Breaking News LIVE : विद्रुपा आणि मोर्णा नदीकाठावरील पुरप्रवण रेषेतील ब्ल्यू झोन आणि रेड झोनमधील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर  जिल्हाधिकाऱ्यांची बंदी

Breaking News LIVE Updates, 13 August 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Aug 2021 10:29 PM
10  ते 30 ॲागस्टपर्यंत एकूण कार्यरत पदाच्या 10 टक्के मर्यादेपर्यंत वाढ करण्याचे आदेश

10  ते 30 ॲागस्टपर्यंत एकूण कार्यरत पदाच्या 10 टक्के मर्यादेपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहे. 
राज्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या 31 ऑगस्टपर्यंत एकूण कार्यरत पदांच्या 35 टक्के एवढया मर्यादेत प्राधिका-यांच्या मान्यतेने करण्यात येणार आहे. 35 टक्के पेक्षा जास्त बदल्या करावयाच्या झाल्यास मुख्यमंत्री यांची मान्यता आवश्यक राहणार आहे.  सर्वसाधारण बदल्यांची कार्यवाही  31 ऑगस्ट पर्यंत पूर्ण करण्यात यावी. विशेष कारणास्तव आवश्यकतेनुसार मुख्यमंत्री यांच्या मान्यतेने ३१ ऑगस्ट, २०२१ नंतर ही बदल्या करता येतील.

विद्रुपा आणि मोर्णा नदीकाठावरील पुरप्रवण रेषेतील ब्ल्यू झोन आणि रेड झोनमधील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर  जिल्हाधिकाऱ्यांची बंदी


'एबीपी माझा'च्या बातमीनंतर शहरातील विद्रुपा आणि मोर्णा नदीकाठावरील पुरप्रवण रेषेतील ब्ल्यू झोन आणि रेड झोनमधील मालमत्तांच्या खरेदी-विक्री व्यवहारांवर  जिल्हाधिकाऱ्यांची बंदी. जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे मुद्रांक नोंदणी विभागाला लेखी आदेश. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विजय मालोकार यांनी शिवसेना आमदार विप्लव बाजोरिया आणि गोपीकिशन बाजोरिया यांच्यावर यासंदर्भात केले होते गंभीर आरोप. सत्तेचा दुरुपयोग करीत पुरप्रवण रेषेतील ब्ल्यू लाईन क्षेत्रात जमीनीच्या अकृषक परवान्यासाठी प्रशासनावर दबावाचा केला होता आरोप. 'माझा'ने केला होता संपूर्ण प्रकरणाचा पाठपुरावा केला होता. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांची बंद दाराआड चर्चा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि प्रवीण दरेकर यांची सह्याद्री अतिथीगृहात पंधरा ते वीस मिनिट बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. पूरग्रस्तांना मदतीचा चेक दिल्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती

पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधील पत्रकारिता विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात हलवण्याच्या निर्णयाला विद्यापीठाकडून अखेर स्थगिती देण्यात आलीय.  पुण्यातील पत्रकारांनी रानडे इन्स्टिट्यूटमधुन पदव्युत्तर पदवीचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या आवारात हलवण्यास आणि पत्रकारितेच्या अभ्यासक्रमाचे मास कम्युनिकेशन आणि मिडीया स्टडीजमधे एकत्रीकरण करण्यास विरोध केला होता.  त्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी 14 ऑगस्टला रानडे इन्स्टिट्यूटला भेट देणार असल्याचे जाहीर केले होते.  पण त्या आधीच विद्यापीठाकडून रानडे इन्स्टिट्यूटमधुन पत्रकारीतेचा कोर्स हलवण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आलीय.

नांदेड शिवसेनेचे नेते तथा राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आशीर्वाद घेण्यासाठी भाजप नेत्याच्या बंगल्यावर

राज्यात भाजपचे 105 आमदार असूनही शिवसेनेने भाजपला विरोधी बाकावर बसण्यास भाग पाडले. या अप्रत्यक्ष पराभवाचे शल्य भाजपला नेहमीच बोचत राहिले आहे. त्यातच संधी मिळेल तेव्हा भाजपचे मंडळी शिवसेनेला टार्गेट करताना दिसत असतात. अशातच शिवसेनेचे नेते व महाविकास आघाडी सरकार मधील मंत्री उदय सामंत यांनी नांदेड येथे सरळ भाजप नेत्याच्या बंगल्यावर जाऊन आशिर्वाद घेतलेत. त्यामुळे जिल्ह्यात आणि राज्यात वेगळ्याच राजकीय चर्चेला उधाण आलय. त्याचे झाले असे की गुरुवारी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत हे नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान अचानक मंत्री उदय सामंत हे स्वतः नांदेडचे शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर, पदाधिकारी यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री तथा भाजप नेत्या सुर्यकांता पाटील यांच्या दारात पोचल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यातच मंत्री सामंत हे आपला आशीर्वाद घेण्यासाठी आले होते असे सुर्यकांता पाटील यांनी सांगितल्याने जिल्हाभरात राजकीय चर्चेचे गुऱ्हाळ सुरू झाले आहे. 

सीसच्या संबंधावरुन एटीएसने अटक केलेल्या परभणीतील चारपैकी एकाचा जामीन मंजुर

इसीसच्या संबंधावरुन एटीएसने अटक केलेल्या परभणीतील चारपैकी एकाचा जामीन मंजुर. मोहम्मद इकबाल या तरुणाचा जामीन मंजुर. ऑगस्ट 2016 मध्ये त्यांना एटीएसकडुन अटक झाली होती. 15 दिवसांपुर्वी सुनावणी झाली होती. मुंबई येथील NIA न्यायालयाने दिला जामीन. UAPA कायद्या अंतर्गत अटक झाली होती.

मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय हवा : हायकोर्ट

मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यात समन्वय हवा. राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना कळवायला हवं. राज्यपाल उत्तर देण्यास बांधील नाहीत, त्यामुळे आम्हीही (हायकोर्ट) त्यांना निर्देश देऊ शकत नाही. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिंहगडला जाणार

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोमवारी सिंहगडाची सफर करणार आहेत. राज्यपाल कोश्यारी आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत.  रविवारी त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी राज्यपाल सकाळी दहा वाजता पुण्यातील राजभवनातून सिंहगडावर जाण्यासाठी निघणार आहेत. सिंहगडावर ते एक तास असणार आहेत. महत्वाचे म्हणजे कोरोनामुळे लोकांना गड किल्ल्यांवर आणि पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई असताना राज्यपाल सिंहगडावर जाणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर देखील चालत गेलेले आहेत. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सिंहगडला जाणार

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सोमवारी सिंहगडाची सफर करणार आहेत. राज्यपाल कोश्यारी आजपासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर आहेत.  रविवारी त्यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजवंदन होणार आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सोमवारी राज्यपाल सकाळी दहा वाजता पुण्यातील राजभवनातून सिंहगडावर जाण्यासाठी निघणार आहेत. सिंहगडावर ते एक तास असणार आहेत. महत्वाचे म्हणजे कोरोनामुळे लोकांना गड किल्ल्यांवर आणि पर्यटनस्थळांवर जाण्यास मनाई असताना राज्यपाल सिंहगडावर जाणार आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या आधी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर देखील चालत गेलेले आहेत. 

साताऱ्यातील कोरोना स्थिती

  • सातारा जिल्ह्यात 1090 पॉझिटीव्ह 

  • 14 कोरोना बाधितांचा मृत्यू

  • काल उपचार देऊन 695 रुग्णांना सोडलं

  • आजअखेर 229,749 बाधित तर 214,987 रुग्णांवर यशस्वी उपचार 

  • 9244 रुग्णांवर उपचार सुरु

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना अटक

लाचखोर शिक्षणाधिकारी वैशाली झनकर वीर यांना ठाणे एसीबीने अटक केली आहे. करावाई नंतर त्या फरार होत्या. वैशाली झनकर वीर यांना निलंबित करण्यात येणार असून  शिक्षण विभागाकडून त्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव राज्य सरकारला जाणार आहे.  लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून 8 लाखांची लाच घेतल्या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

नाशकात ऑक्सिजन प्लान्टची यंत्रसामग्री धूळ खात पडून

करोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये म्हणून नाशिक जिल्हयातील अनेक उपजिल्हा दर्जाच्या रुग्णालयांना ऑक्सिजन प्लान्ट मंजूर केले, काही ठिकाणी त्याच काम प्रगतीपथावर असले तरी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात गेल्या महिना भरापासून ऑक्सिजन निमिर्तीची सर्व सामग्री येऊन पडली. रुग्णालयाच्या आवारातील सध्याच्या महावितरणच्या इलेक्ट्रीक डीपी असलेल्या जागी ती बसवून डिपीची उभारणी अन्य ठिकाणी करावी अस ठरलेले असतांना आणि त्याच्या शिप्टींगसाठी सात लाख रुपये खर्च सुध्दा मंजूर झाला आणि तसे महावितरणच्या अधिकाऱ्यांना कळविण्यात आले मात्र अद्याप पर्यंत त्याची दखल घेण्यात आलेली नसल्याने ऑक्सिजन प्लान्ट साठी आलेली यंत्रसामग्री धूळ खात रुग्णालयाच्या आवारात पडून आहे. 

औरंगाबाद उड्डाणपुलाच्या कॉलमच्या खड्ड्यात कार कोसळली

औरंगाबाद : औरंगाबाद उड्डाणपुलाच्या कॉलमच्या खड्ड्यात कार कोसळली, 25 फूट खोल पाण्याने भरलेल्या खड्ड्यात कोसळली.बीड बायपास एमआयटी कॉलेज चौकातील रात्रीची घटना, गाडीतील व्यक्ती बचावली

कोल्हापूरकरांसाठी खुशखबर, कोल्हापूर-नागपूर विमानसेवा सुरू होणार

कोल्हापूरकरांसाठी खुशखबर, कोल्हापूर-नागपूर विमानसेवा सुरू होणार,


कोल्हापुरातून अहमदाबाद मार्गे नागपूरला जाता येणार, विमान बदलण्याची गरज नाही,


17 ऑगस्ट पासून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही विमानसेवा असेल,


प्रवाशांच्या ऑनलाईन तिकीट नोंदणीला सुरुवात,

आज मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा अंदाज, पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

Breaking News LIVE : आज मुंबई आणि ठाणे परिसरात पावसाचा अंदाज, पुणे जिल्ह्यातही हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, पुणे घाट भागात मुसळधार पाऊस 

कोरोना आणि न्यायालयाच्या आदेशानुसार शिराळ्यात  साध्या पद्धतीने नागपंचमी 
जगप्रसिद्ध असणारी शिराळ्याची नागपंचमी यंदाही साध्या पद्धतीने साजरी होत आहे. न्यायालयाचे आदेश आणि कोरोनाची सावट या पार्श्वभूमीवर नागपंचमी साजरी होत आहे.घरोघरी नागांच्या मूर्तीचे पूजन करून शिराळाकरांना यंदाही साध्या पद्धतीने नागपंचमी साजरी करत आहेत.तर प्रशासनाकडून नागपंचमी उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलाय.
कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा छपाईचा सुळसुळाट

कोल्हापूर जिल्ह्यात बनावट नोटा छपाईचा सुळसुळाट,


करवीर तालुक्यातील सांगरुळ याठिकाणी पोलिसांचा छापा,


साडे दहा लाखांच्या नोटा जप्त, दोन आरोपी अटकेत,


बँकेत नोटा भरण्यासाठी गेल्यानंतर प्रकार उघडकीस,


मुख्य सूत्रधार आबाजी सुळेकर आणि त्याचा साथीदार अटकेत,

कोल्हापूर-नागपूर विमानसेवा सुरु होणार

कोल्हापूरकरांसाठी खुशखबर असून कोल्हापूर-नागपूर विमानसेवा सुरु होणार आहे. कोल्हापुरातून अहमदाबाद मार्गे नागपूरला जाता येणार असून त्यासाठी विमान बदलण्याची गरज नाही. 17 ऑगस्ट पासून मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी ही विमानसेवा असेल. प्रवाशांच्या ऑनलाईन तिकीट नोंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. 

महिनाभरापासून बेपत्ता असलेल्याल लातुरातल्या दोन बहिणींचे मृतदेह सापडले, संपत्तीसाठी जावयानेच केला होता खून

लातुरातील महिन्याभरापासून बेपत्ता असलेल्या दोन बहिणींच्या हत्येप्रकरणातील आरोपीस आज पोलिसांनी जेरबंद केला आहे. जावयाने संपत्तीच्या कारणासाठी आपल्या सासूचा आणि त्यांच्या बहिणीचा खून केला होता. मृतदेह शेततळ्याच्या पाळूमध्ये पुरून ठेवला होता. एक महिन्याच्या तपासानंतर किल्लारी पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. 

पार्श्वभूमी

राज्यात काल 5,609 नव्या कोरोनाबाधितांची भर तर साताऱ्यात सर्वाधिक रुग्णांची नोंद
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून दहा हजारांच्या आत येऊ  लागली आहे. काल 6,388  नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 8 हजार 390 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 75 हजार 010 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.8टक्के आहे. 


राज्यात काल 208 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  62 हजार 351 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (4), धुळे (3) , हिंगोली (79), नांदेड (62), अमरावती (65), अकोला (44), वाशिम (21),  बुलढाणा (86), यवतमाळ (13), वर्धा (11), भंडारा (1), गोंदिया (3), चंद्रपूर (83),  गडचिरोली (20) या नऊ जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13, 892 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. 


विधान परिषदेवरील 12 नामनियुक्त सदस्यांच्या निवडीचा पेच सुटणार का?
विधानपरिषदेवरील 12 नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्तीसंदर्भात राज्य सरकारनं पाठवेल्या प्रस्तावावर उत्तर देण्यास राज्यपाल बांधील नाहीत, असा दावा केंद्र सरकारच्यावतीनं करण्यात आला आहे. त्यावर अशा परिस्थिती या प्रश्नावर नेमका तोडगा काय?, असा सवाल हायकोर्टानं उपस्थित केला. राज्यपालांना संविधानानं सर्वोच्च अधिकार दिलेत हे मान्य, मात्र त्या अधिकारांबाबत राज्यपालांची काहीच जबाबदारी नाही का?, असे सवाल उपस्थित करत यासंदर्भातील याचिकेवर सर्व पक्षकारांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानं हायकोर्टानं आपला अंतिम निर्णय 19 जुलै रोजी राखून ठेवला होता. तो निकाल आज दुपारी 2:30 वाजता मुंबई उच्च न्यायालय जाहीर करेल.


राज्यपाल नियुक्त 12 नामनिर्देशित सदस्यांच्या जागा अजूनही रिक्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाने गेल्या 6 नोव्हेंबर 2020 रोजी या 12 नावांची शिफारस राज्यपालांकडे केलेली आहे. मंत्रिमंडळात या नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर ही नावे राज्यपालांकडे मंजूरीसाठी पाठवण्यात आली आहेत. मात्र, आठ महिने उलटूनही अद्याप निर्णय घेण्यात झालेला नाही. यावरून सत्ताधारी आघाडीतील नेते आणि मंत्र्यांकडून सातत्यानं अनेक टीकात्मक विधानंही केली गेलीत. त्यातच नामनियुक्त सदस्यांबाबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे निर्णय घेत नसल्याने नाशिक येथील रहिवासी रतन सोली लूथ यांनी हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सोमवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर व्हिसीमार्फत सुनावणी पार पडली. मागील सुनाणीदरम्यान खंडपीठानं केंद्र सरकारला आपली भूमिका मांडण्याचे निर्देश दिले होते. त्यावर सोमवारी केंद्र सरकारच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी हायकोर्टापुढे आपली बाजू मांडली. 


सोलापुरातील पाच तालुक्यांत आजपासून संचारबंदी, व्यापाऱ्यांचा मात्र विरोध; काय सुरु, काय बंद?
आजपासून सोलापुरातील पंढरपूर, माळशिरस, माढा, करमाळा आणि सांगोला या पाच तालुक्यात संचारबंदी (Solapur Lockdown) लागू होत आहे. या संचारबंदीला व्यापाऱ्यांचा मात्र विरोध आहे. पंढरपूर व्यापारी महासंघाने संचारबंदीचे आदेश धुडकवात काळे झेंडे लावून दुकानं सुरु ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे व्यापारी आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष चिघळण्याची शक्यता आहे. 


पुण्यातील कोरोना निर्बंधांबाबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तालुक्यांचा उल्लेख करत येथील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनानं या तालुक्यांमध्ये संचारबंदी लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, सोलापूर जिल्ह्यातील 5 तालुक्यात 13 ऑगस्टपासून, म्हणजेच आजपासून पुढील आदेशापर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील माढा, माळशिरस, कसमाळा, सांगोला आणि पंढरपूर या तालुक्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्ह्या प्रशासनानं हे नवे आदेश लागू केले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील या तालुक्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.