Breaking News LIVE : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे पासून सुट्या जाहीर
Breaking News LIVE Updates, 30 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना 1 मे पासून सुट्या जाहीर करण्यात आल्या आहे. 1 मे ते 13 जून दरम्यान शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. 14 जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार. शिक्षकांना, विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षणातून अखेर विश्रांती. राज्यातील शिक्षक संघटनाकडून वारंवार केल्या जात असलेल्या मागणीनंतर शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या आहेत. विदर्भातील तापमान विचारात घेता 28 जूनपासून शाळा सुरू होणार आहेत.
काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती स्थिर आहे, काल रात्रीपासून प्रकृतीत सुधारणा असून ऑक्सिजन लेव्हलही वाढत आहे. लवकरच ते बरे होतील आणि सार्वजनिक जीवनात परततील. त्यांना मुंबईला हलवण्याची गरज नाही : विश्वजीत कदम
महाराष्ट्रातील राज्यपत्रित गट अ आणि गट ब अधिकाऱ्यांचा मे महिन्यातील दोन दिवसांचा पगार कपात होणार आहे. तर गट क आणि गट ड कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कट होणार आहे. याशिवाय पेन्शनधारक अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांचा एक दिवसाचा कट होणार आहे. याबाबत महाराष्ट्र राज्यपत्रित अधिकारी महासंघाने राज्य सरकारला दिलेला प्रस्ताव मंजूर झाला आहे. यामधून राज्य सरकारला सुमारे दोनशे कोटी निधी मिळेल.
वरिष्ठ वृत्तनिवेदक रोहित सरदाना यांचं निधन झालं. कोरोनावरील उपचारादरम्यान हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. रोहित सरदाना यांनी आज तक आणि झी न्यूज या वृत्तवाहिन्यांमध्ये वृत्तनिवेदक म्हणून काम केलं होतं. त्यांच्या निधनाने मीडिया विश्वात शोककळा पसरली आहे.
नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा प्रस्ताव मंजूर. सिडको संचालक मंडळ बैठकीत मोठा निर्णय. प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य मंत्रीमंडळाकडे पाठवला
वैद्यकिय शिक्षक संघटनेचा संपावर जाण्याचा इशारा. निवृत्ती वय वाढवण्याच्या मुद्द्यावरुन संपावर जाण्याचा इशारा. उद्यापासून 1200 डॉक्टर संपावर जाण्याचा इशारा.
मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचं निधन. कोरोनामुळे वयाच्या अवघ्या 34 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
दिल्लीत रेमडेसिवीरचा तुटवडा असताना 10 हजार रेमडेसिवीर विमानाने अहमदनगरला कसे आले असा सवाल न्यायालयाने केला आहे. तुटवडा असताना सुजय विखेंना ती कशी मिळाली असा सवाल उपस्थित करत रेमडेसिवीर प्रकरणी खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यास औरंगाबाद खंडपीठाची मुभा दिली आहे.
गोव्यातील प्रख्यात सतारवादक पंडित योगराज नाईक यांचे कोरोनाने निधन झालं आहे.
लसीकरणासाठी आलेल्या महिलांनी आरोग्य कर्मचारी महिलेला धक्काबुक्की केल्याचा प्रकार कोल्हापूर शहरातील फिरंगाई केंद्रावर घडला आहे. या प्रकरणी माजी उपमहापौर महेश सावंत यांच्यासह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नोंदणी न करता लसीकरणासाठी आलेल्या महिलांनी केंद्रावर गोंधल घातला होता. या गोंधळानंतर केंद्राबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मुंबईतल्या जोगेश्वरीच्या बेहराम बाग परिसरात एक सहा वर्षीय मुलीवर 23 वर्षीय मेडिकलचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने बलात्कार केल्याची घटना काल (29 एप्रिल) संध्याकाळी घडली आहे. सुनील सुखराम गुप्ता असे आरोपीचे नाव असून तो पीडित मुलीच्या घर मालकाचा मुलगा आहे. पीडित मुलीचे कुटुंब हे आरोपीच्या घरातील पोट माळ्यावर भाड्याने राहते. काल संध्याकाळी नेहमीप्रमाणे ती आरोपीच्या घरी टीव्ही पाहण्यास गेली असता त्याने दरवाजा बंद करुन तिच्यावर बलात्कार केला. मुलीने थोड्याच वेळात घरी जाऊन घडलेला प्रकार तिच्या आईला सांगितला. यानंतर मुलीच्या कुटुंबाने याबाबत ओशिवरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला, त्यानंतर पोलिसांनी आरोपी सुनीलला बेड्या ठोकल्या. या आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.
तांत्रिक कारणामुळे वापर थांबवण्याच्या सूचना. रायगडच्या अन्न व औषध प्रशासनाचे आदेश. ५०० इंजेक्शन पुरविण्यात आले होते, त्यापैकी १२० इंजेक्शन देण्यात आले. हेटेरो हेल्थकेअर कम्पनिकडून वितरित करण्यात आलेले रेमेडिसीवीरचा वापर थांबविण्याचा आदेश. कोविफोर नामक इंजेक्शनच्या एचसीएल २१०१३ बॅचचा वापर न करण्याचे आदेश.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली जवळील हिरण्यकेशी नदी परिसरात वाघाचे दर्शन झालं आहे. सह्याद्रीमधील वनक्षेत्रांना कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा दर्जा दिल्यानंतर प्रथमच या परिसरात वाघाचे दर्शन झालं आहे. वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात वाघाच्या हालचाली टिपल्याने पश्चिम घाटातील टायगर कॉरिडॉर सुस्थितीत असल्याचं या निमित्ताने निष्पन्न झालं आहे अशी माहिती कोल्हापूर वन्यजीव विभागाने दिली आहे.
पार्श्वभूमी
Maharashtra Corona : तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे अशा स्पष्ट सूचना जिल्हा प्रशासनांना दिल्या. आज ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलत होते.
Maharashtra Coronavirus Crisis : राज्यात लॉकडाऊन वाढवला, 15 मे पर्यंत कठोर निर्बंध कायम
राज्यात कोरोनानं पुन्हा डोकं वर काढलं असून कोरोना बाधितांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होताना दिसत आहे. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अधिक कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्यात 22 एप्रिल ते 1 मे पर्यंत हे निर्बंध लागू करण्यात आले होते. पण परिस्थिती जैसै थे होती. त्यामुळे 15 मे पर्यंत लॉकडाऊन असणार आहे. यासाठी शासनाच्या वतीनं नवी नियमावली जारी करण्यात आली आहे.
Maharashtra Corona Cases : राज्यात आज नवीन रुग्णांच्या तुलनेत बऱ्या होणाऱ्यांचं प्रमाण अधिक, 68 हजार रुग्णांना डिस्चार्ज
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात 60 हजारांच्यावर नवीन कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. राज्यात आजही तब्बल 66 हजार 159 नवीन कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. दिलासायदायक म्हणजे आज नवीन 68 हजार 537 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 3799266 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 670301 सक्रीय रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 83.69% झाले आहे.
Exit Poll Result 2021 : बंगालमध्ये ममता दिदी, आसाम-पुद्दुचेरीत भाजप, तामिळनाडूत डीएमके-काँग्रेस तर केरळमध्ये लेफ्टची सत्ता येण्याचा अंदाज
पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाकडे देशाचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी विधानसभेच्या निवडणुकांचे निकाल 2 मे रोजी घोषित होणार आहेत. त्याआधी आज एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. यामध्ये भाजप दोन राज्यात, काँग्रेस एका, टीएमसी एका तर लेफ्टची सत्ता एका राज्यात येण्याचा अंदाज आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -