Breaking News LIVE : माझा इम्पॅक्ट, पालघरच्या वाडामधील वादग्रस्त उप अभियंत्याची बदली
Breaking News LIVE Updates, 25 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
महापालिका निवडणुकीत एक सदस्यीय प्रभाग, महापालिका सार्वत्रिक निवडणूक बहुसदस्यीय प्रभाग पद्धती ऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार होणार, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणूक आयोगाकडून राज्यातील 18 महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचा आदेश, निवडणूक होणाऱ्या महापालिका: पुणे, पिंपरी चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, भिवंडी-निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, सोलापूर, नाशिक, मालेगाव, परभणी, नांदेड-वाघाळा, लातूर, अमरावती, अकोला, नागपूर आणि चंद्रपूर.
शिवसेना आमदार अंबादास दानवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल. क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. नारायण राणे यांच्या विरोधात आंदोलन केल्याने गुन्हा दाखल. दानवे यांच्यासह सात ते आठ ज्ञात आणि आठ ते नऊ अज्ञात लोकांच्या विरोधात क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा..
पद्मश्री पुरस्कार विजेते बनबिहारी निंबकर यांचं निधन, साताऱ्यातील फलटणमध्ये वृद्धापकाळाने 90 व्या वर्षी निधन, अॅग्रीकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून शेती क्षेत्रात निंबकर यांचं विशेष योगदान
एसइबीसी प्रवर्ग ठरवण्याचा अधिकार राज्यांना देणाऱ्या कायद्याबाबत सुप्रीम कोर्टात कॅव्हिएट दाखल करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणाची कायदेशीर लढाई लढणारे सामाजिक कार्यकर्ते विनोद पाटील यांच्याकडून सुप्रीम कोर्टात तातडीचं पाऊल उचलण्यात आलं आहे. केंद्र सरकारच्या या कृती विरोधात याचिका दाखल झाल्यास आधी आमचं म्हणणं ऐकलं जावं यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचं विनोद पाटील यांनी सांगितलं.
ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्था आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टातली अपडेट, 2011च्या जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी राज्य सरकारला मिळावी या मागणीवर केंद्रानं तीन आठवड्यात उत्तर द्यावं, सुप्रीम कोर्टाचे निर्देश
या प्रकरणातली पुढची सुनावणी आता 23 सप्टेंबरला.
वाडा मधील महावितरणच्या उप अभियंत्याने ग्राहकाला दमदाटी केल्याची बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर महावितरणच्या वरिष्ठ पातळीवरून दखल घेण्यात आली असून सदर वादग्रस्त उप अभियंत्याची बदली करण्यात आली आहे
नाशिक शहरातील शिवसेना भाजप राडा प्रकरणी दिवसभरात 130 हून अधिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. भाजप कार्यालय फोडल्या प्रकरणी शिवसेनेच्या दोन नगरसेवकांसह जवळपास 30 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या कार्यालयावर चाल करून गेल्या प्रकरणी भाजप नगरसेवक मुकेश शहाणेसह जवळपास 100 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा नाशिकच्या भद्रकाली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला आहे.
पार्श्वभूमी
आंदोलन...अटक आणि अखेर जामीन; काय घडलं काल दिवसभरात?
कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या राजकारणासाठी महत्वाचा दिवस. सोमवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांविरोधात एक आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि मंगळवारी त्यावरुन राजकीय धुरळा उडाला. त्यामध्ये नारायण राणेंच्या विरोधात आंदोलन ते त्यांना अटक आणि रात्री उशीरा त्यांना मिळालेला जामीन या फिल्मी स्टाईलने राजकीय घडामोडी घडल्या. रायगड कोर्टाकडून नारायण राणेंना जरी जामीन मिळाला असला तरी हा राजकीय धुरळा आजही खाली बसण्याची शक्यता कमी आहे.
नारायण राणे यांना महाड कोर्टाकडून जामीन मंजूर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्या केल्याप्रकरणी अटक झालेल्या नारायण राणे यांना रायगड कोर्टाकडून जामीन मंजूर झाला आहे. न्यायालयीन कोठडीची गरज नसल्याचं म्हणत न्यायालयाने हा जामीन मंजूर केला आहे. पोलिसांनी कोर्टात 7 दिवसांची कोठडीची मागणी केली होती. मात्र कोर्टाने ती नाकारली. भविष्यात असे प्रक्षोभक वक्तव्य करू नये असे लिहून देण्याची मागणीही पोलिसानी कोर्टात केली होती. नारायण राणे यांच्यावर पोलिसांनी लावलेली कलमे चुकीची आहेत. पोलीस तपासासाठी दिलेली कारणे देखील योग्य नाहीत. नारायण राणे यांना अटक करण्यापूर्वी पोलिसांनी कोणतीही लेखी नोटीस दिली नाही, असा युक्तिवाद नारायण राणे यांच्या वकीलांनी केला.
राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा; 70 वर्षात उभारलेली संपत्ती विकली जातेय
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर राष्ट्रीय मुद्रीकरण योजनेबाबत (NMP) जोरदार निशाणा साधला. केंद्र सरकारने सर्व काही विकले. केंद्र सरकारने तरुणांच्या हातातून रोजगार हिसकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या 'मित्रांना' मदत करत आहेत. कोरोना संकटातही सरकारने मदत केली नाही, अशी टीका राहुल गांधी यांनी केली. रस्ते मार्ग, रेल्वे, वीज क्षेत्र, पेट्रोलियम पाईपलाइन, दूरसंचार, गोदाम, खाणकाम, विमानतळ, पोर्ट, स्टेडियम हे सर्व कुणाकडे जात आहे? हे सर्व उभारण्यासाठी 70 वर्षे लागली. मात्र आता हे तीन किंवा चार लोकांच्या हातात दिले जात आहे, तुमचे भविष्य विकले जात आहे. तीन-चार लोकांना भेट म्हणून ही देशाची संपत्ती दिली जात आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं.
देशातील पहिली mRNA बेस्ड वॅक्सिन सुरक्षित, दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील ट्रायलसाठी DCGI ची मंजुरी
देशातील पहिली एमआरएनए आधारित कोरोना लसीवक काम करण्याऱ्या पुण्यातील बायो टेक्नोलॉजी कंपनी जेनोवा बायोफार्मास्युटिकल्स लिमिटेडला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायलसाठी मंजुरी मिळाली आहे. कंपनीने पहिल्या टप्प्यातील वॅक्सीन ट्रायल पूर्ण केले आहे. पहिल्या चाचणीचा अहवाल ड्रग कंट्रोलर स्टैंडर्ड कंट्रोल ऑर्गेनाइजेशनच्या कमिटीकडे देखील पाठवण्यात आला होता. कमिटीने पहिल्या चाचणीच्या परीक्षणात वॅक्सीन HGCO19 सुरक्षित आणि इम्युनोजेनिक असल्याचे निष्कर्ष काढले. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीला देखील परवानगी दिली आहे. HGCO19 एमआरएनए बेस्ड कोविड 19 वॅक्सीनच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी जवळपास 10-15 ठिकाणी केली आहे. तर तिसऱ्या टप्प्यातील चाचणी 22-27 जागांवर केली जाणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -