Myanmar Thailand Earthquake Video : म्यानमार आणि शेजारील थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या सातत्याने वाढत आहे. या भूकंपाचे धक्के भारत आणि चीनमध्येही जाणवले. दोन्ही देशांनी मिळून 1 हजार लोकांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे, तर यूएस भूवैज्ञानिक संस्थेने 10 हजारांहून अधिक मृत्यूची भीती व्यक्त केली आहे. वृत्तसंस्था एएफपीच्या वृत्तानुसार, म्यानमारच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी सकाळी झालेल्या विनाशकारी भूकंपात मृतांची संख्या एक हजार झाली आहे, तर 2300 लोक जखमी झाले आहेत. मात्र, बँकॉकच्या अधिकाऱ्यांनी आता थायलंडमध्ये शुक्रवारी झालेल्या भूकंपातील मृतांची संख्या कमी केली आहे. थायलंडने मृतांच्या संख्येचा अपडेटेड अहवाल दिला आहे, ज्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आहे. त्याचवेळी 22 जण जखमी झाले असून 101 लोक बेपत्ता असल्याची माहिती आहे. याआधी शुक्रवारी मृतांची संख्या 10 होती.
चिमुकल्याला शेवटपर्यंत सोडलं नाही!
भूकंपामधील अंगावर शहारे आणणारे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. थायलंडमध्ये अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. दिवसा झालेल्या भूकंपाने अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामधील सर्वाधिक हृदयद्रावक व्हिडिओ चीनमधील आहे. म्यानमार आणि थायलंडमध्ये आलेल्या भूकंपाने चीनमधील यूनान, रुईली प्रांतातही धक्के बसले. याच प्रांतातील दोन नर्सचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. Jingcheng Hospital मधील नवजात बालक विभागात दोन नर्स नवजात बालकांची काळजी घेताना दिसून येत आहेत. या दरम्यान, भूकंप आल्यानंतर एका नर्सनं हातात असलेल्या चिमुकल्या बाळाला साक्षात मृत्यू दिसत असतानाही हातातून सोडलं नसल्याचे दिसून येते. नर्स पहिल्यांदा बेडला पकडून राहते. हादरे जास्त बसू लागताच तिचा तोल जातो तरीही त्या नर्सने बाळाला हातातून सोडलं नसल्याचे दिसून येते.
दरम्यान, थायलंडची राजधानी आपत्तीग्रस्त क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तर म्यानमारच्या हुकूमशाही लष्कराने भूकंपग्रस्त भागात आणीबाणी लागू केली आहे. म्यानमारच्या लष्करी सरकारचे प्रमुख जनरल मिन आंग हलाईंग यांनी देशाच्या सरकारी टेलिव्हिजनवर सांगितले की त्यांनी कोणत्याही देशाला मदत आणि देणगी देण्यास आमंत्रित केले आहे. भूकंपामुळे मोठ्या प्रमाणात लोकांचे प्राण गमवाल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे. युनायटेड स्टेट्स जिऑलॉजिकल सर्व्हे (USGS) ने अहवाल दिला की भूकंपाची खोली 10 किमी होती. आज सकाळी आपल्या ताज्या अहवालात USGS ने 10 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
भीषण भूकंपाबद्दल प्रत्यक्षदर्शी काय म्हणाले?
भूकंपाबद्दल प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अचानक इमारती जोराने हादरायला लागल्या आणि गोंधळ उडाला. हजारो लोक रस्त्यावर आले. सर्वजण गोंधळात पडले होते. बँकॉकमध्ये लोक त्यांच्या कार्यालयातून, घरातून आणि मॉलमधून बाहेर पडले. छतावर बांधलेल्या स्विमिंग टँकमधून पाणी वाहत होते आणि लोक पूर्णपणे घाबरले होते. त्यावेळी भूकंपाचे धक्के सतत येत होते. बँकॉकमधील एका स्कॉटिश पर्यटकाने सांगितले की, "अचानक संपूर्ण इमारत हादरू लागली. लोक ओरडत होते आणि इकडे तिकडे धावत होते." मंडाले, म्यानमारमधील अनेक छायाचित्रे आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये तुटलेली घरे आणि तुटलेल्या इमारती दिसत आहेत. म्यानमारमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धामुळे, मृत्यूची खरी संख्या कधीच पूर्णपणे उघड होऊ शकत नाही. याशिवाय गृहयुद्धामुळे मदत आणि बचाव कार्य आणखी कठीण झाले आहे.
याशिवाय, बीबीसीच्या रिपोर्टमध्ये, तुरुंग प्रशासनाच्या जवळच्या एका सूत्राने म्हटले आहे की, म्यानमारच्या तुरुंगात असलेल्या नेत्या आंग सान सू पूर्णपणे सुरक्षित आहेत. भूकंपाचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्या राजधानी नेपीडावच्या तुरुंगात आहेत. आंग सान सू यांना 2021 मध्ये लष्करी बंडानंतर अटक करण्यात आली होती आणि त्यांना वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये 50 वर्षांपेक्षा जास्त तुरुंगवासाची शिक्षा झाली आहे. याशिवाय म्यानमारमध्ये मदत आणि बचाव कार्यात मदत करण्यासाठी 37 लोकांचे आपत्ती प्रतिसाद दल म्यानमारला पाठवले असल्याचे चीनने म्हटले आहे. चीनच्या युनान शहरातून पाठवण्यात आलेल्या या टीमने आपत्कालीन बचाव उपकरणांचे 112 संच आणले आहेत, ज्यात भूकंपपूर्व इशारा देणारी यंत्रणा, ड्रोन आणि पोर्टेबल उपग्रह यांचा समावेश आहे.
इतर महत्वाच्या बातम्या