Aurangabad News: छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करण्याची भाजप नेत्यांमध्ये जणू स्पर्धाच लागली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यातच आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांची भर पडली आहे. कारण शिवरायांचा एकेरी उल्लेख करणारा दानवे यांचा एक कथित व्हिडिओ कालपासून सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर या विरोधात आज रावसाहेब दानवे यांच्या औरंगाबाद येथील निवासस्थानी शिवभक्त धडक देऊन जाब विचारणार आहे.


रावसाहेब दानवे यांचा एक कथित व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रतिक्रिया देताना दानवे छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करताना पाहायला मिळत आहे. सोबतच राज्यपाल यांनी केलेले वक्तव्य वादग्रस्त आहे का? हे तपासून पाहण्याची गरज असल्याचा दावा करत आहे. त्यामुळे दानवे यांच्या या कथेत व्हिडिओनंतर राज्यभरातील शिवभक्तांमध्ये संताप पाहायला मिळतोय. त्यामुळे दानवे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.


दानवेंच्या घरी शिवभक्तांची धडक...


छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करणारा रावसाहेब दानवे यांचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवभक्त आक्रमक होताना पाहायला मिळतात. त्यामुळे आज दुपारी 1 वाजता औरंगाबाद शहरातील सूतगिरणी परिसरातील रावसाहेब दानवे यांच्या निवासस्थानी शिवभक्त ढोल बजाव आंदोलन करणार आहे. तसेच शिवरायांचा एकेरी उल्लेख केल्याचा जवाब दानवे यांना विचारणार आहे. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


रावसाहेब दानवे यांचा कथित व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवभक्तांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सुरक्षेच्या दृष्टीने रावसाहेब दानवे यांच्या घरासमोर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तर आज दुपारी होणारे आंदोलन पाहता दानवेंच्या निवासस्थानी अधिक बंदोबस वाढवण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. 


वादग्रस्त विधानाची भाजप नेत्यांकडून मालिका सुरूच....


छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल वादग्रस्त विधान करण्याची भाजप नेत्यांमध्ये जणू स्पर्धा लागले असल्याचे चित्र आहे. कारण सुरुवातीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, त्यानंतर राज्यसभा खासदार आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी, मंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार प्रसाद लाढ आणि आता रावसाहेब दानवे यांनी केलेला शिवरायांचा एकेरी उल्लेख. त्यामुळे भाजप नेत्यांकडून सतत शिवरायांबद्दल होत असलेले वादग्रस्त विधान पाहता राज्यभरातील शिवभक्तांमध्ये मोठी नाराजी आहे. 


दानवेंचा खुलासा...


छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्याचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतांना यावर दानवे यांनी खुलासा केला आहे. हा व्हिडिओ दोन वर्षांपूर्वीचा जुना आहे. तर त्यावेळी याप्रकरणी मी संपूर्ण देशाची माफी देखील मागितली असल्याचा खुलासा दानवे यांनी केला आहे.