राज्यातील दुपारच्या पाच महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील


महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकीत कुणाला किती जागा? न्यूज अरेना ट्विटर हँडलवरील भाकित व्हायरल


महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीत कसे निकाल लागतील, याचा अंदाज News Arena India या ट्विटर हँडलने वर्तवला आहे. या ट्विटर हँडलच्या दाव्यानुसार, भाजपला  123 ते 129 शिवसेना म्हणजे शिंदे गटाला 25, राष्ट्रवादी काँग्रेसला 55 ते 56, काँग्रेसला 50-53 तर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला फक्त 17 ते 19 आणि इतर तसंच अपक्ष उमेदवारांना 12 जागा मिळतील असं भाकित करण्यात आलंय. शनिवार 17 जून रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास प्रकाशित झालेल्या या ट्वीटला आतापर्यंत चारशेपेक्षा जास्त रिट्वीट, 19 कोट रिप्लाय आणि अडीच हजारांच्या जवळपास लाईक्स आहेत. वाचा सविस्तर


बंदुकीच्या धाकावर पुण्यातील हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न, मालकाच्या कन्येचा पतीवर आरोप


पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोप हॉटेल मालकाच्या कन्येनं तिच्या पतीवर केला आहे. बंदुकीचा धाक दाखवून त्याची पॉवर ऑफ अटॉर्नी स्वतःच्या नावावर करुन घेतल्याचा आरोप मालकाच्या मुलीने केला आहे. तसंच, लग्नाआधी त्याने बलात्कार केल्याचा आरोपही फिर्यादी महिलने केला आहे. पती, दिर आणि सासू सासऱ्यांविरोधात महिलेने पोलिसांत तक्रार दिली आहे. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाचा सविस्तर


संत निवृत्तीनाथांची पालखी आज कर्जत शहरात मुक्काम, तर मुक्ताबाईंची पालखी पारगावला मुक्कामी 


सकळही तीर्थे निवृत्तीच्या पायी, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव, तुकाराम.... ज्ञानेश्वर माउली तुकाराम, असा हरिनामाचा गाजर करत राज्यभरातील दिंड्या पंढरपूरकडे मार्गक्रमण करत आहेत. टाळ मृदुंगाच्या तालात, हरिनामाच्या गजरात पंढरीची वारी भक्तिरसात न्हाहून निघाली आहे. अशा भक्तिमय वातावरणात संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी नगर जिल्ह्यात असून कर्जत शहराजवळ दाखल झाली आहे. कालच्या मिरजगाव गावातील मुक्कामानंतर संत निवृत्तीनाथ महाराज पालखी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तर संत मुक्ताबाईंची पालखी वडगाव मोरगाव मुक्कामानंतर पंढरपूरकडे मार्गस्थ झाली असून आज पारगावला मुक्कामी असणार आहे. वाचा सविस्तर


सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रुपयांची घसरण


जागतिक पातळीवर सोन्याच्या मागणीत घट झालीय. त्यामुळे सोन्याच्या दरात घसरण होत असल्याचं पाहायला मिळतंय. गेला आठवडाभरात दहा ग्राम सोन्याचे दर 63 हजार 300 रुपयांवरून 61 हजार 300 रुपये झाली. म्हणजे तब्बल दोन हजार रुपयांची मोठी घसरण झालीये. लग्नसराईचा सीजन संपता संपता दरात झालेली घसरण ग्राहकांना दिलासा देणारी आहे. वाचा सविस्तर


कोल्हापुरात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दोघांनी घेतली इमारतीवरुन उडी, एकाचा जागीच मृत्यू


कोल्हापुरात धक्कादायक घटना समोर आली आहे. जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकल्यानंतर कारवाईच्या भीतीने जुगार खेळणाऱ्या दोन तरुणांनी इमारतीवरुन उडी मारली. या घटनेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा तरुण जखमी झाला आहे. साहिल मिनेकर असं मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे. तर दत्तात्रय देवकुळे या तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. राजेंद्रनगरमध्ये परिसरात काल (18 जून) ही घटना घडली. वाचा सविस्तर