मुंबई : आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसआयएसशी संबंधित असल्याप्रकरणी परभणीच्या इक्बाल अहमद कबीर अहमदला मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी सशर्त जामीन मंजूर केला. एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हायकोर्टानं त्याची सुटका केली आहे.
इक्बाल अहमदला एक लाखाच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर खंडपीठाने जामीन मंजूर केला. तसेच अहमदला मुंबई एनआयए न्यायालयाच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला असून आपला पासपोर्ट तपास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यास सांगितले आहे. तसेच प्रकरणाच्या तपासात सहकार्य करावे, पुराव्यांशी छेडछाड करू नये आणि खटला पूर्ण होईपर्यंत मुंबई एनआयए अधिकारी बोलावतील तेव्हा चौकशीसाठी हजेरी लावावी, खटल्यादरम्यान प्रत्येकवेळी सुनावणीला हजर रहावे अशा अटीशर्तींसह अहमदला जामीन मंजूर करण्यात आला आहे.
दहशतवादी संघटना आयएसआयएसचा हस्तक असल्याच्या आरोपाखाली परभणीच्या 28 वर्षीय इकबाल अहमद कबीर अहमदला ऑगस्ट 2016 मध्ये अटक करण्यात आली होती. दरम्यान अहमदनं मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. आपल्या अटकेला चार वर्ष उलटून गेली तरी अद्याप खटला सुरू झालेला नाही. तब्बल दिडशे साक्षीदार या प्रकरणात आहेत. त्यामुळे आपल्याला जामीन मंजूर करावा, अशी मागणी अहमदनं हायकोर्टाकडे केली होती. मात्र राज्य सरकारकडून या जामीनाला विरोध करण्यात आला होता. दोन्ही युक्तिवाद पूर्ण झाल्यांनतर न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने आपला राखून ठेवलेला निकाल शुक्रवारी जाहीर केला.
न्यायालयात न्याप्रविष्ट असलेले खटले निर्धारित वेळेत पूर्ण होत नसल्यामुळे कैद्यांना कारागृहातच खितपत रहावे लागत, अशी खंत या सुनावणीदरम्यान न्यायालयानं बोलून दाखवली होती. खटला वेळेत सुरू होत नाही, त्याची कारणे काहीही असली तरी आरोपींना त्यामुळे कारागृहात रहावे लागतं, असे निरीक्षणही नोंदवलं.
काय आहे प्रकरण?
महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकानं (एटीएस) 7 ऑगस्ट 2016 रोजी इस्लामिक स्टेट (आयएस) शी संबिधंत असल्याच्या आरोपाखाली परभणीतील गुलजार कॉलनीत राहणाऱ्या इक्बाल अहमद कबीर अहमद (28) ला अटक केली. यापूर्वी अटक करण्यात आलेले आरोपी नासिर चाऊस आणि शहीद खान यांनी चौकशीदरम्यान या प्रकरणात अहमदची भूमिका सांगितल्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. अहमद हा 'परभणी मॉडेल' कटात सामील होता. हे दहशतवादी औरंगाबाद येथील एटीएस युनिटवर हल्ला करून माजी पोलीस अधीक्षक (एसपी) नवीनचंद्र रेड्डी यांना लक्ष्य करण्याची योजना आखत होते. ज्यांनी 2012 मध्ये सिमीच्या एका कथित म्होरक्याचा एन्काऊंटर केला होता. या प्रकरणानंतर हे प्रकरण एनआयएकडे हस्तांतरित करण्यात आलं होतं.