Breaking News LIVE : शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर नांदेडच्या बामणीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Breaking News LIVE Updates, 22 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Aug 2021 11:54 AM
सोलापूर जिल्ह्यातील 10 दिवस संचारबंदी असलेल्या पाच तालुक्यातील निर्बंध शिथील

सोलापूर जिल्ह्यातील 10 दिवस संचारबंदी असलेल्या पाच तालुक्यातील निर्बंध शिथील, उद्यापासून अत्यावश्यक सेवेतील दुकाने संपूर्ण आठवडा दुपारी चार वाजेपर्यंत खुली राहणार तर इतर सर्व व्यसवसाय आठवड्याचे पाच दिवस दुपारी चारपर्यंत खुले राहतील

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेतलं काल विक्रमी लसीकरण

  कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने काल पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत दिवसभरात १० लाख ९६ हजार  नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदविला आहे. एकाच दिवशी सुमारे अकरा लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या अतुलनीय कामाची दखल मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे. 


दिवसाला १० लाखापेक्षा अधिक लसीकरण केले जाऊ शकते हे आज आरोग्य विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सिद्ध केले असून याहीपेक्षा अधिक लसीकरणाची क्षमता राज्याची असल्याचे आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी सांगितले. विभागाच्यावतीने त्यासाठी अधिक प्रयत्न करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.


कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत आज सायंकाळी सातपर्यंत ५२०० लसीकरण केंद्रांच्या माध्यमातून १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांना लस देण्यात आली. रात्री उशिरापर्यंत आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता, आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी वर्तविली आहे. 


काही दिवसांपूर्वी राज्यातील  आतापर्यत दिलेल्या डोसेसची संख्या ५ कोटींवर गेली असून देशभऱात उत्तरप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्राने ही विक्रमी कामगिरी केली आहे.


काल सायंकाळी सात वाजेपर्यंत दिवसभरात १० लाख ९६ हजार ४९३ नागरिकांचे लसीकरण झाले. यापूर्वी ३ जुलै रोजी ८ लाख ११ हजार नागरिकांना लस देऊन राज्याने विक्रमी कामगिरी नोंदविली होती त्यानंतर स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला ९ लाख ६४ हजार ४६० नागरिकांना लस देऊन राज्याने आधीचा विक्रम मोडला. आजच्या सर्वोच्च संख्येने झालेल्या लसीकरणानंतर एक नवा विक्रम महाराष्ट्राच्या नावावर नोंदविल्याचे डॉ. व्यास यांनी सांगितले.

 माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या घरी रक्षाबंधन
 

रक्षाबंधनाचा सोहळा आहे देशभर साजरा होत आहे.बहीण-भावाच्या  पवित्रा नात्यांचा हा उत्सव. मोठया उत्साहात पार पडत आहे.माजी कृषी राज्यमंत्री व आमदार सदाभाऊ खोत यांच्या घरी ही रक्षाबंधन सोहळा पार पडला आहे.खोत यांच्या भगिनी रुपाली खोत यांनी आमदार सदाभाऊ खोत यांना राखी बांधून औक्षण केले आहे.वर्षभर घरापासून लांब राहणारे सदाभाऊ खोत हे ना चुकता रक्षा बंधनाच्या दिवशी हजर राहुन बहिणीच्या हक्काचा दिवस साजरा करतात.
चिपळूण महापुरातील पूरग्रस्तांना मिळणार पक्की घरे, सिद्धगिरी मठ संस्थानचा निर्णय 

चिपळूण महापुरात संपूर्ण नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना पक्की घरे बांधून देण्याचा निर्णय काडसिद्धेश्वर महाराज सिद्धगिरी मठ संस्थानने घेतला आहे. काडसिद्धेश्वर महाराज यांनी अधिकारी आणि वास्तुविशारद यांना सोबत घेऊन केली पाहणी. आर्थिक दृष्ट्या दुर्बल असणाऱ्या आणि घरांचे संपूर्ण नुकसान झालेल्या पूरग्रस्त कुटुंबाना श्री क्षेत्र कणेरी मठ कोल्हापूर संस्थान आणि लुपिन फौंडेशन सिंधुदुर्ग यांच्यावतीने पूरग्रस्त कुटुंबांना पक्की घरे बांधून देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.


 

शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

नांदेड:शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर शासकीय इतमामात त्यांच्या जन्मगावी बामणी या ठिकाणी अंत्यसंस्कार.



शहीद असिस्टंट कमांडन्ट सुधाकर शिंदे यांना अखेरचा निरोप व अभिवादन करण्यासाठी पालकमंत्री अशोक चव्हाण,आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी विपीन इटनकर, पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे सह परिसरातील नागरिकांची गर्दी.

शहीद सुधाकर शिंदे यांच्यावर थोड्याच वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

छत्तीसगड येथील नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या नांदेड जिल्ह्यातील बामणी येथील रहिवासी असिस्टंट कमांडर सुधाकर शिंदे यांच्यावर आज त्यांच्या मूळ गावी मुखेड तालुक्यातील बामणी येथे शासकीय इतमामात थोड्याच वेळात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. याठिकाणी जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण तसेच जिल्हाधिकारी विपीन इटनकर हे शहीद सुधाकर शिंदे यांना श्रद्धांजली अर्पण व अंत्यसंस्कारासाठी उपस्थित आहेत.

आमदार नीलेश लंके यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट

आमदार नीलेश लंके यांनी अण्णा हजारे यांची भेट घेतली आणि पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांच्या ऑडिओ क्लिपच्या अनुषंगाने चर्चा केली. असे भ्रष्ट अधिकारी तालुक्यात नकोत, वेळ पडली तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलेन असं अण्णा हजारे यांनी सांगितलं.

पूर्ववैमनस्यातून अक्कलकोट येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून खून

पूर्ववैमनस्यातून अक्कलकोट येथे एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आलाय. शनिवारी सकाळी अक्कलकोट येथील बासलेगाव रोडवर हा धक्कादायक प्रकार घडलाय. तर पोलिसांनी या प्रकरणात दोघा संशयितांना अटक देखील केलीय. अक्कलकोट येथील भीमनगर परिसरात राहणाऱ्या महेश सुरेश मडीखांबे 35 वर्षीय व्यक्तीची हत्या झाली आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस दलाचे अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात या संदर्भात गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणात संशयित आरोपी म्हणून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दिलीप मडिखांबे, यल्लपा मडीखांबे असे अटक झालेल्या दोघा संशयितांची नावे आहेत. सहायक पोलिस निरीक्षक देवेंद्र राठोड हे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

लोणार सरोवर परिसरात आढळलं दुर्मिळ इजिप्शियन गिधाड

बुलढाण्यातील लोणार सरोवराच्या जवळच असलेला आडवा माळ या परिसरात अति दुर्मिळ जातीचं गिधाड (Egyptian vulture) आढळलं आहे.
गिधाडे संकटग्रस्त प्रजातींच्या यादीमध्ये आहे, लोणार परिसरात अतिशय दुर्मिळ जातीचं गिधाड आढळून आल्यानं पक्षी प्रेमींना आनंद झालाय. गेल्या 5 वर्षांपासून पक्षीप्रेमींकडून टीमने असा पक्षी दिसल्यास माहिती द्यावी असे आवाहनही करण्यात येत होतं. जेणेकरून त्याच्या अधिवासाची माहिती BNHS व वनविभागास देता येईल व संबंधितांना संवर्धनासाठी आवश्यक पाऊले उचलता येतील.

पार्श्वभूमी

रक्षाबंधन, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण; जाणून घ्या राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त
श्रावण महिन्याचे वेध लागतात आणि श्रावण महिना सुरु झाला की, नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनाचे वेध लागतात. देशभरात रक्षाबंधनाचा सण आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. बाजारात रंगीबेरंगी आणि मोहक राख्यांची आवक आहे. त्यामुळे आजच्या दिवशी काय काय करायचे, यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे, याचं प्लानिंग करायला सुरुवात झाली आहे. परंतु, आजच्या रक्षाबंधनावर कोरोनाचे सावट आहे.


रक्षा बंधन म्हणजे, राखी पौर्णिमा. हा सण म्हणजे, बहिण-भावाच्या अतुट नात्याचा सण. बहीण आपल्या भावाच्या दिर्घायुष्यासाठी भावाच्या हातावर राखी बांधते. तसेच आयुष्यभर आपलं रक्षण करावं, असं वचन बहिण भावाकडून घेते. दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी रक्षाबंधनाचा सण साजरा केला जातो. यंदा पौर्णिमा 21 ऑगस्टच्या संध्याकाळपासून सुरु होणार आहे. तर 22 ऑगस्ट रोजी सूर्योदयापर्यंत पौर्णिमा असणार आहे. त्यामुळे 22 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन साजरा करण्यात येत आहे. 


राज्यात काल 4,575 नव्या कोरोनाबाधितांची नोंद तर पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली
 राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ  लागली आहे. आज 4,575 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 914 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 27 हजार 219 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.99टक्के आहे. 


राज्यात आज 145 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 33 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  53 हजार 967 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  जळगाव (42), नंदूरबार (0),  धुळे (8), परभणी (16), हिंगोली (77),   नांदेड (41), अमरावती (93), अकोला (17), वाशिम (5),  बुलढाणा (42), यवतमाळ (11), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (3),  गडचिरोली (21) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 558 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


एकनाथ शिंदे शिवसेनेला कंटाळलेत, लवकरच त्यांना आमच्यात घेऊ : नारायण राणे
 एकनाथ शिंदे हे फक्त सही पुरतेच मंत्री राहिले असून आता ते शिवसेनमध्ये कंटाळले आहेत. त्यांना आम्ही आमच्यात घेऊ, असा गौप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला आहे. नारायण राणे यांची जन आशीर्वाद यात्रा आज वसई-विरार भागात आहे.आज नालासोपारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. एकनाथ शिंदे मंत्री असले तरी सही पुरते आहेत. 'मातोश्री'शिवाय ते एकही सही करू शकत नाहीत. ते कंटाळले आहेत. आमच्याकडे आले तर घेऊ, असं सांगतानाच आम्ही मनात आणले तर लवकरच सरकारचे विसर्जन करू, असा दावा राणेंनी या वेळी  केला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.