Breaking News LIVE : कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक
Breaking News LIVE Updates, 06 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
अमरावती जिल्ह्यातील लॉकडॉऊन शिथिल करण्याबाबत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी.. अमरावती जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्याने लॉकडाऊन शिथिल करण्याची मागणी केली असून पालकमंत्री यशोमती ठाकूर ह्या आज मुंबईला रवाना झाल्या असून उद्या मुख्यमंत्री यांना स्वतः भेटून करणार मागणी... अमरावती जिल्ह्यात व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध.
मालेगाव : शासनाने निर्देश झुगारून पूर्ण क्षमतेने शाळा सुरू ठेवणाऱ्या मालेगाव गर्ल्स हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज विरोधात मालेगाव महापालिका व पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत गुन्हा दाखल केला व दंडात्मक कारवाई केली. मालेगाव शहरात कोरोनाने पुन्हा डोके वर काढायला सुरुवात केल्याने कोरोना प्रसार रोखण्यासाठी शहरातील शाळा व कॉलेज बंद ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले असताना मालेगाव गर्ल्स हायस्कुल ही पूर्ण क्षमतेने सुरु होती. पोलीस व महापालिकेने शिताफीने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांना कोरोना अहवाल निगेटिव्ह असणे बंधनकारक. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी काढले आदेश. रिपोर्ट नसतील तर सात दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल : जिल्हाधिकारी. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा कमी असल्याने जिल्ह्यात येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढली आहे. इतर जिल्ह्यातील प्रादूर्भाव पाहता कोल्हापुरात येणाऱ्यांसाठी कडक सूचना.
बुलडाण्यात पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांना व्यापाऱ्यांचा घेराव. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून आज 6 एप्रिल पासून 30 पर्यंत लावण्यात आलेल्या लॉकडाऊनला वंचित बहुजन आघाडीनंतर बुलडाणा शहरातील व्यापाऱ्यांनी देखील विरोध दर्शवत जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांना आज जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात घेराव घालण्यात आला. यावेळी लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे कोरोना साखळी तुटण्यास मदत होणार नाही. नागरीक रस्त्यावर फिरतच आहे. तर आमच्या आस्थापना बंद असल्यामुळे कोरोना कमी होणार का असा प्रश्न उपस्थित करत आठवड्यातील 5 दिवस काही तासाकरीता आस्थापने उघडण्याची मागणी पालकमंत्र्यांकडे करण्यात आली.
राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण लक्षात घेता 31 ऑगस्टपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सहकारी साखर कारखाने, जिल्हा मध्यवर्ती बँका, नागरी बँका यांच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा सहकार विभागाचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी 31 मार्चपर्यंत निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागल्याने निवडणुका पुन्हा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आंबोलीत मुसळधार अवकाळी पाऊस. गेल्या अर्ध्या तासापासून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस सुरू आहे. गेले काही दिवस उकाड्यापासून हैरान झालेल्या आंबोलीकरांना उकाड्यापासून काहीसा दिलासा, मुसळधार पावसामुळे हवेत गारवा. 40 वर्षात आतापर्यंत एप्रिल महिन्यात आंबोलीत पाऊस पडला स्थानिकांची माहिती. जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना शुभेच्छा.
राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक शहाजी पाटील लाच घेताना ताब्यात. परमिट रूम नूतनीकरण करण्यासाठी तक्रारदाराकडून 15 हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले. सांगली लाच लुचपत विभागाची कारवाई.
अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी काल अकोल्यात एका स्वयंपाक्याच्या कानशीलात जोरदार लगावलीय. कोरोना रूग्णांच्या जेवणासाठीच्या धान्यात मोठी अफरातफर झाल्याचं लक्षात आल्यावर कडू यांचा पार चढला आणि त्यांनी ही मारहाण केली. राज्याचे राज्यमंत्री बच्चू कडू हे ओळखले जातात त्यांच्या आंदोलनासाठी अन आक्रमक अंदाजासाठी.. अनेकांना बच्चू कडू यांच्या मारहाणीच्या प्रसादाचा अनुभवही अनेकदा आलाय. मंत्री झाल्यावर काहीसे हरवलेले बच्चू कडूंचा रुद्रावतार काल अकोल्यात पहायला मिळाला. काल बच्चू कडू यांनी जिल्हा रुग्णालयातील मेसला भेट दिलीय. यावेळी कडू यांना मेसमधील डाळीच्या दैनंदिन वापरात अपहार होत असल्याचं लक्षात आलं. त्यातूनच बच्चू कडू यांनी त्या स्वयंपाक्याच्या कानशीलात लगावली.
मनमाड : चांदवड शहरातील नव्याने सुरू होत असलेल्या कोविड सेंटरच्या इमारतीच्या तळमजल्यावरील फर्निचरच्या दुकानाला आग लागली. आग लागताच कोविड सेंटरमधील रुग्ण तातडीने सुखरूप बाहेर काढण्यात आलीे. आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू..
प्रादेशिक हवामान केंद्र, नागपूर यांनी आज वर्तविलेल्या हवामान अंदाजानुसार, बुलढाणा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची तर10 एप्रिल रोजी जिल्ह्यातील तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची व हलक्या पावसाची अधिक शक्यता आहे. म्हणून शेतकऱ्यांनी उष्माघातापासून बचाव करण्यासाठी शेतातील कामे सकाळी किंवा संध्याकाळी करावीत, जनावरे सावलीत/गोठ्यात बांधून ठेवावीत.त्यांना पिण्यासाठी स्वच्छ, थंड पाण्याची पुरेशा प्रमाणात व्यवस्था करावी. तसेच मेघगर्जनेसह विजांचा गडगडाट होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी स्वत:ची व पशुधनाची योग्यप्रकारे काळजी घ्यावी,असे आवाहन जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलढाणा यांनी केले आहे.
सुप्रीम कोर्टात परमबीर सिंह प्रकरणात दोन याचिका दाखल. एक राज्य सरकारच्या वतीने एक अनिल देशमुख यांच्या वतीने. तातडीने सुनावणी घेण्याची देखील याचिकेत मागणी. सीबीआय चौकशी, राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण या मुद्द्यांवर राज्य सरकारची याचिका. सीबीआयला चौकशीसाठी पंधरा दिवसांचा वेळ दिल्याने याचिका तातडीने ऐकण्याची कोर्टाला विनंती.
गृहमंत्री पदाचा चार्ज घेतल्यावर आपल्याला भेटत आहे, असं म्हणत माध्यमांसमोर आलेल्या दिलीप वळसे पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांचे आभार मानले. आपल्यावर विश्वासानं सोपवलेली जबाबदारी पेलणं हे मोठं आणि आव्हानात्मक काम असल्याचं ते म्हणाले. सोबतच पोलीस दलाच्या सक्षमीकरणाचा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
शिक्षण विभागाची बैठक संपली असून नववी आणि अकरावी परिक्षेबाबत निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे. तसंच दहावी आणि बारावी परीक्षेबाबत अजून निर्णय झालेला नाही, चर्चा अद्याप बाकी आहे.
अमरावती शहरातील छोटे-मोठे व्यापाऱ्यांकडे काम करणारे कामगार आक्रमक झाले असून आजपासून ब्रेक द चेन घोषणेमुळे बाजारपेठ 30 एप्रिलपर्यंत बंद असणार आहे. यामुळेच कामगार आक्रमक झाले आहेत. मोठ्या संख्येने कामगार महानगरपालिकेवर धडकले आहेत. तसेच आम्हाला उदरनिर्वाहासाठी पैसे द्या किंवा बाजारपेठा उघडा अशी मागणी या कामगारांनी केली आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत मागील महिन्याभरात कोरोना रुग्णाची संख्या भरमसाठ वाढत असून पालिका प्रशासनाकडून रुग्णाच्या उपचारासाठ करण्यात आलेली सुविधा तोकडी पडू लागली आहे. ऑक्सीजन आणि आयसीयू खाटा भरल्याने रुग्णांना खाटा उपलब्ध करून देताना प्रशासनाची दमछाक आहे.केडीएमसी क्षेत्रात केडीएमसी ने उभारलेले कोव्हीड सेंटर व खाजगी रुग्णालयातील बेड असे मिळून 6222 अशी बेड ची संख्या आहे .यामधील खाजगी बेडची संख्या 1289 आहे.यामध्ये जनरल ,ऑक्सिजन ,आयसीयू ,व्हेंटिलेटर बेडचा समावेश आहे .वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत यासाठी केडीएमसीनकडून टिटवाळा ,मोहने,विठ्ठलवाडी ,वसंत व्हॅली ,याठिकाणीची कोव्हीड सेंटर येत्या काही दिवसात सुरू करण्यात येणार आहेत .तसच आणखी काही खाजगी रुग्णालयासोबत केडीएमसीची बोलणी सूरु आहेत .त्यामुळे रुग्णसंख्या वाढत असली तरी।रुग्णांना उपचारासाठी बेड उपलब्ध होतील मात्र नागरिकांनी देखील कोरोनाला आळा घालण्यासाठी त्रिसूत्रीचे पालन करावे ,शासनाने घालून दिलेल्या निर्बंधांच पालन करावं अस आवाहन केडीएमसी कडून करण्यात येत आहे
मुंबई : डॉ. जयश्री पाटील यांच्याकडून सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. अनिल देशमुख आणि राज्य सरकार मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देण्याच्या तयारीत आहेत. अनिल देशमुखांची याचिका दाखल होण्यापूर्वीच तक्रारदार जयश्री पाटील यांचं कॅव्हेट दाखल करण्यात आलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाल्यास जयश्री पाटील यांचीही बाजू ऐकली जावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली आहे.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या हत्या प्रकरणावरुन राज ठाकरे यांच्याकडून राष्ट्रवादीच्या नजीब मुल्ला यांच्यावर कारवाईची मागणी. लवकरच शरद पवारांचीही भेट घेणार असल्याची माहितीही राज ठाकरे यांनी दिली.
पुन्हा कठोर लॉकडाऊन आला, तर परिस्थिती कठीण असेल. त्यामुळं आतातरी किमान नागरिक कोरोनावरील निर्बंध पाळतील अशी मी आशा करतो- राज ठाकरे
बॉम्बची गाडी पोलिसांनी भरली, ती कोणाच्या सांगण्यावरुन ठेवली? चौकशी ही अनिल देशमुख यांची होईलच. पण, चौकशी ही झालीच पाहिजे, प्रत्येक वेळेला एखादा विषय येतो आणि त्याला फाटे फुटतात. सचिन वाझे प्रकरणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया.
कोरोना लसीकरणात देशभरात सुरुवात झालेली असताना आता लसीकरण प्रक्रियेत वयाची मर्यादा नसावी ही बाब त्यांनी जाणीवपूर्वक अधोरेखित केली.
कोरोनाच्या या संकटकाळात मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर, आपण दिलेल्या पर्यायांवर मुख्यमंत्री सकारात्मक दिसल्याची राज ठाकरे यांची माहिती.
कोरोनाच्या संकटाची दाहकता पाहता, या काळात शेतकऱ्यांना हमीभाव द्या, राज ठाकरे यांची मागणी.
दहावी- बारावीच्या मुलांना परीक्षा न घेता पुढे ढकला अर्थात उत्तीर्ण करा. ही मुलं कोणत्या मानसिकतेत असतील याची आपल्यालाही कल्पना नाही. कुठून अभ्यास करणार, कशी परीक्षा देणार, त्याचा निकाल काय असणार याची आपल्यालाही कल्पना नाही. मी राज्य सरकारला विनंती करतो की, खालच्या इयत्तांप्रमाणे या विद्यार्थ्यांनाही पुढे ढकला, राज ठाकरे यांची मागणी
मनोरंजन क्षेत्र, जीम, सलून यांनाही आठवड्यातून दोन- तीन वेळी दुकानं सुरु करण्याची परवानगी देण्यात यावी असा सूर त्यांनी आळवत क्रीडा क्षेत्राच सराव करणाऱ्या खेळाडूंना सवलत मिळालीच पाहिजे यासाठी ते आग्रही दिसले.
कंत्राटी कामगारांना प्रत्येक वेळी कामावर घेण्यापेक्षा त्यांना गरज लागेल त्या विभागात कायमस्वरुपी कामासाठी घ्या अशी मागणी त्यांनी केली.
राज्य शासनाच्या कोरोना नियमांतील विसंगतीवर राज ठाकरे यांची टीका. पुन्हा लॉकडाऊन नको असं ठाम मत त्यांनी मांडलं.
'ब्रेक दि चेन' मोहिमेबाबत व्यापाऱ्यांमध्ये नाराजी. नियमावली गोंधळात टाकणारी असल्यामुळे व्यापारी संभ्रमात. दादरमध्ये दुकानांवर निषेधाचे पोस्टर. दादर व्यापारी संघाकडून शासनाच्या निर्णयाचा निषेध.
सोलापूर जिल्ह्यातील काही लसीकरण केंद्रात डोस संपले. डोस नसल्याने शहरातील काही केंद्रात आज लसीकरण सत्र नाही. लसीकरण केंद्रावर लस संपल्याची माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. आज संध्याकाळी लसीचा साठा येणार असल्याची जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची माहिती. 'काही ठिकाणी साठा संपला आहे मात्र संध्याकाळी साठा उपलब्ध होईल'. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची फोनवरुन माहिती
वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सदृश्य नियमावली लागू करण्यात आली आहे. याचा परिणाम पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ट्रॅफिकवर थेट झालेला पाहायला मिळत आहे. एरव्ही सकाळच्यावेळी बंपर टू बंपर ट्रॅफिक पाहायला मिळतं. मात्र सध्या या महामार्गावरचं ट्रॅफिक बऱ्यापैकी कमी झालेलं पाहायला मिळत आहे. खाजगी कार्यालयांना वर्क फ्रॉम होमचे निर्देश दिलेले आहेत. सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती लागू करण्यात आली आहे. मॉल्स, स्विमिंग पूल, व्यायामशाळा, क्लब्ज, रेस्टॉरंट यांसारख्या आस्थापना बंद ठेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ज्याचा थेट परिणाम मुंबईच्या ट्रॅफिकवर पाहायला मिळत आहे.
जे सचिन वाझेंनी केलं, जे परमबीर सिंह यांनी केलं तेच अनिल देशमुख यांनी करावं. थेट सांगावं की शरद पवार, उद्धव ठाकरेंनी वसुली करायला सांगितलं. या प्रकरणात अजून चार लाभार्थ्यांची नावे लवकरच बाहेर येतील. माझ्याकडे याचे पुरावे आहेत. अजून तर सीबीआयने तपास सुरु केलेला नाही, त्यानंतर ईडीपासून बाकीच्या यंत्रणा सुद्धा कामाला लागणार आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. सीबीआयच्या प्राथमिक चौकशीसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार का एवढे घाबरतात, असा सवालही किरीट सोमय्या यांनी विचारला
उच्च न्यायालयाने दिलेल्या सीबीआय चौकशीच्या निर्णयाच्या विरोधात अनिल देशमुख आज सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची शक्यता आहे. हायकोर्टाच्या आदेशानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिला आहे. त्यानंतर आता अनिल देशमुख सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार आहेत.
36 दिवसात महाविकास आघाडी सरकारच्या दोन विकेट पडल्या. थोड्याच दिवसांत आणखी एक विकेट पडेल आणि मग बाकी विकेटची रांग लागेल. हे सरकार त्यांच्या कर्मानेच मरणार आहेत, अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. तसंच भाजप यापुढे महाराष्ट्रातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे. कोणाच्या कुबड्या आम्हाला नको, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटातील हालचाली वाढल्या आहेत. थोड्याच वेळात शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी बैठक होणार आहे. या बैठकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, नवनिर्वाचित गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोहोचले आहेत.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी सीबीआयचं विशेष पथक मुंबईत येणार आहे. त्यामुळे मुंबईच्या बीकेसी परिसरातील सीबीआयचं मुख्यालय हे पुढील काही दिवस या तपासाचं केंद्र बिंदू राहणार आहे. या प्रकरणी मुंबई पोलीस दलातील काही अधिकारी आणि महाविकास आघाडीतील काही अन्य नेतेही सामील असल्याचा आरोप विरोधी पक्षाने केला आहे. तेव्हा आता सीबीआयच्या चौकशीतून काय बाहेर येतं हे पाहण्याची उत्सुकता साऱ्यांनाच आहे.
चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात मोहफूल वेचण्यासाठी गेलेल्या काका-पुतण्याचा मृत्यू झाला आहे. सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गावालगतच्या जंगलात ही घटना घडली. गावाकरी आज सकाळी मोहफूल वेचण्यासाठी जंगलात गेले होते. त्याच वेळी वाघाने कमलाकर उंदीरवाडे (वय 65 वर्षे) आणि धुर्वास उंदिरवाडे (वय 50 वर्षे) यांच्यावर हल्ला केला. यात दोघांचाही मृत्यू झाला. वाघाने एकाच वेळी दोघांचा जीव घेतल्याने परिसरात मोठी दहशत पसरली आहे. वनपथक घटनास्थळी दाखल झालं आहे. दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यात वाघाच्या हल्ल्यात तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील वाशी पोलीस ठाण्यावर जमावकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षकासह तीन पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. एका गुन्ह्यातील आरोपीचा रुग्णालयात मृत्यू झाल्याने संतप्त जमावाचा हल्ला. या आरोपीला अटकेनंतर तब्येत खालावल्याने उपचारासाठी शासकीय रुग्णालय उस्मानाबाद येथे दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला उपचारासाठी सोलापूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये केल होत रवाना. उपचारादरम्यान आरोपी असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृतदेह घेऊन काही लोक वाशी पोलीस ठाण्यात घुसले आणि त्यांनी पोलिसांवर हल्ला दगडाचा मारा चढवला. जमावाला फांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुरांची नळकांडी फोडून परिस्थिती आटोक्यात आणली आहे
कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या हिवाळी सत्रातील सर्व परीक्षा पुन्हा एकदा स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोना संकट वाढत असल्याने शिवाजी विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे. 6 एप्रिल ते 12 एप्रिल या कालावधीत परीक्षा होणार होत्या. मात्र विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन परीक्षा स्थगित केल्याचे पत्रक जारी करण्यात आलं आहे.
एरव्ही 24 तास गजबलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरात सोमवारी रात्री आठ वाजताच शुकशुकाट बघायला मिळाला. एक दोन स्थानिक भक्त मंदिराच्या बाहेरुन मुख्य प्रवेशद्वारा जवळ दर्शन घेताना दिसले. मंदिर परिसरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे दुसऱ्यांदा अशी नीरव शांतता बघयला मिळाली आहे. शेगाव मंदिर परिसरातील ही दृश्य कोरोनाची दाहकता दर्शवित आहेत.
पार्श्वभूमी
Maharashtra New Corona Guidelines: मिशन ‘ब्रेक दि चेन’आदेशात सुधारणा, 'या' आवश्यक सेवांचा समावेश
कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंत याची अंमलबजावणी केली जाणार आहे. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. काल दिलेल्या ब्रेक दि चेनच्या आदेशात ज्या आवश्यक सेवांचा उल्लेख होता, त्यात आणखी काही सेवांचा समावेश आज राज्य सरकारने केला आहे. त्या संदर्भातील आदेश आज प्रसिद्ध करण्यात आले .
Pune Lockdown: पुणेकरांना पुन्हा कडक निर्बंध, सुधारित आदेश जारी
राज्यात कोरोनाचा संसर्ग होणाऱ्यांची संख्या इतक्या झपाट्यानं वाढलेली असतानाच आता कोरोना अधिकच गंभीर वळणावर आला असून, परिस्थिती आणखी भयावह होण्याचीही चिन्हं आहेत. यात मुंबई आणि पुण्यात कोरोनाची परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. या पार्श्वभूमीवर शहरासाठी नवीन आदेश काढण्यात आले आहेत.
दिलीप वळसे पाटील राज्याचे नवे गृहमंत्री, गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा राज्यपालांकडून मंजूर
शरद पवार यांचे विश्वासू दिलीप वळसे पाटील अखेरीस गृहमंत्री झाले. गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे. गृह विभागाचा कार्यभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा असेही या पत्रात म्हटले आहे. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार हसन मुश्रीफ व राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत देखील पत्रात विनंती करण्यात आली आहे.
पंतप्रधान मोदींची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत गुरुवारी आढावा बैठक; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चर्चा होणार
देशातील काही राज्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच गुरुवारी 8 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीचं आयोजन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे करण्यात येणार आहे. सकाळी दहा वाजता ही बैठक सुरु होणार आहे.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनेक राज्यांनी संचारबंदी लागू केली आहे. तसेच इतरही निर्बंध लागू केले आहेत. अशातच मोदी पुन्हा देशव्यापी निर्णय घेणार का? याकडे सर्वांचं लक्षं लागलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -