Breaking News LIVE : 'योग्य पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या', काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र

Breaking News LIVE Updates, 12 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 12 Apr 2021 06:25 AM
परभणीत वादळी वारे,विजांच्या गडगडाटासह पाऊस

परभणीत वादळी वारे,विजांच्या गडगडाटासह पाऊस, अवकाळी पाऊस आणि वाऱ्यामुळे फळपीक आणि आंब्याचे मोठे नुकसान होण्याची शक्यता 

भिंवडी शहरात एकतर्फी प्रेमातून मुलीचे ओठ कापले, दाताने चावून ओठ कापले

भिवंडी शहरात एकतर्फी प्रेमातून मुलीचे ओठ कापले, दाताने चावून ओठ कापले, शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना, मुलीला लग्नासाठी केली होती मागणी, मुलीने व नातेवाईकांनी लग्नासाठी दिला होता नकार, मुलीवर केईम रुग्णालयात उपचार सुरू, शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बुलडाणा : नांदुरा तालुक्यातील पोटा गावात कोरोनाचा कहर

बुलडाणा : नांदुरा तालुक्यातील पोटा गावात कोरोनाचा कहर, गावातील एका कोरोनाबाधिताच्या अंत्यसंस्कारात गेलेल्या 150 पैकी 77 जणांना कोरोनाची लागण, संपूर्ण गाव प्रतिबंधित गाव म्हणून घोषित

"योग्य पात्रता असलेल्या सर्व लसींना परवानगी द्या", काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचे पंतप्रधानांना पत्र

राज्यांना लस पुरवताना त्या त्या राज्यातल्या सक्रिय केस आणि भविष्यातला संभाव्य ग्राफ लक्षात घेऊन पुरवठा करा. कोरोनाशी संबंधित सर्व मेडिकल वस्तूंवरचा जीएसटी माफ करा. सध्या वेंटीलेटर, ऑक्सीजन सिलेंडर यासह रेमडीसिविर आणि इतर औषधांवरही जीएसटी लागू होतो. पुन्हा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. पण असं करण्याआधी सहा हजार रुपये गरिबांच्या खात्यात जमा करा, असे सोनिया गांधींनी पत्रात म्हटले आहे. 

पुण्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या भेटीला

पुण्यातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या भेटीला.. शहरातील वाढत्या कोरोनाच्या संकटात नागरिकांना योग्य आणि पुरेशा आरोग्य सुविधा  मिळाव्यात यासंदर्भात  भेट, भाजपा पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ आणि लोकप्रतिनिधी यांनी घेतली भेट

गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली

गुढीपाडवा सणानिमित्त राज्य सरकारची नियमावली, सकाळी 7 ते सायंकाळी 8 पर्यंत साधेपणाने गुढीपाडवा सण साजरा करणे अपेक्षित, कोणतीही मिरवणूक अथवा बाईक रॅली काढण्यास बंदी, सार्वजनिक ठिकाणी पाच पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येऊ नये

पुण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात.

पुण्यात विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात 

केडीएमसीला 12 हजार लसींचा पुरवठा, पालिकेच्या 9 सेंटरवर लसीकरण सुरू

कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य विभागाला शासनाकडून 12 हजार लसी देण्यात आल्या असून आज महापालिकेची दोन लसीकरण सेंटर सुरू असली तरी उद्यापासून पालिकेच्या सर्व 9 सेंटर वर लसीकरण केले जाणार आहे तर 16 एप्रिल रोजी लसीचा पुढचा साठा दिला जाणार असून त्यांनतर मान्यता दिलेल्या 13 खाजगी रुग्णालयांना लसीचे वाटप केले जाईल. मात्र पहिल्या टप्प्यात खाजगी रुग्णलयात  कोव्हक्सींन लस घेतलेल्या नागरिकांसाठी या लसीचा दुसरा डोस उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांनी सांगितले. 

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, 10वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, 10वी आणि 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलल्या, दहावीची परीक्षा जूनमध्ये तर बारावीची परीक्षा मे अखेरीस होणार, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती

दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता

शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठक संपली. राज्यात लागणाऱ्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक बदलण्याची शक्यता आहे. परीक्षांची तारीख पुढे ढकलली जाण्याची शक्यता आहे.

जेजुरीच्या खंडेरायाचा सोमवती उत्सव, धार्मिक विधींसह साधेपणाने साजरा

जेजुरी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खंडेरायाचा सोमवती उत्सव, धार्मिक विधींसह साधेपणाने साजरा करण्यात आला आहे. कोणतीही गर्दी न करता उत्सव मूर्तींना कऱ्हा स्नानासाठी गाडीतून घेऊन पारंपरिक पद्धतीने सोहळ्याचे नियोजन करण्यात आले. या सोहळ्यात गर्दी होऊ नये म्हणून देवाचे मानकरी पुजारी यांच्यासह पोलीस प्रशासनाचाही कडेकोट बंदोबस्त करण्यात आला होता. 


 
वाढदिवसाच्या दिवशीच कोरोना बाधिताचा मृत्यू 50 वर्षीय बाधिताचा मृत्यू

साताऱ्यातील वाई येथील घटना.  वाढदिवसाच्या दिवशीच 50 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू. वाढदिवसा दिवशीच अंत्यसंस्कार करण्याची वेळ. कोरोना बाधित खाजगी रूग्णालयात घेत होता उपचार. सदर घटनेमुळं नातेवाइकांवर शोककळा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कॅण्ड रुग्णालयात  यशस्वी लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पक्षाचे प्रवक्त नवाब मलिक यांनी दिली.

माहिती आणि जनसंपर्क विभागातील उपसंपादक संगीता बिसांद्रे यांचं कोरोनामुळे निधन

माहिती आणि जनसंपर्क विभागातील संगीता बिसांद्रे यांचं कोरोनामुळे निधन झालं. संगीता बिसांद्रे मंत्रालयात उपसंपादक पदावर काम करत होत्या. कोरोनामुळे माहिती आणि जनसंपर्क विभागातील हा तिसरा मृत्यू आहे. याआधी पुणे येथील राजेंद्र सारंग आणि नाशिक येथील राजेंद्र येवले यांचा कोरोनाने मृत्यू झाला होता.

एबीपी माझाच्या बातमीचा परिणाम, बुलढाण्याच्या मलकापुरातील स्मशानभूमीतील पाहणी करुन दुरुस्तीला सुरुवात

बुलढाण्याच्या मलकापुरातील स्मशानभूमीतील मृतदेह भटके कुत्रे रस्त्यावर आणत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ही बातमी एबीपी माझाने दाखवल्यानंतर प्रशासनातील बडे अधिकारी पाहणी करण्यासाठी  स्मशानभूमीत पोहोचले आहेत. उपविभागीय अधिकारी, नगराध्यक्ष, नगर परिषद मुख्याधिकारी, नगरसेवक इत्यादी अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी स्मशानभूमीची पाहणी करत वस्तुस्थिती जाणून घेतली आणि दुरुस्तीला सुरुवात केली. 

सोलापूरात दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाऊन नंतर पुन्हा नियमांचा फज्जा

दोन दिवसाच्या विकेंड लॉकडाऊन नंतर पुन्हा नियमांचा फज्जा. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लोकांची झुंबड. पहाटेपासून भाजीपाला खरेदि-विक्री साठी मोठी गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा

रुग्णांची शोधमोहीम आणि देखरेखीत यंत्रणा अपयशी : केंद्रीय पथकाचा अहवाल

रुग्णांची शोधमोहीम आणि देखरेखीत यंत्रणा अपयशी ठरल्या असून महाराष्ट्राच्या कोरोना व्यवस्थापनात त्रुटी आहे, असा ठपका केंद्रीय आरोग्य पथकाने आपल्या अहवालात ठेवला आहे. तसंच केंद्रीय आरोग्य सचिवांनी  राज्याला पत्र पाठवून आरोग्य यंत्रणेला सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने बेळगावातील कापड व्यापाऱ्याला लाखोंचा फटका

बेळगावात वळीवाच्या पावसामुळे कापड दुकानात पाणी शिरून लाखो रुपयाचे नुकसान झाले. रस्त्याचे काम व्यवस्थित झाले नसल्याने पावसाचे पाणी दुकानात शिरल्याने व्यापाऱ्याला आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. शहापूर मुख्य बाजारपेठेत असलेल्या श्रीमती या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने साड्या आणि कपड्याचे मोठे नुकसान झाले आहे. कोरोनामुळे सध्या सगळ्याच व्यवसायांना फटका बसला आहे. त्यात पावसाचे पाणी शिरुन लाखोंचे नुकसान झाल्यामुळे व्यापाऱ्याला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत रस्ता गटारी आणि ड्रेनेज लाईनचे काम करण्यात आले आहे. रस्त्यावरील पावसाचे पाणी जाण्यास मार्ग नसल्याने सखल भागात असलेल्या दुकानात पाणी शिरत आहे. स्मार्ट सिटी योजनेतील कंत्राटदार आणि अधिकारी यांचे समन्वय नसल्याने हा प्रकार घडला आहे.

मनमाडमध्ये संचारबंदीतही बाहेर फिरणाऱ्यांची अँटिजन टेस्ट, अहवाल पॉझिटिव्ह आल्यास थेट कोविड सेंटरमध्ये रवानगी

सरकारच्या नियमानुसार रात्री आठ वाजल्यानंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यानंतर रस्त्यांवर फिरणाऱ्यांवर जरब बसावी म्हणून मनमाड मध्ये पोलीस, पालिका प्रशासनाने आरोग्य विभागाच्या पथकाला सोबत घेत आगळा-वेगळा उपक्रम राबवायला सुरुवात केली आहे. रात्रीची संचार बंदी असतानाही अनेक जण शहरात गाड्यांवर फेरफटा मारत असल्याचे लक्षात आलं. त्याला आळा बसावा म्हणून पोलीस रस्त्यावरुन फिरणाऱ्यांना पकडून त्यांची आरोग्य विभागाच्या पथकामार्फत जागीच अँटिजन टेस्ट करुन त्यांचे रिपोर्ट तपासले जात आहेत. एखाद्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर त्याची रवानगी थेट कोविड सेंटरमध्ये केली जात आहे. तर निगेटिव्ह रिपोर्ट असणाऱ्यांवर विनाकारण फिरत असल्याने दंडाची कारवाई केली जात आहे. यामुळे रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसणार आहे. 

लातूर : जिल्ह्यातील 35 खासगी कोविड रुग्णालयांपैकी 30 रुग्णालयांत रेमडेसिवीर उपलब्धच नाही

लातूर जिल्ह्यात 10 हजार पेक्षा जास्त अॅक्टिव्ह करोना रुग्ण संख्या आहे. दररोज यात भरच पडत चालली आहे. आजमितीला जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्ण 10160 आहेत. त्यापैकी होम आयोसोलेशन अॅक्टिव्ह रुग्ण संख्या ही 7206 आहे. तर 1350 रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. काल संध्याकाळपर्यंत जिल्ह्यात 28 रेमडेसिवीरचा साठा होता. रुग्णाची स्थिती पहाता इतका अत्यल्प साठा शिल्लक असल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक प्रचंड धावपळ करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील 30 दवाखान्यात तर एकही इंजेक्शन शिल्लक नव्हते. ज्या पाच दवाखान्यात साठा शिल्लक होता, तो ही कमी असल्यामुळे पुढे काय करायचे असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शासकीय रुग्णालयात साठा आहे, मात्र तो तेथील रुग्णांपुरता असल्यामुळे खासगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांचे काय असा प्रश्न मात्र अनुत्तरित आहे. 

मुंबईतील वाकोला पोलीस स्टेशनचे पीएसआय मोहन दगडे यांच कोरोनामुळे निधन

मुंबईतील वाकोला पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक मोहन दगडे (वय 54 वर्ष) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना बीकेसी कोविड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र प्रकृती खालवल्याने त्यांना आयसीयूमध्ये हलवण्यात आलं. मात्र आज पहाटे 3.30 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

साताऱ्यातील बावधनची बगाड यात्रा अंगलट, यात्रेनंतर गावातील 61 जण कोरोना पॉझिटिव्ह

साताऱ्यातील बावधनची बगाड यात्रा अंगलट आल्याचं चित्र आहे. यात्रा झाल्यापासून गावात 61 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. तर वाई तालुक्यातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.

डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन

पालघर जिल्ह्यातील डहाणूचे भाजपचे माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन झालं. मुंबईच्या नानावटी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दहा दिवसांपासून त्यांच्यावर वापीमधील रेम्बो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. रात्री अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना मुंबईत हलवण्यात आलं. मात्र इथे त्यांची प्राणज्योत मालवली. दरम्यान काल भाजपा जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण वरखंडे तर आज माजी आमदार पास्कल धनारे यांचं कोरोनामुळे निधन झालं.

लॉकडाऊनच्या भीतीने परप्रांतीय मजूरांची गावी जाण्यासाठी धावपळ; मुंबईतील कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर गर्दी

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मिनी लॉकडाऊननंतर ही कोरोनाचा आकडा वाढत असल्याने सरकार लॉकडाऊन करण्याच्या विचारात असल्याने पुन्हा एकदा लॉकडाऊनची टांगती तलवार राज्यावर आहे. कडक निर्बंधांमुळे आधीच अनेक व्यवसाय ठप्प झाल्याने कामगार बेरोजगार झाले आहेत. त्यातच  पुन्हा एकदा लॉकडाऊन झाल्यास गेल्यावेळीप्रमाणे पुन्हा फरफट होऊ नये म्हणून मुंबईच्या कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्सवर रात्री परप्रांतिय मजुरांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली. लॉकडाऊन झाल्यास गेल्यावर्षीसारखी वाईट परिस्थिती ओढावू शकते या भीतीने आता मुंबईत वास्तव्याला असणाऱ्या परराज्यातील कामगारांनी गावी परतण्यासाठी कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनल्स रेल्वे स्थानक गाठलं आहे. 

भटक्या कुत्र्यांकडून स्मशानभूमीतील मानवी अवयव रस्त्यावर, बुलढाण्याच्या मलकापुरातील धक्कादायक प्रकार

बुलढाण्यातील मलकापूरमधल्या सर्वधर्मीय स्मशानभूमीतला धक्कादायक प्रकार समोर आला आहे. स्मशानभूमीतील मानवी अवयव रस्त्यावर येत आहे. स्मशानभूमीत जागा अपुरी पडत असल्याने दफन केलेले पार्थिव भटकी कुत्रे उकरुन काढून रस्त्यावर आणत आहेत. कोरोना काळात मृतांचा आकडा वाढल्याने कमी जागेत होतो दफनविधी केला जात आहे. दरम्यान मृतदेहांची अवहेलना होत असल्याने नागरिकांसह नगसेवकही संतप्त झाले असून सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी करत आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांना खुर्चीवर बसवून ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपचार, उस्मानाबादरमधील विदारक चित्र

सार्वत्रिक रुग्ण संख्या वाढत चालल्याने प्रशासनाची तारांबळ उडताना दिसत आहे. जमेल तसा प्रयत्न करुन रुग्णांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. हे दोन फोटो उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयातले आहेत. उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयातील कोरोना उपचार केंद्रातील विदारक चित्र तयार झाले आहे. दोन ज्येष्ठ कोरोनाग्रस्त रुग्णांना खुर्चीवर बसवून ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपचार केल्याचे फोटो व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहिल्यावर कोरोना उपचार केंद्रात कशाप्रकारे रुग्णांची गर्दी आणि यंत्रणेची तारांबळ होत आहे हे स्पष्ट झाले आहे. शनिवारीपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात बेड न मिळाल्याने अनेक रुग्णांना अशाप्रकारे उपचार घ्यावे लागत असल्याची स्थिती सांगणारे फोटो मन पिळवटून टाकणारे आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करणे आणि लक्षणे आल्यावर ताबडतोब डॉक्टरांशी सल्ला साधून उपचार घेणे गरजेचे आहे. जिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.

बुलढाण्यात पहाटेपासूनच पावसाची हजेरी, वातावरणात गारवा

बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर, जळगाव जामोद तालुक्यात पहाटेपासून वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. कालपासून परिसरात ढगाळ वातावरण असल्याने आज सकाळी 5 वाजल्यापासून सुरु झालेल्या जोरदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.

खेड, चिपळूणमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, पोसरे गावातील घरांचे मोठं नुकसान

खेड, चिपळूण तालुक्यात रविवारी सायंकाळी वादळीवाऱ्यासह पडलेल्या मुसळधार पावसाने अनेक गावांना झोडपून काढले. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका पोसरे गावाला बसला. या गावातील अनेक घरांची पडझड झाली तर तर काही घरांवर झाडे तुटून पडली. अनेकांच्या घरांचे लाखोंचे नुकसान झाले. याच गावातील शाहिद खेरडकर यांच्या घरावर झाड कोसळून घराचे मोठं नुकसान झालं. तर त्याच घरात लग्नसमारंभ होते त्याठिकाणी लग्नाचा मांडव कोसळून लाखो रुपयांचे नुकसान झाले.

तळकोकणातील वैभववाडीत अवकाळी पावसाच्या हलक्या सरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडीत रविवारी रात्री अवकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. त्यामुळे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा सुखद गारवा मिळाला.
गेल्या काही दिवसापासून उष्णतेमध्ये कमालीची वाढ झाली होती. सकाळपासूनच दिवसभर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यात पुढील काही दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील राहत्या घरी भेट घेतली

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर येथील राहत्या घरी भेट घेतली. या भेटीचा फोटो हर्षवर्धन पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. ही भेट इंदापूर तालुक्यातील बावडा येथील  हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी झाली. देवेंद्र फडणवीस पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने जात असताना इंदापूरमधील हर्षवर्धन पाटील यांच्या घरी भोजनासाठी थांबले होते. त्यानंतर वार्तालाप करतानाचा फोटो राजवर्धन पाटील यांनी इन्स्टाग्रामवर अपलोड केला आहे. या फोटोत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, हर्षवर्धन पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री पाटील तसेच जिल्हा परिषद सदस्य अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या आज पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात सहा सभा आहेत, त्या सभांना जात असताना देवेंद्र फडणीस यांनी हर्षवर्धन पाटील यांची भेट घेतली.

गडचिरोली पोलिसांची संवेदनशीलता, जखमी नक्षलवाद्यावर उपचार; डिस्चार्ज मिळाल्यावर कायदेशीर कारवाई करणार

29 मार्च रोजी खोब्रामेंढा चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी आपल्या काही साथीदारांना जखमी अवस्थेत सोडून पळ काढल्याचे समोर आले होते. आसपासच्या गावांमध्ये शोध अभियान राबवल्यानंतर टीपागड दलमचा उपकमांडर किशोर कवडो याला शोधण्यात पोलिसांना यश आले आहे. कटेझरी गावातील कट्टर नक्षल समर्थकांच्या घरी पायाला गोळी लागलेल्या अवस्थेत किशोर कवडो लपून होता. पोलीस दलाने गावाला घेराव घालत किशोरला प्राथमिक उपचारानंतर नागपुरात दाखल केले होते. किशोरची प्रकृती आता उत्तम असून रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. पोलिसांनी नक्षल समर्थक गणेश कोल्हेला अटक केली आहे. दरम्यान जखमी नक्षली किशोर कवडो याच्यावर 16 लाखांचे बक्षीस होते. विविध नक्षल गुन्हे, जाळपोळ प्रकरणात पोलीस किशोरच्या मागावर होते.

पार्श्वभूमी

राज्यात कोरोनाचं थैमान, रविवारी राज्यात विक्रमी 63,294 नवीन रुग्णांचे निदान


कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोज नवनवीन उच्चांक गाठत आहे. राज्यात कोरोनाची स्थिती अधिक गंभीर होताना दिसत आहे. कारण रविवारी राज्यात कोरोना रुग्णांच्या उच्चांकांची नोंद झाली आहे. रविवारी 63 हजार 294 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात शनिवारी 55 हजार 411 नवीन रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी, 34 हजार 008 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 349 रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.7 टक्के एवढा आहे. 


मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबतची बैठक; ऑक्सिजन उपलब्धता, वैद्यकीय सुविधा  वाढवण्यावर कार्यवाही करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश


राज्यातील कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्ससोबत महत्त्वाची बैठक पार पडली. कोरोनाच्या मोठ्या लाटेला थोपवण्यासाठी राज्यात कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन प्लान्टची उभारणी, बेड्स व इतर वैद्यकीय सुविधा वाढवणे, रेमडेसिवीर उपलब्ध करणे, लसीकरण वाढवणे व विशेषत: सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देणे यादृष्टीने तत्काळ कार्यवाही व्हावी. तसेच लसीकरण वाढवण्यासाठी महाराष्ट्राला अधिक लसींचा पुरवठा व्हावा अशी विनंती परत एकदा आपण पंतप्रधानांना करणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.


Remdesivir Injection | रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली, भारत सरकारचा मोठा निर्णय


कोरोनाच्या वाढत्या संक्रमणानंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा राज्यात जाणवत होता. रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मोठी धावपळ करावी लागत आहे. हीच परिस्थिती लक्षात घेत भारत सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. भारत सरकारने रेमडेसिवीर इंजेक्शनची निर्यात थांबवली आहे. देशातील कोरोना स्थिती सुधारेपर्यंत हे आदेश लागू असणार आहेत. स्थानिक कंपन्या ज्या रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन करतात त्यांना इंजेक्शनच्या साठ्याविषयीची माहिती वेबसाईटवर ठेवावी लागणार आहे. तसेच कोणत्या डीलरकडून डिस्ट्रिब्युशन होत आहे त्याची माहितीही कंपन्यांना द्यावी लागणार आहे.


राज्यात 14 एप्रिलनंतर लॉकडाऊन? टास्कफोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांची माहिती, मुख्यमंत्र्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरुच


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्सची बैठक संपली आहे. 14 एप्रिलनंतरच्या कॅबिनेटमध्ये लॉकडाऊनचा निर्णय होणार आहे, अशी माहिती टास्क फोर्सच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे या बैठकीनंतर राज्यातल्या सर्व आयएएस अधिकाऱ्यांशी मुख्यमंत्री बातचीत करणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात आज सकाळी बैठक होण्याची शक्यता आहे. 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.