गडचिरोली : पंधरा जवान आणि एका खाजगी वाहनचालकाचा मृत्यू झालेल्या 1 मे 2019 च्या गडचिरोली जिल्ह्यातील जांभूळखेडा घटनेचा सुत्रधार कुख्यात नक्षल नेता दिनकर गोटा याला अटक करण्यात गडचिरोली पोलिसांना यश आले आहे. 18 लाखांचे बक्षीस असलेल्या दोन नक्षलींना बुधवारी (4 मार्च) अटक करण्यात आली.

कुरखेडा तालुक्यातील मौजा दादापूर येथे नक्षलीनी 36 वाहने जाळली होती. लगेच दुसऱ्या दिवशी 1 मे 2019 रोजी नक्षलींनी भूसुरंगाचा स्फोट घडवून आणला. यामध्ये गडचिरोली पोलीस दलाचे 15 जवान आणि 1 खाजगी वाहन चालक शहीद झाले होते. या घटनेच्या मुख्य सुत्रधारांपैकी दिनकर गोटा एक होता. नक्षल्यांच्या उत्तर गडचिरोली विभागीय कमिटीचा तसेच कोरची दलमच्या उपकमांडर पदावर कार्यरत असलेला दिनकर गोटा आणि कोरची दलमच्या सदस्य पदावर कार्यरत असलेली महिला नक्षली सुनंदा कोरेटी हिच्यासह गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष तपास पथकाने पहाटे गडचिरोली पोलीस स्टेशनच्या हद्दीतून अटक केली.

नक्षली दिनकर गोटाची गडचिरोली जिल्ह्याच्या उत्तर भागात पकड होती. दिनकर गोटा याच्यावर गडचिरोली जिल्ह्यात एकूण 108 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. यामध्ये 33 खूनांचा समावेश आहे. त्याच्यावर एकूण 16 लाखांचे बक्षीस होते. सुनंदा कोरेटी त्याची पत्नी असून तिच्यावर 2 लाखांचे बक्षीस होते. ती 2009 साली नक्षल दलममध्ये भरती झाली. सध्या ती नक्षल्यांच्या कोरची दलम सदस्य पदावर कार्यरत होती. तिच्यावर एकुण 38 गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. 28 फेब्रुवारी 2020 रोजी उत्तर गडचिरोली विभागीय समिती सदस्य पदावर कार्यरत असलेला विलास कोल्हा याने एके-47 शस्त्रासह आत्मसमर्पण केले होते. तर नुकतेच चातगाव दलम कमांडरसह संपुर्ण चातगाव दलमने आत्मसमर्पण केले होते. जांभुळखेडा घटनेचा संपूर्ण तपास करुन तपास एनआयएकडे हस्तांतरीत करण्यात आला होता. आरोपींना गडचिरोली पोलीस दलाने यापुर्वीच अटक केली. यानंतर गडचिरोली पोलीस दलाने कुख्यात नक्षली दिनकर गोटा याला अटक केल्याने उत्तर गडचिरोली भागात नक्षलवाद्यांना जबर धक्का देण्यात गडचिरोली पोलीस दलाने यश मिळविले आहे.

नक्षली दिनकर गोटा व सुनंदा कोरेटी यांना न्यायालयाने 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनकर गोटा हा सप्टेंबर 2019 मध्ये एका नक्षल महिलेसह दलम मधुन बाहेर गेल्याची माहिती गडचिरोली पोलीस दलाला मिळाली होती. यानंतर सातत्याने गाडचिरोली पोलीस दल नक्षली दिनकर गोटा याच्या मागावर होते. अखेर आज गडचिरोली पोलीस दलाच्या अखंड प्रयत्नांना यश आले. त्यानंतर जहाल नक्षली दिनकर गोटा आणि सुनंदा कोरेटी यांना जेरबंद करण्यात गडचिरोली पोलीस दलास यश मिळाले आहे. दिनकर गोटाच्या अटकेमुळे 1 मे 2019 रोजी जांभूळखेडा घटनेतील शहीद जवानांना न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

Naxal Leader Surrender | नक्षली कमांडर विलास कोल्हाचं गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण | ABP Majha



संबंधित बातम्या : 

गडचिरोली जिल्ह्यासाठी 231 कोटींचा निधी मंजूर, मानव विकास निर्देशांकात सुधारणा करण्याचे अजित पवारांचे आदेश

नववर्षाच्या पूर्वसंध्येला गडचिरोली पोलीस दलास अभूतपूर्व यश, पाच जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण