Breaking News LIVE : मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात रविवारी शहरात कडक संचारबंदी
Breaking News LIVE Updates, 02 July 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
सोलापूर शहरात पुन्हा लसीकरणाला ब्रेक,
उद्या महानगरपालिका क्षेत्रात कुठेही लसीकरण होणार नाही,
लसींचा पुरवठा न झाल्याने निर्णय,
मागील आठवड्यात ही 5 दिवस लसीकरणाची मोहीम होती बंद,
30 तारखेला जवळपास साडे सहा हजार लसी प्राप्त झाल्या होत्या,
काल आणि आज दोन दिवस या लसी वापरल्या, उद्या पुन्हा बंद
सोलापूर - मराठा आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रविवारी शहरात कडक संचारबंदी,
4 जुलै रोजी पोलीस आयुक्तांकडून कलम 144 अंतर्गत शहरात संचारबंदी लागू,
अत्यावश्यक सेवा कामा व्यतिरिक्त नागरिकांना फिरण्यास मनाई,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय,
नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील लसीकरण गेल्या पाच दिवसापासून बंद असल्याने शहरवासियांची चांगलीच गैरसोय होत आहे. महानगरपालिकेकडून शहरात 74 लसीकरण सेंटर सुरू करण्यात आले आहेत. मात्र गेल्या पाच दिवसांपासून लस मिळत नसल्याने सर्व ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आले आहे. फक्त तीन सेंटर वर कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस दिला जात आहे. नवी मुंबईत आता पर्यंत 5 लाख 60 हजार लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. दिवसाला 15 हजार लोकांना लस दिली जात होती.मात्र सलग पाच दिवस झाले लसीकरण बंद असल्याने मोहिमेला ब्रेक लागला आहे.
ज्या व्यक्तीचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण झाले असतील अशा व्यक्तींना आऊटडोर खेळ खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेतले असतील अशा विद्यार्थ्यांसाठी मेडिकल कॉलेज सुरू करण्यात येणार आहेत. यासाठी प्रशासनाला तयारी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत असं उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं. पुण्याच्या पॉझिटिव्ह दर वाढला आहे. 4.6 टक्क्यावरून हा दर 5.3 झाला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यामुळे अधीचीच नियमावली चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे असंही त्यांनी सांगितलं.
वारी बाबत ही वेगवेगळ्या चर्चा सुरु होत्या, बैठका झाल्या होत्या तरीही काहीजण त्यावर चर्चा करत होते. वारीत 23 वारकरी पॉझिटिव्ह आले आहेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दुसरी लाट अजूनही नियंत्रणामध्ये आली नाही. त्यामुळे काही निंर्णय घ्यावे लागतात असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुण्यात तूर्तास मॉल किंवा इतर गोष्टी सुरु करणार नसून पुण्यासाठी तुर्तास तिसऱ्या गटासाठी निर्धारित केलेले नियम कायम असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितलंय.
बुलढाण्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी चक्क कृषी कार्यालयात किडे सोडले आहेत. आधीच दुबार पेरणीच संकट त्यात वाणी किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतातील पीकं नष्ट झाल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. प्रशासनाने सर्वे करुन शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली असून दोन दिवसात याची दखल न घेतल्यास मंत्रालयात किडे सोडण्याचा इशारा स्वाभिमानीने दिला आहे.
ओबीसी आरक्षणासंदर्भात सुप्रीम कोर्टातील सुनावणी सहा जुलैपर्यंत लांबणीवर पडली आहे. सुप्रीम कोर्ट वेगवेगळ्या याचिका एकत्रितपणे ऐकणार आहे. त्यामुळे पाच जिल्हा परिषदांमधील पोटनिवडणुका होणार की नाहीत याचा फैसला सहा जुलै रोजी होणार आहे.
जरंडेश्वर कारखान्यात अजित पवारांनी सत्तेचा गैरवापर करुन 25 हजार कोटींचा घोटाळा केला असल्याचा आरोप शालिनीताई पाटील यांनी केला. जरंडेश्वर कारखान्यावरील ईडीच्या कारवाईमुळे उशिरा का होईना न्याय मिळाला असं त्या म्हणाल्या
सत्तेतल्या महत्त्वाच्या व्यक्तींची कोंडी करण्याचं काम सध्या सुरु आहे, सरकार पाडणं किंवा सरकार आणणं हे ईडीसारख्या तपास यंत्रणांचं काम नाही, अजित पवार यांच्या निकटवर्तीयांचा कारखान सील केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत याची प्रतिक्रिया
मराठा आरक्षणावर आता पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा प्रश्नच येत नाही. आता राज्यपाल आणि राष्ट्रपतींच्या माध्यमातून मराठा आरक्षण मिळवता येऊ शकेल. त्यासाठी केंद्र सरकारने वटहुकूम काढावा, घटना दुरुस्ती करावी आणि राज्यांना अधिकार द्यावेत अशी मागणी संभाजीराजे छत्रपती यांनी केली आहे.
लसीकरण कॅम्प आयोजित करणाऱ्या सोसायट्या आणि कार्यालयांसाठी पालिकेची नियमावली जारी , मुंबईच्या कांदिवलीमध्ये झालेल्या बोगस लसीकरण प्रकरणानंतर पालिका सतर्क, लसीकरण कॅम्प आयोजित करण्याआधी पोलीस, आरोग्य विभागाला माहिती देणे बंधनकारक
ओबीसी राजकीय आरक्षणासाठी इम्पिरियल डाटा गोळा करण्याची जबाबदारी राज्य सरकारने दिल्यानंतर आज राज्य मागासवर्ग आयोगाची आज पहिलीच बैठक पुण्यात होत आहे. हा डाटा गोळा करण्यासाठी कार्यपद्धती आणि कोणत्या संस्थांचा आधार घ्यायचा यावरती चर्चा करण्यात येणार आहे.
ईडीकडे मी पाच वर्षांपासून कारवाईसाठी फेऱ्या मारतोय, पण माझ्यावर कारवाई केली नाही, आता राजकीय दबाव आणण्यासाठी हेतुपूर्वक कारवाई केली जातेय असा आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. एका साखर कारखान्यावर नाही तर राज्यातील 43 साखर कारखान्यावर कारवाई झाली पाहिजे, सर्वच पक्षाच्या नेत्यांनी मिळून साखर कारखान्यांवर दरोडा टाकलाय असा आरोपही त्यांनी केलाय.
खासदार संभाजीराजे छत्रपती यांची आज सकाळी दहा वाजता होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली आहे. संभाजीराजे सकाळी नऊ वाजता पुण्याहून बीडला जाण्यासाठी निघणार असून जामखेडमधे थांबल्यावर मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर बोलणार आहेत.
मुंबईत आज मर्यादित केंद्रांवर तीन तासच (दुपारी 2 ते 5) कोरोना लसीकरण होणार आहे, मुंबई महापालिकेने ही माहिती दिली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांना कोवॅक्सिन लस दिली जाईल तर कोविशील्ड लस ही केवळ 45 वर्षांवरील नागरिकांना देण्यात येईल, असं बीएमसीने स्पष्ट केलं.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थानापूर्वी आळंदीत वीस वारकरी कोरोना पॉझिटिव्ह आलेत. त्यामुळे प्रशासनासमोर मोठा पेच उभा राहिलाय. उद्या या सर्वांच्या संपर्कातील वारकऱ्यांचा शोध घेतला जाईल आणि मगच प्रस्थान सोहळा पार पडणार आहे. प्रस्थान सोहळ्यासाठी निमंत्रित वारकऱ्यांची चाचणी सुरु आहे. गेल्या दोन दिवसांत 164 वारकऱ्यांपैकी 20 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.
पार्श्वभूमी
Thane : गणेशोत्सव नियमावलीचा पुनर्विचार करा, ठाण्यातील गणेश मंडळांची राज्य सरकारकडे मागणी
राज्यात कोरोनाचे सावट आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मंगळवारी गणेशोत्सव नियमावली जाहीर केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्या नियमावलीचा पुनर्विचार करावा, तसेच, महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर बाळासाहेबांचा सुपुत्र या नात्याने त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार व्हावा, अशी मागणी ठाणे जिल्हा गणेशोत्सव समन्वय समितीने केली आहे. असं झालं नाही तर येत्या काही दिवसात ठाणे महापालिकेसमोर आंदोलन करण्यात येईल असाही इशारा समितीने दिला आहे.
Maratha Reservation : मोठी बातमी... मराठा आरक्षणासंदर्भात केंद्र सरकारची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली
मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation update) सुप्रीम कोर्टातून (Supreme Court )अत्यंत महत्त्वाची बातमी आली आहे. सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केल्यानंतर या निकालाच्या 102 व्या घटनादुरुस्तीच्या मुद्द्यावर केंद्राने केलेली पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. 102 व्या घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना झाली. या आयोगाच्या स्थापनेनंतर एस ई बी सी आरक्षणाचे नवे प्रवर्ग निर्माण करण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींच्या सहीने केवळ याचा आयोगाला असल्याचे निकालात म्हटले आहे. राज्यांना हे अधिकार नसल्याचं मत खंडपीठाने नोंदवलं होतं. या निर्णयाविरोधात केंद्र सरकारने अपील केलं होतं. पण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाने आज सुप्रीम कोर्टात केंद्राचीही पुनर्विचार याचिका फेटाळली आहे. याचा अर्थ एस ई बी सी सारखे नवे प्रवर्ग निर्माण करायचे असतील तर हा निर्णय केवळ केंद्रीय पातळीवरच होऊ शकतो.
Maharashtra Corona Update : राज्यात गुरुवारी 9,195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, मालेगावात रुग्णसंख्या शुन्यावर
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या पुन्हा हळूहळू वाढू लागली आहे. राज्यात आज 9, 195 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 8,634 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 58,28, 535 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट 96.01 टक्क्यावर गेला आहे. तर राज्यात आज 252 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2. 01 टक्के आहे. राज्यात सध्या 1 लाख 16 हजार 667 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. राज्यात कोल्हापुरात सर्वांधिक रुग्णांची नोंद झाली आहे, कोल्हापुरात 1057 रुग्ण तर मालेगावात आज एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही.
ABP Majha Exclusive : 'अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुखांचा हात', स्वीय सचिव पलांडेंची कबुली, कारवाईचा तपशील माझाच्या हाती
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध ईडीने आतापर्यंत केलेल्या कारवाईचा संपूर्ण तपशील माझाच्या हाती लागला आहे. ईडी कोर्टात अनिल देशमुख आणि त्यांच्या परिवाराविरुद्ध मोठा आरोप करण्यात आला आहे. यात सर्वात महत्वाचं म्हणजे, अनिल देशमुख यांचे अटक झालेले स्वीय सचिव संजीव पलांडे यांनी ईडीला कबुली दिली आहे की पोलीसांच्या बदल्यांमध्ये खास करुन आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अनिल देशमुख यांचा हात होता. परमबीर सिंह यांनी 4 मार्चला ज्ञानेश्वरी इथे झालेल्या बैठकीत अनिल देशमुख यांनी मुंबईतील बार मालकांकडून 100 कोटींची वसुली करण्याचे आदेश पोलीस अधिकाऱ्यांना दिल्याचे आरोप आपल्या तक्रारीमध्ये केला होता. ती बैठक झाल्याची कबुली देखील पलांडे यांनी ईडी अधिकाऱ्यांना दिली आहे. पलांडे यांच्या या कबुलीमुळं अनिल देशमुख यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -