Breaking News LIVE : सुरेश पिंगळे यांचा मृत्यू होऊन जवळपास अडीच तासांहुन अधिक कालावधी झाला तरी मृतदेह अजून रुग्णालयातचं

Breaking News LIVE Updates, 19 August 2021 : देश-विदेशातील महत्त्वाचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Aug 2021 09:15 PM
काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार सहभागी

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीला उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होणार सहभागी, ज्या राज्यात काँग्रेसची सत्ता आहे त्या राज्यातील मुख्यमंत्री होणार सहभागी, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार बैठक, शेतकरी कायदे, केंद्र आणि राज्यातील समन्वय, राज्यातील प्रश्न यावर होणार चर्चा

औरंगाबाद : उद्योजकाला धमकावून एक लाखाची खंडणी उकळणाऱ्यांना अटक

औरंगाबाद : उद्योजकाला धमकावून एक लाखाची खंडणी उकळणाऱ्यांना अटक, दौलताबाद पोलिसांची कारवाई, झेब्रा फॅब्रिकेशन कंपनीच्या मालकाकडून धमकावून मागितली होती एक लाखाची खंडणी, शहानुर शेख हसन, शेख इम्तियाज शेख कदीर उर्फ इम्रान याला केले अटक

मोक्का लावलेल्या पुण्यातील उद्योजक गायकवाड कुटुंबियांची अडचणीत आणखी भर पडणार

मोक्का लावलेल्या पुण्यातील उद्योजक गायकवाड कुटुंबियांची अडचणीत आणखी भर पडणार आहे. पिंपरी चिंचवड पोलीस त्यांना ताब्यात घेणार आहे. सध्या गायकवाड कुटुंबीय हे पुणे पोलिसांच्या अटकेत आहेत. त्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून ही कारवाई केली जाईल. अशी माहिती पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलीये.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस पुणे दौऱ्यावर

मनसे अध्यक्ष राज ठाकरे शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस पुणे दौऱ्यावर असणार आहेत. त्यासाठी राज ठाकरे आज संध्याकाळीच पुण्यात दाखल होतायत.  शुक्रवारी सकाळी दहा वाजता राज ठाकरे पुण्यातील मनसे कार्यालयात पदाधिकार्यांसोबत बैठक घेणार आहेत.  या बैठकीत मनसेच्या पुण्यातील शाखा अध्यक्षांच्या नावांबद्दल चर्चा होणार आहे.  पदाधिकार्यांसोबतच्या या बैठकीत राज ठाकरे पुणे शहरातील शाखा अध्यक्षांची नावे निश्चित करणार आहेत.

व्हायरल व्हिडियो प्रकरणी भाजप आमदारांची पोलीस ठाण्यात धाव

कल्याणात सध्या चर्चा आहे ती एक व्हायरल व्हिडिओची. या व्हिडिओमध्ये एक तरुण आमदार गणपत गायकवाड हे ईव्हीएम हॅक करून निवडून आल्याचा दावा करतोय. हा व्हिडिओ एक स्टिंग असल्याचा दावा केलाय. धक्कादायक बाब म्हणजे या स्टिंगमध्ये दिसणारा तरुण हा आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची 40 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. मे महिन्यातील हा व्हिडियो आहे. याबाबत आमदार गायकवाड यांनी आरोपांचे खंडन करत या व्हिडिओत दावा करणाऱ्या आशिष चौधरी विरोधात माझ्या मुलाची 40 लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असून त्याला अटक करण्यात आलीय. मला बदनाम करण्याचं हे षड्यंत्र असून या व्हिडिओची सत्यता तपासून दोषींवर कठोर कारवाई करा, अशी मागणी केलीये.

ईडीसंदर्भात दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली : अनिल देशमुख

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक पत्र जारी करून म्हटले आहे की ईडीसंदर्भात दाखल केलेली त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली आहे. लवकरच त्यावर सुनावणी सुरू होईल आणि जेव्हा ही न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होईल तेव्हा ते स्वतः ईडीसमोर हजर असतील. पत्रात देशमुख यांनी लिहिले आहे की ते त्यांच्या राजकीय आणि सामाजिक आयुष्यात उच्च आदर्शांचे पालन करत आहेत.

तुळजापूरचा मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण, देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना अटक

तुळजापूरचा मंकावती तिर्थकुंड हडप प्रकरण, देवानंद रोचकरी व त्यांचे बंधू बाळासाहेब रोचकरी यांना अटक, तुळजापूर तालुका न्यायालयाने 5 दिवसांची म्हणजे 23 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली 

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस; कोकण, मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

पुढील दोन दिवस महाराष्ट्रात सर्वदूर पाऊस अपेक्षित आहे. कोकण, मध्य महाराष्ट्रात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात देखील सर्वत्र पाऊस अपेक्षित असून काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त, विदर्भातील सर्व जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. नाशिक, पालघरसाठी ऑरेंज अलर्ट, तर ठाणे, मुंबई, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह तिघांना लाच प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती अध्यक्ष नितीन लांडगे यांच्यासह तिघांना लाच प्रकरणी पुणे सत्र न्यायालयाकडून दोन दिवसांची पोलीस कोठडी

न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी

न्यायमूर्ती विद्यासागर मुरलीधर कानडे यांचा आज सकाळी राजभवन येथे राज्याचे लोकायुक्त म्हणून शपथविधी झाला. यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी त्यांना पदाची शपथ दिली.
यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते.

जनआशीर्वाद यात्रेत केंद्रीय राज्यमंत्र्यांची "उठ-बस", झाडांमुळे रथावरच खाली बसण्याची वेळ

बदलापूर शहरात अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या वाढून रस्त्यावर आल्या आहेत. याचाच फटका केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनाही बसला. कपिल पाटील यांच्यासह आमदार किसन कथोरे आणि अन्य स्थानिक नेते हे रथावर उभे असताना अचानक झाडांच्या फांद्या अंगावर येऊ लागल्या. त्यामुळे कपिल पाटील, किसन कथोरे यांना अनेकदा "उठ-बस" करावी लागली. दुरूनच झाड दिसलं, की कपिल पाटील रथातच खाली बसायचे अन् झाड गेलं की पुन्हा उभे राहायचे. एका केंद्रीय राज्यमंत्र्यांसोबत घडत असलेला हा प्रकार पाहून बदलापूर पालिकेच्या कार्यकुशलतेची पोचपावती थेट मंत्र्यांनाच मिळाली, अशी कुजबुज यानंतर शहरात सुरु होती. बदलापूर पालिकेनं पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या खरोखरच छाटल्या होत्या का? असा प्रश्न यानंतर विचारला जातोय.

अवैध दारू विक्री विरोधात महिलांचा पोलीस स्थानकात ठिय्या

बुलढाणा : जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीसांच्या आशीर्वादाने विझोरा गावात आणि परिसरात अवैध दारू विक्री सुरु असल्यानं दारुड्यांचा महिलांना त्रास होत असल्यानं जवळपास 300 महिलांनी किनगाव राजा पोलीस स्थानक गाठून अवैध दारू विक्री बंद व्हावी म्हणून पोलीस स्थानकात दारूच्या रिकाम्या बाटल्या, रिकामे केन घेऊन ठिय्या आंदोलन सुरु केलंय. या परिसरात जवळपास 30 ते 40 अवैध दारूचे अड्डे असल्याने परिसरातील महिलांना दारुड्यांचा मोठा त्रास वाढलाय. त्यामुळे लवकरात लवकर या परिसरातील अवैध दारू विक्री अड्डे बंद करावेत, अशी मागणी या परिसरातील महिलांची आहे. काल दुपारपासून रात्री उशिरापर्यंत महिलांचं आंदोलन सुरु होत आहे.

आज आणि उद्या मुंबईत लसीकरण बंद

देशात कोरोनाच्या (Corona) तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. अशातच देशभरात तिसऱ्या लाटेला थोपवण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाविरोधातील अस्त्र म्हणून सध्या लसीकरणाकडे पाहिलं जात आहे. देशभरात लसीकरण मोहीमेनं वेगही धरला आहे. पण, अनेक ठिकाणी पुरेशा लससाठ्याअभावी लसीकरण मोहीमेत अडथळे येत आहेत. देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईतही पुरेशा साठ्याअभावी लसीकरण बंद ठेवण्याची नामुष्की ओढवली आहे. आज (गुरुवार) दिनांक 19 ऑगस्ट, 2021 आणि उद्या (शुक्रवार) दिनांक, 20 ऑगस्ट, 2021 रोजी पुरेशा लससाठ्या अभावी मुंबईतील लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे. 

नारायण राणेंना डिवचण्याची खेळी की धसका?

सध्या राज्यातील चार केंद्रीय मंत्री जनआशीर्वाद यात्र काढत आहेत. पण, या सर्वांमध्ये चर्चेत आणि केंद्र स्थानी असलेली यात्रा म्हणजे नारायण राणे यांची. नारायण राणे थेट शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात अर्थात कोकणात जोरदार शक्तीप्रदर्शन करणार आहेत. त्यामुळे देखील या यात्रेकडे एका विशेष अर्थानं पाहिलं जात आहे. त्यात आगामी मुंबई पालिका निवडणुकीची जबाबदारी नारायण राणेंना दिल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे. या साऱ्या गोष्टी पाहता नारायण राणे यांच्या यात्रेकडे सर्वांचं विशेष लक्ष आहे. नारायण राणे 23 आणि 24 ऑगस्ट रोजी रत्नागिरी जिल्ह्यात आहेत. यावेळी ते चिपळूण येथे देखील भेट देणार आहेत. त्यांच्या या दौऱ्याआधी रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या निर्णयानं एका वेगळ्याच राजकीय चर्चेला सुरूवात झाली आहे. 24 ऑगस्ट रोजी राज्याचे परिवहन मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन केले आहे. नेमके त्याच दिवशी नारायण राणे रत्नागिरी शहरात असणार आहेत. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्यात एकही अधिकारी हजर राहणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतल्याची चर्चा आता सुरु झाली आहे. सध्या मिळत असलेल्या माहितीनुसार, 23 ऑगस्ट रोजी राणे चिपळूण येथे आहेत. त्यानंतर 24 ऑगस्ट रोजी नारायण राणे संगमेश्वर असा दौरा करत रत्नागिरी येथे दाखल होतील. पण, त्याच दिवशी जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. दरम्यान, यानंतर आता नारायण राणे यांना डिवचण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून होत आहे का? तसेच शिवसेनेनं नारायण राणे यांच्या दौऱ्याचा धसका तर घेतला नाही ना? अशी चर्चा देखील आता सुरु झाली आहे. 

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द, पालघर जिल्हा मुख्यालय इमारतींचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा पालघर दौरा रद्द, पालघर जिल्हा मुख्यालय इमारतींचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य प्रणालीद्वारे , वातावरण खराब असल्यानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवारांचा पालघर दौरा रद्द झाल्याची माहिती

अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना राज्य सरकारचा दिलासा, जिल्हा सहकारी बँकांतून 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा

राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी राखत जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत काल (बुधवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत हा  निर्णय घेण्यात आला आहे. 

पार्श्वभूमी

अतिवृष्टीसह पूरबाधित व्यावसायिकांना राज्य सरकारचा दिलासा, जिल्हा सहकारी बँकांतून 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा


राज्यातील पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधित व्यापारी, टपरीधारक, व्यावसायिकांना दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे. अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी राखत जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत काल (बुधवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत हा  निर्णय घेण्यात आला आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी आहे की, राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि  सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला असून ना नफा तत्वावर अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. दरम्यान या निर्णयाचा फायदा राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना होणार असून त्यांना केवळ 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे.  


Anil Deshmukh : अनिल देशमुखांना कोणताही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार


राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोणताही दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. अनिल देशमुखांविरोधात सीबीआयनं दाखल केलेला गुन्हा रद्द न करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा योग्यच असल्याचं स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयानं अनिल देशमुखांनी या निकालाला आव्हान देत हायकोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळून लावली. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम.आर. शहा यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. भ्रष्टाचाराच्या आरोपांची प्राथमिक चौकशी करत सीबीआयनं दाखल केलेला एफआयआर हा निव्वळ राजकीय सूडबुद्धीनं दाखल केल्याचा आरोप करत देशमुखांनी ही याचिका दाखल केली होती. ही याचिका फेटाळल्यानंतर आता याप्रकरणी निमूटपणे सीबीआय चौकशीला सामोरं जाण्याशिवाय अनिल देशमुखांपुढे पर्याय शिल्लक नाही. या प्रकरणात अटकेची टांगती तलवार दूर करण्यासाठी सीआरपीसीनुसार इतर आरोपींप्रमाणे रितसर अटकपूर्व जामीनसाठी अर्ज करण्याचाच पर्याय त्यांच्याकडे शिल्लक राहतो.


मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लिहिलेल्या पत्रात राज्याचे तात्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटींची वसूली मुंबईतील रेस्टॉरंट आणि बार मालकांकडनं करण्याचे निर्देश दिल्याचा थेट आरोप केला होता. या पत्रावरून अॅड. डॉ. जयश्री पाटील यांनी मलबार हिल पोलीस स्थानकांत रितसर तक्रार दाखल केली होती. मात्र, मुंबई पोलिसांनी या तक्रारीला केराची टोपली दाखवल्यानं पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. ज्याची दखल घेत हायकोर्टानं हे प्रकरण सीबीआयकडे तपासासाठी वर्ग केलंय. आणि आता सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सीबीआयचा याप्रकरणात चौकशीची गती वाढवत पुढील कारवाई करण्याचा मार्ग पूर्णपणे मोकळा झालाय.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.