Sadabhau Khot : सांगोल्यातील हॉटेलमालक अशोक शिणगारे यांनी माजी आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांच्याकडे हॉटेलचे बील मागितल्यामुळे गेल्या चार-पाच दिवसांपासून एक नवीन वाद सुरू झालाय. परंतु, या सर्व प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते दीपक साळुंखे यांचा हात असून ज्याने हॉटेलचे बील मागितले तो अशोक शिणगारे हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, असा आरोप सदाभाऊ खोत यांनी केलाय.
 
सदाभाऊ खोत यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर करण्यात  आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. यावेळी हॉटेलमालक आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांचे फोटो सदाभाऊ खोत यांनी समोर आणले आहेत. याबरोबरच नऊ वर्षे आशोक शिणगारे गप्प का होते? एवढ्या वर्षानंतर त्याने हॉटेलचे बील कसे काय मागितले? असा प्रश्न सदाभाऊ खोत यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
 
सदाभाऊ खोत म्हणाले, "बील मागण्याच्या निमित्ताने माझ्यावर हल्ला करायचे नियोजन होते. या नियोजनाला राष्ट्रवादीच्या नेत्यांचा पाठिंबा होता. या आधी देखील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर हल्ला केला आहे. मला बदनाम करण्याचा राष्ट्रवादीचा प्लॅन होता. टोमॅटोसारखे गाल असलेल्या नेत्याचा हॉटेल मालकाला पाठिंबा आहे. या सर्व प्रकरणात दीपक साळुंखे यांचा हात आहे."


"माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तर मी गप्प बसणार नाही. मला खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला आहे. माझ्याबाबतीत राष्ट्रवादीच्या मनात सुडाची भावना आहे. त्यामुळे हा सुड उगवण्यासाठी राष्ट्रवादीकडून विविध पद्धतीने प्रयत्न केले जात आहेत. आमची तोंडं बंद करण्यासाठी असले उद्योग करण्यात येत आहेत.  परंतु, अंगावर आले तर शिंगावर घेणार असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. 


... तर न्यायालयात जाणार
या प्रकरणी आम्ही आमची लढाऊ लढू. यात सरकारकडून न्याय मिळाला नाही तर न्यायालयात जाऊ असा इशारा सदाभाऊ खोत यांनी दिला आहे. 


''17 एप्रिल रोजी मतदान झाले. 15 एप्रिल रोजी प्रचार संपला. निवडणूक झाल्यानंतर 25 दिवस प्रचाराचा काळ संपला असताना कार्यकर्त्यांना कसे काय जेवण घालू शकतो? ज्या कागदावर त्याने टिपण्णी केली त्याला नऊ वर्षानंतरही घडी पडली नव्हती. माझ्यावर आरोप करताना हॉटेलमालकाने तारखा आणि वेळ पाहिली नाही. निवडणुकीनंतर 15 दिवसांनी फोन केला, असे हॉटेल मालक सांगत आहे. शिवाय त्यावेली मी आमदार आणि मंत्री झाल्याचे बोलले असे तो सांगत आहे. परंतु, मी आमदार आणि मंत्री 2016 ला झालो, असे स्पष्टीकरण सदाभाऊ खोत यांनी दिले.