Breaking News LIVE : कोरोना लसींच्या किंमतीबाबत दाखल जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाचा नकार
Breaking News LIVE Updates, 29 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
कुख्यात गुंड रवी पुजारीला नाशिक न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. नाशिक मधील एका बांधकाम व्यवसायिकाला गोळीबार करत धमकावल्या प्रकरणी रवी पुजारीला अटक करण्यात आली होती. नोव्हेंबर 2011 मध्ये ही घटना घडली होती. मुंबई पोलिसांच्या कोठडीत असलेल्या रवी पुजारीला मुंबई पोलिसांच्या बंदोबस्तात नाशिककडे आणण्यात आलं. याच प्रकणात 8 दिवसांची पोलीस कोठडी संपत असल्याने आज पुन्हा न्यायालयात हजर केलं जाणार आहे.
कोरोना लसींच्या किंमतीबाबत दाखल जनहित याचिकेवर सुनावणी घेण्यास हायकोर्टाने नकार दिला आहे. 'लसींच्या किंमतीचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित नाही. हा मुद्दा देशपातळीवरील आहे, असं सांगत यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने याचिकाकर्त्यांना दिले आहेत.
महाराष्ट्र काँग्रेस मुख्यमंत्री सहाय्यता निधीला पाच लाख रुपये देणार आहे, अशी माहिती काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. काँग्रेस आमदार एक महिन्याचं वेतन तर बाळासाहेब थोरात स्वत: एक वर्षाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहेत.
चंद्रपूर जिल्ह्यात दोन मोठ्या अस्वलींसह दोन पिल्लांचा कठडे नसलेल्या विहिरीत पडून मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. ताडोबाच्या बफर झोनलगत असलेल्या वढोली गावात ही घटना घडलीय. रात्रीच्या सुमारास अस्वलांचं हे कुटुंब या विहिरीत पडलं असावं अशी शक्यता व्यक्त केली जातेय. आज सकाळी शेतात काही लोक गेले असताना त्यांना हे दृश्य नजरेस पडलं. भक्ष्य आणि पाण्याच्या शोधात फिरत असताना ही घटना घडल्याची शक्यता आहे. वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या खंडूखेडा येथील एका रुग्णावर मध्यप्रदेशमधून येऊन बोगस डॉक्टराने उपचार केल्याचं काटकुंभ येथील प्राथमिक आरोग्य पथकाच्या निदर्शनास आलं आहे. हा बोगस डॉक्टर रुग्णांवर घरातच उपचार करत होता. आरोग्य पथकानी त्याची चौकशी केली असता तेव्हा त्यानी उडवा-उडवीची उत्तर दिली. या प्रकरणी मध्यप्रदेशच्या बैतुल जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दिली असून चिखलदरा पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तक्रार नोंद करण्यात आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य पाटील यांनी दिली. मागील आठवड्यात सेमाडोह येथे एका कोरोनाग्रस्त महिलेचा भूमकाच्या उपचाराने मृत्यू झाला होता.
जिल्ह्यात काल रात्री आलेल्या जोरदार वारे, विजांचा कडकडाटीसह तुरळक पाऊस झाला. चिखली तालुक्यातील धोत्रा भनगोजी या गावाजवळ मध्यरात्री वीज पडून एका जनावरांच्या गोठ्याला आग लागली. यात दोन बैल व एक गाईचा मृत्यू झाला. दगडू अक्कर यांच्या मालकीचा हा गोठा होता. या घटनेत त्यांचं 3 लाख रूपयांचं नुकसान झाल.
बुलढाण्यातील मेहेकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात लसीकरण मोहिमेचे नियोजन व्यवस्थित नसल्यामुळे लस घेण्यासाठी आलेल्यांनी एकच गर्दी केली. यावेळी गर्दी वाढल्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मेहेकर इथल्या ग्रामीण रुग्णालयात कोविशील्ड लसीचे 220 डोस प्राप्त झाले होते. परंतु लस घेण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली. यावेळी पोलिसांना पाचारण करण्यात आलं होतं. आधीच लसीचा तुटवडा, त्यात आपल्याला लस मिळते की नाही हा विचार करुन नागरिकांनी गर्दी केली होती.
मुंबईतील लसीकरण केंद्रांवर आज दुपारी 12 नंतर लसीकरण सुरु होणार आहे. मात्र तरीही लोकांनी पहाटेपासून लसीकरण केंद्रांबाहेर रांगा लावलेल्या पाहायला मिळाल्या. मुंबईत 136 पैकी जी 73 खाजगी लसीकरण केंद्र आहेत त्यातली 40 लसीकरण केंद्र आज बंद आहेत. त्यातही आज दुसरा डोस घेणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार असल्याचं लसीकरण केंद्रावर सांगितलं जात आहे.
सांगली जिल्ह्यात व्हेंटिलेटरची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत होती. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यासाठी 45 नवीन व्हेन्टिलेटर प्राप्त झाली असून त्यापैकी 25 व्हेन्टिलेटर ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास देण्यात येणार आहेत. उर्वरीत 20 व्हेन्टिलेटर जिल्ह्यातील इतर रुग्णालयांना वितरीत करण्यात येणार आहेत.
लॉकडाऊनच्या काळातील नाकाबंदी दरम्यान रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील वाटूळ गावच्या ब्रीजवर राज्य उत्पादन विभागाने मोठी कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 1 कोटी 60 लाख 80 हजाराची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. बुधवारी संध्याकाळी वाटूळ गावच्या ब्रीजवर ही कारवाई करण्यात आली. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या ट्रकची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात दारुचा साठा आढळून आला. याप्रकरणी मूळचा केरळमधील कसारागोड तालुक्यातील 47 वर्षीय चालकाला ताब्यात घेण्यात आलं आहे. दरम्यान बुधवारी संध्याकाळी झालेल्या या कारवाईत कंटेनर, दारु आणि मोबाईलसह जप्त केलेल्या एकूण मालाची किंमत ही 1 कोटी 72 लाख आणि 85 हजार इतकी आहे.
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस कमिश्नर परमबीर सिंह यांच्या लेटबॉम्बनंतर पोलीस दलात आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली होती. परमबीर सिंह यांनी आपल्या पत्रातून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर याप्रकरणी अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर त्याच्याच खात्यातील आणखी एका पोलीस अधिकाऱ्यानं भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. त्यामुळे परमबीर सिंह यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एकूण 33 अधिकाऱ्यांविरोधात 27 कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्यासह 33 जणांवर अकोल्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल केले गेले आहेत. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध 'लेटरबाँब' टाकणारे पोलीस निरीक्षक भिमराव घाटगे यांच्या तक्रारीवरून या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. गुन्ह्यांमध्ये अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्याचाही समावेश केला गेला आहे.
मध्य प्रदेशातील पांढुरनामधून महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील कोपरना या ठिकाणी नेण्यात येणाऱ्या देशी दारुची मोठी खेप राज्य उत्पादन शुल्क विभागाने पकडली आहे. नागपूर जिल्ह्यात पांढुरना-नागपूर मार्गावर गोपनीय माहितीच्या आधारावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली. पकडलेल्या ट्रकमध्ये देशी दारुचे 1000 बॉक्स सापडले असून प्रत्येक बॉक्समध्ये देशी दारुच्या 45 बॉटल म्हणजेच एकूण 45 हजार बॉटल जप्त करण्यात आल्या आहेत. हा सर्व मुद्देमाल 39 लाखांचा असून महाराष्ट्रात लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर ही दारु मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणली जात होती.
ज्येष्ठ नाटककार शेखर ताम्हाणे यांचं कोरोनाने निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात त्यांच्या पत्नीचंही कोरोनामुळेच निधन झालं होतं. शेखर ताम्हाणे यांनी सविता दामोदर परांजपे, तिन्हीसांज या नाटकाचं लेखन केलं होतं. तर वेलकम जिंदगी, दिली सुपारी बायकोची या नाटकाची निर्मिती त्यांनी केली होती.
अमरावती : बहुचर्चित मेळघाटच्या वन परिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण आत्महत्या प्रकरणी मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे निलंबित क्षेत्र संचालक श्रीनिवास रेड्डी यांना अखेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अमरावती पोलिसांनी रात्री उशिरा नागपूरात कारवाई केली. दिपाली चव्हाण यांनी सुसाईड नोटमध्ये लिहलेल्या वरिष्ठ अधिकारी शिवकुमारला याआधीच अटक केली असून श्रीनिवास रेड्डी यांची चौकशी लावली होती. चौकशी झाल्याबरोबर त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली जाईल, असं पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगीतल होतं.
पार्श्वभूमी
राज्यात बुधवारी 63,309 नवीन कोरोना रुग्णांचे निदान, 61181 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात बुधवारी (28 एप्रिल) 63 हजार 309 नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले असून 61 हजार 181 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण 37,30,729 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 83.4 टक्के एवढा झाला आहे. राज्यात काल सर्वाधिक 985 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.5 % एवढा आहे. आतापर्यंत तपासण्यात आलेल्या 26527862 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 4473394 (16.86 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 42,03,547 व्यक्ती होम क्वारंटाईन मध्ये आहेत तर 31 हजार 159 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
सीरमकडून कोरोना लसीची किंमत कमी
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने कोरोना लसीची किंमत कमी केली आहे. सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी ही माहिती ट्विटरवरुन दिली आहे. नवीन किमतीनुसार सीरमची 'कोविशील्ड'ची किंमत राज्य सरकारसाठी आता 400 ऐवजी 300 रुपये प्रति डोस असणार आहे. राज्य सरकारने 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या दृष्टीकोनातून ही मोठी बातमी आहे.
सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या वतीने परोपकारी भाव म्हणून राज्यांना कोरोना लस आता 400 रुपयांऐवजी 300 रुपयांना मिळणार असून याची तत्काळ अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यामुळे राज्यांचे हजारो कोटी रुपये वाचणार असून या निधीमुळे लसीकरण अधिक सक्षम होऊन असंख्य जीव वाचतील, असे ट्वीट सीरमेच सीईओ अदर पुनावाला यांनी केलं आहे.
राज्यातील लॉकडाऊन 15 मे पर्यंत कायम
राज्यात 30 एप्रिलपर्यंत लागू असलेला लॉकडाऊन पुढेही कायम राहणार आहे. 1 मे नंतर पुढील 15 दिवस लॉकडाऊन कायम राहणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. 15 मे पर्यंत राज्यात लॉकडाऊन कायम ठेवण्याची मागणी अनेक मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली. 15 मे पर्यंत लॉकडाऊन कायम ठेवला तर फायदा होऊ शकतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला होता. कोरोनाची साखळी तोडायची असेल तर लॉकडाऊन कायम ठेवणे गरजेचं आहे. मंत्र्यांनी 15 दिवस लॉकडाऊन वाढीचा आग्रह धरला आहे, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच याबाबची घोषणा करतील.
महाराष्ट्रात सरसकट मोफत लसीकरण
कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट अधिक गडद होत असताना देशात आणि राज्यात लसीकरण प्रक्रियेला अतिशय झपाट्याने वेग आला आहे. त्यातच लसीकरणाचा पुढचा टप्पा सुरु होण्यापूर्वीच महाराष्ट्र राज्य शासनाने लसीकरणाबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे राज्यात सर्व नागरिकांचं सरसकट मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. वय वर्ष 18 ते 44 अशा वयोगटातील नागरिकांना लसीकरणाच्या नव्या टप्प्यात 1 मे पासून लस देण्यात येणार आहे. या वयोगटात राज्यात 5 कोटी 71 लाखांहून अधिक नागरिक आहेत. यासाठी तब्बल 12 कोटींच्या लसींची आवश्यकता राज्याला असणार आहे. यासाठीच्या खर्चाचा भार राज्य सरकारवर असणार आहे. लसीकरणाच्या या टप्प्यासाठी राज्य शासनाच्या तिजोरीवर 6 हजार 500 कोटी रुपयांचा भार असणार आहे. पण, कोरोनाविरोधातील या लढ्यात राज्य शासनाने मोठ्या जबाबदारीने हा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -