टीमुळे, ओढ्यांना जादा पाणी आल्याने मिरज, वाळवा, पलूस व शिराळा या चार तालुक्यातील 113 गावे बाधित झाले आहेत. महापालिका क्षेत्र तसेच ग्रामीण क्षेत्रातील एकूण 45 हजार 352 कुटुंबे बाधित झाली आहेत. शासन निर्देशानुसार बाधित गावातील कुटुंबे   कृषी, पशुधन व व्यावसायिक नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करण्यात येत आहेत .यामध्ये आज अखेर आज अखेर 16 हजार 879 कुटुंबांचे पंचनामे करण्यात आले आहेत. जिल्ह्यात महापूरामुळे 274 गावांतील 97 हजार 486 शेतकऱ्यांचे 40 हजार 671 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आज अखेर 174 गावांतील 24 हजार 781 शेतकऱ्यांचे 8 हजार 508.72 हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.  
अंबरनाथमध्ये एमआयडीसीच्या जलवाहिनीतून पाणीचोरी

बदलापूरच्या बारवी धरणातलं पाणी अंबरनाथच्या जांभूळ जलशुद्धीकरण प्रकल्पात शुद्ध करून पुढे ते ठाणे आणि मुंबईला पाठवलं जातं. यासाठी अंबरनाथपासून काटई नका आणि तिथून शिळफाट्यामार्गे पाईपलाईन टाकण्यात आल्या आहेत. या पाईपलाईनला अंबरनाथ ग्रामीण भागात नेवाळी आणि पुढे अनेक ठिकाणी टॅप मारून पाण्याची चोरी केली जाते. या भागात असलेले ढाबे, कार वॉशिंग सेंटर या भागात मोठ्या प्रमाणात चोरीच्या पाण्याचा वापर होतो. मात्र एकीकडे फुकटे हवं तितकं पाणी वापरत असले, तरी मलंगगड परिसरात मात्र गावांमध्ये पाण्याची टंचाई आहे. या सगळ्याबाबत एमआयडीसीकडे अनेकदा तक्रारी करूनही पाणी चोरणाऱ्यांवर कारवाई होत नसल्यानं ग्रामीण भागात संताप व्यक्त होतोय. या पाणीचोरांवर कारवाई व्हावी, यासाठी नेवाळी परिसरातील ग्रामस्थ अर्जुन जाधव यांनी आज थेट पाईपलाईनच्या बाजूला झाडाझुडपात उतरून हे चोरीचे कनेक्शन दाखवून दिले. एमआयडीसीच्या केबिनच्या बाजूलाच हे चोरीचे कनेक्शन टॅप मारून घेण्यात आलेत. त्यामुळे आता तरी या चोरीच्या कनेक्शनवर कारवाई होणार का? हे पाहावं लागणार आहे. 

आज अठराव्या दिवशीही पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

सरकारी तेल कंपन्यांनी आज सलग अठराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे आज पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. गेल्या महिन्यात 17 जुलैनंतर डिझेलच्या किमतींत कोणताही बदल झालेला नाही, तर 17 जुलै रोजी पेट्रोलची किंमत 29 ते 30 पैशांनी वाढवण्यात आली होती. त्यानंतरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ झालेली नाही. आज देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचे दर 101.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचे दर 89.87 रुपये प्रति लिटर आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 107.83 रुपये आणि डिझेलची किंमत 97.45 रुपये प्रति लिटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचे दर 102.08 रुपये, तर डिझेलचे दर 93.02 रुपये प्रति लिटर आहेत. तसेच, चेन्नईतही पेट्रोलचे दर शंभरीपार पोहोचले आहेत. चेन्नईत पेट्रोल 102.49 रुपये लिटर आहे, तर डिझेल 94.39 प्रति लिटरनं विकलं जात आहे. 

तोकड्या कपड्यांमुळं मित्रांसह फिरण्यासाठी गेलेल्या तरुणींचा विनयभंग

डोंबिवली : केवळ तोकडे कपडे घातल्याचं कारण काढत मलंगगडच्या पायथ्याशी फिरण्यासाठी गेलेल्या दोन तरूण आणि दोन तरुणींना त्या ठिकाणी असलेल्या 6 ते 8 टवाळखोर मुलांनी बेदम मारहाण केली. हे तरुण इथेच थांबले नाही, तर त्यांनी  दोन्ही तरुणींचे कपडे फाडण्याचा प्रयत्न करत विनयभंग केला. ही निंदनीय घटना रविवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे घाबरलेल्या या चौघांनी स्वतः ची सुटका करून घेत नेवाळी पोलीस चौकी गाठली. मात्र पोलिसाकडून त्यांना मेडिकल करून या तसेच इथे तक्रार होणार नाही, हिललाईनला जा असे सांगत माघारी धाडले. मात्र यातील पीडित तरुणीने हिम्मत न हारता सोशल मिडीयावरून या घटनेला वाचा फोडताच जागे झालेल्या पोलिसांनी याप्रकरणी मंगळवारी संध्याकाळी उशिरा गुन्हा नोंदवला असून सध्या आरोपींचा शोध सुरु केला आहे. 

कोकणात रिफायनरी प्रकल्पावरून घडामोडी कायम, राजापूर तालुक्यातील सोलगावात समर्थनार्थ बॅनर

रत्नागिरी : कोकणात रिफायनरी प्रकल्पावरून घडामोडी कायम आहेत. दरम्यान, रिफायनरी विरोधच्या बॅनरनंतर आता रिफायनरीचे समर्थन करणारे बॅनर सध्या राजापूर तालुक्यातील सोलगावात लागले आहेत. गावच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी आम्हाला रिफायनरी हवी असा मजकूर या बॅनरवर लिहिला गेला आहे. राजापूर तालुक्यातील बारसू आणि सोलगाव या ठिकाणी रिफायनरीच्या नवीन जागेची चाचपणी सुरू असल्याची चर्चा आहे. त्यानंतर लगेचच विरोधी समिती स्थापन होत काही गावांमध्ये विरोधाचे बॅनर देखील लागले होते. पण, रिफायनरी समर्थक देखील त्याच कार्यशैलीनं पुढे जात असून  सोलगावमधील रिफायनरी समर्थक यांनी थेट समर्थन करणारे बॅनल लावले आहेत. सारी परिस्थिती पाहता रिफायनरी समर्थक देखील आपला आवाज पोहोचवण्यासाठी हरप्रकारे प्रयत्न करत असल्याचं दिसून येत आहे.



सोलापूर जिल्ह्यात शहरात परिस्थिती नियंत्रणात असली तरी ग्रामीण भागात वाढणारी रुग्णसंख्या चिंतेचा विषय

सोलापूर : राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध जरी शिथिल झाले असले तरी 11 जिल्ह्यातील निर्बंध हे कायम आहेत. सोलापूर जिल्ह्यात शहरात परिस्थिती नियंत्रणात असली तरी ग्रामीण भागात वाढणारी रुग्ण संख्या ही प्रशासनाची डोकेदुखी ठरणारी आहे. ग्रामीण भागात दररोज सरासरी 400 ते 500 रुग्ण आढळत आहेत. तर ग्रामीण भागाचा पॉझिटिव्हिटी रेट हा सरासरी 5 ते साडे पाच टक्के इतका आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हाचा समावेश अद्यापही तिसऱ्या टप्प्यात आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नागरिक नियमांचे पालन करताना दिसून येत नाहीयेत. परिणामी रुग्णसंख्या वाढतेय. सोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समितीत सकाळी कोरोनाविषयक नियमांचा पुन्हा एकदा फज्जा उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. बाजार समिती जरी शहरात असली तरी या ठिकाणी जिल्ह्यातील सर्वच भागातून नागरिक येत असतात. अशा ठिकाणी नियमांचं पालन झालं नाही तर परिस्थिती आणखी चिंताजनक होण्याची शक्यता आहे.

मुंबईत काल दिवसभरात 288 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4616 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1555 दिवसांवर गेला आहे. 


आज मुंबईत लसीकरण बंद

देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाविरोधातील अस्त्र म्हणून सध्या लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. देशभरात लसीकरण मोहीमेनं वेगही धरला आहे. पण, अनेक ठिकाणी पुरेशा लससाठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. आज (बुधवारी) दिनांक 4 ऑगस्ट, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. 

पार्श्वभूमी

Mumbai Vaccination : आज मुंबईत लसीकरण बंद; पुरेशा लस साठ्याअभावी लसीकरणाला ब्रेक


Mumbai Vaccination : देशात तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाविरोधातील अस्त्र म्हणून सध्या लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. देशभरात लसीकरण मोहीमेनं वेगही धरला आहे. पण, अनेक ठिकाणी पुरेशा लससाठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. आज (बुधवारी) दिनांक 4 ऑगस्ट, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. 


कोविड-19 प्रतिबंध लसीकरण मोहिमेतंर्गत पुरेसा लससाठा उपलब्ध नसल्यामुळे बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील शासकीय आणि महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर उद्या (बुधवार) दिनांक 4  ऑगस्ट 021 रोजी लसीकरण बंद राहणार आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या वतीनं देण्यात आली आहे. तसेच लसींचा साठा ज्या प्रमाणात प्राप्त होईल, त्या अनुरूप योग्य निर्णय घेवून मुंबईकर नागरिकांना सातत्याने अवगत करण्यात येते. लस साठा उपलब्ध झाल्यानंतर लसीकरण पुन्हा सुरु करण्यात येईल. मुंबईकर नागरिकांनी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असं आवाहनही मुंबई महापालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे. 


Tokyo Olympics 2020 : भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर, आज सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनाशी लढत


Tokyo Olympics 2020 : आज टोकियो ऑलिम्पिकमध्ये महिला हॉकी संघ सेमीफायनल्सचा सामना अर्जेंटीनासोबत खेळणार आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाला सेमीफायनल्सच्या सामन्यात बेल्जियमकडून पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून सर्वांच्या नजरा महिला हॉकी संघाकडे लागून राहिल्या आहे. देशातील प्रत्येक जण आज यांच्या विजयासाठी प्रार्थना करत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला हॉकी संघानं इतिहास रचला आहे. दिग्गज ऑस्ट्रेलियाला नमवून भारतीय संघानं पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. अशातच भारतीय महिला हॉकी संघ सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार आज दुपारी 3.30 वाजता सुरु होणार आहे. 


ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून संघ केवळ दोन पावलं दूर 


भारतीय महिला हॉकी संघ ऑलिम्पिक सुवर्णपदकापासून केवळ दोन पावलं दूर आहे. दरम्यान, यापूर्वी त्यांना फायनल्स गाठण्यासाठी सेमीफायनल्समध्ये अर्जेंटीनावर मात करावी लागेल. सध्या भारतीय महिला संघानं इथपर्यंत पोहोचण्यासाठी तीन वेळचा चॅम्पियन संघ ऑस्ट्रेलियाला 1-0 अशा फरकानं पराभूत करत माघारी धाडलं आहे. 


भारतीय संघाला आक्रमक खेळी करावी लागेल 


चॅम्पियन ऑस्ट्रेलियाचा पराभव केल्यानंतर भारतीय संघ पूर्ण आत्मविश्वासानं आज सेमीफायनल्ससाठी मैदानावर उतरणार आहे. तसेच भारतीय हॉकी संघाचा माजी सदस्य आणि ऑलंपियन जगबीर सिंहचं म्हणणं आहे की, अर्जेंटीनाचे खेळाडू अनेकदा आक्रमक होत हॉकी खेळताना दिसून येतात. अशातच आपल्या खेळाडूंनाही आक्रमक खेळी करावी लागले. त्यांचं म्हणणं आहे की, सामन्या दरम्यान भारतीय संघाला अधिकाधिक पेनल्टी कॉर्नर मिळवावे लागतील. तसेच या पेनल्टी कॉर्नरवर गोलही डागावे लागतील. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.