शिक्षण विभागाने याआधी शालेय सहली संदर्भात एक परिपत्रक काढले. त्या परिपत्रकातील अटी-शर्ती म्हणजे शालेय सहली मुख्याध्यापकांनी काढूच नयेत यासाठी केलेला नकारात्मक खटाटोपच होता...! दोन वर्षांपूर्वी अलिबागच्या समुद्रकिनाऱ्यावर काही शालेय मुले पोहताना बुडून मृत्युमुखी पडली होती. या घटनेच्या अनुषंगाने संबंधित शिक्षण संचालकांनी शालेय सहली संदर्भात जाचक अटी -शर्तीचे परिपत्रक सर्व शाळांना पाठवले. त्यामुळे मुख्याध्यापकांनी शाळेत सहली काढण्याचे बंद केले. सहाजिकच शैक्षणिक वर्षातील एक चांगला उपक्रम बंद पडल्याने विद्यार्थ्यांचा हिरमोड तर झालाच. पण त्याचा अप्रत्यक्ष फटका एसटी महामंडळाला बसला होता.
दरवर्षी शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीला मिळणारे हमखास उत्पन्न एकदमच कमी झाले. 2017-18 या शैक्षणिक वर्षात शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीला 63कोटी उत्पन्न मिळाले होते. ते या तथाकथित परिपत्रकामुळे 2018-19 मध्ये 24 कोटी पर्यंत घसरले. यंदाच्या वर्षी मात्र एसटी महामंडळाने पुढाकार घेऊन, थेट मुख्याध्यापकांना आवाहन केले. शालेय सहली एसटीच्या बसेसमधून काढाव्यात, यासाठी प्रत्येक आगाराचे प्रमुख शाळेत जाऊन शिक्षक, विद्यार्थ्यांना भेटले, त्यांना प्रोत्साहित केले. त्यामुळे 2019-20 या शालेय वर्षात एसटीला शालेय सहलीच्या माध्यमातून 60 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. सन 2018-19 तुलनेत या वर्षीच्या उत्पन्नात 36 कोटींनी वाढ झाली आहे.
शालेय सहलीसाठी शासन विद्यार्थ्यांना एसटीच्या प्रासंगिक करारावर 50 टक्के सवलत देते. त्यामुळे इतर खासगी बसेसच्या तुलनेत शाळांना एसटीने सहल काढणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे असते. त्यामुळे ग्रामीण भागात सर्वच शाळा प्रामुख्याने सहलीसाठी एसटीलाच प्राधान्य देतात. यंदा एसटी प्रशासनाने घेतलेल्या सकारात्मक पुढाकारामुळे अनेक शाळांनी सहली काढण्याचा प्रयत्न केला. अर्थात विद्यार्थ्यांसाठी शालेय सहलीच्या माध्यमातून एसटीने त्यांचा बालपणीच्या आठवणींचा "हळवा कोपरा" मात्र जाणीवपूर्वक जपण्याचा प्रयत्न केला आहे, याचे कौतुक होत आहे ...!
शालेय सहली :
वर्ष बसेसची संख्या उत्पन्न (प्रतिपूर्तीसह)
2017-18 14547 63 कोटी
2018-19 5248 24 कोटी
2019-20 10789 60 कोटी
एसटीच्या उत्पन्न वाढीसाठी शालेय सहलींचे योगदान हे खारुताई चा वाटा असला तरी, सध्याच्या एसटीच्या आर्थिक स्थितीला खारू ताईचा हा वाटा ‘मोलाचा’ ठरलाय .