Breaking News LIVE : रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याचा निर्णय रद्द
Breaking News LIVE Updates, 14 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.
रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याचा निर्णय रद्द. काल सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून पत्रकारीतेचा कोर्स हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र, फक्त स्थगितीवर समाधानी न राहता माजी विद्यार्थ्यांकडून हा निर्णय रद्द करण्याची मागणी होत होती. आज विद्यापीठाचे कुलगुरू, कुलसचिव यांची उदय सामंत यांच्यासोबत बैठक झाल्यानंतर विद्यापीठाकडून हा निर्णय रद्द करण्यात आलाय.
पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटला राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत थोड्या वेळात भेट देतायत. रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारीतेचा पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कम्युनिकेशन एन्ड मिडीया स्टडीज या डिपार्टमेन्टमधे समाविष्ट करण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला ओता. मात्र, या निर्णयाला रानडे इन्स्टिट्यूटच्या माजी विद्यार्थ्यांकडून आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाकडून विरोध करण्यात आला. त्यानंतर विद्यापीठाकडून रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारितेचा कोर्स हलवण्याच्या निर्णयाला काल स्थगिती देण्यात आली. मात्र, या वादाची दखल घेत उदय सामंत रानडे इन्स्टिट्यूटला भेट देतायत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर नितीन कळमळकर, कुलसचिव प्रफुल्ल पवार हे रानडे इन्स्टिट्यूटमधे उपस्थित असुन त्यांच्याशी बैठक झाल्यानंतर उदय सामंत पत्रकार परिषद घेणार आहेत.
गजानन काळे यांच्या पत्नी संजीवनी काळे यांचे गंभीर आरोप. 3 दिवस उलटूनही गजानन काळेला अटक करण्यासाठी पोलिसांची टाळाटाळ. पोलिसांमार्फत सेटलमेंट करण्यासाठी दबाव. गजानन काळे यांनी मनपाच्या आरोग्य व वाहन विभागात केलाय भ्रष्टाचार. मनपामध्ये भरती करून प्रत्येक कामगारामागे घेतले अडीच लाख. पालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमताने केला भ्रष्टाचार. भ्रष्टाचाराच्या माध्यमातून जमवलेल्या करोडोंच्या संपत्तीची चौकशी करा. तक्रार मागे घेण्यासाठी पत्रकारांकडून केली जात आहे मध्यस्थी.
पुलवामाच्या घटनेत पाकिस्तानने आमच्या देशाच्या अनेक सैनिकांना शहीद केले. अनेक बहिणींच्या कपाळावरचे कुंकू पुसले. त्याच पाकिस्तानच्या लोकांना वाचवण्यासाठी नरेंद्र मोदींनी भारतीयांची लस फुकट दिल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. एवढेच नाही तर थेट न बोलता अप्रत्यक्ष शब्दातच पटोले यांनी मोदींच्या या वॅक्सीन डिप्लोमॅसीचा संबंध पुलवामा दशतवादी हल्ल्याशी जोडून मोदींनी पाकिस्तानला तेव्हा मोफत लस देऊन जणू त्यांचे कर्ज फेडले असे आरोपही केले.
लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली वीरच्या पोलीस कोठडीत वाढ. आणखी दोन दिवस पोलीस कोठडीची हवा खावी लागणार. वीर यांनी किती बेहिशेबी मालमत्ता गोळा केलीय. बँकेच्या लोकर्समध्ये काय आहे? या याबाबतचा तपास करण्यासाठी मुदतवाढ देण्याची सरकारी पक्षाची मागणी मान्य. अन्य दोघा संशयिताच्या जामीन अर्जावरील निर्णय सोमवारपर्यंत राखीव ठेवण्यात आला आहे. वैशाली वीरसह इतर दोघांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
राजहंस प्रकाशनाचे औरंगाबाद प्रतिनिधी ग्रंथप्रेमी श्याम देशपांडे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी हृदय विकाराच्या धक्क्याने मध्यरात्री निधन झाले. गेली 25 वर्षे राजहंस प्रकाशनाच्या मराठवाडा विभागाचे प्रतिनिधी म्हणून औरंगाबाद येथे ते कार्यरत होते. मराठवाडा साहित्य परिषदेवर कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावरही ते प्रतिनिधी म्हणून राहिले होते.
दैनिक पुढारीसाठी औरंगाबाद प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले. बर्याच वृत्तपत्र, नियतकालीने, मासिके, साप्ताहिकांसाठी त्यांनी मुक्त पत्रकार म्हणून कामगिरी बजावली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांचे वार्तांकन सातत्याने केले. मराठवाड्यातील साहित्य चळवळ, ग्रंथालय चळवळ, सांस्कृतिक चळवळ यांत श्याम देशपांडे यांचे महत्वाचे योगदान राहिले आहे. मराठी प्रकाशक परिषद 'अध्यक्षीय भाषण' या पुस्तकाचे संपादन त्यांनी केले होते.
जालना जिल्ह्यातील कंडारी खुर्द गावात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी आत्याचार केल्याची घटना उघडकीस आलीय. काल सायंकाळी घडलेल्या या प्रकारा नंतर रात्री उशिरा जिल्ह्यातील बदनापूर पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल केलाय. या प्रकरणात मुख्य आरोपी सोपान ढाकणे याला अटक केली असून दुसरा आरोपी शंभु ढाकणे हा अद्याप फरार आहे.
राजहंस प्रकाशनाचे औरंगाबाद प्रतिनिधी ग्रंथप्रेमी श्याम देशपांडे यांचे वयाच्या 70 व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. गेली 25 वर्षे राजहंस प्रकाशनाच्या मराठवाडा विभागाचे प्रतिनिधी म्हणून औरंगाबाद येथे ते कार्यरत होते. मराठवाडा साहित्य परिषदेवर कार्यकारिणी सदस्य म्हणून त्यांनी काम केले. अ.भा. मराठी साहित्य महामंडळावरही ते प्रतिनिधी म्हणून राहिले होते.
धरणांची सुरक्षा, पूर व्यवस्थापन, जल व्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दक्षिण कोरियन 'वाय ओओ आयएल' या संस्थेने चिपळूण येथील महापुराची दखल घेतली आहे.या संस्थेची तज्ज्ञ मंडळी चिपळूनमध्ये दाखल झाली असून गेले दोन दिवस वाशिष्टी नदीचे सर्वेक्षण करीत महापुराच्या कारणांचा शोध घेत आहेत. महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरमुक्ती आणि जलव्यवस्थापनाचा अहवाल ते केंद्र सरकारला देणार आहेत..
नागपुरात आज अखंड भारत संकल्प दिवसानिमित्त सामूहिक वंदे मातरम गायन करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघशी प्रेरणा घेतलेले अनेक संघटन 14 ऑगस्ट हे अखंड भारत संकल्प दिवस म्हणून साजरा करतात...
गेल्या दहा वर्षांपासून 14 ऑगस्ट रोजी नागपूर चे मातृभूमी प्रतिष्ठान तर्फे अखंड भारत संकल्प दिवस साजरे करत सामूहिक वंदे मातरम गायन केले जाते आणि भारताला अखंड भारताचे स्वरूप मिळवून देण्याचे संकल्प केले जाते...
नागपूरच्या सक्करदरा चौकात झालेल्या या वर्षीच्या कार्यक्रमात कोरोना निर्बंधामुळे मोजकेच लोकं उपस्थितीत होते.
त्या सर्वांनी मिळून सामूहिक वंदेमातरम गायन केले...
पालघर जिल्ह्यातील बोईसर चिल्हार मार्गावरील बेटेगाव येथील नाल्यात कार पडून अपघात झाला आहे. अरुंद रस्त्यामुळे गाडी चालकाचं गाडीवरील नियंत्रण सुटल्यांने हा अपघात घडला. सुदैवाने जीवितहानी नाही मात्र अपघातात चालकासह एक सहकारी असे दोघेजण जखमी आहेत.जखमींवर अधिकारी लाईफलाईन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे
पार्श्वभूमी
राज्यात काल 6,686 नव्या कोरोनाबाधितांची भर तर चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली
राज्यात दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल 6,686 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 5 हजार 861 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 80 हजार 871 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.85टक्के आहे.
राज्यात काल 158 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 36 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (1), परभणी (40), हिंगोली (81), नांदेड (51), अमरावती (57), अकोला (37), वाशिम (21), बुलढाणा (6), यवतमाळ (16), वर्धा (5), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83), गडचिरोली (25) या चौदा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 14, 522 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक अखेर जाहीर, अकरावी प्रवेश प्रक्रिया उद्यापासून सुरू
राज्यात अकरावी सीईटी परीक्षा रद्द झाल्यानंतर आता अकरावी प्रवेशाचे वेळापत्रक आज शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आले. राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र,पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी चे सर्व प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रवेश पद्धतीने करण्यात येणार आहेत. सदर 5 ठिकाणच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक यासोबत आज जाहीर करण्यात आले आहे. पाच क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश स्थानिक परिस्थितीनुसार प्रचलित पद्धतीने केले जातील. उद्यापासून या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार असून विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 1 भरायचा आहे. तर 17 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट दरम्यान अकरावी प्रवेश अर्ज चा भाग 2 विद्यार्थ्यांना भरायचा आहे. 27 ऑगस्टला अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे
मुंबई महानगर क्षेत्र आणि पुणे, पिंपरी चिंचवड तसेच नागपूर, नाशिक, व अमरावती या पाच मनपा क्षेत्रातील इ.11 वी प्रवेशाबाबत यापूर्वी वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले होते. न्यायालयीन आदेशानुसार प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्यासाठी सदर वेळापत्रकामध्ये बदल करुन विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर प्रत्यक्ष अर्ज भरण्याची सुविधा 14 ऑगस्ट, 2021 पासून सुरु करण्यात येत आहे.
कोपरखैरणे पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू, CID चौकशी सुरु
कोपरखैरणे सेक्टर 19 येथे 22 वर्षाचा तरुण चोरी करताना रंगेहाथ पकडला गेलेल्या तरुणाला स्थानिक नागरिकांनी मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले. मारहाण झाल्यावर हा तरुण दोन तास कोपरखैरणे पोलिस ठाणे येथे होता. अचानक या तरुणाला उलट्या झाल्याने व चक्कर आल्याने बेशुध्द अवस्थेत तातडीने या तरुणाला रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू असताना रुग्णालयाने या तरुणाला मृत घोषित केले. या तरुणाचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला की जमावाने मारहाण केली याचा तपास पुणे येथील सीआयडी अधिकारी शुक्रवारी सायंकाळी उशिरा पर्यंत करत होते.
कोपरखैरणे येथे गुरुवारी मध्यरात्री एका चोरट्याला चोरी करताना रंगेहाथ जमावाने पकडले. यानंतर पोलिस नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून पोलिसांना पाचारण करून या चोरट्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी या चोरट्याला पोलिस ठाण्यात दोन तास बसवून ठेवले. हा तरुण जखमी अवस्थेत पोलिस ठाण्यात बसला असताना अचानक या तरुणाची तब्येत गंभीर झाल्याने त्याला उलट्या होऊ लागल्या. पोलिसांनी ताबडतोब या तरुणाला घेवून रुग्णालय गाठले. मात्र उपचारासाठी दाखल केल्यावर या तरुणाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -