Breaking News LIVE : राज्यात आज 6026 रुग्ण कोरोनामुक्त, तर 8296 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
Breaking News LIVE Updates, 10 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
राज्यात आज 6026 रुग्ण कोरोनामुक्त, तर 8296 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, गेल्या 24 तासात 179 कोरोना रुग्णांचा मृत्यू तर सध्या राज्यात 1,14,000 ॲक्टिव्ह रुग्ण
कला दिग्दर्शक राजेश सापते आत्महत्या प्रकरण : अटकेत असलेल्या दोघांच्या पोलीस कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ. सापते यांचे व्यावसायिक भागीदार चंदन ठाकरे आणि मिस्त्री नरेश विश्वकर्मा हे दोघे अटकेत आहेत. मात्र मुख्य आरोपी लेबर युनियनचा राकेश मौर्य, गंगेश श्रीवास्तव उर्फ संजुभाई आणि अशोक दुबे हे तिघे अद्याप फरार आहेत. आत्महत्येला आठ दिवस उलटून ही मुंबई आणि पिंपरी चिंचवड पोलिसांच्या हाती ते लागलेले नाहीत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजपासून दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. राज ठाकरेंच्या हस्ते उद्या सकाळी साडे अकरा वाजता मनसेच्या पुण्यातील नवी पेठेत तयार करण्यात आलेल्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर इतर पक्षांतील कार्यकर्ते देखील भाजपमधे प्रवेश करणार आहेत.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात शेतात काम करत असताना विज पडून 2 मजूरांचा मृत्यू तर दोनजण जखमी. शनिवार दुपारीची घटना.
नागपूरचे सामाजिक कार्यकर्ते व जलअभ्यासक प्रवीण महाजन यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ दिला जाणारा ‘जलभूषण पुरस्कार’ महाराष्ट्र शासनाकडून जाहीर करण्यात झाला आहे. जलसंपदा, मृद व जलसंधारण तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता या क्षेत्रात रूट लेव्हलवर उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तिंना हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. ‘जलक्रांतीचे जनक’ महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री डॅा. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीच्या पूर्व संध्येला 13 जुलै रोजी मुबंईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे हस्ते हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे
बंडातात्या कराडकर यांना पायी वारीसाठी स्थानबद्ध केले असले तरी त्यांच्या सहकारी वारकऱ्यांनी केली पायी वारी पूर्ण. 8 दिवसांत आले आळंदी ते पंढरपूर.
रायगड - कर्जतजवळ वर्षा पर्यटनासाठी आलेले तीन जण बुडाले, कर्जत जवळील डिकसळ येथील पाली- भूतवली धरणात तीन पर्यटक बुडाले, बुडालेल्या पर्यटकांच्या शोधासाठी बचाव पथके रवाना
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून हलका आहार घेण्यास सुरुवात झाली आहे. व्हिडीओ कॉल वरून ते कुटुंबियांशी बोलले आहेत. प्रकृती स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही असे डॉक्टरांनी कळवले असल्याचं वंचित बहुजन आघाडीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी कळवलं आहे.
बारामतीच्या काटेवाडीत पार पडणारा मेंढ्यांचा रिंगण सोहळा यंदा देहूतील संत तुकाराम महाराजांच्या मंदिरात पार पडला. इतिहासात पहिल्यांदाच हा रिंगण सोहळा मंदिरात पार पडला. कोरोनामुळं पालखी सोहळा हा मंदिरातच मुक्कामी आहे. त्यामुळे संस्थानने यंदा रिंगण सोहळा मंदिरातच घेण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक वर्षी बारामतीच्या काटेवाडीत दुपारच्या विसावा झाला की पालखी गावाबाहेर येते. धनगर समाजाचे मेंढपाळ आपल्या मेंढ्यांना घेऊन तिथं पोहचलेले असतात. मग सर्व मेंढ्या पालखी रथाला तीन प्रदक्षिणा घालतात. व्यवसायात भरभराट यावी आणि रोगराईपासून मेंढ्यांचे संरक्षण व्हावे या श्रद्धेपोटी हे रिंगण घातले जाते. गेल्या वर्षी यात खंड पडला होता, यंदा मात्र थेट मंदिरातच हा ऐतिहासिक रिंगण पार पाडण्यात आला. तुकोबांच्या पालखी सोहळ्यातील हा अविस्मरणीय असा क्षण आहे.
सातारा जिल्हा बँकेला ईडीची नोटीस, जरंडेश्वर साखर कारखाना कर्ज प्रकरणाची होणार चौकशी, सातारा जिल्हा बँकेने दिले 96 कोटीचे कर्ज, जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात, पुणे जिल्हा बँकेसोबत चार बँकांनी दिले होते कर्ज, कर्ज प्रकरणात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग
'स्वप्नील लोणकरच्या कुटुंबीयासोबत आम्ही चर्चा केली. या कुटुंबांला आम्ही मदत करण्यास तयार आहोत. कशा प्रकारची मदत करता येईल याबाबत हे कुटुंब आम्हास कळवेल. आत्महत्येने प्रश्न सुटत नाहीत. उलट गुंता अधिक वाढतो. सरकार याबाबत लवकरात लवकर निर्णय घेईल. विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करण्यासही आम्ही तयार आहोत.' - खासदार सुप्रिया सुळेंनी घेतली स्वप्नील लोणकरच्या परिवाराची भेट
पुणे-बंगळूर महामार्गावरील नवली पुलाजवळ आज सकाळी आठ वाहनांचा विचित्र अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. आठ वाहनांचे मात्र जबर नुकसान झाले आहे. आज सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास बस भरधाव वेगात जाणाऱ्या एका ट्रकचालकाचे नियंत्रण सुटल्याने त्याने आठ वाहनांना धडक दिली. या अपघातात काही नागरिक जखमी झाले असल्याची माहिती आहे. जखमींना त्वरित नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
वाशिम जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांच्या ढगाळ वातावरणानंतर रात्री उशिरा जिल्ह्यात अनेक भागात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेरणीच्या जवळपास 20 दिवसांनंतर पाऊस पडल्याने पिकाला पुनर्जीवन मिळालं आहे.
हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील मरसुळ शिवारात चक्क उसाच्या शेतात गांजा लागवड केल्याची बाब पोलीस कारवाईत उघड झालीय. पोलिसांनी या ठिकाणाहून तब्बल एक लाख 20 हजारांची गांजाची झाडं जप्त करून एकाच अटक केलीय. मरसुळ शिवारात गांजाची लागवड केली असल्याची माहिती हिंगोलीचे सहायक पोलिस अधीक्षक सतीश देशमुख यांना कळली. त्यांनी कुरुंदा येथील पोलीस पथकाला घेऊन या ठिकाणी धाड टाकून पाशू खान दौलत खान या शेतकऱ्याला अटक केली. उसात लावलेली गांजाची एकुण 24 झाडं, ज्याची किंमत ही एक लाख 20 हजार एवढी आहे, ती सर्व जप्त करण्यात आली आहेत.
यवतमाळ: पांढरकवडा तालुक्यातील पिवरडोल येथील अविनाश पवन लेनगुरे या युवकाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू, वनविभागाची टीम घटनास्थळावर दाखल
साखर आणि मिठाची वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये झाली धडक, सुदैवाने जिवीतहानी नाही, दोन्ही वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त माल, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात, मिठाचा ट्रक नाशिकहून पेठकडे तर साखरेचा ट्रक दिंडोरीरोड कडून पेठरोडवर येत असताना अपघात, पहाटेच्या सुमारास घडलेल्या अपघातात 4 ते 5 जण जखमी, जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील सावंगी भांबळे आणि परिसरात वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांची झोप उडवलीय. लहरीण, निलगायी, रोहीच्या कळपाकडून कोवळे पीक फस्त केले जात आहे. जिंतुर तालुक्यातील सावंगी भांबळे, वझर, सायखेडा, धमधम, बामनी, अंबरवाडी, मानकेश्वर या शिवारात 100-100 हरणांचे कळप शेतशिवारात फिरुन पीक खात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा अन्यथा नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय.
संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना कोल्हापुरात रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.
संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष रावसाहेब देसाई यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांना कोल्हापुरात रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही दिवसांपूर्वीच कोरोनामुळे मरणारी माणसं जगण्याच्या लायकीची नाहीत असं वक्तव्य संभाजी भिडे यांनी केलं होतं.
दाखल गुन्ह्यात मदत करतो म्हणून साडे सात लाख रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या पोलीस निरीक्षक आणि सहायक पोलिस निरीक्षकाला लाचलुचपत विभागाने रंगेहाथ ताब्यात घेतलय. सोलापुरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्यात मुरूम चोरी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात आरोपींना मदत करतो म्हणून पोलीस निरीक्षक संपत पवार यांनी सहायक पोलिस निरीक्षक रोहन खंडागळे यांच्या करवी 10 लाख रुपयांची लाच मागितली होती.
पार्श्वभूमी
रेल्वे कर्मचाऱ्यांनाही आता दोन शिफ्ट; पदभार स्वीकारताच रेल्वेमंत्र्यांचा शिस्तीचा कार्यक्रम
रेल्वेमंत्री वैष्णव यांनी पदभार स्वीकारताच रेल्वे मंत्रालयाच्या कामाच्या स्वरुपात महत्वाचा बदल केला आहे. रेल्वे मंत्रालयाचं कार्यालय आता रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार असून कर्मचारी हे दोन शिफ्टमध्ये काम करणार आहेत. हा निर्णय केवळ रेल्वे मंत्रालयापुरताच मर्यादित असणार आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. आपले पंतप्रधान रोज 18 तासांहून जास्त काम करतात आणि देशाची सेवा करतात. मग आम्ही मंत्र्यांनीही तसं करावं. भारतीय रेल्वे ज्या प्रमाणे 24 तास सुरु असते त्याच धर्तीवर आता केंद्रीय रेल्वेमंत्री यांची कार्यालयंही दोन शिफ्ट मध्ये सुरु राहतील, असं रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं. रेल्वे मंत्र्यांची कार्यालयं आता दोन शिफ्टमध्ये म्हणजे सकाळी 7 त दुपारी 4 आणि दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरु राहणार आहेत. सध्या असलेला कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता नियमांचं पालन करुन प्रत्येकी 50 टक्के अधिकारी आणि कर्मचारी या दोन शिफ्टमध्ये काम करतील.
विमानतळ नामकरणाबाबत केंद्र सरकारनं धोरण निश्चित करावं; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
विमानतळाच्या नामकरणाबाबत केंद्र सरकारनं देशभरात एकसुत्री धोरण निश्चित करावं, त्यासाठी केंद्र सरकारच्या नवनियुक्त नागरी उड्डाण मंत्र्यांनी पुढाकार घेऊन धोरण निश्चित करण्यास प्रथम प्राधान्य द्यावं, असं मतं शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केलं. यासंदर्भात केंद्र सरकारला 16 जुलैपर्यंत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.कोणत्याही विमानतळाचं नामकरण करताना किंवा नाव बदलताना केंद्र सरकारनं एकसमान धोरण ठरवाव, अशी मागणी करत वकील फिलजी फ्रेडरिक यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच हे धोरण निश्चित होईपर्यंत नवी मुंबई विमानतळासह इतर विमानतळांच्याही नामकरणाबाबत राज्य सरकारनं पाठविलेल्या प्रस्तावांवर केंद्राने विचार करु नये, अशी विनंती याचिकाकर्त्यानी या याचिकेतून केली आहे. त्यावर शुक्रवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं विमानतळाच्या नामकरणाबाबत आपलं मत व्यक्त केलं.
माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीवर अवलंबून राहू नका : सुप्रीम कोर्ट
माहितीच्या अधिकाराखाली मिळालेली माहिती ही विश्वसनीय असेलच असं नाही आणि वकिलांनीही न्यायालयातील खटल्यांमध्ये त्याचा पुरावा म्हणून संदर्भ देणं टाळावं अस महत्वपूर्ण विधान सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी केलं आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या एका आदेशाविरोधातील अपीलाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती एएम खानविलकर आणि न्यायमूर्ती संजिव खन्ना यांच्या बेंचने हे मत नोंदवलं. उत्तर प्रदेशातील गोरखपूर विकास प्राधिकरणाच्या मास्टर प्लॅनमध्ये एका जागेची निवासी जागा म्हणून नोंद आहे अशी माहिती याचिकाकर्त्याला माहितीच्या अधिकारातून प्राप्त झाली होती. त्याचाच संदर्भ घेऊन याचिकाकर्त्यांने अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. पण सर्वोच्च न्यायालयाच्या बेंचने याचिकाकर्त्याचे हे मत स्वीकारण्यास नकार दिला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -