Breaking News LIVE : तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी

Breaking News LIVE Updates, 10 August 2021: दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 10 Aug 2021 09:03 PM
तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी अर्ज भरण्याची पुन्हा एक संधी

शैक्षणिक वर्ष 2021-22 करिता तंत्रशिक्षण विभागांतर्गत असलेल्या विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी 2021 या प्रवेश परीक्षांकरिता आतापर्यंत ऑनलाईन अर्ज न केलेल्या उमेदवारांसाठी एक विशेष बाब म्हणून 12 ऑगस्ट ते  16 ऑगस्ट या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्यासाठी संधी देण्यात आली आहे. तसेच या पुर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांना अर्जामधील दुरूस्ती करण्यासाठी 14 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट या कालावधील संधी देण्यात येत आहे.  अधिक माहितीसाठी उमेदवारांनी https://t.co/1lt6aqPrJB  या संकेतस्थळाला भेट द्यावी.

नवी दिल्ली : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर

नवी दिल्ली : लोकसभेत 127 वी घटनादुरुस्ती विधेयक बहुमताने मंजूर झालं आहे. विधेयकाच्या बाजूने 386 तर विरोधात शुन्य मतं पडली. एसईबीसी नवे प्रवर्ग निर्माण करण्याचे अधिकार राज्य सरकारांना बहाल करणारे विधेयक मंजूर झालं आहे. उद्या राज्यसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे. 

शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर - वर्षा गायकवाड

शाळा सुरू करण्यासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर करण्यात आली आहे. मात्र सरसकट आम्ही शाळा सुरू करत नाहीत. ज्या ठिकाणी सुरक्षा आहे त्याच ठिकाणी शाळा सुरू करत आहोत. शिक्षकांच लसीकरण केलं जाणार आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव आहे त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. टास्क फोर्सने जे संगीतल आहे ते समोर ठेऊन हा निर्णय घेत आहोत.

भाजप आमदाराच्या मुलाला लाखोंचा गंडा घालणारा भामटा गजाआड

भाजप आमदाराच्या मुलाची फसवणूक करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी गजाआड केलंय.  शिक्षणासाठी लागणारे सॉफ्टवेअर बनवून देण्याच्या नावाखाली भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या मुलाची तब्बल 40 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार जुलै महिन्यात उघड झाला होता. या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात आशिष चौधरी याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र त्यानंतर आशिष फरार झाला होता. गेले 20 दिवस पोलीस आशिषचा शोध घेत होते. अखेर फसवणूक करणारा आरोपी आशिष चौधरी याला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. आशिष सोबत अजून किती लोक या गुन्ह्यात सहभागी आहेत. याचा तपास पोलिस करीत आहेत. 2018 ते 2021 या तीन वर्षात जवळपास 40 लाख रुपये आरोपीने घेतल्याचं उघड झालं आहे.

नंदुरबार जिल्ह्यातील पुष्प दंतेश्वर साखर कारखान्याचा विक्री व्यवहाराची ईडी मार्फत चौकशी

राज्य सहकारी बँकेचे पुष्पदंतेश्वर सहकारी साखर कारखान्यावर 36 कोटी रुपयाचे कर्ज थकीत असल्याने सहकारी बँकेने हा कारखाना लिलावात काढला होता. तो कारखाना अगोदर आस्ट्रेलिया अॅग्रो प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खरेदी केली त्या नंतर या कंपनीने आयन शुगर प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला विक्री केला आहे हा कारखाना  पवार यांचे निकटवर्तीय आसलेल्या सचिन शींगारे आयन शुगरचे संचालक आहे. आता ई डी आर्थात  अंमलबजावणी संचालनालय ने या कारखान्याचा चौकशी साठी सर्व व्यवहाराची कागदपत्रे ताब्यात घेतली आहे.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस चे उपमुख्यमंत्री आजित पवार यांच्या निकटवर्ती आसलेल्या व्यक्तीची यात चौकशी होण्याची शक्यता आहे

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन, वयाच्या 81 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा हा भाजप नेत्यांसाठीही चर्चेचा विषय

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा हा भाजप नेत्यांसाठीही चर्चेचा विषय बनल्याचं दिसतंय. वो रोज बोलते हैं, हम जवाब क्यों नहीं देते? असा सवाल भाजपच्या राष्ट्रीय पातळीवरच्या नेत्यानं राज्यातल्या नेत्यांना केल्याचं समजतंय. संजय राऊत यांच्या रोजच्या हल्ल्यांना तितकंच जोरदार प्रत्युत्तर द्या असं महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांना दिल्लीतून सांगितलं गेल्याची सूत्रांची माहिती आहे.  भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे चार दिवसांच्या दिल्ली दौ-यावर होते, त्यावेळी त्यांनी संघटन महामंत्री बी एल संतोष, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचीही भेट घेतली. या भेटीत संघटन, आगामी निवडणुका याबाबतची चर्चा झाल्याचंही कळतंय. महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर संजय राऊत हे जवळपास रोज माध्यमांतून आपली भूमिका मांडत असतात. कधी महाविकास आघाडीवर होणा-या आरोपांचं समर्थन, तर कधी केंद्रावर हल्लाबोल, विरोधकांना चिमटे. काही महत्वाच्या मुद्द्यांवर भाजपकडून तातडीनं प्रत्युत्तर येतंही, पण सतत देण्याची आवश्यकता भाजपला वाटत नाही. पण मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत असल्यानंही जोरदार प्रत्युत्तरावर भर देण्याची आवश्यकता भाजपच्या दिल्ली नेत्यांना वाटतेय. हिंदुत्वाच्या मुद्दयावर आक्रमक राहण्याचाही सल्ला दिल्लीतून दिला गेला आहे..एकत्रित सत्तेत असतानाही संजय राऊत सामनामधून महायुतीच्या सरकारवर हल्ले करायचे, पण त्यावेळी सोबत असल्यानं त्याकडे कानाडोळा करण्याची भाजपची भूमिका होती. सामना वाचतच नाही असंही त्यावेळी अनेक नेते सांगताना दिसत होते. पण आता दोन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधातच असल्यानं या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर देणारी यंत्रणा उभी करा असं सांगितलं जातंय. 

राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका, अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द

राज्य सरकारला हायकोर्टाचा दणका. अकरावी प्रवेशासाठीची सीईटी हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. 28 मे चा यासंदर्भातील अध्यादेश हायकोर्टानं रद्द केला आहे. अकरावीचे प्रवेश दहावीच्या गुणांनुसारच करावेत, असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. राज्य सरकारनं निकालाला स्थगिती देण्याची केलेली मागणी हायकोर्टानं फेटाळली आहे. 

जळगावातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित सुनील झंवरला अटक

जळगाव जिल्ह्यातील भाईचंद हिराचंद रायसोनी पतसंस्था घोटाळ्यातील प्रमुख संशयित आरोपी सुनील झंवर याला अटक करण्यात पुणे आर्थिक गुन्हे शाखेला यश मिळालं. आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नाशिक येथून सुनील झंवरला अटक करण्यात आली आहे. बीएचआर म्हणजेच भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टी स्टेट पत संस्थेत  सुनिल झंवर याने पत संस्थेच्या मालमत्ता कमी किंमतीत आपल्या जवळच्या नातलग आणि मित्र मंडळींच्या नावे खरेदी केल्याची सूत्रांची माहिती आहे. 


 

सातारा जिल्ह्यात 827 पॉझिटिव्ह तर 11 कोरोना बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात 827 पॉझिटिव्ह तर 11 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. काल उपचार देऊन 973 रुग्णाना घरी सोडले आहे. आज अखेर 2,26,106 बाधित झालेत तर 212,420 रुग्णांवर यशस्वी उपचार झाला आहे. सध्या 8222 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

सातारा जिल्ह्यात 827 पॉझिटिव्ह तर 11 कोरोना बाधितांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात 827 पॉझिटिव्ह तर 11 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. काल उपचार देऊन 973 रुग्णाना घरी सोडले आहे. आज अखेर 2,26,106 बाधित झालेत तर 212,420 रुग्णांवर यशस्वी उपचार झाला आहे. सध्या 8222 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. 

पुणे मेट्रो लाईन 1,2 आणि 3 चा मार्ग मोकळा, मेट्रे स्टेशनच्या उभारणीत येणाऱ्या वस्त्यांवर कारवाईस प्राधिकरणाला हायकोर्टाकडनं मुभा

पुणे : पुणे मेट्रो लाईन 1,2 आणि 3 चा मार्ग मोकळा झाला आहे. मेट्रो स्टेशनच्या उभारणीत येणाऱ्या वस्त्यांवर कारवाईस प्राधिकरणाला हायकोर्टाकडनं मुभा दिली आहे. पात्र रहिवाशांनी त्यांना देण्यात आलेल्या निवाऱ्यात स्थलांतरीत व्हावं, असं हायकोर्टानं म्हटलं आहे. स्थानिकांना दिलेल्या निर्देशांची वृत्तपत्रांद्वारे माहिती देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत.  बेकादेशीर तसेच प्रकल्पात बाधा येणाऱ्या बांधकामांना हायकोर्टानं दिलेला दिलासा महिन्याअखेरपर्यंतच आहे. पुण्यातील कामगार पुत्र वसाहत, राजीव गांधी नगर, जुना तोफखाना, शिवाजी नगर, विमान नगर परिसरात कारवाई होणार आहे. 

लोकसभेत 127 व्या घटना दुरुस्तीवर आज होणार चर्चा

लोकसभेत 127 व्या घटना दुरुस्तीवर आज चर्चा होणार असून शिवसेनेकडून विनायक राऊत, अरविंद सावंत, प्रतापराव जाधव हे चर्चेत भूमिका मांडण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीकडून खासदार सुप्रिया सुळे या विधेयकावर बोलणार आहेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने संवेदनशील विषयावर राज्यातले खासदार काय भूमिका मांडणार याची उत्सुकता आहे. लोकसभेत या विधेयकावरील चर्चेसाठी चार तासांचा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे. काल हे विधेयक पटलावर मांडल्यानंतर आज दुपारी बारानंतर चर्चेला सुरुवात होण्याची शक्यता आहे. 

पश्चिम आफ्रिकेत कोरोनाप्रमाणेच संसर्गजन्य Marburg virus चा पहिला रुग्ण

पश्चिम आफ्रिकेतील गिनीमध्ये प्रशासनानं जीवघेण्या मारबर्ग व्हायरस (Marburg virus)चा प्रादुर्भाव झाल्याची घोषणा केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम आफ्रिकेत मरबर्ग व्हायरसची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. आफ्रिकेतील इबोला या जीवघेण्या व्हायरसचा प्रादुर्भाव काही दिवसांपूर्वीच कमी झाला होता. त्यानंतर जवळपास दीड महिन्यांतच एका व्यक्तीला संसर्गजन्य ताप आल्याचं पाहायला मिळालं होतं. दक्षिण गिनीच्या गुआकेडो प्रांतात या रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पृथ्वी तापतेय, भारताला धोका; IPCC च्या अहवालातून इशारा

पृथ्वीचे तापमान वाढल्याने कोणते दुष्परिणाम जाणवतील याबाबत संयुक्त राष्ट्राच्या इंटरगव्हर्नमेन्टल पॅनेल ऑन क्लायमेट चेंजचा सहावा अहवाल क्लायमेट चेंज 2021-दी फिजिकल सायन्स बेसिस प्रसिद्ध करण्यात आला. ज्यात येणाऱ्या काळात पूर, उष्णलहरी, समुद्राच्या पाणीपातळीत वाढ, कमी वेळात अधिकचा पाऊस आणि त्याचवेळी त्याच्याच जवळ असलेल्या भागात भयंकर दुष्काळी परिस्थितींमध्ये वाढ होणार आहे. त्याचसोबत 21व्या शतकात उष्णतेचे प्रमाण वाढण्याचे आणि थंडीचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. 

महाराष्ट्र बोर्डाच्या अकरावी प्रवेशासाठीच्या CET चा प्रश्न आज सुटणार, मुंबई उच्च न्यायालय निर्णय देणार

अकरावी प्रवेशासाठी राज्य सरकारनं जाहीर केलेल्या सीईटी संदर्भातील संभ्रम आज दूर होण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयात दाखल झालेल्या एका याचिकेवर आज निर्णय होणार आहे. अकरावीसाठीची सीईटी एसएससी बोर्डाच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यानं आयसीएससी बोर्डाच्या एका विद्यार्थ्यीनीनं त्याविरोधात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. आज दुपारी अडीच वाजता या निकालाचं वाचन केलं जाणार आहे. 

कांग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मंत्री बाळासाहेब थोरात आज नाशिकमध्ये

काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुरु करण्यात आलेल्या 'व्यर्थ ना हो बलिदान' कार्यक्रमासाठी  उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आज 4 वाजता नाशिकला येणार आहेत. हुतात्मा स्मारक येथे हो कार्यक्रम होणार आहे.

सीमाप्रश्न त्वरित सोडवावा आणि सीमाभागांतील मराठी भाषिकांवरील अन्याय दूर करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अकरा हजार पत्रं पाठवणार
बेळगाव : सीमा लढ्यातील पहिले हुतात्मे नागप्पा होसुरकर यांच्या पत्नी नर्मदा होसुरकर यांचे पहिले पत्र युवा समितीकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, खानापूर तालुका युवा समिती अध्यक्ष धनंजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने काही दिवसापूर्वी सीमा प्रश्नाबाबत पंतप्रधानांना अकरा हजार पत्रे क्रांती दिनी पाठवण्याचा संकल्प केला होता. पत्रे पाठवायच्या मोहिमेला केवळ खानापूर तालुक्यातून नव्हे तर संपूर्ण सीमाभागातून उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. बेळगाव शहर, तालुका आणि निपाणी आदी भागात पंतप्रधानांना पत्रे पाठवण्याच्या मोहिमेला जनतेने प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी देखील पत्रे लिहिण्याच्या मोहिमेला प्रारंभ केला आहे. पंधरा ऑगस्टपर्यंत ही पत्रे पाठवायची मोहीम सुरु राहणार आहे.
वसई-विरारमध्ये दोन डोससाठी लसीकरण केंद्रबाहेर लांबच लांब रांगा

वसई-विरार : महापालिकेच्या 17 लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येणार आहे. नालासोपारा पूर्वकडील तुलिंज हॉस्पिटल हे सर्वात मोठे आहे. याठिकाणी 300 लस सकाळी वाजल्यापासून नागरिकांना मिळणार आहेत. त्यातील 150 पहिल्या डोससाठी, तर 150 दुसरा डोस वाल्या नागरिकांसाठी आहेत. आपणाला लस मिळाली पाहिजे यासाठी नागरिक अन्नपाणीमुलं-बाळ घरात सोडूनलसीकरण केंद्राच्या समोर रांगेत बसले आहेत. 12 ते 13 तास रात्रभर रांगेत बसूनही डोस मिळेल की, नाही याची शाश्वती नाही. सरकार डोस घ्या सांगतं, पण रांगेत थांबूनही लस मिळत नाही. नागरिकांनी काय करावेअशा संतप्त प्रतिक्रिया ही नागरिक देत आहेत.

पार्श्वभूमी

Maharashtra Unlock : टास्क फोर्सच्या बैठकीत काल नेमकी काय चर्चा झाली?


मुख्यमंत्र्यांनी नागरिकांशी संवाद साधून सर्वसामान्यांना लोकल सुरु करण्यासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं. हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय टास्क फोर्सच्या बैठकीनंतर  घेतला जाणार असल्याचं सांगितलं होतं.  मात्र प्रार्थनास्थळं, रेस्टॉरंट, मॉल्स उघडण्याबाबत अद्याप काही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबत काल (सोमवारी) टास्क फोर्सच्या बैठकीत  सखोल  चर्चा करण्यात आली. जाणून घेऊया टास्क फोर्सच्या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यावर चर्चा करण्यात आली आहे. 


टास्क फोर्सच्या बैठकीत काल नेमकी काय चर्चा झाली?


हॉटेल- रेस्टॉरंट आणि मॉल खुले करण्यासंदर्भात बैठकीत सखोल चर्चा झाली
हॉटेल-रेस्टॉरंट -मॉल टप्प्याटप्यानं यांसाठी शिथिलता देण्याबाबत विचार झाला.
 हॉटेल - रेस्टॉरंटला रात्री  10 पर्यंत शिथीलता देता येऊ शकेल.  मात्र, त्यासाठी काटेकोर नियमावली तयार होणार
त्यानंतर मॉल खुले करण्याबाबतही विचार केला जाऊ शकेल.  मात्र त्यासाठीही काटेकोर नियमांची अंमलबजावणी आवश्यक आहे. 
धार्मिक कार्यक्रम, प्रार्थनास्थळे, सामाजिक कार्यक्रम याकरता लगेच शिथीलता देता येणार नाही असे मत मांडण्यात आले
शिथिलीकरणासंदर्भातली नियमावली टास्क फोर्स तयार करेल आणि ती मुख्य सचिव, मुख्यमंत्र्यांसमोर सादर होईल.
तिसरी लाट कधी येऊ शकते? राज्याची तिस-या लाटेचा सामना करण्याची तयारी आहे का? 
नियम शिथिल केले तर काय परिणाम होऊ शकतात? लसपुरवठाही अपुरा पडतोय. या सर्व बाबींचा विचार करुन निर्णय होणार आहे.


आयटी कायद्यतील दुरूस्तीचे समाजावर भयानक परिणाम, मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकांवर एकत्रित सुनावणी


केंद्र सरकारनं माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत आणलेल्या सुधारित डिजिटल मीडिया एथिक कोड नियमांमुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि मूलभूत अधिकारांवर आक्रमण होत आहे, ज्याचे परिणाम फार भयानक होतील असा दावा मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या याचिकाकर्त्यांकडून करण्यात आला आहे. केवळ सरकारवर होणारी टिका रोखण्यासाठीच ही सुधारणा केल्याचा आरोप याचिकाकर्त्यांतर्फे ज्येष्ठ वकिल दरायस खंबाटा यांनी केला. तसेच केंद्र सरकार असे नियम आणून एकप्रकारे ऑनलाईन कंटेंटवर नियंत्रण आणू पहात आहे. मात्र त्यासाठी आधीपासून अस्तित्वात असलेली यंत्रणा पुरेशी असून ती सक्षम आहे, असंही ते पुढे म्हणाले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचं उल्लंघन यामधून होत असल्याचा आरोप करत याप्रकरणी काही वृत्तसंस्थांनी मुंबई उच्च न्यायालयात स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे सुनावणी सुरु आहे.


केंद्र सरकारने माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्यात नवीन नियमावली तयार केली आहे. मात्र यातील कलम 9, 14 आणि 16 यांना विरोध करत देशभरातील विविध हायकोर्टात याचिका दाखल झाल्या आहेत. यामध्ये नव्या कायद्यानं तपास यंत्रणांना जादा अधिकार दिले असून एकप्रकारे संबंधित माध्यमांवर थेट कारवाई करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र यामध्ये गंभीर परिणाम होण्याची शक्यता असून धार्मिक किंवा मानहानीच्या आरोपातून मनमानी पध्दतीनं माध्यमांवर फौजदारी कारवाई होण्याची शक्यता आहे. अशा प्रकारे तपास अधिकाऱ्यांनाच न्यायव्यवस्थेसमान अधिकार देऊन काय बदनामीकारक आहे आणि काय नाही?, हे ठरवता येणार आहे. या नियमांना जेष्ठ पत्रकार निखिल वागळे आणि 'द लिफलेट डिजिटल' या वृत्तसंस्थेमार्फत याचिकेद्वारे आव्हान देण्यात आलं आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे यावर सुनावणी झाली. याचिकादारांच्यावतीनं ज्येष्ठ कायदेतज्ञ दरायस खंबाटा यांनी बाजू मांडली. भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 14 (समानतेचा हक्क), 19 अ (अभिव्यक्ती स्वातंत्र्य) आणि व्यवसाय करण्यातील स्वातंत्र्य 19 (1) (जी) या मुद्यांवर याचिका ही केलेली आहे. नव्या नियमांमुळे माध्यमांच्या मूलभूत अधिकारांवर बाधा येत आहे, असा युक्तिवाद खंबाटा यांनी हायकोर्टापुढे केला. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.