मुंबई : येत्या 16 ऑगस्टपासून महाराष्ट्रातील अनेक भागात नव्यानं झालेले केंद्रीय मंत्री आणि राज्यमंत्री यांच्या यात्रेचं नियोजन भाजपतर्फे केले जात आहे. 'जन आशीर्वाद' यात्रा असं नाव याला दिलं आहे.
नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील, भागवत कराड या मोदींच्या मंत्रिमंडळात नव्याने समावेश झालेले हे नेते महाराष्ट्रभर जन आशीर्वाद यात्रा काढणार आहेत. आपापल्या मतदार संघात न जाता इतर जिल्ह्यात या मंत्र्यांचा दौरा असणार आहे. लोकांशी संवाद साधण्यासोबतच केंद्रातील योजनांची माहिती देखील ते जनतेला देणार आहेत. भाजपच्या वतीने देशभर हा कार्यक्रम आखला गेला आहे.
देशभरातील 39 मंत्री जन आशीर्वाद यात्रेत सहभागी होणार आहे. महाराष्ट्रासह 22 राज्यांमध्येही यात्रा निघणार आहे. तब्बल 19 हजार 567 किमी प्रवास केंद्रीय मंत्री करणार आहे. या यात्रेदरम्यान दीड हजारहून अधिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 212 लोकसभा मतदारसंघापर्यंत पोहोचण्याचा भाजप प्रयत्न करणार आहे. महाराष्ट्रात नारायण राणे, कपिल पाटील, भारती पवार, भागवत कराड यात्रा करतील. नारायण राणे 20 ऑगस्टपासून यात्रा सुरू करतील
नारायण राणे यांच्यावर मुंबईसह कोकणाची जबाबदारी देण्यात आली आहे. भारती पवार पालघर जिल्हयातील आदिवासी भाग आणि उत्तर महाराष्ट्रात यात्रा करणार आहेत. कपिल पाटील यांच्याकडे ठाणे, नवी मुंबईची जबाबदारी आहे. तर मराठवाड्यात भागवत कराड आणि रावसाहेब दानवे हे जन आशीर्वाद यात्रेचे नेतृत्व करणार आहेत.
महाराष्ट्रातून नव्याने मंत्री झालेले चारही नेते आयात उमेदवार आहेत. भागवत कराड वगळता इतर नेत्यांना भाजप फारशी अंगवळणी पडली नाही. त्यामुळे या यात्रेच्या निमित्ताने या मंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांशी आणि मतदारांची जोडणे हा प्रमुख उद्देश आहे. शिवाय येणाऱ्या काळात महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीपूर्वी मोदी सरकारने केलेली कामगिरी जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. त्यामुळे या जन आशीर्वाद यात्रेनंतर लोकांचे आशीर्वाद भाजपाला मिळतात का हे बघावं लागेल.
संबंधित बातम्या :