Breaking News LIVE : पवित्र रमजान महिनाची सुरुवात, उद्या पहिला रोजा, घरातच नमाज पठण करण्याचे सोलापूर शहर काझींचे आवाहन

Breaking News LIVE Updates, 12 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Apr 2021 06:40 AM
पवित्र रमजान महिनाची सुरुवात, उद्या पहिला रोजा, घरातच नमाज पठण करण्याचे सोलापूर शहर काझींचे आवाहन

मुस्लीम धर्मात पवित्र समजल्या जाणाऱ्या रमजान महिन्याला सुरुवात झाली आहे. इस्लाम मान्यतेनुसार शाबान महिन्याची तीस तारीख संध्याकाळी संपल्यानंतर रमजानची सुरुवात झाली. आजपासून तरावीह नमाज पठण केले जाणार आहे. तर उद्या पहिला रोजा असणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती साजरा होत असलेल्या रमजानवर देखील अनेक निर्बंध आले आहेत. नागरिकांनी या निर्बंधाचे पालन करावे. सहेरी, इफ्तार तसेच सर्व नमाज पठण हे घरातच राहून करावे असे आवाहन सोलापूर शहर काझी मुफ्ती अमजद अली यांनी केले. 

मुंबई - गोवा हायवेवर पळस्पेनजीक कारने घेतला पेट

मुंबई - गोवा हायवेवर पळस्पेनजीक कारने घेतला पेट, वाहनचालक सुखरूप, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता, कारमधील सीएनजीचा स्फोट

पालघर  पोलिस अधीक्षक दत्तात्रय  शिंदे यांना कोरोनाची लागण

पालघर  पोलिस अधीक्षक दत्तात्रय  शिंदे यांना कोरोनाची लागण, वसई येथील गोल्डन पार्क  रुग्णालयात पोलीस अधीक्षक  दत्तात्रेय शिंदे  दाखल, तालुका आरोग्य अधिकारी अभिजित खंदारे यांची माहिती

धुळे जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना

धुळे जिल्ह्यात रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या तिघांना धुळे एलसीबीने कारवाई करत ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रेमडेसिवीरसह सुमारे 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दरम्यान रेमडेसिवीर हे इंजेक्शन देवपुरात 16 हजार रुपयात विकले जाणार होते. व्यवहार होण्यापूर्वी एलसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.

गुन्हा दाखल झाल्यावर मेहबूब शेखला का अटक नाही?, औरंगाबाद खंडपीठाचा सवाल

औरंगाबाद : औरंगाबादच्या सिडको पोलीस स्टेशनमध्ये राष्ट्रवादीचे युवक काँग्रेसचे  प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे. आणि या गुन्ह्याच्या तपासावर औरंगाबाद खंडपीठाने ताशेरे ओढले आहेत. गुन्हा दाखल झाल्यावर मेहबूब शेखला का अटक नाही? हा प्रश्न औरंगाबाद खंडपीठाने उपस्थित केला आहे.  त्याबरोबरच औरंगाबाद पोलीस अधिकाऱ्यांना तपासाचे धडे देण्याची गरज असल्याचे ही खंडपीठ म्हणाले आहे. या प्रकरणात प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी 2 आठवड्यात बी समरी रोपोर्ट पिढीतेला द्यावा. पिढीतेने 2 आठवड्यात आक्षेप नोंदवावा. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांनी बी समरी वरील निर्णय गुणवत्तेवर निर्णय घ्यावा असे औरंगाबाद खंडपीठाचे निर्देश  दिले. आरोपीच्या अटकेसाठी पिढीतेन औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे या प्रकरणी कोर्टाने हे ताशेरे ओढले आहेत. 

दहावी बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करा, अरविंद केजरीवाल यांची केंद्राकडे मागणी

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी बोर्डच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्राकडे केली आहे. 

सुशिल चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त

सुशिल चंद्रा यांनी देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार घेतला असून त्यांनी सुनिल अरोरा यांची जागा घेतली आहे. सुशिल चंद्रा यांचा कार्यकाल पुढच्या वर्षी मे पर्यंत असेल.

शरद पवार यांच्या भेटीसाठी अजित पवार आणि सुनेत्रा पवार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचले

उपमुख्यमंत्री अजित पवार पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात पोहोचले आहेत. शरद पवार यांच्यावर कालच यशस्वी शस्त्रक्रिया झाली होती.

धुळे : कुलस्वामिनी एकवीरा देवीचा चैत्र नवरात्रोत्सव भक्तांविना होणार साजरा

महाराष्ट्रातील पाचवे शक्तीपीठ आणि खानदेश कुलस्वामिनी श्री आई एकविरा देवीचा चैत्र नवरात्र उत्सव कोरोनाच्या संकटामुळे तसेच शासनाच्या निर्बंधांमुळे रद्द करण्यात आला आहे. खानदेश कुलस्वामिनी श्री एकवीरा देवी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. तसेच महाराष्ट्रासह परराज्यातून मोठ्या प्रमाणावर भाविकांची दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी होत असते. मात्र यंदाच्या नवरात्र उत्सव रद्द करण्यात आल्याने भाविकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे. तसेच या नवरात्र उत्सवाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल दरवर्षी होत असते, मंदिर परिसरात व्यवसायिकांची मोठ्या प्रमाणात दुकाने थाटली जातात मात्र यंदा व्यवसायिकांनी देखील नाराजी व्यक्त केली असून, कोरोनाच्या संकटाचा नाश होऊ दे अशी प्रार्थना भाविकांकडून देवीच्या चरणी केली जात आहे. 

रत्नागिरी : केंद्रीय नवोदय विद्यालयातील परप्रांतिय विद्यार्थ्यांना राजापूर तालुक्याच्या तहसीलदारांकडून शहानिशा न करता रहिवासी प्रमाणपत्र

रत्नागिरी जिल्ह्यातील केंद्रीय नवोदय विद्यालयाकरता परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्याचं प्रथमदर्शनी समोर आल्यानंतर यामध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. परजिल्ह्यातील या विद्यार्थ्यांना राजापूर तालुक्याच्या तहसीलदारांनी रहिवासी प्रमाणपत्र कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता दिल्याचा आरोप आता पालकांनी केला आहे. विद्यार्थी राजापूर तालुक्यातील कोणत्याही गावातील रहिवासी नाही. त्याचे पालक देखील इथं राहत नाहीत. मग कशाच्या आधारावर संबंधित मुलांना अशाप्रकारची रहिवासी प्रमाणपत्र दिली? असा सवाल यावेळी पालकांनी केला आहे. तसेच या प्रकरणात न्याय न मिळाल्यास आम्ही उपोषण करू असा इशारा देखील यावेळी पालकांनी दिलाय. याबाबत राजापूर तालुक्याच्या तहसीलदार प्रतिभा वाराळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी 'संबंधित विद्यार्थ्यांना दाखला देताना कोणत्याही नियमांचं उल्लंघन झालं नाही. नवोदय विद्यालयानं दिलेला अर्ज, संबंधित शाळेच्या मुख्याद्यापकांनी दिलेला दाखला आणि विद्यार्थी नवोदय विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र आहे या आधारे हे दाखले दिल्याचं म्हणत पालकांचे आरोप फेटाळून लावले आहेत. दरम्यान, परजिल्ह्यातील विद्यार्थ्यांचं नवोदय प्रकरण सध्या जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात गाजत असून त्याप्रकरणात चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून त्याच्या चौकशी अहवालाकडे सर्वाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

अहमदनगरमध्ये कोरोनामुळे दशक्रिया विधी 30 एप्रिलपर्यंत बंद, पुरोहित मंडळाचा निर्णय

वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे अहमदनगरमध्ये होणाऱ्या सर्व दशक्रिया विधी येत्या 30 एप्रिलपर्यंत न करण्याचा निर्णय पुरोहित मंडळींनी घेतला आहे. सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोना दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कोरोनामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण देखील वाढत आहेत. त्यामुळे अमरधाम इथे आणलेला मृत व्यक्ती कोरोनाबाधित आहे की नाही याची माहिती पुरोहितांना मिळत नाही. तसेच अंत्यविधी आणि दशक्रियाविधीसाठी होणऱ्या गर्दीमुळे अमरधाम येथे दशक्रिया विधी करणारे अनेक पुरोहित कोरोनाबाधित झाले आहेत. गर्दीतच विधी करण्यासाठी पुरोहितांवर दबाव आणला जातो. त्यामुळे पुरोहितांचा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत अमरधाममध्ये कोणतेही धार्मिक विधी केले जाणार नाही, असा निर्णय अहमदनगर जिल्हा पुरोहित मंडळाने घेतला आहे.

सिंधुदुर्गात कारीवडे नदीपात्रात आंघोळीसाठी गेलेल्या सात वर्षीय चिमुकल्यावर मगरीचा हल्ला

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीमधील कारिवडे गवळीवाडी इथल्या आराध्य घाडी या सात वर्षीय मुलावर नदीपात्रात मगरीने हल्ला केला. मात्र आराध्यने मगरीच्या मिठीतून शिताफीने आपली सुटका करुन घेतली. आराध्य मित्रासह नदीपात्रात आंघोळीसाठी गेला होता. आंघोळ करत असताना मगरीने त्याच्या दोन्ही पायांचा चावा घेत त्याला पकडले. मात्र आराध्यने धिरोदात्तपणे मगरीशी दोन हात केले. तसेच मित्रांचाही जीव वाचवला. आराध्यच्या दोन्ही पायांचा मगरीने चावा घेतल्याने तो जखमी झाला. त्याच्यावर सावंतवाडीतील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कळसावर गुढी उभारून पाडवा हा सण साजरा

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात कळसावर गुढी उभारून पाडवा हा सण साजरा करण्यात आला , मराठी नववर्षाची सुरवात यावेळी करण्यात आली.मंदिराच्या कळसावर गुढी उभारून पूजा करण्यात आली त्यांनतर देवीला शिवकालीन विशेष अलंकार घालण्यात आले तसेच देवीला साखरेचा हार घालण्यात आला , कोरोनाची संकट दूर व्हावे अशी प्रार्थना यावेळी महंत व पुजारी यांनी केली , कोरोना संकट असल्याने तुळजाभवानी मंदिर बंद असून अत्यंत साधेपणाने गुडीपाडवा हा सण साजरा करण्यात आला.


 
लॉकडाऊनच्या शक्यतेने गावाला परतण्यासाठी परप्रांतीय मजुरांची मुंबईतील LTT स्थानकावर गर्दी

महाराष्ट्रात लॉकडाऊनची शक्यता पाहता परप्रांतीय मजूर आणि रोजगारासाठी मुंबईत आलेले नागरिक आपापल्या गावी निघाले आहेत. मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनसवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. तिकीटाशिवाय पोहोचल्याने स्टेशनवर मोठी गर्दी झाल्याचं चित्र आहे.

एनसीबीचे मुंबईत तीन ठिकाणी छापे, दोन ड्रग तस्करांसह ड्रग्ज जप्त

मुंबईच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने मागील रात्री मुंबईच्या तीन ठिकाणी छापा टाकला. मालाड, परेल आणि सांताक्रूज या परिसरात एनसीबीने ही कारवाई केली. या छाप्यात दोन ड्रग्ज पेडलर्सना ताब्यात घेण्यात आल आणि त्यांच्याकडून ड्रग्जही जप्त करण्यात आलं. यापैकी एका ड्रग तस्कराला पोलीस बनायचं होतं. पण तो ड्रग तस्कर बनला.

औरंगाबादमध्ये सामाजिक संदेश देणारी 15 फुटी गुढी उभी

गुढी पाडव्याच्या निमित्ताने औरंगाबादेतील  कुलस्वामिनी प्रतिष्ठानने  15 फुटी गुढी उभा केली आहे .ही गुढी सामाजिक संदेश देणारी  आहे.  कोरोनाचे संकट दुर करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहावे, असा संदेश देऊन 15 फुटी गुढी उभारली आहे. गुढीसही मास्क लावण्यात आला आहे आणि  कोरोनाचे सर्व नियम पाळणेसाठी  सामाजिक संदेश देऊन सर्वांना काळजी घेणेविषयी विनंती केली आहे. शिवाय औरंगाबाद जिल्याततील पर्यटन स्थळ लक्षात घेता 3 फूट बाय 15 फुट चे कॅनव्हास कपड्यावर चित्र रेखाटली आहेत.  या मध्ये रामकृष्ण मंदिर,बिबी का मकबरा,सोनेरी महल, औरंगाबाद लेणी,मकइ गेट,पाणचक्की  हे पेन्टिंग रेखाटलेआहेत.

बावधनच्या बगाड यात्रेवेळी बंदोबस्तासाठी असलेल्या 2 पोलीस अधिकारी आणि 9 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

साताऱ्याच्या वाई तालुक्यातील बावधनच्या बगाड यात्रेमधील ग्रामस्थांसोबतच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही फटका बसला आहे. दोन पोलीस अधिकारी आणि नऊ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तर बावधनमधील आणखी 14 ग्रामस्थांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बावधनमधील एकूण कोरोना पॉझिटिव्ह ग्रामस्थांची संख्या 75 झाली आहे. 

कोरोनाबाधिताच्या अंत्यविधीला गेलेल्या 77 गावकऱ्यांना कोरोनाची लागण, बुलढाण्यातील पोटा गावातील घटना

बुलढाण्याच्या नांदुरा तालुक्यातील पोटा गावात मृत कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्काराला सामील झालेल्या 150 गावकऱ्यांपैकी 77 जणांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जेमतेम 700 लोकसंख्या असलेल्या पोटा या गावात कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू काही दिवसांपूर्वी झाला होता. कोरोनामुळे मृत्यू झाल्याची गावातील ही पहिलीच घटना आहे. त्याच्या अंत्ययात्रेत गावातील अनेक नागरिक सहभागी झाले होते. त्यानंतर आरोग्य प्रशासनाकडून आणि तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गावातील नागरिकांच्या तक्रारीची दखल न घेतल्याने या गावात कोरोनाचा उद्रेक झालाय, असा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. आता हे संपूर्ण गाव प्रतिबंधित गाव म्हणून घोषित करण्यात आलं आहे. आज या संपूर्ण गावातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार रुपेश खंडारे यांनी दिली आहे.

वीकेंड लाकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी दादर मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी, सोशल डिस्टन्सिगचा फज्जा

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने काही कडक निर्बंध लावले आहेत. मात्र आज सकाळी सलग दुसऱ्या दिवशी मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी भाजी घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली आहे. या गर्दीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले असून अनेकांनी मास्कही घातलेला नाही. या गर्दीमध्ये नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचाही फज्जा उडवलेला आहे. सध्या मुंबई पोलिसांच्या आणि मुंबई महानगर पालिकेच्या माध्यमातून सातत्याने गर्दी न करण्याचं आवाहन केलं जात आहे. मात्र नागरिक याकडे कानाडोळा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 

गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट, यंदाही डोंबिवलीत शुकशुकाट

डोंबिवली गणेश मंदिर संस्थानने मराठी नववर्षाचे स्वागत भव्य यात्रेने करण्याची परंपरा सुरु करुन 22 वर्षे उलटली असून ही परंपरा देशविदेशात पोहोचली आहे. तर डोंबिवली गणेश मंदिर संस्थानचा उत्साह आजही तितकाच आहे. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे स्वागत यात्रेच्या परंपरेत खंड पडला होता. यामुळे यंदा तरी मागील वर्षाची कसर भरुन काढता येईल अशी अपेक्षा होती. यासाठी संस्थानच्या कार्यकर्त्यांसह डोंबिवलीकर उत्साहाने तयारी करत होते. मात्र पुन्हा कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने यंदाही डोंबिवलीकराच्या उत्साहावर विरजण पडले आहे. यंदाही स्वागत यात्रा रद्द करावी लागल्याने दरवर्षी पहाटेपासून गजबजणारे डोंबिवली शहर यंदा मात्र सुनेसुने भासत आहे.

गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील दादरच्या फूल मार्केटमध्ये प्रचंड गर्दी

आज गुढीपाडव्याच्या निमित्ताने मुंबईतील दादर फूल मार्केटमध्ये सकाळीच फुलं घेण्यासाठी नागरिकांनी प्रचंड गर्दी केली आहे. राज्यात करोना रुग्णांची संख्या वाढत असताना ही साखळी तोडण्यासाठी सरकारने यंदाही गुढीपाडवा साध्या पद्धतीने साजरा करण्याचं आवाहन केलं आहे. मात्र दादर फूल मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग कुठेही दिसत नाही. शिवाय मास्क न घातलेल्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे.

सांगलीत रेमडेसिवीर इंजेक्शनचा अत्यल्प साठा, औषध विक्रेत्यांकडे केवळ 199 इंजेक्शन शिल्लक

सांगली जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा अत्यल्प साठा असल्याचं समोर आलं आहे. जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांकडे केवळ 199 रेमडेसिवीर इंजेक्शन शिल्लक असल्याची माहिती राज्य औषध विक्रेता परिषदेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी दिली. कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना रेमडेसिवीर इंजेक्शनची गरज आहे. जिल्ह्यात सध्या 578 जणांची प्रकृती गंभीर असून या रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन मिळावी अशी मागणी केली जात आहे.

गुढी पाडव्या निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुल सजावट

गुढी पाडवा अर्थात चैत्र  प्रतीपदा हिंदू मराठी नवावर्षाच्या पहिल्या दिवस निमित्त आज विठुरायाच्या मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे .  पुणे जिल्ह्यातील भाविक नवनाथ मोरे व नानासाहेब मोरे यांनी ही फुल सजावटीची सेवा दिली आहे . झेंडू , शेवंती , गुलाब , ब्लुचिडी आणि कामिनी या पाच प्रकारच्या पाच टन फुलांनी ही मनमोहक सजावट केली आहे . विठ्ठल रुक्मिणी गाभारा , चौखंबी , सोळखंबी या ठिकाणी ही सजावट केली आहे . सध्या कोरोना नियमांमुळे मंदिरात भाविक मंदिर प्रवेश नसला तरी मंदिराच्या सर्व परंपरा मात्र अखंडित सुरू आहेत .

चंद्रपुरात किरकोळ वादातून सासऱ्याकडून सुनेचा खून

किरकोळ वादातून सासऱ्याने सुनेचा खून केल्याची घटला चंद्रपूरच्या पोंभुर्णा तालुक्यातील चेक नवेगाव इथे सोमवारी रात्री घडली. गीता कन्नाके (वय 32 वर्षे) असं मृत महिलेचे नाव असून काल रात्री पैशांवरुन सासरा-सुनेत वाद झाला. यानंतर आरोपी सासऱ्याने डोक्यात फरशी मारल्याने सुनेचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपी भुजंग कन्नाके (वय 52 वर्षे) याला अटक केली आहे.

माजी आमदार किरण पावसकर यांना पितृशोक

माजी आमदार किरण पावसकर यांचे वडील जगन्नाथ नारायण पावसकर (वय 94 वर्ष) यांचे मालवण आचरा येथील राहत्या घरी वृद्धापकाळाने निधन झाले. प्राथमिक शिक्षक असलेल्या पावसकर गुरुजी यांनी वयाच्या सोळाव्या वर्षीच शिक्षण क्षेत्रात पदार्पण केले होते. 45 वर्षी मुख्याध्यापक म्हणून काम करत असताना विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी विशेष प्रयत्न केले. त्यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला होता. या निमित्त तत्कालीन आमदार अमृतराव राणे यांच्या हस्ते बहिक्षाल शिक्षण केंद्रातर्फे आचरा येथे भव्य सत्कार करण्यात आला होता. सकाळी त्यांना अत्यवस्थ वाटू लागले. उपचार सुरु असताना त्यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. माजी आमदार किरण पावसकर, डॉ शाम पावसकर यांचे ते वडील होत. मालवणमधील आचरा देऊळवाडी येथील स्मशानभूमीत मान्यवरांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

पाणीटंचाईस कारणीभूत विहिरीवर गावकऱ्यांचा हातोडा, वर्ध्यातील उमरी गावातील प्रकार

गावाच्या पाणीटंचाईस कारणीभूत ठरत असलेल्या विहिरीवर गावकऱ्यांनी हातोडा चालवला. पाणी पुरवठा योजनेचं पाणी कमी करण्याचं कारण ठरणारी विहीर बुजवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला. वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यात उमरी (येडे) गावात हा प्रकार घडला. उमरी गावाला नाल्याच्या काठावर असलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. पण या विहिरीजवळ शेतकऱ्याने विहीर खोदली आणि या विहिरीमुळे पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाणी पातळी घसरुन गावात पाणीटंचाई निर्माण होऊ लागली. त्यामुळे ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे तक्रारी केल्या. मात्र तक्रारीनंतरही कारवाई होत नसल्याने गावकऱ्यांनी ती विहिरच बुजवण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या प्रतिनिधींनी याबाबत कारवाईचं आश्वासन दिल्यानंतर गावकरी शांत झाले. पण परवानगीशिवाय पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीपासून जवळच बांधलेली गावाच्या पाणी टंचाईस कारणीभूत विहीर बुजवावी, अशी मागणी ग्रामपंचायतीन केली आहे.

निर्बंध असूनही अर्ध शटर उघडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न, वर्ध्यात आठ दुकान सील आणि दहा हजारांचा दंड

निर्बंध असतानाही वर्ध्यात अनेक व्यापाऱ्यांनी अर्ध शटर उघडून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. गुढीपाडवाच्या पार्श्वभूमीवर दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती. नगरपालिकेच्या पथकामार्फत अशा दुकानांवर कारवाई करण्यात आली. या कारवाईत आठ दुकान सील केली असून दहा हजार रुपये दंड आकारण्यात आला.

नालासोपाऱ्यातील विनायका रुग्णालयात एकाच दिवशी सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

नालासोपाऱ्यातील विनायका रुग्णालयात एकाच दिवशी सात कोरोनाबाधित रुग्ण दगावले. ऑक्सिजनअभावी रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तर रुग्णालय प्रशासनाने याबाबत स्पष्ट नकार देत, रुग्ण दाखल झाल्यावेळीच त्याची प्रकृती नाजूक होती आणि आम्ही उपचार करत असताना दुदैवी मृत्यू झाल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. मात्र सोमवारी (12 एप्रिल) दिवसभरात नालासोपाऱ्यात नऊ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन केलाच तर, त्याला पाठिंबा देण्याचा पुणे व्यापारी महासंघाचा निर्णय

पुण्यातील हाताबाहेर चाललेली परिस्थिती लक्षात घेऊन अखेर पुणे व्यापारी महासंघाने  सरकारने जर संपूर्ण लॉकडाऊन केला तर त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका यांनी सोमवारी रात्री उशिरा ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून हा निर्णय जाहीर केला आणि व्यापाऱ्यांना याची माहिती दिली. त्याचबरोबर मंगळवारी म्हणजे गुढी पाडव्याच्या दिवशी दुकानं बंदच ठेवण्याचा निर्णय देखील व्यापारी महांघाने घेतलाय. पुण्यात लॉकडाऊन करायला व्यापारी महांघाने सुरुवातीपासून कडाडून विरोध केलाय. मात्र मागील आठवड्यात लॉकडाऊनच्या विरोधात नियमभंग करून आंदोलन केल्याबद्दल पोलिसांनी अध्यक्ष फत्तेचंद रांका यांच्यासह अनेक व्यापाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. त्यानंतर व्यापाऱ्यांची भूमिका मवाळ होत गेल्याचं दिसून आलं. आणि आता पुण्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असताना व्यापारी महांघाने सरकारने जर संपूर्ण लॉकडाऊन केला तर त्याला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.

पार्श्वभूमी

कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून गुढी पाडवा, नववर्षाच्या शुभेच्छा


कोरोनावर मात हिच आता आरोग्याची गुढी असेल. त्यासाठी सर्वांनीच एकमेकांची काळजी घ्यावी. कोरोनाला रोखण्यासाठी गर्दी टाळणे, मास्कचा वापर आणि वारंवार हात धुणे ही त्रिसुत्री पाळावी, असं आवाहन करतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी साजरा होणाऱ्या गुढी पाडव्याच्या आणि नववर्ष प्रारंभाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.


शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणाले, कोरोनावर मात करण्यासाठी आपल्या सगळ्यांची एकजूट गरजेची आहे. आरोग्य सेवक, परिचारिका, डॉक्टर्स यांच्यासह विविध यंत्रणातील कोविडयोद्धे अहोरात्र राबत आहेत. त्यांच्या प्रयत्नांना साथ म्हणून गुढी पाडव्याच्या सणादिवशीही आपण घरीच थांबुया. नेहमीच्या प्रथा-परंपरांना थोडं बाजूला ठेवून एकमेकांना शुभेच्छा देऊन सण साजरा करूया. गर्दी नकोच, मास्क अनिवार्य आणि वारंवार हात धुणे या त्रिसुत्रीतून कोरोनावर मात करणे ही आरोग्याची गुढी यावर्षी महत्वाची आहे. यातून येणारे नववर्ष आपल्या सर्वांसाठी आरोग्यदायी, सुख-समृद्धी आणि भरभराट घेऊन येईल, असा विश्वास आहे. या आरोग्यदायी गुढीसाठी आणि मराठी नववर्ष प्रारंभाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


Maharashtra Corona Cases : काहीसा दिलासा! सोमवारी 52312 रुग्णांना डिस्चार्ज तर 51751 कोरोनाबाधितांची वाढ


राज्यात सोमवारी कोरोना रुग्णांचा आकडा कालच्या तुलनेत कमी झाल्याचं पाहायला मिळतंय. महत्वाचं म्हणजे आज डिस्चार्ज झालेल्या रुग्णांची संख्या वाढ झालेल्या रुग्णांच्या तुलनेत जास्त आहे. राज्यात आज 51751 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 52312 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 2834473 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 564746 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


आज राज्यात 258 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं एकूण 58,245 लोकांचा बळी गेला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.94% झाले आहे. पुण्यात आज दिवसभरात 9621 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे तर 86 बाधितांचा मृत्यू झाला आहे. 


छत्री, रेनकोट, ताडपत्री व्यावसायिकांना दिलासा, अत्यावश्यक सेवेच्या यादीत समावेश


कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्याच लाॅकडाऊन लागण्याची शक्यता असताना अत्यावश्यक सेवेत छत्री, रेनकोट आणि ताडपत्री व्यावसायिकांचा समावेश करण्यात आला आहे. पावसाळा सुरु होण्याआधी छत्री, रेनकोट आणि ताडपत्री विकणाऱ्या व्यापाऱ्यांचा सीजन फक्त दोन ते तीनच महिनेच असतो. त्यामुळे या व्यापाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समावेश करत दिलासा देण्यात आला आहे. भिवंडी आणि परिसरात व्यापाऱ्यांचे कारखाने सुरु आहेत. उत्पादन होत असताना माल विकायचा कुठे असा प्रश्न या व्यापाऱ्यांसमोर निर्माण झाला होता. आज व्यापारी वर्गाकडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्यात आली आणि त्यानंतर उपमुख्यमंत्रांकडून हा निर्णय घेण्यात आला असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं आहे. व्यापारी वर्ग, कामगार वर्गाकडून राज्य सरकारच्या या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले आहे. 


मोठ्या प्रमाणात माथाडी कामगारांचेही पोट मुंबईतील छत्री बाजारावर भरत असते. या बाजारात जवळपास 400 दुकाने आहेत. ह्यातील काही दुकानांमध्ये छत्री, रेनकोटचा ठोक माल विकल्या जातो. ज्यात हा व्यवसाय चांगल्या प्रमाणात तीन ते चार महिनेच होत असतो. त्यामुळे जर आता पुन्हा यावर्षी लॉकडाऊनची झळ व्यापाऱ्यांना बसली असती तर मोठं नुकसान झालं असतं असं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आलं. त्यामुळे व्यावसायाचा अत्यावश्यक सेवेमध्ये समावेश झाल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.