Breaking News LIVE : लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीरला न्यायालयीन कोठडी
Breaking News LIVE Updates, 17 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
परभणी- येलदरी,सिद्धेश्वर प्रकल्प परिसरात मुसळधार पाऊस, पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी साठ्यात वाढ, येलदरी 75.36 टक्के तर सिद्धेश्वर 85.78 टक्के भरले, असाच पाऊस सुरू राहिल्यास प्रकल्पातून होणार पाण्याचा विसर्ग वाढणार, पुर्णा पाटबंधारे विभागाकडून पुर्णा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
हैदराबाद मुक्ती संग्राम लढ्यातील सक्रिय स्वातंत्र्यसेनानी तथा आखाडा बाळापूर येथील ज्येष्ठ नागरिक नागाबाई किशनराव पंडित यांचे वृद्धापकाळाने आज सकाळी निधन झाले.मृत्यू समयी त्या 95 वर्षाच्या होत्या.हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील त्यांच्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी आखाडा बाळापूर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात मुलगा,नातू पणतू असा मोठा परिवार आहे..नागाबाई पंडित या हैद्राबाद मुक्ती संग्राम लढ्यात सक्रिय होत्या त्यामुळे त्यांच्या अंत्यसंस्काराला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीरला न्यायालयीन कोठडी. 8 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी 4 दिवस पोलीस कोठडी होती. जामिनासाठी डॉ. वैशाली वीरचा अर्ज दाखल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांत मोहरम मिरवणूक आयोजित करण्यास हायकोर्टाची याचिकाकर्त्यांना सर्शत परवानगी. लसीकरण पूर्ण झालेल्या भक्तांनाच 'ताजिया' मिरवणुकीत सामील होण्याची परवानगी. सात ट्रक मधून प्रतिकात्मक शोक मिरवणूक काढण्यास परवानगी, एका ट्रकवर 15 जणांना मुभा. दक्षिण मुंबईत डोंगरी ते माझगाव कबरीस्तान दरम्यान मिरवणुकीची परवानगी. मिरवणुकीच्या शेवटी केवळ 25 जणांनाच कबरीस्तानात जाण्याची परवानगी.
महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टीज असोसिएशनकडून राज्य सरकारच्या शाळांची 15 टक्के फी कपात करण्याच्या शासन निर्णया विरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल. राज्य शासनाने मागील आठवड्यात राज्यातील शाळांची 2021-22 मध्ये 15 टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यानंतर राज्यातील संस्थाचालकांनी या शासन निर्णयाला विरोध दर्शवला होता. त्यामुळे आता संस्थाचालक संघटना या शासन निर्णया विरोधात याचिका दाखल केली आहे.
पुढील 3 तास विदर्भातील अनेक जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा. विजांच्या कडकडाटासह अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, वर्धा, वाशिम, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, आणि गोंदिया जिल्ह्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने महाराष्ट्रात पाऊस पुन्हा सक्रीय.
नाशिक पुणे मार्गावरील शिंदे टोल नाक्यावर तृतीयपंथीयांचा राडा. पैसे न दिल्याने प्रवाशांना मारहाण. प्रवासी आणि तृतीयपंथी यांच्यात तुंबळ हाणामारी. हाणामारीत दोन प्रवासी जखमी. टोल नाका कर्मचाऱ्यांची मात्र बघ्याची भूमिका.
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी.एस. कुलकर्णी यांना हायकोर्टानं जामीन देण्यास पुन्हा एकदा नकार दिलाय. मात्र, त्यांच्या पत्नी हेमंती यांना मात्र हायकोर्टानं दिलासा देत त्यांचा जामीन मंजूर केलाय. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांनी राखून ठेवलेला निकाल मंगळवारी जाहीर केला. डीएसके हे आता जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची शरद पवार यांच्यावर टीका. शरद पवार यांना जनजागृती यात्रा काढण्याची नामुष्की ओढावल्याची टीका. जनजागृती यात्रेला जन-आशीर्वाद यात्रेची बरोबरी करता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत काढण्यात येणार जनजागृती यात्रा. ओबीसी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत जनजागृती यात्रा काढण्यात येणार...
वर्ध्यात पावसाला सुरुवात, जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास बरसल्या पाऊसधारा, अर्ध्या तासापासून शहर तसच परिसरात पावसाच्या सरी, पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा
शरद पवार हे मोठे व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल आपण काय टीका करणार. ते आपल्या देशाचे माननीय व्यक्ती आहेत. ते काही बोलले तर आपण त्यांच्यावर टीका करायला हवी का? असं राज्यपाल भगतसिहं कोश्यारी म्हणाले. सिंहगड किल्ल्याचा अनुभव चांगला होता, प्रत्येकाने तिथं जायला हवं असंही ते म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये सिमबायोसिस महाविद्यालयाला त्यांनी भेट दिली, त्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.
मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी आज जाहिर केली जाणार आहे. प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रियेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 3 लाख 35 हजार 256 विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाईन नावनोंदणी केली आहे. या प्रक्रियेत विविध अभ्यासक्रमांसाठी 5 लाख 38 हजार 956 एवढे अर्ज केले आहेत.
प्रवेशपूर्व नोंदणीच्या वेळापत्रकानुसार आज ( 17 ऑगस्ट 2021 रोजी सकाळी 11 वाजता) सलंग्नीत महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षण संस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता प्रसिद्ध होणार आहे. कागदपत्रे पडताळणी आणि शुल्क भरण्याची प्रक्रिया ही 18 ते 25 ऑगस्ट 2021 पर्यंत राहणार आहे. दुसरी आणि तिसरी गुणवत्ता यादी ही वेळापत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे असेल.
केवळ एक वर्ग खोलीची शाळा बनविण्यासाठी जिल्हा परिषदेने मान्यता दिली असताना शाळेतील शिक्षकाने पुढाकार घेत लोकवर्गणीतून सुंदर सुबक एक मजली शाळा उभारली. तसेच शाळेत विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्यासाठी संपूर्ण वर्ग खोल्यांच्या भिंतीं वर सुंदर चित्र रेखाटली असून या इमारतीचा उदघाटन सोहळा नुकताच पार पडला .
कोल्हापूर : सासरी नांदायला नकार देणाऱ्या मुलीला बापानेच नदीत ढकललं असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड पोलिसांनी मुलीच्या वडिलाला ताब्यात घेतलं आहे. मुलीचा मृतदेह दूधगंगा नदी पात्रात आढळून आला. चार दिवसांपूर्वी वडिलांनीच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार कुरुंदवाड पोलिसांत दिली होती. साक्षी काटकर 17 वार्षिय विवाहितीचे नाव आहे. वडील दशरथ काटकर यांनी साक्षी हिचा अल्पवयीन असताना विवाह लावून दिल्याचेही पोलिसांना संशय.
ऑगस्टपासून दोन डोस घेऊन 14 दिवस झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाचे मुभा देण्यात आली. या नागरिकांना रेल्वेकडून प्रवासासाठी पास दिला जातोय. सर्वात जास्त पास हे डोंबिवली रेल्वे स्थानकात वितरित झाले होते .15 ,16 ऑगस्ट या दोन्ही दिवशी सुट्टी असल्याने डोंबिवली रेल्वे स्थानकावर थोड्याफार प्रमाणात गर्दी होती .त्यानंतर आज सकाळीच डोंबिवली स्टेशन पुन्हा एकदा प्रवाशांनी भरून गेलेला पाहायला मिळालं.
केंद्रीय मंत्री कपिल पाटील साहेब यांची जन आशीर्वाद यात्रा आज सकाळी अलिबाग येथून सुरु होत आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण भाऊ दरेकर ,माजी पालकमंत्री रवींद्र, चव्हाण, आमदार प्रशांत ठाकुर, आमदार निरंजन डावखरे, आमदार केळकरकर, आमदार महेश बालदी, आमदार रवीशेठ पाटील, आमदार रमेश पाटील, ज्येष्ठ नेते माजी मंत्री गणेश नाईक, आमदार नितेश राणे उपस्थित राहणार आहेत
पार्श्वभूमी
लॉर्ड्सवर भारताचा इंग्लंडविरुद्ध 151 धावांनी विजय; मोहम्मद शमी, केएल राहुलची निर्णायक खेळी
लॉर्ड्सवरील दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडवर 151 धावांनी मात केली आहे. मोहम्मद शमी, केएल राहुलची यांची खेळी निर्णायक ठरली.
मराठा-ओबीसी आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्विकारणार नाही : पंकजा मुंडे
मराठा आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणावरून, भाजप नेत्या पंकजा मुंडे या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी जाहीर भाषणामधून जोपर्यंत मराठा आणि ओबीसी समाजाच्या, आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागत नाही. तोपर्यंत हारतुरे आणि फेटा स्वीकारणार नाही. असा आक्रमक पवित्रा त्यांनी घेतला. बीडमध्ये आयोजित एका अभिनव कार्यशाळेत त्या बोलत होत्या.
पंकजा मुंडे बोलताना म्हणाल्या की, "मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत बीड जिल्ह्यानं नवा आदर्श घालून दिला पाहिजे. मी सांगते आजपासून कोणीही मला हार घालणार नाही. मी मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय मार्गी लागत नाही, तोपर्यंत हारतुरे स्विकारणार नाही. त्यासोबतच ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही. तोपर्यंत फेटा बांधनार नाही. समाज बंधावांनी मराठा-ओबीसी वाद लावणारांपासून सावधान होणं गरजेचं आहे. तसेच छत्रपती शिवरायांचा सामाजिक अभिसरणाचा आदर्श घेण्याची गरज आहे." आज बीड शहरामध्ये जिल्ह्यातील राजपुर बूथ कार्यकर्त्यांनी यांचे वर्कशॉप आयोजित करण्यात आलं होतं, या ठिकाणी पंकजा मुंडे बोलत होत्या.
केंद्र सरकारने केलेली घटनादुरुस्ती म्हणजे OBC समाजाची फसवणूक : शरद पवार
केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी राज्याचे अधिकार काढून घेतले होते. आता संसदेत घटनादुरुस्ती करुन राज्यांना ओबीसीसंबंधी यादी तयार करण्याचा अधिकार दिला. त्यामुळे अनेकांचा असा समज झाला की केंद्राने महत्त्वाचे पाऊल टाकले मात्र ही केंद्राने शुद्ध फसवणूक केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत केला.
शरद पवार म्हणाले, 1992 साली नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाने इंद्रा साहनी विरुद्ध भारत सरकार या खटल्यात आरक्षणासंबंधी महत्त्वाचा निकाल दिला. 50 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा अधिक आरक्षण देता येणार नाही असा निर्णय दिला. मध्यंतरी आणखी एक दुरुस्ती करुन त्यात 10 टक्के वाढ करण्याची तरतूद घटनेत दुरुस्ती करुन दिली. राज्य सरकारने यादी तयार करुन ओबीसींना आरक्षण देऊ शकता असे सांगितले. पण प्रत्यक्षात याचा काही उपयोग होणार नाही. आज देशात जवळपास 90 टक्के राज्यात 50 टक्क्यांहून अधिक आरक्षण आहे. त्यामुळे राज्यांना अधिकार दिले. यात तथ्य नाही. केंद्र सरकारने संबंध ओबीसी वर्गाची फसवणूक केली आहे. हे लोकांसमोर आणणे ही आमची जबाबदारी आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -