Maharashtra Weather Update: राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा उच्चांक दिसत आहे. उन्हाचा चटका असह्य झाला आहे. संपूर्ण विदर्भात 40 अंशांच्या पुढे तापमान गेल्याने धडकी भरेल एवढं तापमान नोंदवलं जात आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही कमाल तापमानाचा पारा 38- 40 अंशानदरम्यान आहे. दरम्यान भारतीय हवामान केंद्राने गुढीपाडव्यापासून आता संपूर्ण राज्यभर अवकाळी पावसाचे इशारे दिले आहेत. (IMD)
दक्षिण मध्य महाराष्ट्रापासून अवकाळी पावसाला आजपासून सुरुवात होणार आहे. मार्चच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 31 मार्चला ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सातारा सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. येलो अलर्ट नसला तरी पुण्यासह मध्य महाराष्ट्र कोकण व मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना हलक्या व मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. 1 एप्रिलला विदर्भ वगळता संपूर्ण महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. 2 एप्रिलला संपूर्ण महाराष्ट्रला अवकाळी पाऊस झोडपणार आहे.
अवकाळी पाऊस कशामुळे येतोय?
हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या अंदमान समुद्रासह आजूबाजूच्या परिसरात कायम आहे परिणामी महाराष्ट्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
31 मार्च: ठाणे पालघर नाशिक नगर धुळे नंदुरबार सातारा सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना यलो अलर्ट.- रायगड रत्नागिरी पुणे सोलापूर बीड छत्रपती संभाजीनगर जळगाव पावसाची शक्यता 1 एप्रिल: ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर सांगली सातारा पुणे नाशिक, नगर जळगाव छत्रपती संभाजी नगर बीड जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती या जिल्ह्यांना येलो अलर्ट. - पालघर सोलापूर धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली नंदुरबार धुळे जिल्ह्यांना पावसाचा इशारा 2 एप्रिल: संपूर्ण महाराष्ट्राला पावसाची शक्यता. मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात यलो अलर्ट
याबाबत पुणे IMD वेधशाळेचे प्रमुख के. एस होसाळीकर यांनी Xपोस्टही केलीय. पहा सविस्तर
पुढील पाच दिवस तापमान कसे राहणार?
गेल्या दोन दिवसांपासून तापमानाचा कहर झाला आहे. आज विदर्भात बहुतांश ठिकाणी 40° चा वर तापमान आहे. चंद्रपुरात 42 अंश तापमानाची नोंद आज झाली असून नागपूर 41.8 वर्धा 41.9 अकोला 41 अंश आहे. मध्य महाराष्ट्रात 38 ते 40 अंश सेल्सिअस पर्यंत तापमानाचा पारा गेलाय. साताऱ्यासह पुण्यात 38.4 अंश सेल्सिअस, मराठवाड्यात छत्रपती संभाजी नगर 37.7° परभणी 39.8 तर बीड 39.6°c तापमानाची नोंद झाली. येत्या 2 दिवसात तापमान दोन ते तीन अंशांनी कमी होणार आहे. मध्य महाराष्ट्रात सध्या फारसा बदल नाही पण येत्या दोन दिवसात दोन ते तीन अंशांनी तापमान घसरणार आहे. मराठवाडा आणि विदर्भातही तापमान घसरणार असलं तरी कमाल तापमान 39 - 41°c पर्यंत राहणार आहे.
हेही वाचा:
ABP Majha Marathi News 4 PM Top Headlines 4 PM 29 March 2025 संध्याकाळी 4 च्या हेडलाईन्स