Breaking News LIVE : राज्य सरकारने सुरु केली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी, 549 कोटीपेंक्षा अधिक रकमेची औषधे खरेदी करणार

Breaking News LIVE Updates, 23 August 2021 : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 23 Aug 2021 05:06 PM
नारायण राणेंच्या वक्तव्यांनं युवा सेना आक्रमक, नारायण राणेंच्या घरांवर युवा सेना मोर्चा काढण्याची शक्यता

नारायण राणेंच्या वक्तव्यांनं युवा सेना आक्रमक, नारायण राणेंच्या घरांवर युवा सेना मोर्चा काढण्याची शक्यता, सर्व युवा सैनिकांना उद्या जुहू येथे जमण्याचे आदेश

राज्यातील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर

सन 2021 च्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी राज्यातील खुर्शीद कुतुबुद्दीन शेख, जिल्हा परिषद उच्च प्राथिमक शाळा,आसरअली,ता. सिरोंचा जि.गडचिरोली व उमेश रघुनाथ खोसे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जगदांबानगर, कडदोरा ता.उमरगा जि.उस्मानाबाद या दोन शिक्षकांची निवड केद्र शासनाने केली आहे. 

दीड कोटीच्या हरभरा आणि तूर घोटाळ्यात सहा जणांना अटक

दोन वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यात खळबळ माजवून दिलेल्या कोट्यवधींच्या हरभरा आणि तूर गहिवताल्यातील ६ आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने आज अटक केली आहे. या सहा आरोपींना बीडच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. यातील १५ पेक्षा अधिक आरोपी अजूनही फरार आहेत.

राज्य सरकारने सुरु केली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी, 549 कोटीपेंक्षा अधिक रकमेची औषधे खरेदी करणार.

राज्य सरकारने सुरु केली तिसऱ्या लाटेचा सामना करण्याची तयारी असून 549 कोटी 33 लाख 50 हजार रकमेची औषधे खरेदी करणार. ही रक्कम खर्च करण्यास सरकारने दिली मान्यता. या पैशातून आरोग्य विभाग रेमडेसिवीर, टोसीलीझुमॅब,अॅम्फोटेरिसीन, पॅरासीटेमॉल. ऑक्सीजन मास्क, ऑक्सीजन हूड, आरटीपीसीआर टेस्ट कीट, रॅपिड अंटिजेन टेस्ट कीट ट्रिपल लेयर मास्क, एन-95 मास्क, पीपीई किट, डेड बॉडी सूच अशा 25 वस्तूंची खरेदी करणार. सरकारने या संदर्भातील जीआर जारी केला  आहे. 

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांना अखेर जामीन मंजूर

लाचखोर शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर-वीर यांना अखेर जामीन मंजूर झाली आहे.  जिल्हा सत्र न्यायालयानं अटी-शर्तींवर केला जामीन मंजूर केला आहे. दर सोमवारी झनकर यांना ACB कार्यालयात हजेरी बंधनकारक आहे. 

मुश्रीफ साहेब माझ्या नादी लागू नका तुम्हाला महागात पडेल- राजू शेट्टी

राजू शेट्टी यांचे भाषण



  • सत्तेच्या तुकड्यासाठी तुम्ही कुठं कुठं जाता

  • मी शेवटपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार आहे

  • मुश्रीफ साहेब सत्तेचे लाभार्थी फक्त तुम्हीच आहात बाकीचे सतरंज्या उचलत आहेत 

  • मुश्रीफ साहेब माझ्या नादी लागू नका तुम्हाला महागात पडेल

  • एकदा भाजपला पळवून लावलं आहे तुम्हाला देखील पळवून लावलं जाईल

कल्याण : पालिकेच्या शून्य कचरा मोहिमेला कामचुकार ठेकेदारांकडून हरताळ

कल्याण डोंबिवली महापालिकेने मोठ्या गाजावाजात शून्य कचरा मोहीम राबवली खरी. मात्र कामचुकार ठेकेदारामुळे शून्य कचरा मोहिमेचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कचरा उचलण्याचे काम ज्या ठेकेदाराचे आहे त्या ठेकेदाराला पालिकेने अनेकदा नोटीस देऊनही तो जुमानत नसल्याची कबुलीच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली या कामचुकार ठेकेदारविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल असे देखील पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

देऊळगाव राजा बायपास मार्गावर परिवहन बस व ट्रकचा भीषण अपघात.

देऊळगाव राजा बायपास मार्गावर परिवहन बस व ट्रकचा भीषण अपघात.


अपघातात एक वृद्ध महिला जागीच मृत्युमुखी तर 18 प्रवासी जखमी.


जखमी प्रवाशांवर देऊळगाव राजा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू .


6 अतिगंभीर जखमी प्रवाशांना जालना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आल्याची माहिती.

महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधींसमवेत मुख्यमंत्र्यांचा संवाद

महाराष्ट्रातल्या गोविंदा पथकांच्या प्रतिनिधीसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधत आहेत.

विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक बसल्याने गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनाचा अपघात 

नागपूरच्या कोराडी परिसरातील काल रात्रीची घटना ,


विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनाची धडक बसल्याने गस्तीवर असलेल्या पोलीस वाहनाचा अपघात ,


काही वाळू तस्कर एका मोठ्या ट्रक मध्ये वाळू घेऊन चालल्याचे दिसून आल्यानंतर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला ,


मात्र वाळू तस्कर तीव्र गतीने ट्रकसह पळून गेले, पाठलाग करताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका वाहनाने पोलीस वाहनाला धडक दिली ,


त्यामुळे पोलिसांच्या वाहनांचे मोठे नुकसान होऊन दोन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहे,

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निश्चित केलेल्या योजना जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न : चंद्रकांत पाटील
नवनिर्वाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आज रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळी खालापूर जवळील पाली फाटा येथून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. यावेळी, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांचे स्वागत केले. यावेळी, जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तर, पुढील वर्षी देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असून त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अनेक योजना निश्चित केल्या आहेत, त्या जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे. तर, जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून मतांची बेरीज केली जात असल्याचे बोलले जात असल्याने लोकांचा आशीर्वाद घेणार असल्याने त्यातूनच मतांची संख्या वाढणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 
जेजुरी देवसंस्थानच्या वतीनं पूरग्रस्तांसाठी 11 लाख रुपयांची मदत
जेजुरी : महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या वतीने पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीत अकरा लाख रुपयांचा निधीचा धनादेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी भाविकांना दर्शनासाठी व जेजुरी शहरातील व्यवसाय ,व्यापार पुन्हा सुरू व्हावेत यासाठी खंडोबा मंदिर दर्शनासाठी लवकर खुले व्हावे अशी मागणी यावेळी देवसंस्थानच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली असल्याचे विश्वस्तांनी सांगितले. गेली दीड दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेजुरीचे खंडोबा मंदिर बंद असल्याने देवावर अवलंबून असणारा खुप मोठा वर्ग आज उपसमारीच्या गर्तेत सापडला आहे . जेजुरी शहराची अर्थव्यवस्था खंडोबा देवाला येणाऱ्या भाविकांच्या अनुषंगाने होणार व्यवसाय,धार्मिक विधिवर अवलंबून असून मंदिरे बंद असल्याने शहराची अर्थव्यवस्था कोलमडली आहे. तसेच राज्यातील लाखो भाविकांना कुलदैवताच्या दर्शनाची ओढ आहे, शासनाने निर्णय घेऊन जेजुरीचे खंडोबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे अशी मागणी सर्व विश्वस्त मंडळाने केली. 

 
#obcreservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी

#obcreservation : ओबीसी आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. मंत्री छगन भुजबळ दिल्ली दौऱ्यावर असून यासंदर्भात ते ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांची भेट घेणार आहेत. 

मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची मृत्यूशी झुंज अयशस्वी, सुभाष जाधव यांचा उपचारादरम्यान मृत्यू

मंत्रालयाबाहेर आत्महत्याचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शेतकरी सुभाष जाधव यांनी 20 तारखेला विष पिऊन मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकरी सुभाष जाधव यांनी मुलांच्या शिक्षणासाठी गावातला सावकार विलास साधू शिंदे आणि सुशीला सुरेश जाधव यांच्याकडून पाच लाख रुपये पाच टक्के व्याज दराने कर्ज घेतले होते, मात्र हे पैसे सावकार विलास शिंदे यांना ना दिलामुळे सुभाष जाधव यांच्या घराचा तोडफोड केली होती आणि कुटुंबासोबत मारहाण केली होती. यासंदर्भात शेतकरी सुभाष जाधव यांनी स्थानिक मंचर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. मात्र पोलिसांनी कारवाई न केल्यामुळे शेतकरी सुभाष जाधव यांनी 20 ऑगस्ट ला मंत्रालयात येऊन मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना भेटण्यासाठी प्रयत्न करत होते, मात्र मंत्रालयाबाहेर सुरक्षारक्षकांनी आत मध्ये प्रवेश न दिल्यामुळे शेतकरी सुभाष जाधवनी अशा पद्धतीचे  टोकाचं पाऊल उचलले आहे. सध्या मध्यरात्री मरिन ड्राईव्ह पोलिसांनी सुभाष जाधव यांचा मुलगा गणेश सुभाष जाधव याचा तक्रारीवरून गुन्हा नोंद करून पुण्यात मंचर पोलिसांना ट्रान्सफर केले आहेत. यासंदर्भात अधिक चौकशी पुण्यातला मंचर पोलीस करणार आहेत. 

'मोदी नामा'ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल : सामना

एकेकाळी भाजप सोबत सत्तेत असलेली शिवसेना आता रोज भाजपवर टीकेचे बाण सोडताना दिसत आहे. आज देखील सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं भाजप नेतृ्त्वावर टीका केली आहे. सामनामध्ये म्हटलं आहे की, '2024 चे लक्ष्य' वगैरे ठीक आहे, पण मोदी-शहांप्रमाणे हातचलाखीचे काही प्रयोग विरोधकांनाही करावेच लागतील. 'मोदी नामा'ची जादू उतरली आहे. त्यामुळे 2024 चा जय-पराजय हा हातचलाखीच्या खेळावरच ठरेल. त्याची तयारी, रंगीत तालीम करावी लागेल, नाहीतर जन आशीर्वादाच्या ‘जत्रा’ लोकांना गुंगीचा मंत्र देऊन पुढे निघतील असा सल्ला शिवसेनेने विरोधकांना दिला आहे. 


अग्रलेखात म्हटलं आहे की, मोदी सरकारने सध्या त्यांच्या मंत्र्यांची एक जन आशीर्वाद ‘जत्रा’ सुरू केली आहे. त्या जत्रेत फक्त विरोधकांविरोधात शिव्याशाप देण्याचेच काम सुरू आहे. या जन आशीर्वाद जत्रेतले अर्धे मंत्री हे विचार व आचाराने उपरे किंवा बाटगे आहेत. म्हणजे काल-परवा भाजपात घुसले व मंत्रीपदाची हळद लावून बोहल्यावर चढले. हे उपरे भाजपचा प्रचार करीत फिरत आहेत व वर्षानुवर्षे भाजपच्या पालख्या उचलणारे कार्यकर्ते त्या ‘जत्रे’त येड्याखुळ्यासारखे सामील झाले आहेत, अशी एक गंमत महाराष्ट्रासह देशभरात सुरू असताना विरोधी पक्षांना अधिक विचाराने पावले टाकावी लागतील, असा सल्लाही शिवसेनेनं दिला आहे. 

देशात पुढील महिन्यात कोरोनाची तिसरी लाट? नीती आयोगाकडून केंद्राला महत्त्वाचा अलर्ट

देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगानं व्यक्त केलाय. पुढच्या महिन्यात साधारण कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते, असं नीती आयोगाचं म्हणणं आहे. तिसऱ्या लाटेत दररोज चार ते पाच लाख रुग्णांची नोंद होऊ शकते, असा अंदाज नीती आयोगाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच पुढच्याच महिन्यात दोन लाख आयसीयू बेड्सची गरज भासू शकते, असंही नीती आयोगानं सांगितलं आहे. तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नीती आयोगानं यंत्रणेला काही महत्त्वाच्या शिफारशीही केल्या आहेत. 


देशात पुढच्या महिन्यातच कोरोनाचं विक्राळ रुप पाहायला मिळू शकतं, असा अंदाज नीती आयोगानं व्यक्त केला आहे. नीती आयोगानं देशात येणाऱ्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत महत्त्वाचा अलर्ट दिला आहे. आयोगानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सप्टेंबरमध्ये 4 ते 5 लाख दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद केली जाऊ शकते. प्रत्येकी 100 कोरोना रुग्णांपैकी 23 कोरोनाबाधितांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागू शकतं. याच पार्श्वभूमीवर आधापासूनच 2 लाख आयसीयू बेड्स तयार ठेवण्याच्या सूचना नीती आयोगानं केंद्र सरकारला दिल्या आहेत.

चंद्रपुरात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 जणांना अमानुष मारहाण, चंद्रपूर पोलिसांकडून 12 जणांना अटक

चंद्रपूर : चंद्रपुरात जादूटोणा करत असल्याच्या संशयातून एकाच कुटुंबातील 7 जणांना अमानुष मारहाण करण्यात आली आहे. चंद्रपूर पोलिसांकडून 12 जणांना अटक करण्यात आली आहे. जिवती तालुक्यातील वणी-खुर्द या गावात ही घटना घडली. शनिवारी दुपारी भर चौकात लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्याती करण्यात आली होती. मारहाणीत 7 जण जखमी झाले असून शांताबाई कांबळे (53), शिवराज कांबळे (74), साहेबराव हुके (48), धम्मशीला हुके (38), पंचफुला हुके (55), प्रयागबाई हुके (64), एकनाथ हुके (70) अशी मारहाण झालेल्या लोकांची नावं आहेत. पोलिसांनी 12 आरोपींना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी देखील दलित समाजातील आहेत. मारहाण झालेल्या कुटुंबावर आधीपासूनच गावातल्या लोकांचा जादूटोणा करत असल्याचा संशय होता, त्यातच मोहरमच्या सवारी दरम्यान गावातील काही महिलांच्या अंगात आलं आणि त्यांनी गावातील कांबळे आणि हुके कुटुंबातील लोकांची जादूटोणा करतात म्हणून नावं घेतली, त्यानंतर या लोकांना चौकात बोलावून मारहाण करण्यात आली आहे.

सोलापुरातील पाच तालुक्यांना आजपासून निर्बंधात शिथिलता, सर्व दुकानं दुपारी चार वाजेपर्यंत सुरु राहणार

कोरोनाचं संकट असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पाच तालुक्यांना आजपासून प्रशासनाने नियमात शिथिलता दिल्याने नागरिक आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळणार असून सर्व दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या 10 दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली होती. मात्र आजपासून प्रशासनाने या संचारबंदीत शिथिलता दिल्याने दुपारी चार पर्यंत सर्व दुकाने उघडण्यास परवानगी दिली आहे . या आदेशानुसार सर्व दुकाने आठवड्यातील पाच दिवस उघडी ठेवली जाणार असून अत्यावश्यक सेवांची दुकाने संपूर्ण सात दिवस उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. लग्नासाठी 50 जणांना तर अंत्यसंस्कारासाठी 20 जणांना परवानगी देण्यात आली असून सर्व हॉटेल आणि रेस्टारंट 50 टक्के उपस्थितीत पाच दिवस सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. सर्व खाजगी कार्यालये उघडण्यासही परवानगी दिली असून सामाजिक आणि राजकीय मेळाव्यांना 50 टक्के उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. प्रवासी वाहतूक आणि सलून स्पा यालाही आठवड्यातील पाच दिवस परवानगी दिली आहे. 

पाच वर्षांत मिळणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे स्वरूप

ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं असेल? याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. अशातच आता पुरातत्व विभागानं दिलेल्या विकास आराखड्याला मंदिर समितीनं मंजुरी देत तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे. येत्या 5 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. विठुरायाच्या बाबतीत नाही, घडविला नाही बैसविला ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. विठ्ठल मंदिर हे 11व्या शतकातील असल्याचं अभ्यासक मनात असले, तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे पंढरपुरातील मंदिर अस्तित्वात असल्याचं काही अभ्यासकांचे मत आहे . 


आता पुन्हा 700 वर्षांपूर्वीचे मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा बनविला असून पुरातत्व विभागाने गेल्या दोन वर्षांपासून याचा आराखडा बनविण्याचे काम केलं होतं. आता हे काम पूर्ण झालं असून यासाठी 61 कोटी 50 लाखांचा आराखडा मंदिर समितीकडे सोपवला होता. मंदिर समितीनं नुकत्याच झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता हा अंतिम आराखडा मंजुरीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे पाठविला आहे. या आराखड्यानुसार, विठुरायाच्या मंदिराचं काम पाच टप्प्यात केलं जाणार आहे. यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथं दगडांची झीज झाली आहे, अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केलं जाणार आहे. याशिवाय मंदिराचं आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचं काम केलं जाणार आहे. विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणलं जाणार आहे. 

पार्श्वभूमी

पाच वर्षांत मिळणार पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला 700 वर्षांपूर्वीचे स्वरूप; 61 कोटी 50 लाखांचा आराखडा राज्य शासनाकडे सादर


ज्ञानोबा तुकाराम आदी संतांच्या काळातील म्हणजे 700 वर्षांपूर्वीचं विठ्ठल मंदिर कसं असेल? याची सगळ्यांनाच उत्कंठा लागून राहिली आहे. अशातच आता पुरातत्व विभागानं दिलेल्या विकास आराखड्याला मंदिर समितीनं मंजुरी देत तो आराखडा राज्य शासनाकडे पाठवला आहे. येत्या 5 वर्षांत हे काम पूर्ण करण्याचं नियोजन आहे. विठुरायाच्या बाबतीत नाही, घडविला नाही बैसविला ही मान्यता वारकरी संप्रदायाची आहे. विठ्ठल मंदिर हे 11व्या शतकातील असल्याचं अभ्यासक मनात असले, तरी त्याहीपूर्वीपासून विठुरायाचे हे पंढरपुरातील मंदिर अस्तित्वात असल्याचं काही अभ्यासकांचे मत आहे . 


आता पुन्हा 700 वर्षांपूर्वीचे मूळ मंदिराप्रमाणे या मंदिराला रूप देण्यासाठी हा आराखडा बनविला असून पुरातत्व विभागाने गेल्या दोन वर्षांपासून याचा आराखडा बनविण्याचे काम केलं होतं. आता हे काम पूर्ण झालं असून यासाठी 61 कोटी 50 लाखांचा आराखडा मंदिर समितीकडे सोपवला होता. मंदिर समितीनं नुकत्याच झालेल्या बैठकीत या आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता हा अंतिम आराखडा मंजुरीसाठी विधी आणि न्याय विभागाकडे पाठविला आहे. या आराखड्यानुसार, विठुरायाच्या मंदिराचं काम पाच टप्प्यात केलं जाणार आहे. यात मंदिराला मूळ हेमाडपंथी रूप देण्यासाठी जिथं दगडांची झीज झाली आहे, अशा ठिकाणी रासायनिक संवर्धन केलं जाणार आहे. याशिवाय मंदिराचं आयुष्य वाढविण्यासाठी दुसऱ्या टप्प्यात मजबुतीकरणाचं काम केलं जाणार आहे. विठ्ठल मूर्तीला हानिकारक असलेले गाभाऱ्यात बसविलेले ग्रॅनाईट हटवून त्यामागील दगडी बांधकाम मूळ स्वरूपात आणलं जाणार आहे. 


नागपुरात गंगा जमुना वस्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन महिला नेत्या आमने-सामने


महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याचं गृह खातं राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलं, तरी उपराजधानी नागपुरात पोलिसांच्या एका कारवाईसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्याच दोन महिला नेत्या आमने-सामने आल्या आहेत. एका बाजूला ज्वाला धोटे गंगा जमुना वारंगणांची वस्ती खुली करण्यासाठी आंदोलन करत आहेत. तर दुसर्‍या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस आभा पांडे इतर पक्षाच्या स्थानिक नेत्यांसह गंगा जमुना वस्ती हटवण्यासाठी आंदोलन करत आहेत. काल (रविवारी) रक्षाबंधनाच्या दिवशी गंगा जमुना या वारंगणाच्या वस्तीसमोर दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर तब्बल दोन तास जबर राडा झाला. दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांच्या विरोधात आर्थिक लाभापाई आंदोलन उभारण्याचा आरोप करत हा मुद्दा फक्त गंगा जमुना वस्ती पुरता मर्यादित नाहीच, असे संकेतही दिले.


नागपूरच्या मध्यवर्ती भागांत सुमारे दहा एकर परिसरात ही वारंगणांची गंगा जमुना वस्ती विस्तारलेली आहे. उपराजधानी नागपुरात रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या वस्तीत सुमारे दोन हजार महिला आणि तरुण मुली देहविक्रीचा व्यवसाय करतात. मात्र, 10 ऑगस्ट रोजी पोलिसांनी या वस्तीत छापा घातल्यानंतर आठ अल्पवयीन मुलींकडून बळजबरीनं देहव्यापार करून घेतलं जात असल्याचं उघडकीस आलं. त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगा जमुना वस्तीत अल्पवयीन मुलींकडून बळजबरीने देहव्यापार करून घेतले जात असल्याचा ठपका ठेवत वस्ती एका वर्षासाठी सील केली. 


गंगा जमुना वस्तीत देह व्यवसायाच्या आड अनेक गुन्हेगार अमली पदार्थांचा व्यवसाय आणि गुन्हेगारी कृत्य करतात, असा ठपकाही पोलिसांनी आपल्या कारवाईच्या समर्थनार्थ ठेवला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला नेत्या आणि विदर्भ अन्याय निवारण समितीच्या अध्यक्ष ज्वाला धोटे यांनी गेल्या काही दिवसांपासून गंगा जमुना वस्ती सील करण्याच्या पोलिसांच्या कारवाई विरोधात आंदोलन सुरु केलं आहे. 15 ऑगस्ट रोजी ज्वाला धोटे यांनी वस्तीत जाऊन पोलिसांनी लावलेले सर्व बॅरिकेड्स फेकून दिले होते. अशातच काल (रविवारी) रक्षाबंधनाच्या निमित्तानं ज्वाला धोटे पुन्हा गंगा जमुना वस्तीत पोहोचल्या आणि त्यांनी वारंगणांकडून रक्षासूत्र बांधून घेत, मी तुमची रक्षा करेन, असं आश्वासन दिलं आणि पुन्हा पोलिसांनी लावलेल्या बेरिकेट्सची तोडफोड करत वस्ती खुली करण्याचा प्रयत्न केला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.